सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

"आमानधमकी"ची गोष्ट

चिऊ त्यादिवशी घरी आली होती. ( चिऊचं पाळण्यातलं नाव 'अर्पिता' आहे, पण तिला सगळे चिऊच म्हणतात. आता तर अशी  परिस्थिती आहे कि चिऊ हे आपलं खरं नाव आहे असे तिला वाटतेय, तिने तिच्या ज्यु. केजीतल्या बाईंना तिचं पूर्ण नाव चिऊ उत्तम पाटील असे सांगितल्यावर त्याही जरा संभ्रमात पडल्या होत्या) ती घरी येणार कळताच अक्षरक्ष: दंगलीची परिस्थिती असल्यासारखी आवराआवर सुरु होते. तिच्या हाताला लागेल अशी महत्वाची वस्तू जवळपास नाही ना याची खात्री केली जाते, तिची नवचित्रकला माझ्या संग्रहातील  पुस्तकांच्या पानांवर दिसेल. ज्याला सर्व जण रेघोट्या म्हणतो अशा abstract चित्रकलेचं प्रात्यक्षिक तिने माझ्याकडच्या  पुस्तकांवर केलंय. बर्याच वस्तूंनी शेवटचा श्वास सोडलाय. तर मुद्दा असा चिऊ घरातून जाईपर्यंत आम्ही घाबरेघोबरे असतो. त्या दिवशी आई तिला रागाने उद्देशून म्हणाली,"तिला आमानधमकी पाहिजे आता".
आईच्या तोंडून तो शब्द ऐकताच आत्याची आठवण झाली एकदम. खरं म्हणजे ती माझ्या वडिलांची आत्या, पण आम्ही नातवंडेपण तिला आत्याच म्हणायचो. "आमानधमकी हा तिचाच शब्द." ती फार गोष्टीवेल्हाळ होती. कमरेत पोक काढून चालायची. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर लहान मूल घाबरून रडलंच पाहिजे, पण नंतर त्याचे तिच्याशिवाय अजिबात चालायचे नाही.  लहान मुलाला तेल लावून अंघोळ घालण्यापासून रात्री झोपवेर्यंत त्या मुलांच्या आयांना आत्या हवीच असे. तिला स्वतःला मूल नव्हतं, पण त्याची कसूर तिने आम्हाला वाढवून पूर्ण केली.
रात्री सगळ्यांची जेवणे उरकली, अंथरुणं पडली कि सगळा लहान मुलांचा गोतावळा आत्याच्या अंथरुणाशेजारी जमायचा. घरात एकूण तीन म्हातार्या होत्या, पण आत्यासारखी popularity त्यांना नव्हती. वयोमानाने येणारी अस्वस्थता,बैचेनी तिच्यात दिसायची नाही. "आत्या गोष्ट सांग ना" चा गजर व्हायचा. घरातल्या इतर बायका मुलांना आत्याकडे पिटाळून झोपून जायच्या. कंदिलाच्या पिवळ्या उजेडात बालफौज आत्याजवळ जमायची.
त्या बालफौजेत दोन ते दहा वयोगटातले सगळे असायचे, त्यात रांगणारे, नुकतेच चालायला शिकलेले (ज्यांच्या पायात पैजण असायचे, व त्याच्या आवाजावरून त्यांच्या detective आया त्यांना शोधून काढायच्या.) असे श्रोते असायचे. आत्या कुठली गोष्ट सांगू असे विचारायची, मग आम्ही एकसुरात म्हणायचो, "आमानधमकीची". जसे तमाशाला सुरुवातीला नमन असतं, तसंच इथे सुरुवातीला "आमानधमकी"ची गोष्ट असलीच पाहिजे असा आमचा आग्रह असायचा.
मग गोष्ट सुरु व्हायची. "एक होता राजा, तो एकदा जंगलात शिकारीला गेला."
तिच्या प्रत्येक पूर्ण वाक्याला "हुं" करून साद दिलीच पाहिजे असा अलिखित नियम होता.
"दिवसभर भटकला तो, पण शिकार काही सापडेना. कंटाळला बिचारा, अशात रात्र झाली. करावं काय आता. राजवाडा कोसो दूर. जवळ प्रधानजी नाही. कुठे राहायचं, काय खायचं, कुठली झोपडी दिसेना आसपास?"
"रात्र अशी किर्र, प्राण्यांचे आवाज येताहेत"
अशा वेळी खिडकीतून दिसणारी बाहेरची झाडे विचित्र हालचाल तरी करत किंवा विचित्र आकार तरी निर्माण करत.आणि मग पुरते घाबरून  आम्ही तिकडे न पाहता आत्याच्या गोष्टीकडेच ध्यान केंद्रित करीत असू. पण आपण जे पाहिलंय ते दुसर्याला इशार्याने दाखवून त्यालापण घाबरवत असू.
"तेवढ्यात राजाला एका झाडाच्या टोकावर एक छानशी जागा दिसली कि तिथे तो लपून राहू शकेल, तो झाडावर चढून जाऊन बसला, चढताना त्याने एक भला मोठ्ठा दगड सोबत घेतला.  थोड्यावेळाने काय झालं, एक मोठं अस्वल आलं आणि नेमकं त्या झाडाखाली बसलं. आता काय करावं, झाडावरून उतरू तर शकत नाही, उतरलं तर अस्वल खाऊन टाकणार"
आमच्यापैकी कुणीही अस्वल पाहिलं नव्हतं तेव्हा. त्यामुळे त्याचं चित्र मनावर पक्कं नव्हतं, त्याला काळे घनदाट केस असतात आणि ते उंच असतं या वर्णनामुळे कुणीही अशा टाइपचा इसम दिसल्यास आम्ही घाबरून जात असू.
"राजाने मग नेम साधला आणि जवळचा मोठ्ठा दगड त्याच्या पाठीत घातला. आणि जोराने म्हणाला "कशी पडली आमानधमकी?" बिचारं अस्वल जीवाच्या आकांताने पळत सुटलं. राजा मग सकाळ होताच घरी परतला."
ही गोष्ट सांगून होईपर्यंत अर्धेअधिक श्रोते झोपेच्या अधीन झालेले असत. कुणी आत्याच्या मांडीवर, कुणी तिला बिलगून झोपी गेलेले असायचे. मग अशा बहाद्दरांना हलकेच उचलून बाजूला ठेवण्यात येई. आणि मग  आमच्यासारख्या चिवट श्रोत्यांसाठी दुसरी गोष्ट सुरु होई, त्यात कधी गरीब शेतकरी आणि त्याची शहाणी मुलगी असे. शेतकर्याला अचानक  मोठा धनलाभ होतो. राजाला हे कळतं, राजापासून वाचण्यासाठी मग ती सोन्याच्या मोहरा शेणाच्या गोवर्यात लपवून ठेवते. अशा अनेक गोष्टी.
तिच्या काही गोष्टी तर दोन तीन दिवस चालायच्या. कुठलातरी राजा परदेशभ्रमंतीसाठी निघायचा आणि रस्त्यांत त्याला अनेक संकटे यायची. तिने सांगितलेल्या गोष्टींपैकी फार थोड्या आता आठवताहेत, पण आमानधमकीची गोष्ट मनात पक्की आहे,  मूल जरा जास्त दंगा करत असेल तर कुणी वडीलधार्याने म्हटलं कि "आमानधमकी हवीय का ?" तर ते सुमडीत गप्प बसायचं. शाळेतून आल्यावर न बोलता कुणी अभ्यासाला बसलं कि "शाळेत आज आमानधमकी पडलेली दिसतेय!" असा टोला असायचा.
***
कॉम्पुटरवर गेम खेळणाऱ्या घरातील नव्या पिढीला भेटण्याचा योग आला.आता कुटुंब विखुरलेले. त्यामुळे सततचा संपर्क नाही.  ही नविन पिढी आमच्यापेक्षा फार सतर्क. रात्री जेवणानंतर मी सर्वांना गोष्ट सांगणार असे आधीच जाहीर केल्यामुळे बिछान्याजवळ गर्दी. मुलांना 'आमानधमकी'ची गोष्ट सांगूया म्हणून सुरुवात केली "एक असतो राजा. . . "
तर त्यावर "असा राजा बिजा नसतो काही" अशी प्रतिक्रिया.
मुलांचे हिरोही बदललेले.
"काका तुला गर्लफ्रेंड आहे का रे?" वय वर्ष साडेपाच असलेल्या माझ्या पुतण्याचा प्रश्न.
"तू Asphalt 8 खेळणार का?"
आता त्यांना आवडणार्या गोष्टींविषयी बोलत गेलो. हळू हळू गोष्टीतल्या राजाची जागा Hugh Jackman ने घेतली. त्याने एका alien ला कशी आमानधमकी दिली इथपर्यंत आल्यावर मी सुटकेचा श्वास घेतला.
त्यांना "आमानधमकी" शब्द व ती गोष्ट लक्षात राहील की नाही कुणास ठावूक? निघताना मात्र,आम्हाला कुणीच गोष्ट सांगत नाही तेव्हा तू थांब बरेच दिवस असा आग्रह झाला. मुलांना रात्री झोपताना गोष्ट सांगायला त्यांच्या आई वडिलांना वेळ नाही. त्यांचे आई वडीलही एका  जगावेगळ्या आनंदाला मुकताहेत हे नक्की.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

असंबद्ध

"तू कविता करतोस ?"
"लिहायचो पण खूप आधी, कॉलेजला होतो तेव्हा !"
"मला वाचायला आवडतील तुझ्या कविता, काही हरकत नसेल तर . . ."
". . . ती एक मोठी दर्दभरी कहाणी आहे.. माझ्या कवितांची वही २६ जुलैच्या पावसात वाहून गेली.  ( हुश्श !!)
"अरेरे !"
"त्यानंतर कविता लिहावीशी वाटली नाही, पण आता वाटतेय."

***

 "वुडहाउसला मानलं पाहिजे यार, काय लिहितो !"
 "छे काहीतरीच. त्याच्या आजूबाजूला काय चाललंय याची त्याने साधी दखल घेतली नाही कधी , फक्त जुनं लंडन शहर रंगवत गेला. "
"पण, लोकांना हसवणं सोपं काम नाही."
"मान्य. पण साहित्यात जीवनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे."
"कुठल्या मुर्खाने सांगितलं की साहित्यात जीवनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे? आणि ऐक. . वुडहाउस ग्रेट आहे. वाद संपला. आजूबाजूला काय चाललंय याची त्याने दखल घेतली नाही म्हणून तो ९३ वर्षं जगला."



***

"काय शोधतोयस त्या सुभाषितांच्या पुस्तकात?"
"एक छानसं वाक्य, One liner जे मी स्टेटस म्हणून टाकू शकेल. "
"कसं वाक्य पाहिजे तुला ?"
"एकदम catchy, भरपूर likes मिळतील असे, आवडलं पाहिजे सगळ्यांना."
"घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलायस असं लिही, तुझ्या सगळ्या पुरुषमित्रांना आवडेल ते, कुणी एक शूर वीर म्हणून. "

***
"एकदा का नातं स्वीकारलं कि, त्या माणसाचा पण पूर्णपणे स्वीकार केला पाहिजे. . त्याच्या गुणदोषांसकट.  आपल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे . नातं लोणच्यासारखं असतं, मुरायला वेळ द्यावा लागतो. "
"आणि नातं जपताना दमछाक, मनस्ताप  होत असेल तर?"
"तर. . . ते नातं जपण्याइतकं गरजेचं आहे का याचा पुन्हा विचार करावा. उगाच मनात कुढत राहू नये "
" छान सल्ले देतोस. वपुंच्या कथांतून ढापतोस वाटतं अशी वाक्ये.  काही म्हणा ते लोणच्याचं बोललास ते आवडलं बाकी आपल्याला !!"

***