रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

वाचायची राहून गेलेली पुस्तके

घरात पाऊल टाकलं की टेबलावर असलेला पुस्तकांचा ढीग नजरेस येतो. कितीक दिवसांपासून ती अशीच पडली आहेत. त्यातील बरीचशी अर्धी वाचून ठेऊन दिलेली, काही संदर्भासाठी कपाटातून काढलेली, काहींचं पहिलं पानही न उघडलेलं. वीस - तीस असावीत. आईची सतत भुणभुण की पसारा आवर. पसारा आवरायला घेतला कि मी हटकून एखाद्या पुस्तकाच्या पुन्हा प्रेमात पडणार, एखादा paragraph वाचता वाचता एक तास त्यात जाणार. पुलंनी लिहिलेला 'निळाई' लेख, फक्त एकदा नजरेखालून घालतो म्हणून वाचायला लागलो तर थेट वेनिसला जाऊन पोहोचलो. आईने तासाभराने आठवण करून दिली तेव्हा कुठे भानावर आलो.
आम्हा पुस्तकवेड्यांना स्थळ, काळ याचं भान राहतच नाही. फोर्टच्या रस्त्यांवर पुस्तके विकणाऱ्या माणसांना आम्ही परग्रहावरचे वाटत असू. त्याने प्रदर्शनाला ठेवलेल्या पुस्तकांच्या एकदम तळाशी असलेलं एखादं पुस्तक आम्ही मागणार, त्याचा ब्लर्ब वाचणार, मुखपृष्ठ कौतुकाने पाहणार, किती जुनी आवृत्ती आहे हे बारकाईने पाहणार, मधली पाने व्यवस्थित आहेत ना, पानांचा वास घेऊन अंदाजपंचे किती जुनं आहे याचे मनोमन गणित करणार, कुणी बरं लिहिलं होतं / सुचवलं होतं या पुस्तकाबद्दल ? हे आठवत बसणार, तोपर्यंत उभ्याने दोन पायांच्या कवायती करून झालेल्या असतात, अर्धा एक तास पुस्तक आपण न्हाहाळत असतो. विक्रेता साड्यांच्या दुकानातील सेल्समनसारखा डोक्यावर बर्फ ठेवून विचारतो, 'लेने का है क्या?' मग आपण किंमत विचारणार, त्याने सांगितलेली किंमत अर्थातच आपल्याला पटलेली नसते. मग त्यावर घासाघीस. कुठल्याही परिस्थितीत पुस्तक हातून जाऊ द्यायचं नसतं आपल्याला. शेवटी तडजोड होते. चांगल्या पुस्तकाची किंमत नाही करता येत असा विचार करून आपण समाधान करून घेतो. नवीन पुस्तक प्रवासात वाचत घरी येतो, पुढचे दोन तीन दिवस अर्धं वाचून होतं मग कामाच्या व्यापात अर्धं तसंच राहून जातं. अशी अर्धी वाचून झालेली पुस्तके कपाटातून आपल्याकडे रागाने पाहत आहेत असे वाटते. 

एखादं पुस्तक इतकं खिळवून ठेवणारं असतं की एक - दोन दिवसातच वाचून पूर्ण होतं. फोरसिथ, ग्रिशमच्या कादंबऱ्या अशापैकीच. रात्र रात्र जागून कादंबऱ्या संपवण्याची नशा वेगळीच असते. गोनिदा, पेंडसे, यांच्या कादंबऱ्या रात्री जागून वाचलेल्या, 'पडघवली' वाचून संपवली तेव्हा पहाट होत होती आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि योगायोगाने कादंबरीच्या शेवटीही तशाच पावसाचे वर्णन आहे.
पुलंच 'अपूर्वाई' मला पूर्ण वाचायचंय, पण कधीचा मुहूर्त येईल ठाऊक नाही, गेल्या चार वर्षात मी ते चारदा विकत घेतलंय. कधी मित्रांनी ढापलं, कधी कुणाला वाचायला दिलं त्यांनी परतच केलं नाही.
काही पुस्तके गेल्या काही वर्षांपासून माझ्या रीडिंग लिस्ट वर आहेत. एका कुंद पावसाळी संध्याकाळी वाचण्यासाठी मी Eliot च्या कविता ठेवल्यात, गावी आमराईत बसून निवांत दुपारी वाचता येईल म्हणून फास्टर फेणे, फेलूदा घेऊन ठेवलेत. अधेमधे त्यातल्या काही साहसकथा वाचतो पण अथ पासून इति पर्यंत नाही.
बालकवींच्या कविता पूरवून वाचतोय. कधी एखादी कविता एक दिवस पुरते कधी महिनोंमहिने डोक्यात घुमत राहते. सुनीताबाईंच्या 'सोयरे सकळ' 'मण्यांची माळ' तसेच  माधव आचवल यांच्या 'किमया' मधील ललितलेख एका बैठकीत नाही वाचता येत. प्रत्येक लेख मनात हळू हळू झिरपावा लागतो.  जी. ए. कुलकर्णी ( Genius GA असं आम्ही मानतो ) यांची कथा परत परत वाचावी लागते तेव्हा कुठे त्यांनी योजलेल्या शब्दकळेचं सामर्थ्य आणि सौंदर्य ध्यानात येतं.
 एकदा तर असं ठरवलं कि एक पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचाच नाही. पण कितीही पक्का निर्णय केला तरी किमान तीन पुस्तके simultaneously (एकसमयावछ्चदेकरून) वाचायची सवयच लागली आहे. अशात बरीच पुस्तके अर्धी वाचायची राहूनच जातात. मित्र जेव्हा विचारतात कि इतकी पुस्तके वाचतोस केव्हा, त्यावेळेस वाटतं यांना सत्य परिस्थिती कुठे माहितेय?
 सध्या काय वाचतोयस? या प्रश्नाला मी अताशा खरं उत्तर देणे टाळतो, कारण हातातलं पुस्तक कधी संपवता येईल याची खात्री नाही. म्हणूनच ग्रंथालयातून ठराविक मुदतीसाठी पुस्तके आणणे मला जमत नाही.

पुस्तकांच्या बाबतीत मी आळशी आहे, पण काही झालं तरी पुस्तके  माझी कागाळी कुणाकडे करणार नाहीत, अबोला धरणार नाहीत किंवा रागावणार नाहीत, त्यांच्या पानांत दडवून ठेवलेली सुगंधी गुपिते सुरक्षित जपून ठेवतील. 




रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

चप्पल

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधे एक इमारत कोसळली तेव्हाची गोष्ट. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना  काढताना  प्रसारमाध्यमे Live दाखवत होती.  ७२ तास ढिगाऱ्याखाली असलेल्यांच्या जिवंत असण्याविषयीच साशंकता होती. त्यात या संकटातून वाचलेल्यांच्या मुलाखती चालू होत्या. 'आपको अब कैसा लग रहा है ?' सर्वात फालतू प्रश्न. जीवावरच्या संकटातून वाचलेल्याला काय वाटणार?
माणसे रडत होती. एकाने मोबाईल फोनमुळे आपण वाचलो असे सांगितले, एकाने आपण जगणार असल्याची आशाच सोडली होती, पण वाचलो असे सांगितले,  तेवढ्यात बचावदलाने आणखी एका जिवंत माणसाला बाहेर काढताच पत्रकारांचा आणि कॅमेरावाल्यांचा ओघ तिकडे सरसावला. त्या माणसावर फोकस करून परत तोच प्रश्न विचारला - 'आपको अब कैसा लग रहा है ?' त्या माणसाने बावचळल्यासारखे केले आणि बचावदलातील एका माणसाला विचारले 'मेरी चप्पल किधर है?'
Pause.
सगळे अचंबित.
इतक्या मोठ्या संकटातून वाचलेल्या माणसाला स्वतःच्या जीवाचे मोल नसून एका शुल्लक चपलेचे आहे असे वाटले. दुसऱ्या दिवशी बहुतेक सर्व वर्तमानपत्रांनी ही घटना प्रकाशित केली.
चपलांवरून असे अनेक किस्से आठवले.


***

पुलंच्या 'गुळाचा गणपती' चित्रपटात एका प्रसंगात मोठी जाहीर सभा घडतेय असे त्यांना दाखवायचे होते, पण इतकी माणसे आणणार कुठून ? त्यांनी एक शक्कल लढवली. शूटिंगला जमलेल्या सर्वांना त्यांच्या चपला काढून त्यांचा ढीग बनवायला सांगितला. सभेला येणारा प्रत्येकजण बाहेर चप्पल काढून आत जातोय असे दाखवले. background ला नेत्याचे भाषण ऐकू येतेय. खऱ्याखुऱ्या सभेचे चित्र उभे राहिले.

*** 

IBN लोकमत वर 'यंगिस्तान जिंदाबाद' हा चर्चासत्राचा  कार्यक्रम लागतो. आजच्या तरुणाईला भेडसावणारे प्रश्न त्यात मांडले जातात. ग्रामीण , शहरी भागातील तरुण मुले ह्यात आपले विचार मांडतात. मागे एकदा विषय होता 'देव आहे की  नाही?' यावर खडाजंगी झाली. बरीच मते मांडली गेली. मूळतः हा विषय फार प्राचीन आहे, आस्तिक, नास्तिक, विज्ञानवादी असे बरेच गट आहेत. एका मुलाने मी देव का मानत नाही याचे विश्लेषण करताना उदाहरण दिले कि. 'मी देवळात गेलो, देवाचे दर्शन घेतले. बाहेर आलो तर माझी चप्पल गायब ! जो देव माझ्या चपलेचे रक्षण करू शकत नाही तो माझे रक्षण कसे करणार ?'
यावर एक हशा आणि बऱ्याचशा सहमतीसाठी डोलावलेल्या माना.
 पांडुरंगशास्त्री आठवलेंनी एकदा म्हटलं होतं 'तुमच्या चपलांची रक्षा करायला देव आहे का? ज्याने ही भव्य, सुंदर सृष्टी निर्माण केली, जो तुमचे हृदय चालवतो, बाळ जन्माला येताच पहिला श्वास कसा घेते हे अजून विज्ञानालाही सुटले नाही असे कोडे आहे त्या चिद्घन शक्तीवर चप्पल चोरीला गेली म्हणून अविश्वास दाखवता?'

***
गेले ते दिन गेले जेव्हा मोठा भाऊ राम वनवासात गेला म्हणून धाकट्या भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादूका सिंहासनावर ठेऊन राज्य केले. आता लोकशाही व्यवस्थेत निरंकुश सत्ता भोगणाऱ्या राज्यकर्त्यांकडे स्वतःच्या चपलांसाठीच वेगळे सदन असते.
राज्यकर्त्यांवर चप्पल फेकून मारणे ही आजच्या काळातील असंतोष व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. 

***

कमलेश्वर हे हिंदीतले नावाजलेले लेखक. त्यांची 'चप्पल' ही कथा माझी अत्यंत आवडती. उपहासात्मक कसं लिहावं याचा वस्तुपाठ त्यांचे लेखन वाचताना मिळतो. 'चप्पल' या कथेत लेखक त्याच्या आजारी नातेवाईकाला भेटायला हॉस्पिटलमधे जातो , तिथल्या रुग्णांच्या वेदनांनी तो हेलावून गेलाय, त्याला जन्म - मृत्यू - ईश्वर याबद्दल विचारमग्न केलंय.  लिफ्टमधे त्याची भेट एका सात - आठ  वर्षाच्या लहान मुलाशी होते, त्याला व्हीलचेअरवर बसवलंय आणि त्याच्या पायातील निळ्या हवाई चपलांवर त्याचे विशेष प्रेम आहे, लिफ्टमधून बाहेर पडताना जेव्हा त्याची एक चप्पल मागे पडते तेव्हा त्यासाठी तो बाबांना गळ घालतो. त्याच मुलाचे दर्शन तीन तासांनी लिफ्टमधे स्ट्रेचर वर होते, यावेळी त्याचा एक पाय कापला गेलाय, तो बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्या निळ्या हवाई चपला बाबांच्या हातात आहेत. ते काहीतरी विचार करतात आणि लिफ्टमधून बाहेर पडल्यावर त्या कोपऱ्यात फेकून देतात आणि क्षणभरानंतर परत उचलतात त्यांना बहुतेक वाटत असावं शुद्धीत आल्यावर तो चपला मागेल. कमलेश्वर म्हणतात, तो परत शुद्धीत आल्यावर चपला मागेल कि स्वतःचा कापलेला पाय ?
एका प्राचीन संस्कृतीचा भाग असल्यामुळे वेदनांना सामोरं जाण्याचं धैर्य येतं किंवा त्या वेदनांना 'पुनर्जन्म' नावाचं गोंडस उत्तर देऊन मनाची समजूत घालता येते.

***

'व्यक्ती आणि वल्ली' मधे 'चितळे मास्तर' वाचताना शेवटची ओळ मनाला चटका लावून जाते -
''मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टेंडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले - - कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या !''