सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

उगाच हळहळते आपली शाई

सहावीत असतानाची गोष्ट. मराठीचा तास चालू होता. बाई सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता शिकवत होत्या. सगळ्यांची डोकी बाकावरील पुस्तकांत होती. बाईंचा तसाच आदेश होता. या कवितेच्या पानावर निळ्या हिरव्या रंगातला समुद्र होता. वर्गात फ़क्त बाईंचाच आवाज घुमत होता. शेजारचा मित्र वर्गात असून नसल्यागत. त्याची छान समाधी लागलेली. मागे जरा वळून पाहिलं, मागच्या बाकावरचे पण समाधीत गुंतलेले.
बाई कविता शिकवताहेत. मुलं कठीण शब्दांचे अर्थ समासात लिहिताहेत. खिडकीतून येणार्या उन्हाची एक तिरिप कंपासपेटीवर पडलीय. अचानक खट  सारखा आवाज येतो अन धपदिशी काहीतरी माझ्या पुढ्यात पडतं.  त्या आवाजाने वर्गाची तंद्री भंगते. सगळे काय झालं म्हणून एकमेकांकडे पाहू  लागतात. माझ्या समोरील पुस्तकावर चिमणी मरून पडलेली असते. रक्ताचा एक मोठा ठिपका पानावर पडलेला असतो. रक्ताचे काही डाग कुणाच्या तरी यूनिफार्मवर उडालेले असतात.  एकंदरीत खिडकीतून आलेली एक चिमणी छताच्या पंख्याच्या तावडीत सापडून निष्प्राण झालेली असते.  एव्हाना माझ्या अवतीभोवती मुला-मुलींची गर्दी जमा होते.  शेजारी बसलेल्या मित्राची झोप खाडकन् उतरलेली असते. मग चारी बाजूंनी 'च्यक च्यक' सुरु होते. बाई गर्दीतून वाट काढत माझ्या बाकाजवळ येतात. मेलेल्या चिमणीला पाहतात अन् वर्गातील मागच्या बाकावरील धाडसी मुलाला तिला बाहेर फेकून यायला सांगतात. तो मुलगा मग ते पुस्तक सांभाळून उचलतो आणि वर्गाबाहेर पडतो मग वर्गाबाहेर जाता जाता मधल्या रांगांमधले आणि ज्यांना मेलेली चिमणी पाहता आली नाही ते तिला शेवटचं पाहण्याचा प्रयत्न करतात.
वर्ग परत सुरु होतो. माझं लक्ष आता उडालेलं. मी वरती पंख्याकडे पाहतो. तो गरगर फिरत असतो. माझं डोकं पण गरगरायला लागतं.  पुढचे दोन दिवस मी कुणाशीच फार बोलत नाही. इतक्या जवळून मृत्यू पाहण्याची ही पहिलीच वेळ.

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी होतो. आजीची दुभती म्हैस आजारी होती. चार दिवस तिने चारा पाणी काहीच शिवलं नाही. एखादं माणूस आजारी असावं असं शोकाकूल वातावरण घरी होतं.म्हैस काही वाचणार नाही हे ही सगळ्यांना कळून चुकलेलं. अन् ती रात्रीच केव्हातरी वारली. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो. अन् सकाळी जाग आली ती आजीच्या किंकाळीने. लहान होतो. आजी का रडतेय हे सुरुवातीला कळलं नाही. नंतर मेलेल्या म्हशीला पाहून कळलं. आजीच्या डोळ्याला पाण्याच्या नुसत्या धारा लागल्या होत्या. लहानशी चिमणी मरते तशी इतकी मोठी म्हैसपण मरते तर ! हालचाल थांबली, श्वास थांबले म्हणजे मृत्यू असंच असले पाहिजे. पण ही काहीतरी हरवल्याची जाणीव कसली? लोकं का रडतात?

शाळेच्या थोडं पुढे मुसलमानांच कब्रस्तान होतं. त्याला लागूनच खदान. त्यात आम्ही शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.  कब्रस्तानमधले हे उंचवटे कसले, ही उत्सुकता होती. मित्राने सांगितलं, माणूस मेला की त्याला इथे पुरतात. पण जोपर्यंत डोळ्याने पाहत नाही तोवर विश्वास कसा ठेवायचा? एकदा खेळताना  कब्रस्तानमधे गर्दी दिसली, काहीतरी खांद्यावरनं आणलेलं दिसलं. मग खेळ तसाच ठेवून आम्ही सगळे जमलो अन् चर्चेतून कळले की कुणीतरी मेलयं. खेळ संपल्यावर संध्याकाळी वाट चुकवून आम्ही तिथे पोचलो. त्या उंचावट्यावर फुलांची चादर होती. असाच प्रकार एकदा शाळेतून घरी जाताना दिसला पण यावेळी माणसाला पांढरया कपड्यात गुंडाळून खांद्यावरुन नेत होते. आई माझ्यासोबत होती. तिने बजावलं की असं काही दिसलं की लांब उभं राहायचं. आणि नमस्कार करायचा. आईला प्रश्न विचारण्याचं धाडस झालच नाही तेव्हा. मग हिन्दुंमधे मेलेल्या माणसाला जाळतात हे पुढे कळलं. शाहरुखचा 'कुछ कुछ होता है' मधे सुरुवातीस राणी मुख़र्जीच्या दहनाचा सीन आहे, तेव्हा तीही शंका फिटली पिक्चर पाहून.

काही जवळच्या, काही शेजारच्या व्यक्तींचं अकाली जाणं पाहिलं. त्यांच्या जाण्याने होणारं दुःख अनुभवलं आणि हे सर्व निसर्गनियमाचा भाग आहे, जाणारा जातोच त्याला परत नाही आणता येत इत्यादि सांत्वन करणारं तत्त्वज्ञान कधी पिंडाचा भाग होऊन गेलं कळलं देखील नाही.  मन कोरडं नाही झालं हे नशीब.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळची दादर फ़ास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मला उभा होतो. गाडीला यायला तीन मिनिटे अवकाश होता म्हणून थोडं चालत जाऊया पुढे म्हणून प्लेटफार्मवर चालत होतो. गर्दी होती थोडीशी. अचानक मधे कबूतराचं पिल्लू तडफडत पडलेलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या पत्र्यांमधल्या पोकळीत कबूतराचं घरटे होते. बॅगेतून टिश्यू पेपर काढला आणि त्याला अलगद उचलून कोपर्यात नेलं. बारिकशी चोच हालत होती. पाण्याच्या बॉटल मधलं थोडस पाणी करंगळीने त्याला पाजलं. एव्हाना लोकं कुतूहलाने पाहत होतीच माझ्याकडे. ट्रेन आली. थोड्या वेळाने ते मेलं. त्याला आणखी एका टिश्यू मधे गुंडाळून कोपर्यात कुणाचाही पाय लागणार नाही असं ठेवलं. एवढ्यात माझे हे सर्व उद्योग बघणार्या एकाने असही म्हटले कि "पंछी चुतिया होते है किधर भी घोंसला बनाते हैं".  माझी ट्रेन एव्हाना सुटली होती  दूसरी ट्रेन कुठली लागलीय हे पाहूया म्हटलं. हे इंडिकेटर पण जाम मिजासखोर. थोड्या वेळाने मागे वळून जिथे पिल्लू ठेवलय तिथे पाहिलं तर त्या पिल्लाजवळ एक कबूतर येऊन थांबलं होतं. त्याचच पिल्लू असावं बहुतेक.  आप्त स्वकीयाच्या  मरणाचं दुःख पशू पक्षांनापण होतं असावं.
संजय चौधरीची ओळ आठवली एकदम 'जाणारा जातोच, थांबवता येत नाही.. पण उगाच हळहळते आपली शाई'

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

द परसूट ऑफ़ हॅप्पीनेस

   
२००६ साली आलेला 'द परसूट ऑफ़ हॅप्पीनेस' हा सिनेमा नुकताच  पाहिला आणि  प्रचंड आवडला. साधी सोपी गोष्ट.  चित्तथरारक असे एक्शन आणि एडवेंचर नाही. पाहताक्षणी मनाला पटणारा आणि भिडणारा. विल स्मिथ हा ताकदीचा नट. याआधी मोहम्मद अलीच्या बायोपिक मधे त्याने भूमिका केली होती आणि MIB च्या मालिकांत तो असतोच.
     आपल्या आयुष्यातील सर्व संपत्ती  'बोन डेन्सिटी स्कॅनर' नामक एका मशीनच्या वितरणात खर्ची घातलेल्या ख्रिस गार्डनर (विल स्मिथ)ची ही गोष्ट.  बोन डेन्सिटी स्कॅनर ही मशीन हाड़ांचे अधिक परिणामकारक चित्र देते, पण सध्याच्या एक्स रे मशीन पेक्षा दुप्पट महाग असते. त्यामुळे बहुसंख्य डॉक्टरांना हा खर्च विनाकारण आहे असं  वाटतं. कुठल्याही परिस्थितीत महिन्याला किमान ३ मशीन विकणं हे त्याला चरिथार्थ चालवण्यासाठी आवश्यक आहे. त्याला सतत किटकिट करणारी बायको आहे, एक लहान मुलगा (ख्रिस्तोफर) आहे. एकंदरीत  त्रिकोणी कुटुंब.  आपण जबाबदार बाप बनण्याचे तो हरघडी प्रयत्न करतोय.
         हल्ली नवरा बायकोच्या नातेसंबंधात तणाव आहे.  त्याला मुख्य कारण म्हणजे ख्रिसला सेल्स मधे सतत येणारं अपयश. त्याला पार्किंगचे टिकिट्स भरता न आल्याने वाहतुक विभागवाले त्याची गाडी उचलून घेऊन जातात. घरमालकाचे भाडे थकलेले असते. कर भरण्यासाठी सरकार दरबारातून बर्याच नोटिशी घरात पडलेल्या असतात. सकाळी दोन्ही हातात एक एक अशा मशीन घेऊन तो त्याच्या मुलाला पाळणा घरात सोडतो.  त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधे मशीन विकण्यासाठी डॉक्टरांच्या मुलाखती सुरु.  डॉक्टरांची अपेक्षाभंग करणारी उत्तरे.  या सर्वांतून संध्याकाळी बायकोचं तिरसट बोलणं, असा त्याचा नेहमीचा दिनक्रम.
       एकदा असंच वॉल स्ट्रीटवरून चालताना एका गगनचुंबी इमारतीकडे तो पाहत असतो. बाजूला एक श्रीमंत दिसणारा  गृहस्थ लाल पोर्शे पार्क करतो. ख्रिस त्याला विचारतो की तू हे कसं केलस आणि आणि तू काय नेमकं  करतोस? तो उत्तर देतो की तो स्टॉकब्रोकर आहे.  ख्रिसला या हलाखीच्या आयुष्याचा कंटाळा आलेला असतो, तो ठरवतो की असं काही तरी करावं. जॉब बदलाच्या त्याच्या निर्णयाला त्याच्या बायकोकडून अपेक्षेप्रमाणे कडवट प्रतिसाद मिळतो.
   त्याच दरम्यान एक स्टॉक ब्रोकिंग फर्म इंटर्नशिपसाठी उमेदवार घेत असते. सहा महिन्यांची इंटर्नशिप. शेकडो अर्जापैंकी वीस जणांनाच निवडणार आणि त्या वीस जणामधून एकाचीच नोकरी पक्की होणार. ख्रिस पण इंटर्नशिपचा अर्ज भरतो.  एकदा इंटर्न रिक्रूट करणारा HR  मॅनेजर -ट्विसल टॅक्सीची वाट पाहत असतो त्या वेळी ख्रिस  "मला पण त्याच ठिकाणी जायचे आहे" असे सांगून त्याला घरापर्यंत टॅक्सीतून लिफ्ट देतो. काही करून त्याला ही संधी गमवायची नसते. या प्रवासात तो रूबीक क्यूब सोडवून  दाखवतो आणि आपण बुद्धिमान आहोत हे सिद्ध करतो पण त्याच्याकडे टॅक्सीचे पैसे भरण्याइतपत पैसे नसतात. मग टॅक्सीवाल्याला बरेच फिरवून एका ठिकाणी तो टॅक्सीतून पळ काढतो. टॅक्सीवाला त्याच्या मागे ओरडत पळत असतो. शेवटी ख्रिस त्या टॅक्सीवाल्याकडून स्वताची सुटका करुन घेतो. या गडबडीत तो एक मशीन गमावतो. एक मशीन म्हणजे एका महिन्याचं राशन.  तो घरी उशीरा येईल असे सांगण्यासाठी फोन करतो तेव्हा त्याची बायको आपण घर सोडून चाललो आहोत असे सांगून त्याला आणखी मानसिक संकटात टाकते. ख्रिस तरीही ठामपणे बायकोला बजावतो कि त्याचा मुलगा ख्रिस्तोफर त्याच्याचसोबत राहील. अशा वेळी त्याला थॉमस जेफेरसनने अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यात लिहिलेल्या "प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा शोध घेण्याचा अधिकार आहे" या वाक्याची आठवण होते त्याला राहून राहून  प्रश्न पडतो की जेफेरसनने 'सुखाचा शोध' असं का म्हटलं असेल ? सुखाचा फ़क्त शोधच घेता येतो का ? खरोखर सुखासारखं  काही असतं का? सुख म्हणजे नक्की काय असतं?
      घरी आल्यावर बायको आणि मुलगा दोघेही घरी नसतात. बायको मुलाला घेऊन घर सोडून गेलेली असते. त्याचं मन नैराश्याने भरुन जातं. अशा वेळी ट्विसल (HR  मॅनेजर) त्याला फोन करुन  सांगतो की, त्याला उद्या ऑफिसमधे येऊन भेट- तो इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालाय. इथे  एक लोच्या असतो की या इंटर्नशिप दरम्यान कुठलेही मानधन मिळणार नसते, आणि सहा महिन्यांनंतरही नोकरीची हमी नसते, काय करावं आता? ख्रिस ही संधी स्वीकारतो.
    मग त्याचा अत्यंत खडतर असा प्रवास सुरु होतो. सकाळी उठून मुलाला पाळणा घरात सोडणं, त्यानंतर इंटर्नशिपवर, मग मशीन विकण्याचा प्रयत्न करणं संध्याकाळी परत येताना ख्रिस्तोफरला घरी आणणं. अशातच घरमालक भाड़े वेळेवर देता न आल्यामुळे त्यांना घराबाहेर काढतो, त्याचे बँक अकाउंट्स सरकारकडून गोठवले जातात. ख्रिस पुरता कफल्लक होतो  ख्रिसला आपल्या मुलासोबत एक रात्र रेल्वे स्टेशनवरील बाथरूममधे काढावी लागते. आता राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्याला कळते की एका चर्च मधे राहण्याची व्यवस्था होऊ शकते पण फ़क्त मर्यादित लोकांसाठीच. मग वेळेशी लढाई सुरु होते. इंटर्नशिप संपल्या संपल्या ख्रिस्तोफरला घेऊन चर्चजवळ रांगेत उभे राहवे लागे. जरा उशीर झाला तर रात्र उघडयावर काढावी लागेल ही भीती सदोदित मनी असे. आपण कफल्लक झाले आहोत हे तो ऑफिस मधे कुणालाच कळू देत नाही. एकदा त्याच्या बॉसकडे टॅक्सीवाल्याला द्यायला सुट्टे पैसे नसतात, तेव्हा पाच डॉलर उसने देतो.  पाच डॉलरही त्याच्यासाठी फार मोठी रक्कम असते त्यावेळी. ख्रिस त्याच्या इंटर्नशिप च्या काळात खूप शिकण्याचा प्रयत्न करतो. एकदा तर नियमांना डावलून एका बड्या कंपनीच्या CEO ला फोन करतो आणि गुंतवणुकीसाठी वेळ मागतो, त्या CEO सोबत एका रग्बी मॅचला जाऊन आपले कॉन्टेक्ट्स वाढवतो.
     अशातच त्याला त्याची हरवलेली एक मशीन सापडते. त्या मशीनला एक वेडा 'टाइम मशीन' असे मानत असतो. त्याच्याकडून तो ती परत घेतो, तिचे काही भाग मोडलेले असतात. तिला दुरुस्त करण्यासाठी पैशांची गरज असते. ख्रिस रक्तदान करून पैसे कमावतो आणि ती दुरुस्त करतो. त्या मशीनला विकून अडीचशे डॉलर मिळतात. आणखी काही दिवसांचा प्रश्न मिटतो. असे करता करता सहा महिने होतात. अंतिम परीक्षा पार पडते.
इंटर्नशिपच्या शेवटच्या दिवशी त्याचा बॉस त्याला केबिन मधे बोलावतो. ख्रिसने नविन शर्ट घातलेला असतो. तो त्याला म्हणतो की त्याने हाच शर्ट उद्या पण  घालावा. स्टॉक ब्रोकर म्हणून कामाच्या पहिल्या दिवशी. त्याची निवड झाल्याबद्दल तो त्याचे अभिनंदन करतो. ख्रिसला त्याचे अश्रु आवरत नाहीत. तो धावत पाळणाघरात जाऊन ख्रिस्तोफरला मिठी मारतो. आता त्याला कळतं सुख म्हणजे नेमकं काय!
     चित्रपटाच्या नावातील हॅप्पीनेसची स्पेलिंग जाणीवपूर्वक चुकीची लिहिलीय ख्रिस्तोफरच्या पाळणाघराजवळील भिंतीवरील ग्राफिटीवरुन ती घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत स्वत: वर विश्वास ठेवायला हवा असा संदेश कुठल्याही उपदेशाचा बडेजाव न आणता हा चित्रपट देतो. चित्रपटात एके ठिकाणी ख्रिस आणि त्याच्या मुलाचा संवाद आहे तो  खूप प्रेरणादायी आहे "Hey. Don't ever let somebody tell you... You can't do something. Not even me. All right?"
Christopher: All right.
Christopher Gardner: You got a dream... You gotta protect it. People can't do somethin' themselves, they wanna tell you you can't do it. If you want somethin', go get it. Period."
    ख्रिस पुढे जाऊन एक यशस्वी स्टॉक ब्रोकर बनतो. या चित्रपटाची कथा ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यावरून घेतलीय. एकदा पहावाच असा हा चित्रपट आहे.