शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

लक्ष्मणरेषा लोपली

आर. के. लक्ष्मण गेले. प्रत्येक मर्त्य देहाला कधीतरी जावेच लागते. आर. कें.च्या जाण्याने मात्र रुखरुख लागून राहिलीय. ज्यांच्या व्यंगचित्रांनी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवलं ते लक्ष्मण हयात नाहीत हे पचवणं थोडं कठीण जातंय. सहावीत असल्यापासून घरी म. टा. यायचा. त्यात "कसं बोललात !" ही चौकट असायची. पूर्ण पेपर वाचायच्या आधी ही चौकट डोळ्याखालून घालायची सवय. लक्ष्मण यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत कुणालातरी फटकारलेले  असायचे.  सुरु असलेला युनियनचा संप, विमान कंपन्यांचा नेहमीचा वक्तशीरपणा (?), वाढणारी महागाई, मंत्रिमहोदयांचे सुरु असलेले परदेशी दौरे, महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्यांची कार्यपद्धती असे विविध विषय असत. या चौकटीत रेषारेषांच्या चौकटीचा कुर्ता घातलेला, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा असलेला, कानशिलावरचे केस पांढरे झालेला 'कॉमन मॅन' असे. तोच नायक. कधी एक शब्द तोंडातून न  काढणारा. पुलं म्हणतात तसं संन्याशाच्या वस्त्रांचं रुपांतर राज वस्त्रांत  झाल्यावर जे स्थित्यंतर  घडलं ते  निमूट  पाहणारा.
या सामान्य माणसाला सोबत घेऊन त्यांनी आपल्याला  लोकशाही पाहायला शिकवली. राजकारणाचा अभ्यास करणार्यांनी रजनी कोठारी यांच्या पुस्तकाबरोबर लक्ष्मण यांची व्यंगचित्रेसुद्धा अभ्यासावीत. (दोघांचे निधन याच महिन्यात झाले हा फार मोठा ऱ्हास !)
मालगुडी डेज मधील त्यांच्या रेखाटनांनी दक्षिण भारतातील या काल्पनिक गावाला मूर्त स्वरूप दिलं. आर. के. नारायण यांच्या लेखणीतून उतरलेल्या व्यक्तींना लोभस रूप दिलं.
वृत्तपत्रीय लिखाणाचं आयुष्य फार लहान असतं असे म्हणतात.  पण फार वर्षांपूर्वी लक्ष्मण यांनी काढलेले एखादे व्यंगचित्र जेव्हा सद्य स्थितीवर भाष्य करते तेव्हा आपण त्याच वर्तुळात फिरत असल्याचा भास होतो.
 सामान्य माणसाला जेव्हा राजकारण्यांच्या आचार  आणि विचार  यांतील महदअंतर दिसून येते तेव्हा आपण फसवले गेलो आहोत याची जाणीव होते. लक्ष्मण यांनी सामान्य माणसाच्या मनातील विचार अत्यंत प्रभावीपणे आपल्या व्यंगचित्रांतून मांडले. आपले परखड मत व्यक्त करताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. जे चारशे शब्द खर्च करून संपादकाला सांगायचे असे ते त्यांच्या दोन ओळींच्या चित्रातून उमटे.
त्यांची असंख्य चित्रे आठवताहेत. .
हातात दंडुका घेतलेला, पोट वर्दीतून ओसंडून वाहणारा मग्रूर शिपाई जेव्हा रस्त्याशेजारच्या पिंपातील व्यक्तीला बाहेर काढतो तेव्हा काकुळतीला येऊन तो गरीब व्यक्ती उद्गारतो, "मी इथे लपलो नव्हतो, तर हेच माझे घर आहे."
जे स्वप्न 'नियतीशी करार' करताना दाखवलं गेलं ते कितपत सत्यात उतरलं ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरची त्यांची व्यंगचित्रे डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहेत. विकासाची आणि समानतेची स्वप्ने पाहणाऱ्यांना खाड्कन जमिनीवर आणणारे लक्ष्मण यांच्या जाण्याने आपण रोजच्या जीवनातील हास्याचा किरण गमावला आहे.
जॉर्ज ओर्वेलच्या 'Animal Farm' मधलं -
“All animals are equal, but some animals are more equal than others.” वाचताना लक्ष्मण यांच्या चित्रांची दर वेळेस आठवण येत राहील. 

शनिवार, ३ जानेवारी, २०१५

ज्याचे आम्ही मामा आहोत - शरद जोशी

एक सदगृहस्थ  बनारसला पोहचले. स्टेशनवर उतरल्यावर लगेच एक मुलगा पळत पळत आला.
'मामाजी ! मामाजी !' मुलाने पुढे वाकून नमस्कार केला.
त्यांनी काही त्याला ओळखलं नाही. "तू कोण रे?"
"मी मुन्ना ! ओळखलं नाहीत मला ?"

"मुन्ना ?" ते विचारात पडले.
"हो मुन्ना, विसरलात मला मामा. जाऊ द्या आता त्या गोष्टीला. इतकी वर्षं झाली आता."
"तू इथे कसा ?"

"मी आजकाल इथेच असतो."
"अच्छा."
"हो"
मामासाहेब आपल्या भाच्यासोबत बनारस फिरायला लागले. चला कुणाचीतरी सोबत मिळाली. कधी या मंदिरात चल तर कधी त्या मंदिरात. मग पोचले गंगातीरावर. विचार केला अंघोळ करावी.

"मुन्ना, अंघोळ करू?"
"जरूर मामाजी. बनारसला आलात आणि गंगास्नान नाही केलंत, कसं शक्य आहे?"
मामाजींनी गंगेत डुबकी मारली. हर हर गंगे.

बाहेर आल्यावर सामान गायब. कपडे गायब.
तो मुलगा - मुन्ना पण गायब.
"मुन्ना . . . ए … मुन्ना"
पण मुन्ना तिथे असेल तर मिळेल ना. ते टॉवेल लपेटून उभे होते.
"अहो भाऊ, तुम्ही मुन्नाला पाहिलंत का ?"

"कोण मुन्ना ?"
"ज्याचे आम्ही मामा आहोत"
"मी समजलो नाही"
"अहो, आम्ही ज्याचे मामा आहोत तो मुन्ना !"
ते टॉवेल लपेटून इकडून तिकडे पळत राहिले.
मुन्ना नाही सापडला.

मित्रांनो, भारतीय नागरिक आणि भारतीय मतदार म्हणून आपली अशीच परिस्थिती आहे. निवडणुकीच्या काळात कुणीतरी येतं आणि आपल्या चरणाशी पडतं. मला नाही ओळखलं ? मी निवडणुकीतील उमेदवार आहे, होणारा खासदार.
तुम्ही प्रजासत्तेच्या गंगेत डुबकी मारता. बाहेर पडल्यावर तुम्ही पाहता की जी व्यक्ती काल तुमच्या पाया पडत होती ती आज मत घेऊन गायब आहे. मतांची पूर्ण पेटी घेऊन फरार आहे.

समस्यांच्या तीरावर आपण टॉवेल लपेटून उभे आहोत.
सर्वांना विचारत आहोत - "साहेब, तुम्ही त्यांना पाहिलंत? तेच ज्याचे आम्ही मतदार आहोत, ज्याचे आम्ही मामा आहोत."
पाच वर्षे याच पद्धतीने टॉवेल लपेटून तीरावर उभे राहत निघून जातात.

लेखक - शरद जोशी 

***
(शरद जोशींचा हा छोटासा लेख हिंदीत वाचल्यावर असं वाटलं की याचा अनुवाद करावा. म्हणून हा प्रयत्न.)