सोमवार, २४ मार्च, २०१४

लोकलकथा

माझा एक सहकारी प्राध्यापक मित्र पीएचडी करतोय. त्याचा विषय आहे की मुंबईतील रेल्वे कशा प्रकारे एक लहान विश्व आहेत -  स्वताचे वेगळेपण असणारे. या मोठ्या विश्वात आणखी लहान लहान विश्वे.  रेल्वेमुळे कशा पद्धतीने समाज आणि त्यातील घटक बांधले जातात वगैरे. या तत्सम तांत्रिक गोष्टी तो माझ्याशी बराच वेळ बोलत होता. तर या विषयावर बोलत असताना रेल्वेतील भिकारी, भजनी मंडळे, ग्रुप्स, पाकिटमार, भेळवाले असे अनेकविध विषय माझ्या डोळ्यासमोर आले. पुढे मागे यातील एका विषयावर आपणही पीएचडी करण्यास हरकत नाही.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्या रेल्वेची ओळख फार लहानपणीच झाली.  त्यावेळी आणि आतापण हा प्रवास फारसा सुखकारक आहे असे कधी वाटले नाही.  दिवाळीला बाबांच्या ऑफिसमधे लक्ष्मीपूजेसाठी आम्ही जात असू, त्यावेळी कांदिवली ते चर्नी रोड हा तासभराचा प्रवास कधी संपेल असे वाटे. कंटाळा येई.  शाळेत असताना एकदा मी फर्स्ट क्लास ने प्रवास केला होता. टिकिट मात्र सेकंड क्लासचे होतं. त्यावेळी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास काही माहित नव्हतं.  स्टेशनला टीसीने पकडलं आणि विचारलं 'टिकिट' ,  मग मी सेकंड क्लासचं टिकिट दाखवताच त्याने विचारलं की 'फर्स्ट क्लासने कशाला आलास?' मग मी  विचारलं की "फर्स्ट क्लास म्हणजे काय?" त्या बिचार्याला माझ्या अज्ञानाची दया आली असावी. त्याने मला सोडून दिलं.

कॉलेजमधे असताना पहाटे ५. ३० ची लोकल पकडायला लागायची. सातच्या ठोक्याला एप्रन घालून लॅबमधे हजर असलच पाहिजे असा दंडक होता.  उशीरा येणार्याना  कुलकर्णी सर अशा नजरेने पाहत की, अख्या वर्गात आपण 'होपलेस' आहोत आणि आपण रसायनशास्त्रावर काळिमा आहोत असे वाटे. सोबतीला आणखी एक जण असल्यावर हा काळिमा आणि होपलेस'पणा वाटून घेतल्यासारखे वाटे.  सकाळची ही लोकल सुटली की दहा मिनिटे थांबावे लागे.  पुलं म्हणतात तसे मुंबईकराचे घड्याळ हे त्याच्या नशिबालाच बांधलेले असते. 
नेहमीची लोकल चुकल्यानंतरचे दुःख फ़क्त मुंबईकरालाच अनुभवता येईल.  भल्या पहाटे देखील बसायला थर्ड सीट किंवा किमान चौथी सीट मिळणे कठीण. अशा वेळी ज्यांना विंडो सीट मिळते त्यांच्या नशिबात चांगले ग्रह असावेत.   सकाळच्या गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेन मधे चढणार्याचे कसब पाहून कौतुक वाटे.

लोकलच्या या गर्दीतही ग्रुप असतात. रोज रोज एकाच ट्रेनने जाणारे अनोळखी चेहरे हळू हळू एकमेकांना नावाने ओळखू लागतात.  "आपला माणूस" म्हणून त्याच्यासाठी जागा धरली जाते.  त्याला  निदान नीट उभं राहायला मिळावं अशी अपेक्षा असते.  मग या जागा अडवून ठेवण्यावरून भांडणे होतात.  क्वचित प्रसंगी मारामारी होते.  इथे लोक ग्रुपने मार खातातही आणि मार देतातही ! इथे बहुतेक सर्व सण साजरे केले जातात.  एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले जाते.  वयानुसार प्रत्येकाची यथोचित थट्टा मस्करी पण होते.  गटारीचे प्लान बनवले जातात, कधी कधी वडे समोसे आणले जातात.

या तास दीडतासाच्या प्रवासात काही भजनी मंडळी कोकलून इतर प्रवाशांचा जीव खातात.  निवडक काही अप्रतिम गाणारे असतात.  बाकी नुसता टाहो.  काही दिवसांपूर्वी विरार लोकलच्या लेडीज़ डब्यात एका बाळाचा जन्म झाला, तेव्हा लोकांना कोण आनंद ! गाडी वीस मिनिटे स्टेशन वर थांबली तरी एरवी सेकंदासाठी कुरबुरी करणार्या कुणीही तक्रार केली नाही. 

माधवनचा 'रहना है तेरे दिल में' आठवतोय ? त्यात तो दिया मिर्ज़ाचा हात हातात घेऊन तिचे भविष्य सांगताना म्हणतो की, "तेरे हातों में लम्बी रेखाएं नहीं है, सब लोकल ट्रेन की पटरियां ही है" किंवा लोकलच्या दरवाज्यात उभा राहून राणी मुखर्जी वर लाइन मारणारा 'साथिया'तला विवेक ओबेरॉय, शेवटची लोकल चुकल्यामुळे अनपेक्षित प्रसंगाना सामोरे जावे लागणारा 'एक चालीस की लास्ट लोकल ' मधला अभय देओल असो.  बॉलीवुडने लोकल ट्रेनला कथावस्तूचा एक भाग म्हणून स्वीकारलय.  'ह्यूगो' नावाच्या हॉलीवुड चित्रपटात तर रेल्वे स्टेशन वरच सर्व महत्वाच्या घटना घडतात.

विजय तेंडुलकरांची 'झपूर्झा' नावाची श्रुतिका आहे.  त्यात त्यांनी बॅकग्राउंडला लोकल ट्रेनचा प्लॉट घेतलाय. संध्याकाळी घरी परतणारा म्हातारा त्याच्या मनातले विचार, त्याचे कुटुंब, ट्रेनमधले प्रवासी या सर्वांचा त्यांनी ज्या शैलीने मिलाफ केलाय.. मानना ही पडेगा !!  ती श्रुतिका उत्तरोत्तर मनावर असा ताबा मिळवते की त्या ट्रेनमधील त्या कम्पार्टमेंट मधे आपणच आहोत असे वाटते.  वपुंचे 'कर्मचारी' पुस्तक लोकलकथांनी भरलेले आहे.

मुंबईवर जेव्हा दहशती हल्ला झाला तेव्हा लोकल ट्रेन्समधली निरागस माणसे हकनाक मारली गेली.  ते भयाण दिवस विसरणे कधीही शक्य नाही. पण या सर्व संकटांतूनही माणसे पुन्हा उभी राहिली.  पुन्हा जीवावर उदार होऊन स्टीलचा रॉड पकडत ऑफिसला जाऊ लागली.  "स्पिरिट ऑफ़ मुंबई"चे गोडवे गायले गेले, पण या सर्व धैर्यामागे शूरपणा नव्हताच. होती ती फ़क्त अगतिकता. एक दिवस कामावर गेलो नाही तर पगार बुडेल किंवा काहींच्या बाबतीत घरी चूलच पेटणार नाही ही परिस्थिती.

कष्टकर्यांच्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणार्या अस्सल मुंबईकराला अजूनही 'विंडो सीट'चच स्वप्न पडतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा