शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

आभासी प्रतिमांच्या जगात

         घड्याळात पहाटे साडेचारचा गजर झाला. सुमेधने  त्रासिक चेहरा करून पांघरून दूर केलं. त्याने पलंगावरून उतरून गालिच्यावर पाय ठेवताच घरातील दिवे लागले, कॉफीची मशीन चालू झाली. घरातील मोठ्या भिंतीवजा स्क्रीनवर ट्रॅफिकचे अपडेट्स व दिवसाचं सगळं वेळापत्रक  आलं. त्याने हाताने स्क्रोल करून महत्वाच्या गोष्टी टिपून घेतल्या. तेवढ्यात त्याचा पर्सनल रोबो त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. त्याने टूथब्रश व नॅपकिन सुमेधला दिला. सुमेध अंघोळ करेपर्यंत टेबलवर नाश्ता तयार होता. पांघरुणाची घडी व्यवस्थित घालून बेडरूम नीट आवरली गेली होती. नाश्ता करताना त्याला प्रोफेसर मार्टिन यांची आठवण आली. आज त्यांना कुठल्याही परिस्थितीत भेटून कन्विन्स केलंच पाहिजे. जेवताना त्याने मोबाइलवर कालचे शरीराचे मेट्रिक्स पाहिले. या महिन्याचा ऑक्सिजनचा किती कोटा उरलाय याची त्याने नोंद केली. या महिन्याच्या उरलेल्या दहा दिवसांसाठी तेवढा ऑक्सिजन पुरेसा होता. पुढच्या एक तारखेला पुन्हा सरकारकडून त्याच्या अकाउंटला ठराविक ऑक्सिजन जमा होणार होता. त्याच्या नाकपुड्यांना जोडलेल्या यंत्रांनी त्याचे मापन केले जायचे व त्याचे सर्व तपशील सरकारदरबारी जमा होत. 

        सन २५०० उजाडलं तेव्हा कित्येक दशकं चाललेली मानवाधिकार आंदोलनं मोडीत काढून सरकारने ऑक्सिजनची वितरण व्यवस्था स्वतःकडे घेतली होती. ऑक्सिजन ही सगळ्यात दुर्लभ कमोडिटी बनल्यामुळे भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी नवीन कायदे आणले होते. काही शतकांपूर्वी जसे अन्नधान्य रेशनकार्डवर मिळे, तसे आता ऑक्सिजन बाबत घडू लागले. बेछूट वृक्षतोडीमुळे आणि शतकभर चाललेल्या दुष्काळामुळे जगभर वनसंपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. क्वचित कुठला पक्षी आकाशात उडताना दिसे. आणि तो दिसल्यावर मोठी माणसे लहान मुलांना कडेवर घेऊन दाखवीत. हवेत विषारी वायूचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्येक कार्यालय आणि घरात हवा शुद्ध करण्याची यंत्रे बसवलेली असत. सरकारने कडा विरोध पत्करून नागरिकांचे जीवनमान साठ वर्ष ठरवले होते. 

        वयाची साठी गाठायच्या सहा महिन्यांपूर्वी नागरिकाला नोटीस येई. अमुक तारखेनंतर ऑक्सिजन मिळणार नाही आणि देहदान करायच्या ठिकाणी जमले पाहिजे असा आदेश असे. पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. जगाच्या कुठल्याही भागात गेलात तरी सरकारच्या सेंट्रल डाटाबेसमध्ये जीपीएसची नोंद होई. आयुष्यभर तुम्ही कुठे फिरलात, अमुक एका वेळी कुठे होतात ह्याचा लेखाजोखा क्षणात मिळे. डीएनए सिक्वेन्समुळे अफरातफर करायचा प्रश्नच न्हवता. शेवटच्या दिवशी नागरिकाला विदा करायला त्याचे कुटुंबीय येत.  दहा फुटबॉल स्टेडियम भरतील अशा विशाल इमारतीत देहदानाची प्रक्रिया चाले. सुमेध याच इमारतीत कामाला होता. मरणपंथावरच्या या नागरिकांच्या स्मृती जतन करायच्या विभागात तो सिनियर मॅनेजर या हुद्द्याला होता. 

      मृत्यू बाबतची अनपेक्षता सरकारने कायदा करून नष्ट केल्याने सगळीकडे असंतोष माजेल, कायदा सुव्यवस्था राहणार नाही याची सरकारला भीती वाटत होती. माणूस आपण कधीच मरणार नाही या अविर्भावात जगत आला होता. जवळच्या व्यक्तीचे जाणे काही काळाने मृत्यूचे शाश्वत सत्य बोथट करे. आता मृत्यूची तारिख ठरल्यावर माणूस कसा रिऍक्ट होईल यावर विद्यापीठांत संशोधन झाले, खूपसे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. प्रगत तंत्रज्ञानाने जर माणसाच्या स्मृती जतन करता आल्या तर सरकारच्या निर्णयाला थोडा तरी पाठिंबा मिळेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला. मग यासाठी वेगळा विभाग सुरु करण्यात आला. अत्याधुनिक संगणकीय  तंत्रज्ञानाने माणसाची हुबेहूब आभासी प्रतिमा सतत त्याच्या नातलगांसोबत राहील, आधीच रेकॉर्ड केलेले हावभाव, वाक्ये, वेगवेगळे पेहराव यामुळे ती प्रतिमा जिवंत वाटे.  त्या प्रतिमेतून आरपारचे दिसे, पण प्रतिमेला अजून कसे परिणामकारक करता येईल यावर संगणक तज्ञांच्या कॉन्फरेन्स होत. 

        सुमेधला प्रोफेसर मार्टिन यांना भेटायचं होतं ते याच कारणासाठी. या प्रकल्पासाठी त्यांची निवड केली गेली होती. प्रोफेसर मार्टिन युनिव्हर्सिटीत इतिहास शिकवत. 'बाविसाव्या शतकातील मूल्यभान'  हा त्यांच्या पीएचडीचा विषय होता. अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक, जबाबदार पालक ते प्रेमळ आजोबा असा त्यांचा प्रवास राहिला होता. काही महिन्यांत त्यांचा साठावा वाढदिवस होता. स्मृतिजतन करण्याच्या प्रकल्पात त्यांचे फोटो, मुलाखती, चालण्याच्या, हावभावाच्या इत्यादी लकबी संगणकाने प्रोसेस करून त्यांची आभासी प्रतिमा तयार केली होती. ती पाहताना क्षणभर त्यांनादेखील गहिवरून आलं. जेव्हा ती प्रतिमा आणि ते जोडीने उभे राहिले तेव्हा त्यांना अश्रू आवरणे कठिण झाले. त्यांच्या कुटुंबियांना या प्रकल्पाची कल्पना नव्हती. हा प्रोटोटाईप त्यांच्या कुटुंबियांना दाखवून त्यात त्यांनी बदल सुचवावेत असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ठाम नकार दिला.  त्यांच्या जाण्याला अजून काही महिने शिल्लक असताना आताच त्यांची उणीव जाणवून देणे त्यांना पटत नव्हते. त्यांची पत्नी, मुले, नातवंडे कशी रिऍक्ट होईल याची त्यांना काळजी वाटत होती. सुमेधने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. प्रोफेसर मार्टिन यांच्या जाण्यानंतर त्यांच्या प्रतिमेत काहीच बदल करता येणार नाही, याउलट त्यांच्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्यावर या प्रतिमेत, डाटाबेसमध्ये आवश्यकसे बदल करता येतील असे त्याने सहानुभूतीपूर्वक सांगितले. शेवटी प्रोफेसर मार्टिन तयार झाले पण त्यांची एक अट होती, ही सर्व चाचणी प्रयोगशाळेत न करता त्यांच्या घरी केली जावी आणि ते उपस्थित नसताना.  ही अट मान्य केली गेली. ही सर्व चाचणी नियमानुसार चित्रित केली जाणार होती. 

        चाचणीच्या दिवशी सरकारी अधिकारी, तंत्रज्ञ, प्रोफेसर मार्टिन यांच्या घरी आले.  पूर्वसूचना दिल्यामुळे सर्व कुटुंबीय घरी होतेच. सोबतच्या चौकोनी ठोकळ्यासदृश यंत्राला त्यांनी घरातील नेटवर्कला जोडलं आणि स्वीच ऑन केला. प्रोफेसर मार्टिन यांची आभासी प्रतिमा घरात वावरू लागली. त्यांच्या  दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे डाईनिंग टेबलवर हसत चहा पिताना, सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करताना, दुपारी सोफ्यावर पुस्तक वाचत पेंगताना असे रेकॉर्ड केलेली दृश्ये दाखवली जाऊ लागली. सुरुवातीला भावनिक झालेले सगळे कुटुंबीय हळूहळू या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करू लागले. छोट्याशा इकिरुला तर आजोबांची प्रतिमा पाहून गंमत वाटत होती. तिला जन्म मृत्यू या सर्वांचा गंधच नव्हता. तिचं नाव आजोबांनी ठेवलं होतं. विसाव्या शतकातील जपानी भाषेतील हा शब्द होता ज्याचा अर्थ 'जगणे' असा होता.  

        प्रयोगशाळेतून प्रोफेसर मार्टिन हे सगळे पाहत होते. संध्याकाळी इकिरुला झोपण्यापूर्वी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असे. त्यांनी खास तिच्यासाठी वर्ष-दोन वर्ष पुरतील एवढ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी ग्रंथालयातून प्राचीन ग्रंथ जमा केले होते. आज त्यांची प्रतिमा इकिरुला गोष्ट सांगत होती.  मोठं कथानक असलेल्या शूर राजा आणि त्याच्या साहसांबद्दल ही गोष्ट होती. गोष्ट ऐकता ऐकता  इकिरु झोपी गेली. सवयीप्रमाणे प्रोफेसर मार्टिन यांची प्रतिमा झोपण्यापूर्वी पुस्तक वाचताना दाखवली जात होती. त्यांच्या हातात त्यांचं अत्यंत आवडतं झेनकथांच पुस्तक होतं. त्याच्या एका पानावर पुढील कथा होती:

"A Japanese warrior was captured by his enemies and thrown into prison.That night he was unable to sleep because he feared that the next day he would be interrogated, tortured, and executed. Then the words of his Zen master came to him, "Tomorrow is not real. It is an illusion. The only reality is now." Heeding these words, the warrior became peaceful and fell asleep."

        प्रोफेसर मार्टिन हे सगळं प्रयोगशाळेतून पाहत होते. त्यांनी प्रयोगशाळेत सगळ्यांना गुड नाईट विश केलं आणि घराकडे निघाले. निघताना त्यांनी एक दीर्घ श्वास घेतल्याची त्यांच्या ऑक्सिजन मापन यंत्राने नोंद केली. 

***

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

लग्नसमारंभ

            मी आठ वर्षाचा असताना मामाच्या लग्नाला गेलो होतो. आयुष्यात अटेंड केलेलं पहिलं लग्न. ते चांगलंच लक्षात आहे ते दोन कारणांमुळे. एक : मी पोलिसाचा ड्रेस घातला होता (टोपी सकट) आणि दुसरं कारण म्हणजे लग्नाला जाताना वऱ्हाडाच्या टेम्पोत मला  उलट्या झाल्या होत्या.  मे महिन्यातली दुपारची ती रखरखती दुपार, घाटाची वळणे, टेम्पोचा डिझेलचा उग्र वास आणि आंबूस झालेलं तोंड यामुळे तो दिवस कायमचा कोरला गेलाय माझ्या आठवणींत. मामीच्या माहेरी परत कधीही  जाताना या घटनेची परत उजळणी होतेच. पोलिसाचा ड्रेस शिट्टीसकट घ्यायचा मी का हट्ट केला असेल याचा मला आता अर्थबोध होत नाही. मी लहानपणीदेखील आताइतकाच समंजस होतो असा माझा समज आहे, सतत चेहऱ्यावर गंभीर भाव असायचे. त्यामुळे आई-वडीलांनीच त्यांच्या मनासारखं करत मला तो ड्रेस घालायला भाग पाडलं असेल. त्या लग्नाचे फोटो पाहताना मला विलक्षण अवघडल्यासारखं होतं.  फोटोत माझा छोटा भाऊ मात्र मस्त चौकड्यांचं शर्ट आणि हाफ चड्डीत आहे आणि मी - मामा-मामी शेजारी लाच घेतल्यावर पकडल्या गेलेल्या पोलिसासारखा उभा आहे. 

            गावाकडच्या  लग्नांत आता बुफे पद्धत आलीय. मात्र अजूनही काही ठिकाणी जेवणाच्या पंगती उठतात. लग्नाचे जेवण पुरुष मंडळी बनवतात. त्यासाठी चरव खंदला जातो. मोठमोठी पातेली, त्यात रटरटणारा भात, लाल पिवळसर किंचित हिरव्या बुंदीने भरलेली घमेली,  आणि वांगी आणि बटाटाच्या मोठ्या फोडी असलेली तीच फेमस भाजी. ही वांगी-बटाटयाची साधी रस्सा भाजी मिशलिन स्टार रेस्तराँत पण मिळणार नाही. त्या चवीने नॉस्टॅल्जिक होऊन मी घरी कित्येकदा तशी भाजी बनवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. लाकडाचा  स्मोकिनेस, धूळमाती , क्लोरीन नसलेलं झऱ्याचं शुद्ध पाणी आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, कुणीही जेवणाला नाव ठेवून अतृप्त जाऊ नये यासाठी झटणारी भावकीतली माणसे ही महत्वाची इन्ग्रेडिएंट्स असल्याशिवाय त्या बिनमिठाच्या भाताला आणि रस्सा भाजीला चव कशी येईल? त्या सोहळ्यात गोणपाट अंथरून त्यावर वांगी चिरत, लसूण सोलत आजूबाजूच्या कोलाहलाचा भाग होताना मजा असते.  पंगतीत जेवताना श्लोक म्हटले जात. श्यामची आई पुस्तकात याचा उल्लेख आहे. माझ्या पाहण्यात तशा श्लोक म्हणण्याच्या स्पर्धा पंगतीत घडल्या नाहीत. जेवण वाढताना नजरानजर होऊन काही लग्न जुळल्याची उदाहरणं मात्र लक्षात आहेत. 

        लग्नानंतरच्या वराती पाहण्यासारख्या. बैलगाडीला मस्त डेकोरेट करून वाजंत्रीने मिरवत, ढोल खेळत वराती निघत.  आता सगळीकडे वरातीची स्पेसिफिक गाडी असते त्या पुढे डीजे असतो आणि बेधुंद नाचणारी मुलं मुली. मराठी मुक्तछंदातली कविता कितीही आशयघन असली तरी इथे कामाची नाही. इथे पाहिजे ते हे. 

 "गढुळाचं पाणी कशाला ढवळीलं..  नागाच्या पिलाला तू का ग खवळीलं? 

"अहो  मामी. .  तुमची मुलगी लय सुंदर. "

माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले दोन मित्र (त्यांना सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी  रमेश आणि सुरेश म्हणूया ) आजूबाजूच्या गावांतील वरातीत नाचायला जात. सूत जमवणे हा मुख्य उद्देश असायचा. अजूनही वरातीत छान नाचणाऱ्यांना बक्षीस मिळते काही ठिकाणी. तर सांगायची गोष्ट अशी कि रमेश आणि सुरेश दुसऱ्या गावी जायचे. सुरेश नाचत असताना रमेश माईकवाल्याजवळ जाऊन सुरेशसाठी पाचशे रुपये बक्षिसाचा पुकारा करायचा, मग सगळ्यांचे लक्ष त्याकडे वेधले जायचे. हीच ट्रिक सुरेश त्याच्या मित्रासाठी दुसऱ्या गावात करायचा. अशा रीतीने महिलावर्गाचे लक्ष आकर्षून घेण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असे. 

        शहरात हॉलमध्ये लग्न असल्यावर मी शक्यतो जायचं टाळतो . दुपारच्या उकडत्या वातावरणात कोंबून भरलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या, भिंतीला लावलेल्या पंख्याची हवा खाण्यासाठी धडपड करणारी माणसे, स्टेजवर चाललेले अनाकलनीय विधी आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं घालून बसलेली माणसे. सगळीकडे हाच देखावा. जेवणात पनीरची भाजी, सोडा टाकलेला जिरा राइस, दाल तडका, गुलाबजाम आणि आईस्क्रीमची रांग.  एकदा वाशीला सेक्टर शोधत शोधत लग्नाच्या हॉलजवळ आलो तेव्हा पोचायला उशीर झाल्याने लग्न काही गाठता आले नाही.  जेवल्यावर कळलं कि लग्न तर पहिल्या मजल्यावर आहे. तिथे तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर दोन्ही ठिकाणी लग्नें होती. 

        Pre Wedding फोटोशूट साठी हल्ली छोटे छोटे द्वीपसमूह शोधले जातात. सिनेमाच्या धर्तीवर लग्नाची शॉर्टफिल्म बनवली जाते. लग्न आयुष्यात एकदा होत असल्याने सगळ्या हौशी भागवल्या जातात. 

        ताईचं लग्न होतं त्या दिवशी. सकाळी वऱ्हाड घेऊन बस जाण्याआधी आम्ही घराशेजारच्या देवळात गेलो. ताईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. त्या थरथरत्या स्पर्शात तिला जाणवणारी anxiety मिश्र भीती मला कोण जाणे त्या वयात कळली नव्हती. काही वर्षांनी माझ्या लग्नात मला तो प्रसंग आठवला आणि त्या भावनेची खूण पटली.