सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

बसरातील ग्रंथपाल (The Librarian Of Basra)

२००३ सालापासून सुरु असलेल्या इराक युद्धाच्या कहाण्या वाचनात आल्या. त्यात 'The Librarian Of Basra' हे जेनीट विंटर यांनी लिहिलेलं छोटेखानी पुस्तक वाचनात आलं. लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक. इराक मधील बसरा या शहरात तेथील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल असलेल्या आलिया मुहम्मद बेकर यांनी युद्धकाळात तीस हजार पुस्तकांचं ग्रंथालय कसं वाचवलं याची ही कथा. युद्धकाळात ब्रिटिश आणि अमेरिकी फौजा जेव्हा इराक वर आक्रमण करणार अशी चर्चा सुरु झाली तेव्हा पुस्तकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या बेकर यांनी ग्रंथालय स्थलांतरित करण्याची मागणी तेथील गवर्नर यांना केली, अपेक्षेप्रमाणे त्यांनी ती धुडकावून लावली. सरकारचं सहकार्य नाही, सद्दाम हुसेनविषयी जनमनात प्रचंड असंतोष. सर्वत्र लुटीचं वातावरण. अशात पुस्तके वाचवण्याची पर्वा कुणाला? ग्रंथालयात काही प्राचीन हस्तलिखिते,इतिहास, तत्वज्ञान यावरची मोल्यवान पुस्तके, त्यातील एक तर मुहम्मद पैगंबरचं तेराव्या  शतकातील चरित्र. हवाई बॉम्बहल्ल्यात ग्रंथालय नष्ट होण्यापूर्वी बेकर यांनी रोज थोडी थोडी पुस्तके गाडीतून घरी न्यायला सुरुवात केली. शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजारी असलेल्या रेस्टारंटच्या मालकाला विनंती करून तिथे काही पुस्तके हलवली.
हळू हळू ग्रंथालयात फौजांनी बस्तान मांडलं. आकाशात अमेरिकी सैन्याची विमाने घिरट्या मारू लागले. अशा वेळी सर्व पुस्तके एका ट्रक मधे लादून त्यांनी स्वतच्या घरी हलवली. घरी सर्वत्र पुस्तकेच पुस्तके. युद्ध सुरु झालं आणि काही दिवसातच ग्रंथालयाची इमारत बेचिराख झाली. बेकर युद्ध संपेपर्यंत वाट पाहत राहिल्या.पुस्तकांची घरी काळजी घेत राहिल्या.
                                          

आता युद्ध संपल्यावर पुन्हा नव्याने ग्रंथालयाची इमारत बांधली गेलीय आणि पुन्हा बेकर ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्यात.
त्यांच्या ग्रंथालयात रोज शहरातील विद्वजन,कलाकारांची हजेरी असते. त्या म्हणतात पवित्र कुराणात अल्लाने मुहम्मदला पहिली आज्ञा जर कुठली केली असेल तर ती म्हणजे "वाच". ग्रंथालये लिखित, मौखिक स्वरूपातील ज्ञान, त्या त्या भूभागाचा इतिहास, पुढील अनेक पिढ्यांसाठी जतन करतानाच हे सर्व त्यांच्यापर्यंत कसे पोहचेल याचीही काळजी करतात. एखाद्या समाजाची बौद्धिक जडणघडण करण्यात ग्रंथालयाचा महत्वाचा वाटा असतो. चांगला ग्रंथपाल ग्रंथालयाला लाभणे हे ही तितकेच महत्वाचे असते. ९ ते ५ कार्यालयीन वेळेच्या पल्याड वाचकांपर्यंत पोचणारा, पुस्तकांची भेट घडवून देणारा ग्रंथपाल जरी कुबेराच्या संपत्तीचा रखवालदार असला तरी ही संपत्ती लुटण्यासाठीच आहे असं मानणारा पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा