सोमवार, १९ मार्च, २०१८

आयुष्य वाया कसं घालवावं?


एका निवांतशा संध्याकाळी आयुष्याकडे वळून पाहताना आपण जगलो ते आयुष्य खरंच worth होतं का? काय कमावलं? काय गमावलं? याचा आलेख मांडताना जे काही मनात दाटून येत असेल ते म्हणजे 'The Remains of the Day'. कसुओ इशीगुरु या ब्रिटिश लेखकाची १९८९ प्रकाशित झालेली कादंबरी. तिला बुकर प्राईझ मिळालं, या पुस्तकावर आधारित फिल्मला ८ अकॅडेमी नॉमिनेशन्स मिळाले.

तर या पुस्तकाने मला अंतर्यामी फार हलवलं, इतकं की,वाचून झाल्यावर नैराश्याच्या भावनेने काही दिवस मी  रोजचं वर्तमानपत्रही ढुंकून पाहिलं नाही. अजून काही वाचावंसं वाटत नव्हतं.

या पुस्तकाचा सारांश एका वाक्यात करायचा झाला तर - आयुष्य वाया कसं घालवावं याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे या पुस्तकातील स्टीवनची आत्मकथा. एखादा माणूस आपल्या स्वप्नांविषयी, भावनांविषयी एकंदरीत स्वतःच्या आयुष्याविषयी किती क्रूर वागू शकतो?

स्टीवन एक बटलर आहे. Darlington Hall नावाच्या एका राजेशाही वाड्यात Lord Darlington यांची सेवा करण्यात त्याने आयुष्य वेचलय.  दुसऱ्या महायुद्धानंतर सगळं बदललं. वाड्याची मालकी आता अमेरिकन Mr Farraday यांच्याकडे आलीय. नवीन मालकाने सुचवल्यामुळे रोड ट्रीप साठी निघाल्यावर प्रवासात स्टीवन स्वतःच्या गतायुष्याकडे पुन्हा पाहतोय. त्याचे बाबाही बटलर. टिपिकल राजेशाही इंग्लिश वातावरणाचा बटलर हा अविभाज्य भाग होता. बटलर, हाऊसकिपर, फूटमॅन अशा पदांच्या उतरंडी. बटलर पदापर्यंत पोचण्यासाठी कित्येक वर्षांचा अनुभव लागे. बटलरने आपलं अस्तित्व जाणवू न देता घरातील सर्व कामे पार पाडायची.
या प्रवासात स्टीवन आपल्या कारकिर्दीत ( कसली कारकीर्द, डोंबलाची!) आपण काय जोखमीची कामे केली याची उदाहरणे देतो जिथे त्याच्यामते भावनांना आवर घालावा लागला.  उदाहणार्थ एका प्रसंगात त्याचे बाबा मृत्युशय्येवर आहेत आणि त्याला हॉलमध्ये पार्टीची व्यवस्था बघावी लागते. काही कालानंतर बाबा वारल्याचे कळल्यावर देखील त्याला पार्टीत पाहुण्यांना ड्रिंक्स सर्व करत हिंडावे लागते. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना देखील मागे सारावे लागते.

स्टीवनचे बाबा. वयाची ऐंशी वर्षे ओलांडली तरी चाकरी करताहेत. एकदा चहाचा ट्रे नेताना पाय घसरून पडतात. त्यांना मग अशी कामं दिली जात नाहीत, कुणा पाहुण्यांच्या अंगावर चहा सांडला तर?
याच म्हाताऱ्या बाबांना नंतर lawn मध्ये ट्रेसह पायऱ्या चढण्या उतरण्याची प्रॅक्टिस करताना स्टीवन बघतो.
दुष्यन्त कुमार यांची ओळ आठवते अशा वेळी : ये लोग कितने मुनासिब है इस सफर के लिए.

मिस केंटन घरातील हाऊसकिपर आहे. तिचं स्टीवन वर प्रेम आहे,  बऱ्याचदा ते जाणवू देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी दुसऱ्याशी लग्न केलं. आयुष्यात प्रेम नावाची गोष्टच नाही.
या रोड ट्रिप मध्ये हे सगळं तो आठवतोय. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असल्याने बरेच राजकीय संदर्भ येतात, या मोठ्या राजकीय पटलावर आपणही काही तरी योगदान दिलंय, आपल्या सेवेमुळे मोठे निर्णय घेता आले असं स्टीवनचं मत आहे. घरातील चांदीची भांडी लखलखीत असल्यामुळे पाहुण्यांना आत्मिक शांती मिळाली असं त्याचं मत.
Lord Darlington यांच्या ज्यू द्वेषामुळे ज्यू नोकरांना कामावरून काढून टाकलं जातं याचा त्याला विरोध करता येत नाही कारण साहेबांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असावा असं याचं मत. स्वतःची काहीच मते नाहीत.

आपल्या कामाच्या dignity बद्दल स्टीवन जे स्पष्टीकरण देतो ते मुळात वाचण्यासारखं आहे. आपण आयुष्यभर आपलं काम डिग्निटीसह करण्याचा प्रयत्न केला असं त्याचं म्हणणं.

एका बटलरच्या - एका नोकराच्या आत्मकथेतून नेमकं काय सुचवायचंय लेखकाला? असं आयुष्य जगू नये.
हा तर साधा निष्कर्ष झाला. मग कसं जगावं?

आपण आपल्या मनाप्रमाणे करीअरचं क्षेत्र निवडतो, काहीतरी भव्य करावं, या विशाल पटलावर काहीतरी योगदान द्यावं, राबराब राबतो, काही प्रसंगात कौतुक वाट्याला येतं आणि ते प्रसंग कोरले जातात मनावर. त्यांच्याच शिदोरीवर आणखी  राबराब राबतो. व्याकुळ संध्यासमयी मग आयुष्याची उजळणी करताना काय उरलं याचाच विचार येतो. मग कसे जगलो आपण? डिग्निटीसह जगलो का?

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा