सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

निसर्ग आणि आम्ही

आपल्या चाकोरीबद्ध जगण्याने निसर्गाने देऊ केलेल्या छोट्या छोट्या आनंदाला आपण मुकत चाललो आहोत.
ऑफिसची वेळ गाठण्याच्या गडबडीत दारी फुललेला चाफा आपले मन वेधून घेत नाही, पावसाच्या सरींनी मन भरून येत नाही,  ऋतू येतात जातात त्याची आपल्याला खबर नसते.  पावसाचा पुन्हा एकदा वेध घेत असताना प्रा. म. ना. अदवंत यांच्या 'निसर्ग आणि आम्ही' लेखातील एक उतारा माझ्या वाचनात आला. चाकोरीबद्ध जगण्याचे निसर्गाला मान्य नसलेले तत्व त्यांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेले आहे. तो उतारा इथे देत आहे.

"कोटाची -पुस्तकांची -बुटांची आशा मी आता सोडूनच दिली होती. छत्री मिटवून टाकली व अपरिहार्यतेला तोंड देण्याच्या दृष्टीने मी पावले टाकायला सुरुवात केली. सप- सप- सप- माझ्या चेहऱ्यावर व अंगावर पावसाचा मारा होत होता. मी जात होतो ती पायवाट एका शेतातून जात होती. त्या ठिकाणचा चिवट चिखल इतका विलक्षण होता की, अनेक वेळी बूट चिखलातच रुतून राही आणि पाय फक्त बाहेर येई. पुन्हा पाय बुटात घालून बुटासह तो पाय बाहेर काढणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते. 
अर्धा फर्लांग गेल्यावर मी माझ्या चिडक्या मनोवृत्तीतून बाहेर आलो. या सर्व वादळी परिस्थितीतही मला अतिशय अननुभूत असा आनंद वाटायला लागला. आतापर्यंत मी जवळ जवळ चाळीस पावसाळे पाहिले होते. असे मुसळधार पावसाचे दृश्य तर शेकडो वेळा पाहिले असेल, पण अशा पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद मी पहिल्यानेच अनुभवीत होतो. पाऊस आला तर शक्य तो घरातून निघावयाचेच नाही आणि मध्येच पावसाने गाठले तर शक्य तितक्या तातडीने आश्रयस्थान जवळ करावयाचे हा माझा आतापर्यंतचा शिरस्ता. पावसातून जाताना कपडे भिजू नयेत - अंगावर चिखल उडू नये म्हणून जास्तीत जास्त दक्षता घेण्याची काळजी. त्यामुळे निसर्गाच्या या आनंदाचे मी आतापर्यंत त्रयस्थपणाने आणि तटस्थपणानेच कौतुक करीत होतो. पण त्या निसर्गाच्या भव्य व प्रचंड आंदोलनात समरस होण्याचा, त्याच्याशी एकरूप होण्याचा आनंद केवढा मोठा आहे याची मला त्या दिवशी कल्पना आली. 
पावसाचा माझ्या चेहऱ्यावर सपासप होणारा मारा मला अतिशय सुखावह वाटायला लागला. चिखलात होणार्या घसरगुंडीत आणि कसरतीत मोठी मौज वाटू लागली. माझ्या प्रतिष्ठेचे व हिशेबी वृत्तीचे ओझे दूर फेकून देऊन मी जणू निसर्गाच्या क्रीडेत सामील झालो. 
माणसाच्या मनावर असलेल्या  प्रतिष्ठेच्या व व्यावहारिक गोष्टींच्या दडपणामुळे अशा प्रकारे किती आनंदाला तो मुकत असेल याची मला या वेळी जाणीव झाली. आपण आपले जीवन अनेक वेळा रुपये आणि पै यांच्या हिशोबात बसविण्याचा प्रयत्न करतो. प्रतिष्ठेची आपणाभोवती खरी खोटी वलये निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चाकोरीला जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद मानण्याचा आपण प्रयत्न करतो. त्या चाकोरीबाहेर जाणारे, हिशोबी वृत्तीला धक्का देणारे, प्रतिष्ठेच्या वलयातून बाहेर पडणारे थोडे जरी काही घडले, तरी आपण अस्वस्थ होतो. आणि काहीतरी चुकल्याची, काहीतरी अनिष्ट घडत असल्याची जाणीव आपण करून घेतो."
***  
       ( पूर्ण लेख  'मनाची मुशाफिरी' या पुस्तकात वाचता येईल. )


मग काय करता येईल या  प्रतिष्ठेच्या खोट्या वलयांतून बाहेर पडण्यासाठी? निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयोग केलेल्या थोरोने फार पूर्वी म्हटलंय  -
"I went to the woods because I wished to live deliberately, to front only the essential facts of life, and see if I could not learn what it had to teach, and not, when I came to die, discover that I had not lived."
यातील 'live deliberately' मी  मुद्दाम ठळक केलंय, कारण हे दोन शब्द माझा पिच्छा सोडत नाहीयेत.  विचारपूर्वक किंवा निश्चयाने जगणं म्हणजे कसं ते शोधण्याची धडपड चाललीय सध्यातरी.
***