सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

रवींद्रनाथांचा 'काबुलीवाला'

           काही माणसं आपल्या मनात वस्तीला येतात, त्यातलीच काही कायमचं अधिराज्य गाजवतात. आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर त्यांचा स्नेह मिळतो, दुःखाच्या प्रसंगी धीर द्यायला ते सरसावतात तर सुखाच्या वेळी त्यांची हमखास आठवण येते. पुस्तकांतून भेटलेली माणसे पण अशीच असतात. त्यांची सुख - दुःखे, त्यांचा तर्हेवाईकपणा, त्यांची विचार करण्याची शैली आपलीच आहे असं वाटतं. माझ्या आठवणींच्या कुपीत पुलंचा 'नंदा प्रधान', सुर्व्यांच्या 'पोस्टर' मधील 'इसल्या', माडगुळकरांच्या शाळेतील 'दिनू',  जी. ऐं.च्या राणी कथेतील 'आजोबा' तसेच साने गुरुजींचा 'श्याम' खुशीने सामावलेत.या माणसांच्या पंक्तीत रवींद्रनाथांचा 'काबुलीवाला' आपला दरारा निर्माण करून आहे.
             रवींद्रनाथांच्या कथा, त्यातील व्यक्तिरेखा सारं काही स्तिमित करणारं.  पुलं जसे म्हणतात तसे या माणसाला किती तरी मोठी स्वप्ने पडत होती.  तपनदांनी बनवलेला काबुलीवाला आवडलाच पण लेखणीतलाच काबुलीवाला मनात पक्का ठाम आहे.  लेखक किंवा कथेचा निवेदक, त्याची लाडकी मुलगी मिनी  व काबुलीवाला ही मुख्य पात्रे. अफगाणीस्तान व त्या दूरच्या देशांतून हिंग, सुका मेवा विकायला प. बंगालात येणार्या पठाणाची ही कथा.
                लेखकाच्या निवेदनातून एकेक घटना उलगडत जाते. लेखक काळाची चक्रे फिरवतो व आपण क्षणार्धात पंधरा - सोळा वर्षे मागे जातो. काही कथा वगैरे लिहित असताना त्याची लाडकी मुलगी मिनी (वय वर्षे अंदाजे पाच ) त्याच्या लेखनसमाधीत व्यत्यय आणत असते. तिच्या बालसुलभ प्रश्नांना उत्तरं देता देता त्याचा जीव मेटाकुटीला येतो. तेवढ्यात ती खिडकीतून रस्त्यावरून जाणार्या पठाणाला हाक मारते -"काबुलीवाला ss ओ काबुलीवाला" अन्  घाबरून लेखकामागे लपते.  लांब वाढवलेली दाढ़ी , धिप्पाड शरीर, पायघोळ झ़गा आणि खांद्यावर झोळी असा काबुलीवाल्याचा अवतार.  आजच्या आया जसं आपल्या मुलांना पोरं पकडून नेणार्यच भय दाखवतात तसंच  भय या बंगालमधील बायका या पठाणांच  घालत असत. मग दंगा करणारं पोर लगेच गप होई. काबुलीवाला लेखकाजवळ येतो, लेखक त्याच्याकडून मग काहिबाही खरेदी करतो. काबुलीवाल्याचं नाव रहमत आहे व तो दूर अफगाणीस्तानातून आहे हे कळतं.
                   पुढे काबुलीवाल्याची व मिनीची गट्टी जमते, त्याच्या लांब झग्यातील खिशाकडे पाहून ती विचारे- "काबुलीवाला तुझ्या खिशात आहे काय ?" मग काबुलीवाला हसत म्हणे "हत्ती!" मग  मिनी गोड हसे. तासन्तास काबुलीवाला गालावर पंजा ठेऊन त्या चिमुकलीचे बोलणे ऐके. तो तिला म्हणे "मुली, तू कधी सासरी जाऊ नकोस हं !" यावर मिनी विचारे "काबुलीवाला सासर म्हणजे नेमकं काय, तू कधी जाणार ?" मग काबुलीवाला तिच्या या प्रश्नावर मोठ्याने हसे. तो म्हणायचा "हम ससुराल को मारेगा" अन् मारण्याचा खोटा अविर्भाव करी. लेखकाच्या घरच्यांना  मिनीची आणि काबुलीवाल्याची मैत्री खुपे.  लेखक मात्र  त्यांच्या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करी.
                 हे पठाण लोक वर्षभर हिंग,मेवा विकत. या व्यवसायात उधारी चालायची. मग आपल्या मुलुखाला परत जायच्या वेळी जानेवारीत  या उधारीची वसूली करावी लागे. कुणाकडे किती देणी आहेत ते यांना तोंडी ठावूक असे. "जबान के पक्के" टाइप.  अशाच एका उधारी चुकवणार्या माणसाशी काबुलीवाल्याची झटापट होते आणि त्यात तो इसम जबर जखमी होतो.  पोलिस काबुलीवाल्याला पकडून नेत असताना मिनी व तिचे बाबा त्याला भेटतात.  मिनी त्याला विचारते "कुठे चाललास ? सासरी ?" रहमत काबुलीवाला हसून म्हणतो - "हा मैंने ससुराल  को मारा"  रहमतला काही  वर्षांची शिक्षा होते.
                 पुढे लेखक  आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आणतो.  आज मिनीचं लग्न आहे अन् घरात बरीच धावपळ चाललीय. मिनी आज सासरी जाणार या कल्पनेने लेखकही क्षणभर भावुक होतो. मिनी आज तिच्या मैत्रिणींसोबत आहे अशातच रहमत लेखकाला भेटायला येतो. सगळ्यांच्या भुवया उंचावतात.  या मंगल प्रसंगी ही पीड़ा नको असेच सगळ्यांना वाटत असते.  त्याला मिनीला भेटायचे असते पण लेखक मनाई  करतो. रहमत पाणावलेल्या डोळ्यांनी परत फिरत असतानाच लेखक त्याला थांबवतो व मिनीला बोलावतो. मिनी आता वधूवेषात असते मात्र काबुलीवाल्याच्या डोळ्यांसमोर तीच चिमुरडी असते मिनी त्याला ओळखत नाही.  त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात.
                   तो लेखकाला खिशातून एक कागद काढून दाखवतो. कोळशाच्या छापाने त्या कागदावर छोट्या मुलीचा पंजा काढलेला असतो. त्या कागदाकडे पाहतच त्याने तुरुंगातले दिवस जगलेले असतात. आता माझीही मुलगी मिनी एवढी असेल, कशी असेल? कदाचित सासरीही गेली असेल ! ती पण मला ओळखणार नाही अशी खंत तो व्यक्त करतो.  एका बापाचं हे दुःख पाहून लेख़क त्याला परत गावी जाण्यासाठी  पैशाची थोड़ीफार मदत करतो.
गोष्ट इथे संपते !!
या काबुलीवाल्याशी , त्या पठाणी कणखर शरीरामागील हळव्या हृदयाशी माझं नातं जुळलयं !!
               

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

प्रेमचंदांची "ईदगाह"

मी आठवीत असताना, त्यावेळी दूरदर्शनवर मेट्रो नावाचं एक चॅनेल असायचं. त्यावर दर सोमवारी, संध्याकाळी सहा वाजता एक मालिका लागायची - "सुनो कहानी". त्या मालिकेचं शीर्षकगीत मला अजूनही आठवतेय "ना कोई राजा ना कोई राणी दिल कहता है दिल की जुबानी… सुनो कहानी".
या मालिकेत दर आठवड्याला एक कथा  दाखवायचे, या कथा बहुधा भारतातील वेगवेगळ्या भाषांतील अभिजात साहित्यातून घेतलेल्या असायच्या.  या मालिकेचे भाग यूट्यूब वर मिळतात का ते पाहिलं पण मिळाले नाहीत. असो.  या मालिकेतील असंख्य आठवणीत राहिलेल्या भागांपैकी एक भाग म्हणजे "ईदगाह". मुंशी प्रेमचंद यांच्या याच नावाच्या गाजलेल्या कथेचं हे सादरीकरण. नंतर वयपरत्वे चांगलं वाचायला लागल्यावर लगोलग प्रेमचंदांच्या अनेक कथा मिळवून वाचल्या. नॅशनल बुक ट्रस्टने त्यांच्या कथांचा एक संपादित कथासंग्रह काढलाय ( नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके स्वस्त आणि मस्त असतात, दर्जाबद्दल प्रश्नच नाही )  या कथासंग्रहात ही कथा पुन्हा एकदा वाचताना भरून आलं.

या कथेची सुरुवात होते ती ईदच्या सकाळी. रमजान महिन्याच्या अत्यंत कडक उपवासाच्या तीस दिवसांनंतर ईदची सकाळ उगवलेली. सगळीकडे अतिशय आनंदाचे वातावरण आहे.  लवकर तयार होऊन नमाज़साठी "ईदगाह"ला (नमाज़ची जागा )जायला सर्व तयार होताहेत. घरातील बायका शेवयांची गोड खीर बनवण्यात मश्गूल आहेत.  लहान मुलांना वडील मंडळींकडून "ईदी" मिळाल्यामुळे ते  सारखे सारखे आपला खिसा चाचपत आहेत, आपल्या या खजिन्यातून काय काय घेता येईल याचे स्वप्नरंजन चालले आहे.
एकीकडे हे सुखद चित्र असतानाच दुसरीकडे काळोखात बुड़ालेलं अमीनाचं घर आहे. अमीनाचा कर्तासवरता मुलगा गेल्या वर्षीच्या प्लेगात अकाली मृत्यू पावलाय. सूनही नवरयाच्या मागोमाग "अल्लाघरी" गेलीय, पदरी पाच वर्षाचा एक निरागस नातू आहे - हामिद.  त्याला तिने सांगितलय की अब्बाजान कामासाठी बाहेरगावी गेलेत आणि अम्मीजान अल्लाच्या घरी त्याच्यासाठी छान छान  वस्तू आणायला गेलीय.  मृत्यूच्या कटु वास्तवाची ओळख या निष्पाप जीवाला नकोच.  घरोघरी गोडधोड असताना हामिदही हट्ट करेलच अन घरात पुरेसं सामानही नाही म्हणून ती  विवंचनेत.  शिवणकामाच्या छोट्या मोठ्या कामातून जमलेल्या काही  पैशांपैकी ती हामिदला तीन पैसे खर्चाला देते. हामिद आपल्याहुन दोन - तीन वर्षांनी मोठ्या असलेल्या सोबत्यांसोबत ईदगाहकडे निघालाय.  गावाहुन ईदगाह दोन - तीन मैल दूर आहे. वाटेत शहराकडील बड्या मंडळींची घरे लागतात त्यांची श्रीमंती, घरापुढील फुललेले बगीचे, कोर्टकचेरी, कॉलेज यांच यथार्थ वर्णन येतं.
नमाज़ झाल्यावर विविधरंगी जत्रेत मुलं बागडताहेत. मुलांच्या मनाला रिझवेल असं बरंच काही जत्रेत आहे.
उंचच उंच जाणारा झोपाळा, गोल गोल फिरणारे हत्ती घोडे आहेत त्यावर बसण्यासाठी कुणाही मुलाचं मन करेल. हामिदकडे फ़क्त तीन पैसे आहेत तो एवढ़या पैशात या झोपाळयावर नक्कीच बसू शकतो, पण त्याने तसं केलं नाही.
आता सोबत्यांची फ़ौज मातीच्या खेळण्यांकडे वळलीय, कुणी मातीचा शिपाई घेतलाय तर कुणी हातात कायद्याचं पुस्तक असलेला वकील साहेब.  हामिदला कुठली ही खेळणी परवडणार? तो त्यांची उगाच निंदा करतो की पडल्यावर फळकन फुटतील बिचारे! काय फायदा मग विकत घेऊन ? मनातून त्याला प्रत्येक खेळण्याला स्पर्श करून पहायचाय, त्याला हातात मिरवायचय, पण त्याचे ते सोबती त्याला करू देत नाहीत. मनातून अगदी हिरमुसुन गेलाय बिचारा !
पुढे मिठायांची दुकाने आहेत. जिलेबी, गुलाबजामुन , रबड़ी.  नुसतं नाव घेताक्षणी तोंडाला पाणी सुटेल.  अहाहा! काय घमघमाट सुटलाय ! हामिदचे  सोबती काहीबाही विकत घेऊन खाताहेत. हामिद का नाही काही विकत घेत? हामिदचे  मित्र त्याला कंजूस म्हणून चिडवतात, तर कोण म्हणतोय की आपले सर्व पैसे संपले की तो खायला विकत घेईन व आपल्याला दाखवून दाखवून खाईल. हामिद हिरमुसतो.
 मिठायांच्या  दुकानापुढे लोखंडाच्या घरगुती उपयोगाच्या वस्तू विकणारे, नकली दागिने विकणारे यांची दुकाने आहेत. लहान मुलांचे इथे काय काम? त्या दुकानात हामिदला एक चिमटा दिसतो. मग आपले हे छोटे साहेब विचार करतात की  रोज भाकरया भाजताना आजीचे हात पोळतात. कुणा शेजारणीने विस्तव मागितला तरी ती हाताने उचलून देते, मग पोळलेल्या हातावर सतत फुंकर मारत बसते.  घरात चिमटा असेल तर असं होणार नाही. मी तिच्यासाठी चिमटा घेतला तर ती खुश होईल या खेळण्यांवर कोण खुष होईल? कधीतरी अब्बाजान व अम्मीजान येतीलच. ते पण खुश होतील माझ्यावर. असा विचार करून हामिद तीन पैशाचा चिमटा विकत घेतो.
हामिदने चिमटा विकत घेतल्यावर त्याचे सोबती त्याला वेड्यात काढतात. मुर्ख लेकाचा !! अख्खे तीन पैसे खर्च करुन घेतलं ते काय? तर हा लोखंडाचा विद्रूप चिमटा. काय उपयोग त्याचा ? पण असं म्हणतात, दारिद्र्य जगण्याचं धैर्य शिकवतं. हामिद मग त्यांच्या मतांचं खंडन करू लागतो. "हा चिमटा पहा , हातात घेतला आणि दुसर्या हातावर आपटला कि झाली फकीराची चिपळी , खांद्यावर घेतला कि झाली बंदूक आणि मातीच्या खेळण्यांचा काय निभाव लागणार या चिमटया पुढे" इ. इ. सर्वजण शेवटी बोलण्यात हामिदला शरण जातात आणि सर्वांना मान्य करावचं लागतं की चिमटा हीच योग्य वस्तू आहे.  मग प्रत्येकाला तो चिमटा हातात घ्यावासा वाटतो व हामिदचा हेवा वाटतो. गावात परतायला  दुपार होते.
अमीना हामिदची वाट पहात असते. घरी पोचल्यावर हामिद लगेच आजीच्या कुशीत शिरतो. अमीनाला जाणून घ्यायचं असतं की लेकराने काय काय पाहिलं?  काय मजा केली ? ती त्याच्या हातातील चिमटा पाहून आश्चर्यचकित होते व विचारते "कुठुन आणलास ?" . तिला जेव्हा हामिद सांगतो कि त्याने तीन पैशाला विकत घेतलाय तेव्हा संतापाच्या सुरात ती म्हणते कि पैशाचं काही खाता न पिता कशाला घेतलास हा दळभद्री चिमटा ? तेव्हा हामिद म्हणतो की आता तुझे हात गरम तव्याने पोळणार नाहीत, म्हणून तर मी विकत घेतला अमीनाचा राग क्षणात प्रेमात बदलतो. तिच्या डोळ्यात अश्रु  दाटतात.  लहानग्या हामिदला कळतही नाही कि आजी का रडतेय ?
कथेच्या शेवटची तीन वाकये अतिशय सुंदर आहेत...
"और अब एक बड़ी विचित्र बात हुई। हामिद कें इस चिमटे से भी विचित्र। बच्चे हामिद ने बूढ़े हामिद का पार्ट खेला था। बुढ़िया अमीना बालिका अमीना बन गई। वह रोने लगी। दामन फैलाकर हामिद को दुआऍं देती जाती थी और आँसूं की बड़ी-बड़ी बूंदे गिराती जाती थी। हामिद इसका रहस्य क्या समझता!"
कथा इथे संपते पण माझ्या  मनातील कथा मात्र इथे संपत नाही. ही कथा एका नातवाने आपल्या आजी वरच्या प्रेमापोटी विकत घेतलेल्या चिमटयावर थांबत नाही तर मानवाच्या चिरंतन अशा जिजुविषु वृत्तीच दर्शन घडवते. तुम्ही भले पैशाने श्रीमंत असाल , काहीही विकत घेऊ शकत असाल पण जोपर्यंत तुम्ही दुसर्याचा विचार करत नाही, त्या पैशाने दसर्याच्या चेहर्यावर जरासं का होईना, हसू आणत नाही आनंद आणत नाही तोपर्यंत त्या पैशाचा काही उपयोग नाही.
   पैसा आहे म्हणून मस्त जगता येईलच असं नाही.  तुम्ही कुठल्या गोष्टींवर तो खर्च करता त्यावर ते अवलंबून आहे.  पैशाने वस्तू विकत घेता येतीलही पण आनंद नाही विकत घेता येत.  ज्यांना दुसर्यांवर प्रेम करता येतं त्यांना धातूचे तुकडे फ़क्त साधन वाटतात साध्य नाही.(प्रेमचंद यांच्या "ईदगाह"या कथेवर मुक्तचिंतन.  समीक्षेचे कुठलेच नियम न वापरता एका वाचकाने कथा का आवडली आणि कथेत काय आहे याचं वर्णन इथे केलयं. जर काही चांगलं असेल या लेखात तर त्याचे श्रेय प्रेमचंद यांच्या सशक्त लेखनाला आहे   )

ही कथा आणि प्रेमचंद यांच्या इतर कथा इथे वाचता येतील.


    

सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

बालपणातल्या हिरोंसोबत


             दिवाळीच्या निमित्ताने घरात साफ़सफाई सुरु होती. आईने अचानक फर्मान सोडलं की, माळ्यावर पेटीत जी काही रद्दी साठवून ठेवली आहेस, ती एकदाची बाहेर काढ ! या घरात राहायला आलो त्याला आता पाच -एक वर्षे झाली. सामान आवरण्याच्या गडबडीत जुन्या घरातील माझी सर्व जुनी वह्या पुस्तके त्या पेटीत भरली होती. रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा मुहूर्त साधून ती पेटी उघडली. वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या फायली, निबंध व चित्रकलेच्या वह्या आणि गोष्टींची खूप सारी पुस्तके.  एक एक वस्तू मला  भूतकाळात नेणारी.  ताम्हणकरांच्या "गोट्या"चा अख्खा संच, चंपक, चांदोबा, ठकठकचे काही अंक, चित्रकलेच्या वहीतील "याला चित्रकला म्हणतात का" असं वाटायला लावणारी चित्रे आणि रोजच्या सुविचारापासून मोटार गाडीच्या चित्रापर्यंत कशाचही कात्रण असलेल्या फायली, रंगपेट्या.   मी प्रत्येक गोष्ट अगदी निरखून पाहतोय म्हणून आईचा पारा चढला पण मी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं.  यातल्या प्रत्येक गोष्टीसोबत एक एक आठवण जोडली गेली होती
             चित्रकलेच्या वहीत "डक टेल्स" मधील संपूर्ण "स्क्रूज" फॅमिलीचं रेखाचित्र सापडलं. माझा अत्यंत आवडता कार्टून शो. दर गुरुवारी संध्याकाळी बरोबर पाचच्या ठोकयाला "ज़िन्दगी तूफानी है" असा कोरस आमच्या घरातून ऐकू यायचा. अत्यंत कवडीचुंबक पण श्रीमंत असलेला म्हातारा अंकल स्क्रूज मैकडक, अंकल डोनाल्ड डक नौदलात गेल्याने स्क्रूजकड़े राहायला आलेले त्याचे तीन अतिमस्तीखोर पुतणे लुई - ड्युई  - ह्युई, विमान चालवणारा बेभरवशाचा पाइलट लॉन्चपैड मैकक्वेक आणि  अंकल स्क्रूजला रस्त्यावर आणायला टपलेले त्याचे शत्रू ; असा सगळा प्लॉट असल्यावर धमाल ठरलेलीच. स्क्रूजला आपला पैसा सतत वाढतच कसा जाईल याची काळजी. स्वतः च्या पैशाने भरलेल्या गोदामात तो स्विमिंग पूल सारखा पोहे व क्षणात किती  पैसे आहेत हेही त्याला कळे. मला  सर्वात जास्त आकर्षण वाटायचं त्याच्या लकी कॉइनचं, त्याची आयुष्यातली पहिली कमाई.  हा कॉइन त्याच्याकडून हिसकावून घेतल्यास तो दरिद्री बनेल म्हणून त्याचे शत्रू अनेक मार्ग वापरतात पण हार मानेल तो अंकल स्क्रूज कसला ! त्याची पूर्ण फॅमिली त्याच्या सोबत असते, मग ती संकटे अत्यंत दुर्गम अशा वाळवंटातील असो वा नव्यानेच शोधलेल्या कुठलेश्या समुद्रप्रदेशातील असोत. मी पण एक कॉइन सतत सोबत ठेवायचो जेणेकरुन लवकर श्रीमंत होईल.
              उन्हाळ्यात शाळेला सुट्टी पडली की शेजारच्या ताईकडे असलेल्या चांदोबाच्या पुस्तकांत आम्ही डोके खुपसून तासनतास बसत असू. ताईच्या बाबांनी चांदोबाचे खूप जुने अंक बाइंड करुन  ठेवले होते.  तिचा आम्हाला अजूनही हेवा वाटतो . चांदोबा मधील पात्रांची नावे अगदी कठीण असायची.  संस्कृतप्रचूर वगैरे. जगाच्या पाठीवर कुठले आई -बाप आपल्या मुलांची नावे अशी कठीण ठेवत असतील असं आम्हाला वाटायचं. त्यातील विक्रम वेताळच्या गोष्टी वाचून विक्रम राजाला दुसरा कामधंदा नाही का ? किंवा एका रात्रीत वेताळ  इतक्या गोष्टी सांगतोय, तर त्याने त्या कुणाकडून ऐकल्या, असे प्रश्न मला पडायचे. गोष्टीच्या सुरुवातीला  विक्रम राजाच्या हातात तलवार आहे, भोवताली काळशार जंगल व त्यात हिरवी झाडे आहेत, जमिनीवर ठिकठिकाणी कवटींचा खच पडलाय असं चित्र असायचे. चांदोबातील चित्रेही बोलकी असायची.  मध्यंतरी एकदा रेलवे स्टॉलवरून चांदोबाचा अंक विकत घेतला. चांदोबातील चित्रे आज ही सुरेख असतात पण बदलत्या वाचकवर्गाचा विचार करताना गोष्टींचा दर्जा मात्र खालावलाय. "चंपक" आणि "ठकठक" नंतर आवडेनासे झाले.
         "गोटया"चा संच मीच विकत घेतलेला. त्यातील गोटयाच्या करामती अजूनही फ्रेश वाटणार्या. आगगाडीतून प्रवास करताना इतकी मोठी आगगाडी एवढ़याश्या साखळीने कशी थांबू शकते ? म्हणून साखळी ओढणारा भाबडा गोटया, व्याख्यात्यांनी यायला नकार दिला म्हणून रद्द होत असलेली शाळेतली व्याख्यानमाला चालू रहावी म्हणून कुंभार, सुतार, मदारी यांना व्याख्याते म्हणून बोलवणारा चतुर व प्रसंगवधानी गोटया मला हिरो वाटायचा.
         त्यावेळी आवडणारे हिरो वेगळे होते.  आता आवड बदलली असेल वय वाढल्यामुळे. रविवारी दुपारी दूरदर्शन वर येणारा "शक्तिमान" त्यातील पत्रकार पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री मुळे आवडायचा. त्याचं ते बावळट ध्यान,  गीता विश्वासला "देवीजी" म्हणून पुकारण, त्याचा तो चक्रमपणा खूप हसवायचा. संकटात असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शक्तिमान यायचा.  एक हात वर करून दूसरा हात कमरेवर ठेऊन गोल गोल फिरताना तो हवेत उड़त उड़त इच्छित स्थळी पोहचायचा. अशा वेळी सरकारी कचेरीतील टेबल फैन सारखा आम्ही तोंडाने झू s s झू झू आवाज करायचो. शक्तिमान योगासन करताना पाठीच्या कण्यावर सात चक्र दिसायची व ती फिरत असायची. आमच्या सामान्य  विज्ञान भाग २ च्या पुस्तकात याचा कुठेच उल्लेख नव्हता. शक्तिमानच्या लोकप्रियतेमुळे त्याच्यासारखी कपडे, त्याचे चित्र असलेली स्टीकर्स बाजारात आलेली होती.मी निबन्धाच्या वहीला शक्तिमानचा स्टीकर लावला होता तेव्हा भर वर्गात बाईंनी या "शक्तिमान"ने नंतर स्टाफरूम मधे येऊन वही घेऊन जावी असं म्हणून माझा चांगलाच पानउतारा केला होता.
          "मालगुडी डेज" मधील स्वामी आणि त्याचे दोस्त मला खूप जवळचे वाटायचे. पुस्तकाच्या शेवटी राजनच्या वडिलांची बदली होऊन तो गाव सोडून जातो आणि त्याची आणि स्वामीची भेटही होत नाही हे वाचल्यावर मला अतिशय वाईट वाटल होतं. राजन आपल्याला लक्षात ठेवेल का असा प्रश्न स्वामीला पडतो जर आर. के. नारायण मला भेटले असते तर मी त्यांना नक्कीच विचारलं असतं की मोठेपणी तरी ते एकमेकांना भेटलेत का ?
             "श्यामची आई" पुस्तक मला बक्षिस मिळालेलं, त्यातील श्याम सारखा समंजस मी त्या वयातही नव्हतो. पुस्तक वाचून रडल्याचं तेवढं आठवतं. खाऊच्या पैशातून स्वतः च्या भावासाठी कोट शिवणारा श्याम त्या वयात जितका समंजस, धाडसी होता तितका मी किंवा  माझ्या वयाची मंडळी होतो का असाही प्रश्न मला पडतो.
            खूप वर्षांनंतर उघडलेली पेटी मला परत बालपणात घेऊन गेली. माणसाने असचं वेळात वेळ काढून स्वताच्या बालपणात परत एकदा जावं, त्यात फार काळ रमू नये पण ती निरागसता सतत जोपासावी. पीटर पैनच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाने या जादुई दुनियेतील आपल्या मनातील परींच राज्य जपावं.