खूप दिवसांनी 'लहानपण देगा देवा' हे कुमार गंधर्वांच्या आवाजातलं गाणं ऐकलं आणि शाळेतल्या दिवसांची आठवण झाली. 'लहानपण देगा देवा' हा विषय मराठीच्या पेपरात निबंधलेखनासाठी होता. संतांच्या अभंगांतील, ओवीतील एखादी ओळ किंवा म्हण हमखास निबंधासाठी असायची. मराठीच्या पद्य विभागात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ इत्यादी संतांची काव्यरचना अभ्यासायला असायचीच. पुलं एके ठिकाणी म्हणतात तसे सिलॅबसमध्ये २० मार्कांच्या चौकटीत ज्ञानेश्वर बसवला जायचा. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी या प्रचितीसाठी पुढे खूप वर्षे जावी लागली.
आता शाळा सुटून इतक्या वर्षांनंतर पुन्हा मराठीच्या पुस्तकातील कविता आठवतात. त्यांचा भावार्थ आता कळतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण म्हणजे काय ते आता उमजते. संतांच्या या काव्यरचना इतक्या शतकांनंतरही जनमानसात अजून जिवंत आहेत. नदीत बुडवलेली तुकयाची गाथा पिढ्यानुपिढी मौखिक पद्धतीने पुढे जातच राहिली आणि अमर झाली. पंढरीच्या वारीत ग्यानबा तुकाराम असा घोष करत लाखो वारकरी प्रवास करत असतात. लाखो घरांत हरिपाठाचा जप नित्यनेमाने चालू असतो. संतांनी अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे अशी आर्जवे केली.जो जें वांच्छील तो तें लाहो असे विश्वासाठी पसायदान मागितलं. कर्मयोगासोबत भक्तिमार्ग दाखवला.
आताच्या इंस्टाग्रामच्या कन्टेन्टच्या समुद्रात समाजाचे अवधान लोप पावत असताना आपण काहीच चांगलं निर्माण करत नाही आहोत जे तुकोबारायांच्या गाथेसारखं टिकून राहील असं वाटतं.
ज्ञानेश्वरांना कधी Writer's block आला असेल का?