सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

प्रवासी

सांजवेळ झाली  तेव्हा प्रवासी अनोळखी गावाच्या वेशीजवळ पोचला. दूर त्याला घरांची छपरं आणि मिणमिणते दिवे दिसू लागले. एका मोठ्या वृक्षाच्या टोकावर पक्ष्यांचा गलबलाट चालू होता.  हातातल्या काठीने रस्ता चाचपडत तो गावाच्या दिशेने निघाला. पहाटे निघताना त्याने काहीबाही खाल्लेले. आता त्याचे पाणी झालेले. पाठीवरच्या पिशवीतून त्याने पावाचा उरलेला तुकडा काढला आणि हळूहळू चघळत त्याची पावले पडू लागली . त्याला असे वाटले आधीच्या मुक्कामाच्या गावातील माणसे खरेच देवमाणसे होती. ईश्वर त्यांना सदैव श्रीमंती बहाल करो. त्याला पडक्या देवालयातील कोपऱ्यात रात्र काढायला त्यांनी जुनी रजई दिली आणि पोटाला गरम जेवणही. त्या रजईशिवाय रात्रीच्या त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्याचं काही खरं नव्हतं. 

सकाळ झाली तेव्हा त्या मोडक्या छपरातून आलेला प्रकाशाचा झोत आणि चमकणारे धुळीचे कण पहुडल्या पहुडल्या  बघत त्याने आपला भेगाभेगांचा तळहात त्या उजेडात धरला. ऊन अजून कोवळं होतं. त्याने प्रकाशाकडे पाहत डोळे मिटून घेतले आणि डोळ्यांच्या आतल्या बाजूच्या लालेलाल प्रकाशावर लक्ष केंद्रित केलं. अजब अजब आकार तार्यांसारखे चमकत त्या पडद्यावर दिसत होते. असंच ऊन खात पडून राहावं असं त्याला वाटलं. पिशवीतील पाण्याचा घोट घेऊन त्याने चूळ भरली. रजईची नीट घडी घालून पिशवीत ठेवली. आता निघायला हवे. जाताना त्याने काल भेटलेल्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला अलविदा केलं. म्हाताऱ्याने एकही अक्षर न बोलता त्याला हात उंचावून सांभाळून जाण्याची सूचना केली.  वाटेतील झऱ्यात ढोपरापर्यंत उतरून त्याने चेहऱ्यावर पाण्याचा थबका मारला. थोडे पाणी जवळच्या चामडी पिशवीत भरून घेतले.  

उन्ह माथ्यावर आली तेव्हा बऱ्यापैकी सावलीची जागा पकडून त्याने अंग टेकलं. पिशवीतून पुस्तक काढून तो वाचू लागला. त्या पिशवीत हे एकच पुस्तक होतं आणि तेही बऱ्याचदा पारायण करून झालेलं. जागोजागी खुणा करून झालेल्या. प्रवासात एका बाजाराच्या गावी त्याला पुस्तक विक्रेत्याने हे विकलं होतं. चामडी बांधणीचं नक्षीदार. त्याला वाचायची इतकी सवय नव्हती तरी त्याने निश्चयाने ते पूर्ण केलं. आता ते वाचताना गरम हवेची एक झुळूक त्याच्या चेहऱ्यावरून गेली आणि आलेल्या थकव्याने त्याला केव्हा झोप लागली त्यालाही कळले नाही.  स्वप्नात त्याला एका बाजाराच्या गावी खाल्लेल्या मिठाईची आठवण झाली. जिभेवर ठेवताच विरघळून जाणारी ती जांभळी मिठाई, तलम रेशीमचे कपडे नेसलेली ती स्त्री आणि ग्राहकांच्या घासाघाशीच्या त्या गदारोळात त्या स्त्रीच्या डोळ्यांत डुबत चाललेलो आपण. दूर कुठूनतरी येत असलेला वाद्यांचा मंजुळ ध्वनी, आणि पावले ओढत नेतील ती वाट. झाडावरील एक छोटं फळ त्याच्या चेहऱ्यावर पडलं आणि त्याला जाग आली. रात्र होईतो दुसऱ्या गावी मुक्कामासाठी पोचायला हवं असा निश्चय करत त्याने स्वतःला सावरलं आणि पावलं झपाझप पडू लागली. अनेक छोटे झरे पार करत तो डोंगरावरून उतरू लागला. काही मैल पार केल्यावर त्याला दूरवर वस्तीची खूण दिसली. ईश्वरा,याही गावातील माणसे भली निघोत. प्रवाशाचे मन कामना करू लागलं. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा