परवा वाटेत एक मित्र भेटला. त्याने बोलता बोलता खिशातून त्याचे विजिटिंग कार्ड काढून दिले. मी म्हणालो "अरे बाबा कार्ड कशाला ? आहे माझ्याकडे. काही महिन्यांपूर्वीच नाही का तू दिलस !" तर त्यावर त्याचे उत्तर -"जॉब बदलला मी, हे नवीन कंपनीचं". मी चकित. कारण या आमच्या मित्राला हेवा वाटावा अशा पगाराची नोकरी. त्यावर आईटी क्षेत्रातला जॉब. न राहवून कारण विचारलं, तेव्हा म्हणाला "पॅकेज जास्त आहे" . आईटी क्षेत्रातली मंडळी एका जागी फार टिकत नाहीत हे ऐकून होतो. चांगली संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सर्वच असतो, पण या क्षेत्रातल्या मंडळींचा एका ठिकाणचा कार्यकाळ हा तीन महीने ते जास्तीत जास्त दोन वर्ष असा असतो. त्यातही सतत स्वताला अपडेट ठेवायची धडपड. ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या एका मित्राने सांगितलं, की हल्ली माणसं एका कंपनीत एखाद वर्ष काम करतात आणि तो अनुभव बांधून दुसर्या कंपनीत जातात. कंपनीशी त्यांना कुठलीही बांधीलकी असत नाही. मग ही माणसे जाताना एका वर्षात या क्षेत्रात कमावलेले ज्ञान, बहुमोलाचे अंदाज सोबत घेऊन जातात. जे कंपनीच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. नवीन नोकरदारांवर कामकाज शिकवण्यासाठी जो खर्च होतो तो वेगळाच.
माझ्या शेजारचे काका, इतकेच कशाला माझ्या बाबांनी देखील एकाच कंपनीत २५ वर्षे नोकरी केली. कंपनीच्या उत्कर्षाच्या सर्व घटनांचे साक्षी राहिले. त्यांना विचारलं तर आपण सुरुवात किती रुपये पगारापासून केली आणि आता मेहनतीने कुठपर्यंत आलो आहोत याचा सविस्तर आलेख सांगतील. पण पैसा कमावणं हाच नोकरी करण्याचा महत्वाचा हेतू आहे का?
स्वताच्या आवडीच्या क्षेत्रात किती जण काम करतात?
मुळात आपण नोकरी, उद्योग कशासाठी करतो ? पैसा कमावण्यासाठी. हे खरं प्राथमिक उत्तर. कारण त्याशिवाय उपजीविका करणं कठीण आहे. (पैश्य़ाशिवायही रानावनात नीट जगता येतं हे थोरोचं वाल्डेन वाचताना पटतं आणि त्याचा खूप हेवा वाटतो) रोज सकाळी उठून कामावर जाण्याची लगबग. तो सकाळचा दीर्घ प्रवास, दिवसभर ऑफिसमधे काम, संध्याकाळी थकल्या जीवांची घराची ओढ. रात्रीची जरा झोप लागतेय तोच पुन्हा घड्याळाचा गजर. पुन्हा तेच तेच. कधी एकदा रविवार येतोय याची आस. आणि रविवारच्या रात्री सोमवारची भीती. जगण्यात एकसुरीपणा येत जातो . कामाच्या डेड लाइन्स पाळता पाळता आपणच डेड होऊन जातो कळतच नाही. एंजॉयमेंटच्या नावावर वीकेंडला नविन लागलेला पिक्चर पाहतो, बाहेर जेवतो आणि आपलं सगळं सुरळीत चाललं आहे याचं स्वतःलाच आश्वासन देत राहतो.
माझ्या आईटी क्षेत्रातल्या मित्रासारखे काही झटपट नोकर्या बदलतात,तर काही दुसरी चांगली नोकरी शोधूया का? मिळेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात आणि सुरक्षितता शोधत जगत असतात. एका मित्राने सरकारी नोकरी मिळाल्यावर "Finally got a government job... आता आयुष्यभराची चिंता मिटली" असे म्हटल्यावर काय रिएक्शन द्यावी या विचारात बराच वेळ होतो मी. आवश्यकतेपेक्षा जास्त पगार, कामाचे कमी तास,दिवाळी बोनसची खात्री, केव्हाही संप करून व्यवस्थेला वेठीला धरण्याची मुजोरी आणि कामचुकारपणा ही व्यवछेदक लक्षणे असणार्या नोकर्यांसाठी जेव्हा लाखोंच्या संखेने अर्ज येतात,प्यून, क्लर्क सारख्या पोस्टसाठी जेव्हा मास्टर्स झालेली मुले मूली प्रयत्न करतात तेव्हा काळजी वाटते की इतके शिकूनसुद्धा आपल्याला पुढे काय करायचे आहे हे न कळणं ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका नव्हे का?
निव्वळ स्कोप आहे असा विचार करून इंजीनियर झालेला माझा मित्र जेव्हा कॉल सेंटरमधे कमी पगाराचा जॉब करतो,तेव्हा खंत वाटते. करिअरिस्टिक धोरणातून इतरांच्या सांगण्यावरून क्षेत्र निवडलेलं. त्यात मनातून आवड नाही म्हणून रेटत रेटत केट्या पास करत एकदाची हाती मिळवलेली डिग्री. आणि त्याच क्वालिफिकेशनचे हजारो लोग. नोकरी नाही म्हणून घरच्यांनी दाखवलेला अविश्वास हेच हल्लीच्या पिढीचे क्रंदन आहे. बरं, वाट चुकली हे ध्यानात आल्यावरही आपल्या मनासारख्या क्षेत्रात न जाणार्या रिस्क घ्यायला घाबरणार्या लोकांची दया येते. आला दिवस ढकलला जातो. पगार केव्हा वाढेल याच विचारात आयुष्य गुंतून जाते.
वपु काळे यांनी त्यांच्या वडिलांबद्दल लिहिलय की,उतारवयात ते असंबध्द बोलत . आयुष्यभर बॉसला एक शब्द उलटा न बोलता इमाने एतबारे नोकरी केल्यानंतर उतारवयात ते बॉसला शिव्या देत. आयुष्यभर दाबून ठेवलेला राग, अपमान, संताप याचा म्हातारपणी उद्रेक होतो.
याउलट आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद वेगळाच असतो. मॉनेटरी फायदे हे मग बायप्रोडक्ट असतं. आवडीच्या क्षेत्रातली कंटाळवाणी कामे पण कल्पकतने कशी करता येतील हे कळू लागतं. प्यून, क्लर्क यांना मी अजिबात कमी लेखत नाहीये. शेवटी प्रत्येक काम महत्वाचच असतं,पण प्रत्येकाने स्वतःची वाट शोधायला हवी. At the end of the day समाधान महत्वाच असतं. "मी तेव्हा हे करू शकलो असतो" किंवा "मी तेव्हा हे केलं असतं तर किती बरं झालं असतं" ही वाक्ये नंतर खूप त्रास देतात मनाला.
आपलं आवडीचं क्षेत्र कसं निवडावं? माझा मित्र दिपची theory असे सांगते की, जे करताना तुम्ही देहभान विसरता त्याचसाठीच तुमचा जन्म झालेला असतो. बर्याचदा त्याची मस्करी केली आम्ही. पण आता ते पटतंय.
शाळेत असताना निबंधांचा शेवट जसा आपण typical पद्धतीने करायचो तसाच शेवट एका मोठ्या माणसाचे वचन उद्गारून करतोय -
"And in the end, it’s not the years in your life that count. It’s the life in your years."
- Abraham Lincoln