शुक्रवार, ३१ मे, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 31 May

 1. सोनेरी किल्ला

मला नेहमी असे वाटत आलंय कि सत्यजित रे यांना लेखक आणि संगीतकार  म्हणून तितकीशी प्रसिद्धी वा लक्ष नाही मिळालंय, जे ते डिसर्व करतात. या  धगधगत्या अहमदाबादच्या उन्हाळ्यात या रविवारी मी त्यांची  'सोनेरी किल्ला' ही छोटीशी रहस्य कथा वाचून संपवली. बाकी उन्हामुळे घरातून बाहेर जाता येणं शक्य नव्हतं. 

त्याच्या फेलूदा या डिटेक्टिव्ह सिरीज मधली ही कथा. कलकत्त्यातील एका लहान मुलाला त्याच्या पूर्वजन्मातील काही गोष्टी आठवतात व तो विक्षिप्त वागू लागतो. त्याच्या बोलण्यात सोनेरी किल्ल्याचा व गुप्त खजिन्याच्या विषय येतो आणि त्याला प्रसिद्धी मिळते. एक परमानसशास्त्रज्ञ त्याला सोबतीला  घेऊन मोहिमेला निघतो. त्या लहान मुलाचे वडील फेलूदाकडे ही केस घेऊन येतात. फेलूदा आणि त्याचा सहकारी तोपशे यांचा मग प्रवास सुरु होतो. 



मध्ये अनेक कॅरेक्टर्स येत जातात आणि संशयाचा फेरा सुरु होतो. अनेक साहसांनी भरलेला त्यांचा प्रवास, अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे या कथा मस्त जमल्यात. 

अशोक जैन यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलाय. अशोक जैन यांची ओळख  'राजधानीतून' या म.टा.तील सदरासाठी आहेच, त्याशिवाय अनेक भाषांतरित पुस्तकांसाठीही. 

सोनार केल्ला या सत्यजित रे यांनीच डायरेक्ट केलेल्या चित्रपटातील ही फेलूदा थिम पण भारीय. 



2. Miss Rumphius by Barbara Cooney



हे छोटंसं पुस्तक Alice नावाच्या मुलीची गोष्ट सांगतं. तिचं समुद्रकाठी घर आहे. तिचे आजोबा कलाकार आहेत. तिने आजोबांना वचन दिलंय कि त्यांच्यासारखंच मोठं झाल्यावर ती जग फिरेल आणि म्हातारी झाल्यावर समुद्रकाठी विसावेल. तिचे आजोबा तिला सांगतात कि अजून एक गोष्ट कर: या जगातून जाण्याआधी हे जग अजून सुंदर कसं बनवता येईल हे बघ. मग ठरल्याप्रमाणे ती शहर सोडून प्रवासाला निघते, जगभर भटकंती करते आणि म्हातारपणी समुद्राकाठी घर घेते. आजोबांना वचन दिलेली तिसरी गोष्ट पूर्ण करण्यासाठी ती फुलांची झाडे लावते. पक्षी, वारा त्यांची बीजे दूरवर नेतात. लोकांच्या चेष्टेला भीक न घालता काम सुरु ठेवते. दरवर्षी उन्हाळ्यात ती फुलं फुलतात आणि ते गाव रंगांनी भरून जातं.

-

 हे जग अजून सुंदर कसं बनावं यासाठी आपण काय करू शकतो ? 


3. कोण दिवस येतो कसा, कोण जाणतो  ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कीर्तनाचा फिल्म्स आर्काइव्हने केलेला हा विडिओ पाहण्यात आला. 

कोण दिवस येतो कसा, कोण जाणतो ।।धृ ।।

एक दिवस हत्तिवरी, मिरविती त्या नवऱ्यापरी ।

एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो  ।।

एक दिवस मान जनी, चवरी डुलतील तनी ।

एक दिवस न पुसे कुणी, सोडी प्राण तो ।।

ऐसा हा विधि-लिखित, जीवांना त्रास देत ।

तुकड्याची मात नव्हे, शास्त्र बोध तो ।।

असं सांगण्यात येतं कि या कीर्तनाला कोयना भूकंपाने केलेल्या विध्वंसाची पार्श्वभूमी आहे.

कोणता दिवस कसा येईल याची अनिश्चितता आपल्याला सजग राहण्याचा उपदेश करते



4. कानगोष्टी : Charlie Parker With Strings

Recommended!!


5. काय नवीन?

स्टीवन किंगचा नवीन कथासंग्रह आलाय. You Like It Darker



<iframe style="border-radius:12px" src="https://open.spotify.com/embed/album/1DPRDrZgfU3rAo2SL4GrZw?utm_source=generator&theme=0" width="100%" height="352" frameBorder="0" alowfullscreen="" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; fullscreen; picture-in-picture" loading="lazy

शुक्रवार, २४ मे, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 24 May

1. Town Is by the Sea

या आठवड्यातील वाचलेलं पुस्तक Joanne Schwartz चं "Town Is by the Sea".



या पुस्तकात रेखाटने आहेत Sydney Smith ची.


कोळशाची खाण असलेल्या गावातील एका लहान मुलाची दिनचर्या- daily routine अशी या पुस्तकाची थिम आहे. त्या मुलाचे वडील समुद्राखाली असलेल्या खाणीत कामगार आहेत. त्याचे आजोबाही खाण कामगार होते.


सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतचा मुलाचा दिनक्रम यात आहे. मग त्यात मित्रासोबत बागेत झोका घेणं, आईने सांगितलेल्या गोष्टी बाजारातून आणणं असो , दुपारी आजोबांच्या थडग्याला भेट देणं आणि संध्याकाळी बाबांची वाट पाहणं.


दिवसभर त्याला आपले बाबा खोलवर अंधाऱ्या खाणीत काम करताहेत याची आठवण येत असते.

पुस्तकातली रेखाटने खूप सुंदर आहेत आणि त्या लहान मुलाच्या भावविश्वाचा ठाव घेणारी आहेत.

पुस्तक या लिंक वर वाचता येईल.


2. Perfect Days

या आठवड्यात पाहिलेला नितांत सुंदर असा जपानी सिनेमा.



या सिनेमात conflict काहीच नाहीये. काहीच धक्कादायक घडत नाही.  हिरायामा नावाच्या साठीतील  सार्वजनिक संडास साफ करणाऱ्या एका सफाई कामगाराची गोष्ट.  त्याचा दिनक्रम. आपण नेहमी एक समज करून घेतो कि समाजाच्या दृष्टीने अशी 'हलकी' कामे करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य समृद्ध नसेलच. आनंदी नसतील राहत ती. या चित्रपटाचा नायक त्याच्या कामात आणि आयुष्यात खुश आहे. त्याचं एक सेट रुटीन आहे रोजचं आणि सुट्टीच्या दिवसाचं. वर्षानुवर्षे ते चालूय. आजच्या डिजिटल युगात त्याचं अनालॉग आयुष्य स्लो वाटेल. बघितलाच पाहिजे असा सिनेमा. द गार्डियन मधला review इथे वाचता येईल. 


3. पंच मधील कार्टून 



पंच मासिकातील जुने  कार्टून.  १९१८ साली प्रकाशित झालेले . जगभरात चाललेल्या युद्धयांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बघावेसे वाटले. 

4. On not finishing a book

Alberto Manguel - अथ ते इति पर्यंत पुस्तके वाचून न संपवण्याबाबतचं मनोगत.

त्यांच्या मते पुस्तके अर्धवट वाचून ठेवण्यात गैर काहीच नाही. पुस्तके वाचता वाचता आपणही बदलत जातोच. एखादं पुस्तक परत वाचताना आपणही बदललेले असतो.  We never enter the same book twice.

कधी कधी अर्धवट वाचलेल्या पुस्तकांना दुसरी संधी देता येऊ शकते. कधी कधी खूप चांगलं पुस्तक पुरवून पुरवून वाचण्यासाठी अर्धवट ठेवलेलं असतं. हा लेख इथे वाचता येईल.

5. सध्या काय वाचतोय ?

गीत चतुर्वेदीचे 'सिमसिम'.  फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारतात स्थलांतरित झालेल्या सिंधी युवकाची गोष्ट. त्याबद्दल लिहीन पुढील भागांत.