मी आठ वर्षाचा असताना मामाच्या लग्नाला गेलो होतो. आयुष्यात अटेंड केलेलं पहिलं लग्न. ते चांगलंच लक्षात आहे ते दोन कारणांमुळे. एक : मी पोलिसाचा ड्रेस घातला होता (टोपी सकट) आणि दुसरं कारण म्हणजे लग्नाला जाताना वऱ्हाडाच्या टेम्पोत मला उलट्या झाल्या होत्या. मे महिन्यातली दुपारची ती रखरखती दुपार, घाटाची वळणे, टेम्पोचा डिझेलचा उग्र वास आणि आंबूस झालेलं तोंड यामुळे तो दिवस कायमचा कोरला गेलाय माझ्या आठवणींत. मामीच्या माहेरी परत कधीही जाताना या घटनेची परत उजळणी होतेच. पोलिसाचा ड्रेस शिट्टीसकट घ्यायचा मी का हट्ट केला असेल याचा मला आता अर्थबोध होत नाही. मी लहानपणीदेखील आताइतकाच समंजस होतो असा माझा समज आहे, सतत चेहऱ्यावर गंभीर भाव असायचे. त्यामुळे आई-वडीलांनीच त्यांच्या मनासारखं करत मला तो ड्रेस घालायला भाग पाडलं असेल. त्या लग्नाचे फोटो पाहताना मला विलक्षण अवघडल्यासारखं होतं. फोटोत माझा छोटा भाऊ मात्र मस्त चौकड्यांचं शर्ट आणि हाफ चड्डीत आहे आणि मी - मामा-मामी शेजारी लाच घेतल्यावर पकडल्या गेलेल्या पोलिसासारखा उभा आहे.
गावाकडच्या लग्नांत आता बुफे पद्धत आलीय. मात्र अजूनही काही ठिकाणी जेवणाच्या पंगती उठतात. लग्नाचे जेवण पुरुष मंडळी बनवतात. त्यासाठी चरव खंदला जातो. मोठमोठी पातेली, त्यात रटरटणारा भात, लाल पिवळसर किंचित हिरव्या बुंदीने भरलेली घमेली, आणि वांगी आणि बटाटाच्या मोठ्या फोडी असलेली तीच फेमस भाजी. ही वांगी-बटाटयाची साधी रस्सा भाजी मिशलिन स्टार रेस्तराँत पण मिळणार नाही. त्या चवीने नॉस्टॅल्जिक होऊन मी घरी कित्येकदा तशी भाजी बनवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. लाकडाचा स्मोकिनेस, धूळमाती , क्लोरीन नसलेलं झऱ्याचं शुद्ध पाणी आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, कुणीही जेवणाला नाव ठेवून अतृप्त जाऊ नये यासाठी झटणारी भावकीतली माणसे ही महत्वाची इन्ग्रेडिएंट्स असल्याशिवाय त्या बिनमिठाच्या भाताला आणि रस्सा भाजीला चव कशी येईल? त्या सोहळ्यात गोणपाट अंथरून त्यावर वांगी चिरत, लसूण सोलत आजूबाजूच्या कोलाहलाचा भाग होताना मजा असते. पंगतीत जेवताना श्लोक म्हटले जात. श्यामची आई पुस्तकात याचा उल्लेख आहे. माझ्या पाहण्यात तशा श्लोक म्हणण्याच्या स्पर्धा पंगतीत घडल्या नाहीत. जेवण वाढताना नजरानजर होऊन काही लग्न जुळल्याची उदाहरणं मात्र लक्षात आहेत.
लग्नानंतरच्या वराती पाहण्यासारख्या. बैलगाडीला मस्त डेकोरेट करून वाजंत्रीने मिरवत, ढोल खेळत वराती निघत. आता सगळीकडे वरातीची स्पेसिफिक गाडी असते त्या पुढे डीजे असतो आणि बेधुंद नाचणारी मुलं मुली. मराठी मुक्तछंदातली कविता कितीही आशयघन असली तरी इथे कामाची नाही. इथे पाहिजे ते हे.
"गढुळाचं पाणी कशाला ढवळीलं.. नागाच्या पिलाला तू का ग खवळीलं?
"अहो मामी. . तुमची मुलगी लय सुंदर. "
माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले दोन मित्र (त्यांना सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी रमेश आणि सुरेश म्हणूया ) आजूबाजूच्या गावांतील वरातीत नाचायला जात. सूत जमवणे हा मुख्य उद्देश असायचा. अजूनही वरातीत छान नाचणाऱ्यांना बक्षीस मिळते काही ठिकाणी. तर सांगायची गोष्ट अशी कि रमेश आणि सुरेश दुसऱ्या गावी जायचे. सुरेश नाचत असताना रमेश माईकवाल्याजवळ जाऊन सुरेशसाठी पाचशे रुपये बक्षिसाचा पुकारा करायचा, मग सगळ्यांचे लक्ष त्याकडे वेधले जायचे. हीच ट्रिक सुरेश त्याच्या मित्रासाठी दुसऱ्या गावात करायचा. अशा रीतीने महिलावर्गाचे लक्ष आकर्षून घेण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असे.
शहरात हॉलमध्ये लग्न असल्यावर मी शक्यतो जायचं टाळतो . दुपारच्या उकडत्या वातावरणात कोंबून भरलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या, भिंतीला लावलेल्या पंख्याची हवा खाण्यासाठी धडपड करणारी माणसे, स्टेजवर चाललेले अनाकलनीय विधी आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं घालून बसलेली माणसे. सगळीकडे हाच देखावा. जेवणात पनीरची भाजी, सोडा टाकलेला जिरा राइस, दाल तडका, गुलाबजाम आणि आईस्क्रीमची रांग. एकदा वाशीला सेक्टर शोधत शोधत लग्नाच्या हॉलजवळ आलो तेव्हा पोचायला उशीर झाल्याने लग्न काही गाठता आले नाही. जेवल्यावर कळलं कि लग्न तर पहिल्या मजल्यावर आहे. तिथे तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर दोन्ही ठिकाणी लग्नें होती.
Pre Wedding फोटोशूट साठी हल्ली छोटे छोटे द्वीपसमूह शोधले जातात. सिनेमाच्या धर्तीवर लग्नाची शॉर्टफिल्म बनवली जाते. लग्न आयुष्यात एकदा होत असल्याने सगळ्या हौशी भागवल्या जातात.
ताईचं लग्न होतं त्या दिवशी. सकाळी वऱ्हाड घेऊन बस जाण्याआधी आम्ही घराशेजारच्या देवळात गेलो. ताईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. त्या थरथरत्या स्पर्शात तिला जाणवणारी anxiety मिश्र भीती मला कोण जाणे त्या वयात कळली नव्हती. काही वर्षांनी माझ्या लग्नात मला तो प्रसंग आठवला आणि त्या भावनेची खूण पटली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा