सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

पुस्तकं वाचणारी माणसे

 

Dear J,

आजच्या पोस्टाने तुझे पार्सल मिळाले. शेजारच्या पोस्ट ऑफिसला दोन तीनदा चौकशी केलेली न राहवून. गहाळ होण्याच्या भीतीनेच अंगावर काटा आलेला. 'मिळेल हो, कुठं जातंय, आलं नाही अजून इथं' अशी सारखी आश्वासक उत्तरं  तामिळमधून मिळत होती . शेवटी एकदाचे सुखरूप मिळाले. ते मी आज नीट ड्रॉवरमधे ठेवले. लंचब्रेकला डिपार्टमेंटचे सगळे कॅन्टीनला गेल्यावर हळूच ते उघडले. पुस्तकावर तू प्लास्टीकचं कव्हर लावून पाठवलंस ते बरं केलंस, इथे गेले आठवडाभर पावसाची रीप रीप चालूच आहे. 

संध्याकाळी घरी आल्यावर  हार्डबॉउंड कव्हरवर हात फिरवत मी खूप वेळ बसलो. पुस्तकाच्या मूळ मालकाने त्यात काही ठिकाणी समासांत पेंसिलने नोंदी केल्यात. title page च्या बाजूच्या पानावर 'Lt Col Atul Sinha' लिहिलंय वळणदार अक्षरात. आणि तारीख ३ ऑगस्ट १९७७. म्हणजे ३० वर्षांनी हे पुस्तक माझ्या हाती लागलंय. त्याआधी पाच वर्षांपूर्वी ते पब्लीश झालंय. ३५ वर्षांचं वयोमान. बांधणी अजून घट्ट आहे. नीट काळजी घेतलीय पुस्तकाची. 

कोण असतील हे कर्नल अतुल सिन्हा? का त्यांनी हे पुस्तक रद्दीत दिलं असेल? त्यांच्या समासातल्या नोंदी खूप विस्तृत आहेत. फिलॉसॉफीचे जबरदस्त रेफरन्स आहेत. त्यांचं पर्सनल कलेक्शन तर ग्रेटच असेल. लिन युतांगचा हवाला देऊन त्यांनी एके ठिकाणी अमेरिकन आणि चिनी माणसे वेळ कसा मोजतात ते लिहिलंय. अमेरिकन माणसे तीन महिने पुढचा विचार करून आयुष्य आखतात, उदा. अमुक एके दिवशी मी अमुक एका ठिकाणी अमुक एक करेन. टायपोग्राफिकल चुका अमेरिकन संपादक फार गंभीरपणे घेतात तर या उलट चिनी संपादक त्या चुका शोधल्यावर वाचकांना मिळणाऱ्या आनंदावर विरजण पडू देऊ इच्छित नाहीत. कधी कधी तर आपण एक कादंबरी क्रमशः छापतोय हेही ते विसरतात.  यापैकी आताच्या धकाधकीच्या आयुष्यात किती टिकलं असेल माहित नाही. 

पुस्तकासोबत बिल पाठवलं नाहीस. कळव. 

Yours,

S. 

२५/७/२००७

चेन्नई 

PS: या कर्नल अतुल सिन्हांबद्दल काही कळालं तर सांग. त्यांच्या कलेक्शनमधली काही पुस्तके असतील तर मला यादी पाठव. 


***

Dear J,

सोबत चेक पाठवत आहे. कर्नल अतुल सिन्हांच्या संग्रहातील मला हवी असेलेली पुस्तके तू पाठवलेल्या यादीत हायलाईट करून पाठवतोय. त्यांच्या मुलीशी तुझी भेट झाली हे मस्तंय. तुझ्यासारखा शेरलॉक तूच. युनिव्हर्सिटीच्या  कामासाठी पुढचे दोन आठवडे  तुतिकोरिनला असेन.  आल्यावर तुला कळवीन. तोपर्यंत ही पुस्तके शोध. 

Yours,

S. 

२०/८/२००७
चेन्नई

***

Dear J,

इथला मुक्काम अजून लांबला. महिनाभर इथेच आहे. अजून काही आठवडे इथेच असेन. इथल्या गेस्ट हाऊसचा पत्ता पाठवतोय. वाचायला आणलेली पुस्तके संपली. शहर छोटंसं आहे आणि पुस्तकांचं मार्केट जवळपास नाहीय. काही घबाड सापडलं तर कळव.  दुर्गा भागवतांचे 'वॉल्डेनकाठी विचार विहार' मिळेल का? सरूला हवंय. मी मुंबई मराठीला वाचलं त्याला काळ लोटला. त्याची झेरॉक्स करणार होतो संग्रहासाठी,  पण मन धजेना. बघ मिळतंय का?

Yours,

S. 

२७/९/२००७
तुतिकोरिन

***


Dear J,

गेस्ट हाऊसवर तू पाठवलेलं सेम्पेचं Monsieur Lambert मिळालं. फ्रेंच शिकतानाचे युनिव्हर्सिटीतले दिवस आठवले. तो हिरवा कॅम्पस, संध्याकाळी सातला अंधार भरून येत असताना हॉस्टेल ते लायब्ररी फेऱ्या आणि लाइब्ररीतील जुनाट पुस्तकांचा वास. 
लाइब्ररीच्या इमारतीबाहेर पिवळा बल्ब. 
कुणीतरी एखाद दुसरा विद्यार्थी असायचा त्या वेळी. MA मराठी करणारा एकनाथ आठवतोय तुला? आणि त्याने डब्यात आणलेली अतिविशाल बाजरीची भाकरी? लाइब्ररीत खाण्याला मनाई होती म्हणून समोरच्या बागेत बसून पोटाला आधार म्हणून कोरडी भाकरी चघळत आम्ही बसलेलो असू. मध्यंतरी ऐकण्यात आले कि लातूरला त्याने टूव्हिलर गाड्यांचे शोरूम काढले. 

कर्नल अतुल सिन्हांच्या संग्रहातील पुस्तकांचे काय झाले? पाठवणार असशील तर चेन्नईच्या पत्त्यावर पाठव. उद्या इथला मुक्काम हलवतोय. 

Yours,

S. 

९/१०/२००७
तुतिकोरिन

***

Dear J,

तीन किलोचं रजिस्टर पार्सल मिळालं आज. कृष्णमूर्ती म्हणून माझा कलीग आहे त्याला ह्या माझ्या पुस्तक संग्रहाचं फार नवल वाटतं. कर्नल साहेबांनी पुस्तके फार मेहनतीने जमवलेली दिसतात. देशोदेशीच्या भ्रमंतीचे ठसे आहेत. एक पुस्तक तर ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या लाइब्ररीने वीड आऊट केलेलं. एकावर व्हिएन्ना मध्ये विकत घेतलेला दुकानाचा शिक्का. पुढचे काही दिवस मस्त जातील. नवीन मोबाईल फोन घेण्याचा विचार आहे  CDMA. तुला नंबर कळवीन. 

 तू बिल पाठवायला हयगय का करतोस? पैसे नकोयत का?


Yours,

S. 

१२/११/२००७

PS: कर्नल साहेबांविषयी उत्सुकता आहे. येत्या पात्रात बिलासोबत त्यांच्याविषयी लिही. 

चेन्नई 

***

Dear J,

महिनाभराने तुझं पत्र आलं. कर्नल साहेबांनी कसं भरभरून आयुष्य जगलं आणि त्यांच्या पराक्रमाचे किस्से तू लिहिलेल्या पत्रातून वाचले. गेल्यावर्षी ते वारले हे वाचून खूप वाईट वाटलं. तू पाठवलेल्या एका पुस्तकात त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सापडला मला.  त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या संग्रहातील पुस्तकांचे सोयरसुतक नसल्याचे वाचून तर अजून वाईट वाटले.  मी इथल्या युनिव्हर्सिटीत काहीतरी खटपट करतो. त्यांचा पूर्ण संग्रह कितीला मिळेल याची चौकशी कर. 

बापरे एक भयानक विचार माझ्या डोक्यात वळवळू लागलाय. माझ्याही पश्चात माझ्या पुस्तकांना कसे दिवस येतील? 


Yours,

S. 

१२/१२/२००७

चेन्नई 



सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

प्रवासी

सांजवेळ झाली  तेव्हा प्रवासी अनोळखी गावाच्या वेशीजवळ पोचला. दूर त्याला घरांची छपरं आणि मिणमिणते दिवे दिसू लागले. एका मोठ्या वृक्षाच्या टोकावर पक्ष्यांचा गलबलाट चालू होता.  हातातल्या काठीने रस्ता चाचपडत तो गावाच्या दिशेने निघाला. पहाटे निघताना त्याने काहीबाही खाल्लेले. आता त्याचे पाणी झालेले. पाठीवरच्या पिशवीतून त्याने पावाचा उरलेला तुकडा काढला आणि हळूहळू चघळत त्याची पावले पडू लागली . त्याला असे वाटले आधीच्या मुक्कामाच्या गावातील माणसे खरेच देवमाणसे होती. ईश्वर त्यांना सदैव श्रीमंती बहाल करो. त्याला पडक्या देवालयातील कोपऱ्यात रात्र काढायला त्यांनी जुनी रजई दिली आणि पोटाला गरम जेवणही. त्या रजईशिवाय रात्रीच्या त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्याचं काही खरं नव्हतं. 

सकाळ झाली तेव्हा त्या मोडक्या छपरातून आलेला प्रकाशाचा झोत आणि चमकणारे धुळीचे कण पहुडल्या पहुडल्या  बघत त्याने आपला भेगाभेगांचा तळहात त्या उजेडात धरला. ऊन अजून कोवळं होतं. त्याने प्रकाशाकडे पाहत डोळे मिटून घेतले आणि डोळ्यांच्या आतल्या बाजूच्या लालेलाल प्रकाशावर लक्ष केंद्रित केलं. अजब अजब आकार तार्यांसारखे चमकत त्या पडद्यावर दिसत होते. असंच ऊन खात पडून राहावं असं त्याला वाटलं. पिशवीतील पाण्याचा घोट घेऊन त्याने चूळ भरली. रजईची नीट घडी घालून पिशवीत ठेवली. आता निघायला हवे. जाताना त्याने काल भेटलेल्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला अलविदा केलं. म्हाताऱ्याने एकही अक्षर न बोलता त्याला हात उंचावून सांभाळून जाण्याची सूचना केली.  वाटेतील झऱ्यात ढोपरापर्यंत उतरून त्याने चेहऱ्यावर पाण्याचा थबका मारला. थोडे पाणी जवळच्या चामडी पिशवीत भरून घेतले.  

उन्ह माथ्यावर आली तेव्हा बऱ्यापैकी सावलीची जागा पकडून त्याने अंग टेकलं. पिशवीतून पुस्तक काढून तो वाचू लागला. त्या पिशवीत हे एकच पुस्तक होतं आणि तेही बऱ्याचदा पारायण करून झालेलं. जागोजागी खुणा करून झालेल्या. प्रवासात एका बाजाराच्या गावी त्याला पुस्तक विक्रेत्याने हे विकलं होतं. चामडी बांधणीचं नक्षीदार. त्याला वाचायची इतकी सवय नव्हती तरी त्याने निश्चयाने ते पूर्ण केलं. आता ते वाचताना गरम हवेची एक झुळूक त्याच्या चेहऱ्यावरून गेली आणि आलेल्या थकव्याने त्याला केव्हा झोप लागली त्यालाही कळले नाही.  स्वप्नात त्याला एका बाजाराच्या गावी खाल्लेल्या मिठाईची आठवण झाली. जिभेवर ठेवताच विरघळून जाणारी ती जांभळी मिठाई, तलम रेशीमचे कपडे नेसलेली ती स्त्री आणि ग्राहकांच्या घासाघाशीच्या त्या गदारोळात त्या स्त्रीच्या डोळ्यांत डुबत चाललेलो आपण. दूर कुठूनतरी येत असलेला वाद्यांचा मंजुळ ध्वनी, आणि पावले ओढत नेतील ती वाट. झाडावरील एक छोटं फळ त्याच्या चेहऱ्यावर पडलं आणि त्याला जाग आली. रात्र होईतो दुसऱ्या गावी मुक्कामासाठी पोचायला हवं असा निश्चय करत त्याने स्वतःला सावरलं आणि पावलं झपाझप पडू लागली. अनेक छोटे झरे पार करत तो डोंगरावरून उतरू लागला. काही मैल पार केल्यावर त्याला दूरवर वस्तीची खूण दिसली. ईश्वरा,याही गावातील माणसे भली निघोत. प्रवाशाचे मन कामना करू लागलं.