शनिवार, २५ जुलै, २०२०

दूरदर्शन

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा केबल नेटवर्क ने आपली पाळेमुळे फार खोलवर रुजवली नव्हती. बहुतेकांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा(ओनिडा, BPL, सोनी, क्राऊन या कंपनीचे बहुतांशी). दूरदर्शनचं एकच चॅनेल दिसायचं.  नंतर त्यात डीडी मेट्रोची भर पडली. जेव्हा काही कार्यक्रम नसेल तेव्हा स्क्रीनवर सफेद मुंग्या दिसायच्या.जरा हवेने अँटेना हलला तर चित्र गायब. मग कोणतरी छपरावर चढून तो ऍडजस्ट करणार आणि त्याला घरातून 'दिसतंय' किंवा 'अजून थोडं सरकव' असा फीडबॅक देणार. कार्यक्रमही आतासारखे पाल्हाळ नसायचे. आठवड्यातून एकदा प्रसारीत होणारे. त्यांची खूप आतुरता असायची.  शक्तिमान, डक टेल्स, टेल्सपिन, सुराग, राजा अँड रँचो, कॅप्टन व्योम, सी हौक्स ही काही मोजकी नावे आता आठवतायेत. आतासारखी OTT सुविधा नसल्यामुळे एक जरी एपिसोड चुकला तरी फार वाईट वाटायचं. शाळेत मित्रांना विचारायचं काय दाखवलं काल? . मग ते हळहळ व्यक्त करत मिर्च मसाला लावून सांगत.  रविवारी संध्याकाळी चार वाजता मराठी चित्रपट लागायचा.  प्रेक्षकांचं आयुष्य सॉर्टेड होतं कारण पर्याय कमी होते.

मग केबल नेटवर्क आणि कलर टीव्हीचा जमाना आला. भरमसाठ न्यूज, सिने चॅनेल सुरु झाले.  २४ तास प्रक्षेपणाची सोय झाल्याने कंटेन्टचा दर्जा खालावला. सिरिअल्स वर्षानुवर्षे चालू लागल्या. 'चार दिवस सासूचे' मालिका चार हजार दिवस झाले तरी चालूच राहिली. मालिकांतली पात्रे मेल्यावर पब्लिक डिमांड वर परत जिवंत होऊ लागली. मधे एकदा प्लास्टिक सर्जरीची लाट येऊन गेली. लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयी बदलल्या. रात्री उशिरा पर्यंत जेवणं उरकू लागली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चॅनेल्स वर आवडती मालिका असेल तर एक दुपारी रिपीट टेलिकास्ट वर बघितली जाऊ लागली. या मालिकांतली मोठी मोठी घरं, उंची पेहराव मध्यम व नव-उच्चभ्रूवर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत गेला. मध्यमवर्गाचं जगणं टीव्ही सिनेमाच्या जगात म्हणावं तसं रेखाटलं गेलं नाही.

हाय स्पीड इंटरनेट आणि OTT च्या काळात पुन्हा एकदा टीव्हीचा कायापालट झाला. नविन पिढीला (आणि जुन्यांनाही) कन्टेन्ट महत्वाचा वाटू लागला भले त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले तरी. नेटफ्लिक्स, Prime, हॉटस्टार यासारखी अनेक प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांसाठी उबलब्ध झालीयेत. Netflix and Chill तरुणाईत पॉप्युलर झालंय. मल्टिमिडीया कन्टेन्टचा ओघ न संपणारा झालाय. तुम्ही युट्युबवर एक विडिओ बघता बघता असे काही वाहवत जाता कि आपण नेमकं काय पाहण्यासाठी युट्युब उघडलंय याचा विसर पडतो. नेटफ्लिक्सवर आता काय पाहावं हे शोधण्यातच बराच वेळ जातो. न्यूज चॅनेल्स ओपिनियन मेकर्स झालीयेत. एक ठराविक अजेन्डा राबवताना दिसतायेत.

अखंड वाहणाऱ्या माहितीच्या या स्रोतांनी आयुष्य कॉम्प्लिकेटेड केलीयेत.
शुक्रवार, १७ जुलै, २०२०

आठवणींचा कोलाज - घर
"मुझे एक मकान चाहिए 
जिसकी छोटी-सी क्यारी में
एक नन्हा-सा बिरवा रोप सकूँ 
जो केवल अपना हो 
जिसकी छत के नीचे लेटूँ 
तो सदियों से जगी मेरी आँखों में भी 
एक निजी सपना हो 
मैं एक छोटा-सा मकान खोज रहा हूँ 
ऊँची इमारतों वाले इस शहर में। 

- रामदरश मिश्र 


TIFR ला इंटर्नशीप करत असताना रोज समुद्राची गाठभेट व्हायची. तिथल्या लायब्ररीतून समुद्र दिसायचा. तिथल्या लोकांना मात्र त्याचं काहीच कौतुक नाही.(त्यांच्यासाठी नेहमीचाच तो) लंचच्या वेळेत तिथल्या कट्ट्यावर जाऊन बसायचो. संध्याकाळी घरी जाताना कुलाबा, कफ परेड फिरत बस चर्चगेटला यायची. आजूबाजूच्या उंच इमारती , समुद्राची जवळीक याचे अप्रूप वाटे. असाच एकदा संध्याकाळी परतत होतो. बसमध्ये माझ्या पुढच्या सीटवर एक नवविवाहित जोडपं बसलं होतं. बहुतेक मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायकचे दर्शन करून आले होते.(लग्न झाल्यावर या ठिकाणी जोडीने जायलाच पाहिजे असा अलिखित नियम असावा , आता त्यात टिटवाळ्याच्या गणपतीची पण भर पडलीय) मुलीने साडी नेसली होती, हातातल्या प्लास्टिकचा पिशवीत प्रसादाच्या चुरमुर्याचे पाकीट, पेढ्याचा पुडा, कुंकवाची डबी होती. मुलगा थोडासा बावरलेला होता. खिडकीतून तिला बऱ्याच गोष्टी दाखवत होता.उदा. ही अमुक एक वास्तू, इथे अमुक एक होतं वगैरे. त्यात आपल्याला या शहराबद्दल खूप माहितेय हा अविर्भाव होता. इम्प्रेशन मारण्याची फेज.
एका उंच इमारतीकडे डोळे विस्फारून पाहत एकाएकी त्या मुलीने म्हटलं,
 'आपलं असेल का हो असं एखादं घर ?'
यावर त्या मुलाने थोडं हसत उत्तर दिले - "असेल की"
या महानगरात सोबतीने बघितलेल्या एका नवीन स्वप्नाची ती नांदी होती.

 मुळातच घर ही फार सुंदर गोष्ट आहे, नवीन घराचे किंवा स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणारी व त्यासाठी झगडणारी माणसे मला फार ग्रेट वाटतात. ग्रेट यासाठी कि त्यात एक दुर्दम्य आशावाद आहे. नोकरीच्या, पोटापाण्याच्या शोधात माणसं स्थलांतरित होतात. नवीन शहरात, गावात "आशियाना" शोधतात. ऍड्जस्ट करतात स्वतःला. आम्हाला मराठीच्या पुस्तकात उपमा अलंकाराचं उदाहरण म्हणून पुढील वाक्य होतं -"मुंबईतील घरे म्हणजे कोंबड्यांची खुराडीच ". अरुंद  गल्लीबोळातून जाणारी, अरुंद अशी एकावर एक इमले असलेली फार लहान लहान घरं मी पाहिली आहेत. एका मित्राच्या घरातून नारळाचे झाड उगवले होते ते थेट छपरातून बाहेर, किंवा असे म्हणूया या झाडाभोवतीच त्यांनी झोपडी बांधली होती. मग या झाडाच्या खोडाला पिशवी, दप्तर वगैरे वस्तू अडकवल्या जात. काही घरांच्या लादीतून पावसाळ्यात पाणी उफाळे. काहींच्या छपरातून पाणी गळे. पावसाळयाच्या सुरुवातीला मग पत्र्यांवर डांबराचा थर चढवला जाई.

घरांचा स्वभाव त्यांच्या घरमालकाप्रमाणे बदलतो. कुठे फक्त चहा मिळणार आहे आणि चहा पिल्यावर निवांत गप्पा मारता मारता जेवणाचा आग्रह कुठे होणार आहे हे घरमालकाच्या स्वभावावर ठरतं. काही घरांत आब राखून अवघडून बसावं लागतं, जीव गुदमरतो तर काही घरांत बिनदिक्कत जमिनीवर फतकल मारून बसता येतं. काही घरांत ओठातल्या ओठांत खोटं हसत समोरच्या श्रीमंतीकडे पाहावं लागतं तर कुठे गगनभेदी हसण्याने मन मोकळं होतं.

"No one realizes how beautiful it is to travel until he comes home and rests his head on his old, familiar pillow." हे जे लिन युतांगने म्हटलंय ते १००% खरंय.

माझ्या मते घर म्हणजे सोयी सुविधा नव्हेत. उंची फर्निचर नव्हे. स्केवर फूटचं गणित नव्हे. घर बनतं माणसांमुळे.
लहानपणी उन्हाळाच्या सुट्टीनंतर मुंबईला परतल्यावर आजी म्हणायची "तुम्ही होतात तेव्हा गजबजलेलं होतं, आता एकटं घर खायला उठतंय". अंगणात पायरीवर बसून रातकिड्यांचे आवाज ऐकत आम्ही आजीची गोष्ट ऐकत असू.  घर बांधताना माझे बाबा आणि काका किती लहान होते आणि तरीही खेळण्याच्या गाडीतून कसे वाळू आणायचे, कसे चिखलात खेळायचे, हा पायरीचा भला मोठा लाल दगड कसा आणला, कुठं उसाचं गुऱ्हाळ होतं वगैरे गोष्टी आम्ही तल्लीन होऊन ऐकत असू.
कुणास ठाऊक घरांना बोलता येत असतं तर त्यांनी सगळ्या पावसाळयांचा हिशोब मांडला असता. पणजोबांच्या वेळेची हकीकत पोक्त आजोबांप्रमाणे दाढी कुरवाळत सांगितली असती. लहान मूल दुडू दुडू धावताना पडल्यावर मायेची हाक घातली असती. माजघरातील नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा चोरटा प्रणय बघून गालातल्या गालात हसलं असतं.

विश्वास पाटलांच्या 'झाडाझडती' मध्ये एक प्रसंग आहे. धरणासाठी एक अख्ख गाव विस्थापित होणार असतं. गाव सोडून जाण्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री एक अधू म्हातारे आजोबा घराच्या भिंती चाचपडत असतात. घराला पारखं होण्याआधी त्यावर मायेचा हात फिरवत, त्याचा स्पर्श साठवत. आजी तिच्या शेवटच्या आजारपणात सतत गावच्या घराचा उल्लेख करी. मला मरण माझ्या घरात येऊ दे म्हणत राहिली. आता ती नसलेल्या घरात आम्हाला घर खायला उठतं.


***

शुक्रवार, १० जुलै, २०२०

स्माईल

मध्यंतरी एका रविवारी मी आणि बायको youtube वर पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' बघत होतो. आमच्या पिढीला प्रत्यक्षात काही त्यांना पाहता आलं नाही. त्यांच्या रेकॉर्डिंग्स, पुस्तके हाच काय तो ठेवा.  संध्याकाळ फार मस्त गेली.  त्यातल्या 'एका रविवारची गोष्ट' मधले काही प्रसंग असे होते कि ते आठवून आम्ही खूप दिवस हसत होतो. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय कि त्यांचा कुणी पुतळा वगैरे उभारला तर त्याखाली एवढंच लिहा "या माणसाने आम्हाला हसवले". रवींद्र नाट्यमंदिराच्या अंगणात जो पुलंचा पुतळा आहे त्याखाली हेच वाक्य लिहून ठेवलंय. 

हसणं ही मनुष्य प्राण्याला लाभलेली अद्भुत देणगी आहे. इतर कुठलेच प्राणी हसत नाहीत. आपणच 'हीही ते हाहा ते हाहाहा' हसत असतो. लहान बाळं किती गोड हसतात (अपवाद: मध्यरात्री सगळे झोपल्यावर  हसत असतील तर). माझ्या एका मैत्रिणीने तिच्या भाचीचा हसण्याचा आवाज रेकॉर्ड करून अलार्म टोन म्हणून ठेवला होता. एकदा ती निवासी कॅम्पला गेल्यावर भल्या पहाटे जेव्हा एका लहान मुलीचा हसण्याचा आवाज जंगलात घुमायला लागला तेव्हा त्या हसण्याच्या आवाजाने बाकी सगळ्यांना भीतीनं घाम फुटला होता. असो.

माझ्या पुस्तकसंग्रहात वुडहाऊस, पुलं, दमा मिरासदार यांची पुस्तके आहेतच, याशिवाय 'पंच' या कार्टूनविषयक मासिकाचा एक विशेष अंक आहे ज्यात 'पंच' मधील सर्वोत्तम कार्टून समाविष्ट आहेत. तो संग्रह न्याहाळत मी कितीही वेळ बसू शकतो. मध्यंतरी दूरदर्शनच्या भरभराटीच्या काळातील 'ये जो है जिंदगी', मालगुडी डेज, देख भाई देख, फ्लॉप शो हे कार्यक्रम पाहून बॅकलॉग भरून काढला.  किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात.

फ्रेंड्सचा एक एपिसोड बघत असताना Joey आणि Chandler च्या रूममध्ये दोन व्यक्तींचं  ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर दिसतं.  कोण ही दोघं? या प्रश्नाचा शोध घेत मी लॉरेल अँड हार्डी पर्यंत पोचलो आणि मी त्यांचा फॅन झालो.  लहानपणी कधीतरी जाड्या आणि रड्याची ही series सह्याद्रीवर मराठीत डब होऊन यायची ते आठवलं.
काही मालिका, चित्रपट यांनी खूप हसवलं. काहींनी हसता हसता अंतर्मुख करायला लावलं. श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेत वयस्क आबा (दिलीप प्रभावळकर) एकदा  लाफ्टर क्लब मध्ये जातात आणि तिकडच्या इन्स्ट्रक्टरच्या सांगण्यावर हसण्याचा सराव करायला लागतात. घरी जेव्हा ते चोरून हसण्याचा सराव करत असताना जी काही गम्मत होते ते पाहण्यासारखं आहे.

Humor कळणारा समाज (उदा : ब्रिटिश हुमर) फार प्रगतीशील असतो
माणूस जेव्हा स्वतः हसता हसता दुसऱ्यांना हसवायला लागतो तेव्हा त्याच्या पुण्याची बेरीज व्हायला सुरुवात होते.

.***

गुरुवार, २ जुलै, २०२०

विमानप्रवास

चांदण्या रात्री आकाशात एक प्रकाशाचा लुकलुकता ठिपका दिसला.. तो हळूहळू मोठा होत गेला.. मग कळलं विमान आहे ते. 
मी पाहिल्यांदा केव्हा विमानप्रवास केला हे मला आठवतंय. २०१६ सप्टेंबर मध्ये. जेव्हा मी नवीन ठिकाणी जॉबला लागलो आणि आठवडाभरात ट्रैनिंग साठी बंगळूरला पाठवायचं ठरलं. मी जरासा बुजलेला होतो. एअरपोर्टवर गेल्यावर काय करायचं, बोर्डिंग पास कसा मिळवायचा, सोबतच्या सामानात काय न्यायला परवानगी आहे, काय नाही  याबद्दल मी Quora वर बरंच वाचलं,मनात खूणगाठी केल्या आणि लढाईला निघाल्यासारखं 'हर हर महादेव' म्हणत घर सोडलं. काहीही झालं तरी बावळट दिसायचं नाही हा निश्चय ठाम होता. आपल्याला फर्राटेदार इंग्रजी बोलता येतं त्यामुळे कुठलाही शाब्दिक हल्ला आपण सहज परतवू शकू याचं मानसिक बळ गोळा करत मी एअरपोर्टवर पोचलो. माझ्या अपेक्षांना कात्री देत फार काही इंग्रजी न पाजळता मी  चेक-इन, security, बोर्डिंग पार करत विमानात जाऊन बसलो. विंडो सीटचा प्रेफरेन्स आधीच दिल्याने खिडकीतून बाहेरचं जग पहायला मिळणार याची उत्सुकता होती. आकाश पाळण्यात बसल्यावर जशी असते तशी. मग इतर सोपस्कार पार पडल्यावर सुरक्षेच्या सूचना झाल्या. रनवे वर विमान पोचलं. विमानाने टेक-ऑफ घेतल्यावर पोटात वर-खाली झालं. एकदाचं ते त्याच्या मनाजोगत्या उंचीवर पोचल्यावर कप्तान साहेबांनी 'खुर्ची की पेटी' बांधण्याचे 'संकेत' बंद केले. 
विमानातून खालच्या इमारती, रस्ते, डोंगर इवलुसे दिसत होते. हा पसारा केवढा भव्य आहे. आपण या सर्व पसाऱ्यात केवढेसे. माणसाने प्रयत्न करून आकाशात पण स्वतःच अस्तित्व तयार केलंय.  हे सर्व कुतुहूलमिश्रित डोळ्यांनी पाहत असताना अचानक ऐरहोस्टेस ने 'सर, Would you like to have something? विचारल्यावर भानावर आलो. मी त्या बयेच्या विनवण्या ऐकूनही काहीच घेतलं नाही. एक तर त्या सर्व वातावरणात आपण दबून गेलेलो असतो. आवाज आपसूक नरमाईचा होतो. दोन तासांनी जेव्हा बंगळूरला पोचलो आणि इतर सोपस्कार पार पडेपर्यंत पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. एअरपोर्टवर साधा चहाचा कप तुम्हाला शंभराला पडतो तेव्हा चहापत्ती दक्षिण ध्रुवावरून आणलेली असावी असं वाटतं. 
हॉटेलकडे जात असताना ड्राइवरला मधे एखादं बरं ठिकाण दिसलं तर सांग बाबा असं म्हटलं. त्याने एका ठिकाणी थांबल्यावर मस्तपैकी इडली खाऊन भूक शमवली. काही दिवसांनी जेव्हा ऑफिस मधील सहकाऱ्याने सांगितलं कि flight मधलं खाणं-पिणं ऑफिसने आधीच बुक केलेलं असतं तेव्हा मात्र त्या ऐरहोस्टेस बयेच्या विनवण्याचा अर्थ लागला. ऑफिसच्या induction प्रोग्रॅम मध्ये बऱ्याच फालतू गोष्टी नवीन एम्प्लॉयीला सांगता तेव्हा अशा  अत्यंत महत्वाच्या गोष्टी का बरे सांगत नाहीत?
गेल्या चार वर्षांत बरेच विमानप्रवास झाले. मी सराईतासारखा फिरायला लागलो. बरेचसे हॅक्स कळले. एकदा flight चुकल्यावर वेळेची गणिते कळली. हातात पुस्तक घेऊन बसल्याने विद्ववतेचा आव आणता येतो आणि कानात हेडफोन्स असले कि तुसड्यासारखं वागता येतं.  विमान लँड झाल्याझाल्या आपण पॅसेजमधे उभं राहून जणू जग जिंकायला निघालेल्या नेपोलियनचे वंशज आहोत आणि लढाईसाठी उशीर होतोय असं दाखवता येतं. 

मला जे हॅक्स कळलेत (एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये जी ज्ञानप्राप्ती झालीय) त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी फुकटात ज्ञान देत नसतो. सिद्धार्थाला देखील घर दार सोडून जावं लागलं होतं. तुमच्याही नशिबी खूप विमानप्रवास असावेत , त्यातून तुम्ही जग तुमच्या चष्मानं बघावं आणि या सर्व पसाऱ्याचा अर्थ लावावा ही सदिच्छा. 

***