शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

आठवणींचा कोलाज : दिवाळी

लहानपणी दिवाळी म्हटलं की, दिवाळीची सुट्टी आठवते. शाळा बंद पण अभ्यास चालू. बहुतेक सहामाही परीक्षा संपलेली असायची, शेवटचा पेपर लिहिल्यानंतर जरा कुठे मोकळा श्वास घेतोय तोच 'दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास' गळ्यात पडायचा. रोज वर्गातील फळा सजवायची जबाबदारी सरांनी वाटून दिलेली असायची. फळ्यावर दिनांक, वार आणि आजचा सुविचार लिहायचा आणि ते पण पहिल्या तासाच्या आधी. हे सर्व हजेरीपटावरच्या नंबरनुसार. ज्याचा आज नंबर असेल त्याला सुविचार काय लिहू असा प्रश्न पडायचा. बहुतेक सुविचार लिहून झालेले असायचे त्यामुळे नवीन सुविचार बनवले जायचे उदा. 'गुलाबावरून गेली रिक्षा, जवळ आली सहामाही परीक्षा'. (वि. स. खांडेकरांनी एके ठिकाणी म्हटलंय, 'बालपणी परीक्षा, तरुणपणी प्रेम आणि म्हातारपणात मृत्यू ह्या अन्न गोड लागू न देणाऱ्या गोष्टी होत' एकदम खरंय).
सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर लिहिल्यानंतर 'दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास' लिहून घ्यावा लागायचा. बारा विषयांचा भरमसाठ अभ्यास. मुलांनी ही सुट्टी आनंदात घालवूच नये याचसाठी ही उपाययोजना असावी. ही अभ्यासाची वही सजवण्यासाठी आम्ही आमची सारी कल्पकता पणाला लावायचो, म्हणजे त्यात दिवाळीच्या फराळाने सजलेल्या ताटाचे चित्रच काढ, कुठे जगविचित्र कंदील काढ, शेजारच्या ताईकडून रांगोळीचं चित्र काढून घे, वहीला चांगलं कव्हर घाल असं. सगळा अभ्यास सुरुवातीच्या दोन दिवसात पूर्ण करून नंतर उंडारायचे ही strategy असायची. बाकीचे लोक सुट्टी संपायच्या दोन दिवस आधी अभ्यासाला लागायचे आणि अशा आणीबाणीच्या वेळी हुशार मुलांच्या वह्यांना जाम मागणी असायची.

***


दिवाळीचा किल्ला बनवायला मुंबईत जागा नाही, पण गावी किल्ला बनवायला मजा येई. आधी जमीन साफ करून घ्यायची, विटा, भुसभुशीत माती जमा करून ठेवायची. मग विटांनी, बारीक दगडांनी किल्ल्याला आकार द्यायचा. पर्वतासारखा आकार आला पाहिजे. विटांच्या मधली पोकळी चिखलाच्या गिलाव्याने भरून काढायची. शिवाजी महाराजांसाठी सिंहासन बनवायचं. किल्ल्यावर गहू पेरायचा,आणि कोंबड्यापासून गव्हांकुरांना वाचवायचं सुद्धा. शिवाजी महाराज, मावळे यांच्या छोट्या मूर्त्या तालुक्याच्या बाजारातून आजी आणायची. पोळ्याच्या सणाला आणलेली मातीची बैलजोडी किल्ल्यावर चरायला लावून द्यायची. नागपंचमीला केलेला मातीचा नाग पायथ्याला ठेवायचा. शेजारच्या मित्रांनी बनवलेल्या किल्याच्या पायथ्याशी खेळण्यातील छोटा ट्रक पण असायचा. शिवरायांच्या काळात ट्रक नव्हते याचे तेव्हा सोयर सूतक नव्हते. आणि तेही योग्यच. कॉमन सेन्स वापरून आज नवीन काही बनवताना धापा लागतात.
किल्ल्याचे  बांधकाम पूर्ण होईपर्यंत आळीपाळीने सुरक्षारक्षकांची फौज निगराणीसाठी असे. घरातून माऊलीने जेवणासाठी हाका मारल्या तरी अशा वेळी मावळे जागचे हलत नसत. किल्याला लाईटिंग करण्यासाठी कॉलेजला जाणाऱ्या दादाची मदत घेतली जायची. त्याने मग भाव खायचा. मग तो घरातून अंगणात एक्शटेन्शन टाकून लाईटिंग करून द्यायचा. आपल्याला हवी तशी लाईटिंग झाल्यावर कधी एकदा रात्र होतेय आणि आपण किल्ला उजळून टाकतोय असे व्हायचे.
संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यावर किल्ल्याची रोषणाई सुरु करायची. महाराजांची मूर्ती फोकसमधे आली पाहिजे. मावळे पण चमकले पाहिजेत, अशी मांडणी चेहऱ्यावर जे आमच्या चेहऱ्यावर जे तेज येई ते काय विचारता !
दिवाळीच्या दिवसांत मग आल्या-गेलेल्या पाहुण्यांना आमचा किल्ला पाहण्यावाचून आणि आमच्या वास्तुकलेचे कौतुक करण्यावाचून गत्यंतर नसे. गाईडची भूमिका कोण करणार यावर भांडणे होत, त्यावेळेला आम्ही पाहुणे वाटून घेऊ.

***

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी सगळं जग पहाटे लवकर उठतं तेव्हा मी डाराडूर झोपलेलो असतो. भल्या सकाळी चारला उठून, उटणं लावून अंघोळ करणं माझ्या तब्येतीला कधीच मानवलं नाही. सगळेजण फटाके वगैरे फोडून इतरांच्या झोपा मोडतात. काय ती पहाटेची साखरझोप. अहाहा !! माझी ही सवय मोडण्याचा प्रयत्न करून सगळे फसले.
लहानपणी तुमचा इलाज नसतो, ऐकावं लागतं. आता मोठेपणी वाद घालता येतो. हे असंच का? ते तसंच का?
लोक आजकाल इतक्या पहाटे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जातात तेही अंघोळ वगैरे करून, कुर्ता घालून (specifically कुर्ता घालून), मला त्याचं कायम नवल वाटत आलंय. मला दिवाळी पहाटचा कार्यक्रम म्हटला कि तो सादर करणारे कलाकार किती वाजता उठत असतील बिचारे, किती लांबून येत असतील, बहुतेक पहिली ट्रेन पकडत असतील, आणि कुणाचा गजर वाजलाच नाही तर आणि उठायला उशीर झाला तर ? असले हजार प्रश्न.
मी उठेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी उरकलेल्या असतात. फराळाच्या दोन चार प्लेटी रिचवलेल्या असतात. उटण्याने अंघोळ केल्यावर चिरोटे फोडायचे आणि ते पण एका दणक्यात डाव्या टाचेखाली. आपण साक्षात नरकासुराच्या मानेवर पाय देत आहोत असा अविर्भाव करायचा.
फराळ करताना इतरांच्या चेहऱ्याकडे पाहावं. आपली झोप पूर्ण झालेली असते पण इतरांच्या जांभया चालू असतात तेव्हा जो आसुरी आनंद होतो (नरकासुरी म्हणूया) काय वर्णावा.

***

दिवाळीचा फराळ हा स्त्रियांच्या चर्चेचा खास विषय. खाण्याचा कमी आणि टीका करण्याचा जास्त. कुणाची करंजी आतून पोकळच कशी होती, सारण नीट भाजलंच नव्हतं, कुणाचे अनारसे आतून कच्चेच कसे राहिले, कुणात तेल किती जास्त अशी समीक्षा सगळीकडे आढळून येते. एखादीच्या चकल्या तेलात विरघळल्या असतील तर पुढच्या दिवाळीला कशा चकल्या करायच्या यावर दहा बारा वेगवेगळी उत्तरे येतात, कुणी म्हणतं पिठात तेलाचं मोहन फार कडक नसावं तर कुणी म्हणतं कडक असावं. ती सुगरण बिचारी ऐकत बसते.
चाळीतल्या बायका फराळ बनवायला एकमेकांच्या घरी मदतीला जातात. इमारतींच्या बंद घरांत राहणारी माणसे शेजारच्या घरातील खिडकीतून तुपाचा वास येतोय म्हणजे शंकरपाळ्या चालल्यात हे ओळखतील, पण "काय मोरेकाकू कुठवर आलाय फराळ? आज शंकरपाळ्या करताय वाटतं. नंतर वेळ मिळाला तर आमच्याकडे या, तुमच्या हातचे रव्याचे लाडू अविला फार आवडतात हो, करूया थोडे. कसं ?" हे विचारणार नाहीत.  करंजी (ज्याला कानावलं असे पण म्हणतात) बनवायला वेळ लागतो म्हणून चाळीत बायका आपापलं पोळपाट लाटणं घेऊन एकमेकींच्या घरी जात. सर्व करंज्या बनवून झाल्यावर प्रत्येकीला दोन करंज्या मिळत. शेवटच्या राहिलेल्या सारणातून चंद्र-सुर्य बनवले जायचे. त्यावर मात्र माझे  लक्ष असे.  कधी कधी फराळाच्या मदतीला आईच्या मैत्रिणी घरी यायच्या, त्यांच्यासोबत त्यांच्या मुली. आणि त्या कर्मधर्मसंयोगाने माझ्याच वर्गातल्या निघायच्या.  आईला मदत करतोस की नाही या त्यांच्या प्रश्नावर "कसली मदत करतोय तो. उलट काम वाढवून ठेवलंय बघ, मघाशी सांगितलं की सारणात पिठीसाखर घाल अर्धा किलो, तर मैदा घातला." मी बराच वेळ काय रिएक्शन द्यावी या विचारात.

***
शाळेत असताना एका मैत्रिणीच्या घरी फराळाला गेलो होतो . म्हणजे तिनेच बोलावलं होतं म्हणून. चहाचा ट्रे आणि फराळाची प्लेट आली. घरी करंज्या चहात बुडवून खायची सवय. इथे कशी खायची. मैत्रीण प्लेट हातात देऊन आत स्वयंपाकघरात गेलेली. आम्ही एक करंजी उचलली आणि बुडवली चहात, आणि खाण्यासाठी परत उचलतोय वर तर पारलेच्या बिस्किटाप्रमाणे मोडून पडली चहात. आता ? घरी असतो तर बिनदिक्कत अंगठा आणि  तर्जनी चहात घालून बाहेर काढली असती करंजी. आणि हे काही आपले घर नाही. माझी कैफियत तिने जाणली आणि चमचा आणून दिला. आपल्याला एवढी साधी गोष्ट सुचू नये याचं आजही आश्चर्य वाटतं.

***

 एका मित्राला घरी फराळाला बोलावलं होतं. त्याला म्हटलं बेसनाचे लाडू मस्त झालेत खाऊन बघ. तो म्हणाला, "नको रे".
"अरे घाबरू नकोस, खरंच छान झालाय सगळा फराळ" मी.
त्यावर तो "तसं काही नाही रे, पण बेसनाचा लाडू सोडून सगळं खातो."
"का पण?" मी.
 "एका दिवाळीला आई गेली, मग तिच्या आठवणीसाठी बेसनाचा लाडू खायचं सोडलं. आई होती म्हणून दिवाळी होती रे. मला अजून आठवतंय ती लाडवासाठी बेसन भाजायची तेव्हा अभ्यासातून मन उडायचं. लाडू वळल्यानंतर परातीत काढून ठेवल्यावर माझ्या स्वयंपाकघराच्या वाऱ्या सुरु व्हायच्या. तिला बरोबर कळायचं. मग तीच म्हणायची "बघ जरा चाखून, साखर व्यवस्थित आहे का?". साखर व्यवस्थित आहे का ते एक लाडू खाऊन कसं कळणार, दोन तीन व्हायचे".
मित्राच्या डोळ्यांत पाणी तरळलं. आठवणी अशाच छोट्या छोट्या गोष्टींशी  निगडीत असतात. सण निमित्तमात्र असतात नात्यांना उजाळा देण्यासाठी.

 ***