रविवार, २८ डिसेंबर, २०१४

Software

माझ्या एका इंजीनीअर मित्राला म्हटलं,
तू एवढे program लिहितोस,
computer ला कमांड वगैरे देऊन मनासारखे software बनवतोस,
चिंधी गोष्टींसाठीही आहेत तुमच्याकडे software
मग वेळेलाच मागं नेता येईल असं काही करता येईल का?
Ctrl  Z करून पहिल्यासारखं करता येईल का?
एखादी घटना थांबवता येईल का?
to be specific, पृथ्वीची चक्रे मागे फिरवून थांबवता येईल का त्या निरागस मुलांच्या मृत्यूला?
किंवा मानवी मेंदूतील या हिंसेलाच उखडून काढता येईल का मुळासकट ?
Please  बनवच तू एखादा program जो run करताच सगळीकडे नांदू लागेल शांतता
ज्या program ने आम्ही एकमेकांना ओळखू लागू फक्त माणूस म्हणून
हिंदू - मुसलमान, काळे गोरे, वरची जात खालची जात असे नसतील भेद
रक्त फक्त रक्त असेल RBC, WBC, plasma यांनी बनलेलं
असा program जो मुल जन्माला आल्याबरोबर लगेच install करायला पाहिजे त्याच्या मेंदूत
हळूहळू update करत त्यात रुजवली पाहिजेत शाश्वत मुल्ये
सगळ्या चांगल्या ग्रंथांतून तयार केलं पाहिजे मूल्यांचं universal package
जे सतत धीर देत राहील आणि bugs fix करत राहील जगताना अनुभवायला येणारे
जे  replace करेल द्वेषाला प्रेमाने
बनवच असे software, पण एक काळजी घे याचं manual राजकारण्यांच्या हाती लागू देऊ नकोस !

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

आठवणींचा कोलाज : दिवाळी

लहानपणी दिवाळी म्हटलं की, दिवाळीची सुट्टी आठवते. शाळा बंद पण अभ्यास चालू. बहुतेक सहामाही परीक्षा संपलेली असायची, शेवटचा पेपर लिहिल्यानंतर जरा कुठे मोकळा श्वास घेतोय तोच 'दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास' गळ्यात पडायचा. रोज वर्गातील फळा सजवायची जबाबदारी सरांनी वाटून दिलेली असायची. फळ्यावर दिनांक, वार आणि आजचा सुविचार लिहायचा आणि ते पण पहिल्या तासाच्या आधी. हे सर्व हजेरीपटावरच्या नंबरनुसार. ज्याचा आज नंबर असेल त्याला सुविचार काय लिहू असा प्रश्न पडायचा. बहुतेक सुविचार लिहून झालेले असायचे त्यामुळे नवीन सुविचार बनवले जायचे उदा. 'गुलाबावरून गेली रिक्षा, जवळ आली सहामाही परीक्षा'. (वि. स. खांडेकरांनी एके ठिकाणी म्हटलंय, 'बालपणी परीक्षा, तरुणपणी प्रेम आणि म्हातारपणात मृत्यू ह्या अन्न गोड लागू न देणाऱ्या गोष्टी होत' एकदम खरंय).
सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर लिहिल्यानंतर 'दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास' लिहून घ्यावा लागायचा. बारा विषयांचा भरमसाठ अभ्यास. मुलांनी ही सुट्टी आनंदात घालवूच नये याचसाठी ही उपाययोजना असावी. ही अभ्यासाची वही सजवण्यासाठी आम्ही आमची सारी कल्पकता पणाला लावायचो, म्हणजे त्यात दिवाळीच्या फराळाने सजलेल्या ताटाचे चित्रच काढ, कुठे जगविचित्र कंदील काढ, शेजारच्या ताईकडून रांगोळीचं चित्र काढून घे, वहीला चांगलं कव्हर घाल असं. सगळा अभ्यास सुरुवातीच्या दोन दिवसात पूर्ण करून नंतर उंडारायचे ही strategy असायची. बाकीचे लोक सुट्टी संपायच्या दोन दिवस आधी अभ्यासाला लागायचे आणि अशा आणीबाणीच्या वेळी हुशार मुलांच्या वह्यांना जाम मागणी असायची.

***


दिवाळीचा किल्ला बनवायला मुंबईत जागा नाही, पण गावी किल्ला बनवायला मजा येई. आधी जमीन साफ करून घ्यायची, विटा, भुसभुशीत माती जमा करून ठेवायची. मग विटांनी, बारीक दगडांनी किल्ल्याला आकार द्यायचा. पर्वतासारखा आकार आला पाहिजे. विटांच्या मधली पोकळी चिखलाच्या गिलाव्याने भरून काढायची. शिवाजी महाराजांसाठी सिंहासन बनवायचं. किल्ल्यावर गहू पेरायचा,आणि कोंबड्यापासून गव्हांकुरांना वाचवायचं सुद्धा. शिवाजी महाराज, मावळे यांच्या छोट्या मूर्त्या तालुक्याच्या बाजारातून आजी आणायची. पोळ्याच्या सणाला आणलेली मातीची बैलजोडी किल्ल्यावर चरायला लावून द्यायची. नागपंचमीला केलेला मातीचा नाग पायथ्याला ठेवायचा. शेजारच्या मित्रांनी बनवलेल्या किल्याच्या पायथ्याशी खेळण्यातील छोटा ट्रक पण असायचा. शिवरायांच्या काळात ट्रक नव्हते याचे तेव्हा सोयर सूतक नव्हते. आणि तेही योग्यच. कॉमन सेन्स वापरून आज नवीन काही बनवताना धापा लागतात.
किल्ल्याचे  बांधकाम पूर्ण होईपर्यंत आळीपाळीने सुरक्षारक्षकांची फौज निगराणीसाठी असे. घरातून माऊलीने जेवणासाठी हाका मारल्या तरी अशा वेळी मावळे जागचे हलत नसत. किल्याला लाईटिंग करण्यासाठी कॉलेजला जाणाऱ्या दादाची मदत घेतली जायची. त्याने मग भाव खायचा. मग तो घरातून अंगणात एक्शटेन्शन टाकून लाईटिंग करून द्यायचा. आपल्याला हवी तशी लाईटिंग झाल्यावर कधी एकदा रात्र होतेय आणि आपण किल्ला उजळून टाकतोय असे व्हायचे.
संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यावर किल्ल्याची रोषणाई सुरु करायची. महाराजांची मूर्ती फोकसमधे आली पाहिजे. मावळे पण चमकले पाहिजेत, अशी मांडणी चेहऱ्यावर जे आमच्या चेहऱ्यावर जे तेज येई ते काय विचारता !
दिवाळीच्या दिवसांत मग आल्या-गेलेल्या पाहुण्यांना आमचा किल्ला पाहण्यावाचून आणि आमच्या वास्तुकलेचे कौतुक करण्यावाचून गत्यंतर नसे. गाईडची भूमिका कोण करणार यावर भांडणे होत, त्यावेळेला आम्ही पाहुणे वाटून घेऊ.

***

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी सगळं जग पहाटे लवकर उठतं तेव्हा मी डाराडूर झोपलेलो असतो. भल्या सकाळी चारला उठून, उटणं लावून अंघोळ करणं माझ्या तब्येतीला कधीच मानवलं नाही. सगळेजण फटाके वगैरे फोडून इतरांच्या झोपा मोडतात. काय ती पहाटेची साखरझोप. अहाहा !! माझी ही सवय मोडण्याचा प्रयत्न करून सगळे फसले.
लहानपणी तुमचा इलाज नसतो, ऐकावं लागतं. आता मोठेपणी वाद घालता येतो. हे असंच का? ते तसंच का?
लोक आजकाल इतक्या पहाटे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जातात तेही अंघोळ वगैरे करून, कुर्ता घालून (specifically कुर्ता घालून), मला त्याचं कायम नवल वाटत आलंय. मला दिवाळी पहाटचा कार्यक्रम म्हटला कि तो सादर करणारे कलाकार किती वाजता उठत असतील बिचारे, किती लांबून येत असतील, बहुतेक पहिली ट्रेन पकडत असतील, आणि कुणाचा गजर वाजलाच नाही तर आणि उठायला उशीर झाला तर ? असले हजार प्रश्न.
मी उठेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी उरकलेल्या असतात. फराळाच्या दोन चार प्लेटी रिचवलेल्या असतात. उटण्याने अंघोळ केल्यावर चिरोटे फोडायचे आणि ते पण एका दणक्यात डाव्या टाचेखाली. आपण साक्षात नरकासुराच्या मानेवर पाय देत आहोत असा अविर्भाव करायचा.
फराळ करताना इतरांच्या चेहऱ्याकडे पाहावं. आपली झोप पूर्ण झालेली असते पण इतरांच्या जांभया चालू असतात तेव्हा जो आसुरी आनंद होतो (नरकासुरी म्हणूया) काय वर्णावा.

***

दिवाळीचा फराळ हा स्त्रियांच्या चर्चेचा खास विषय. खाण्याचा कमी आणि टीका करण्याचा जास्त. कुणाची करंजी आतून पोकळच कशी होती, सारण नीट भाजलंच नव्हतं, कुणाचे अनारसे आतून कच्चेच कसे राहिले, कुणात तेल किती जास्त अशी समीक्षा सगळीकडे आढळून येते. एखादीच्या चकल्या तेलात विरघळल्या असतील तर पुढच्या दिवाळीला कशा चकल्या करायच्या यावर दहा बारा वेगवेगळी उत्तरे येतात, कुणी म्हणतं पिठात तेलाचं मोहन फार कडक नसावं तर कुणी म्हणतं कडक असावं. ती सुगरण बिचारी ऐकत बसते.
चाळीतल्या बायका फराळ बनवायला एकमेकांच्या घरी मदतीला जातात. इमारतींच्या बंद घरांत राहणारी माणसे शेजारच्या घरातील खिडकीतून तुपाचा वास येतोय म्हणजे शंकरपाळ्या चालल्यात हे ओळखतील, पण "काय मोरेकाकू कुठवर आलाय फराळ? आज शंकरपाळ्या करताय वाटतं. नंतर वेळ मिळाला तर आमच्याकडे या, तुमच्या हातचे रव्याचे लाडू अविला फार आवडतात हो, करूया थोडे. कसं ?" हे विचारणार नाहीत.  करंजी (ज्याला कानावलं असे पण म्हणतात) बनवायला वेळ लागतो म्हणून चाळीत बायका आपापलं पोळपाट लाटणं घेऊन एकमेकींच्या घरी जात. सर्व करंज्या बनवून झाल्यावर प्रत्येकीला दोन करंज्या मिळत. शेवटच्या राहिलेल्या सारणातून चंद्र-सुर्य बनवले जायचे. त्यावर मात्र माझे  लक्ष असे.  कधी कधी फराळाच्या मदतीला आईच्या मैत्रिणी घरी यायच्या, त्यांच्यासोबत त्यांच्या मुली. आणि त्या कर्मधर्मसंयोगाने माझ्याच वर्गातल्या निघायच्या.  आईला मदत करतोस की नाही या त्यांच्या प्रश्नावर "कसली मदत करतोय तो. उलट काम वाढवून ठेवलंय बघ, मघाशी सांगितलं की सारणात पिठीसाखर घाल अर्धा किलो, तर मैदा घातला." मी बराच वेळ काय रिएक्शन द्यावी या विचारात.

***
शाळेत असताना एका मैत्रिणीच्या घरी फराळाला गेलो होतो . म्हणजे तिनेच बोलावलं होतं म्हणून. चहाचा ट्रे आणि फराळाची प्लेट आली. घरी करंज्या चहात बुडवून खायची सवय. इथे कशी खायची. मैत्रीण प्लेट हातात देऊन आत स्वयंपाकघरात गेलेली. आम्ही एक करंजी उचलली आणि बुडवली चहात, आणि खाण्यासाठी परत उचलतोय वर तर पारलेच्या बिस्किटाप्रमाणे मोडून पडली चहात. आता ? घरी असतो तर बिनदिक्कत अंगठा आणि  तर्जनी चहात घालून बाहेर काढली असती करंजी. आणि हे काही आपले घर नाही. माझी कैफियत तिने जाणली आणि चमचा आणून दिला. आपल्याला एवढी साधी गोष्ट सुचू नये याचं आजही आश्चर्य वाटतं.

***

 एका मित्राला घरी फराळाला बोलावलं होतं. त्याला म्हटलं बेसनाचे लाडू मस्त झालेत खाऊन बघ. तो म्हणाला, "नको रे".
"अरे घाबरू नकोस, खरंच छान झालाय सगळा फराळ" मी.
त्यावर तो "तसं काही नाही रे, पण बेसनाचा लाडू सोडून सगळं खातो."
"का पण?" मी.
 "एका दिवाळीला आई गेली, मग तिच्या आठवणीसाठी बेसनाचा लाडू खायचं सोडलं. आई होती म्हणून दिवाळी होती रे. मला अजून आठवतंय ती लाडवासाठी बेसन भाजायची तेव्हा अभ्यासातून मन उडायचं. लाडू वळल्यानंतर परातीत काढून ठेवल्यावर माझ्या स्वयंपाकघराच्या वाऱ्या सुरु व्हायच्या. तिला बरोबर कळायचं. मग तीच म्हणायची "बघ जरा चाखून, साखर व्यवस्थित आहे का?". साखर व्यवस्थित आहे का ते एक लाडू खाऊन कसं कळणार, दोन तीन व्हायचे".
मित्राच्या डोळ्यांत पाणी तरळलं. आठवणी अशाच छोट्या छोट्या गोष्टींशी  निगडीत असतात. सण निमित्तमात्र असतात नात्यांना उजाळा देण्यासाठी.

 ***

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

"आमानधमकी"ची गोष्ट

चिऊ त्यादिवशी घरी आली होती. ( चिऊचं पाळण्यातलं नाव 'अर्पिता' आहे, पण तिला सगळे चिऊच म्हणतात. आता तर अशी  परिस्थिती आहे कि चिऊ हे आपलं खरं नाव आहे असे तिला वाटतेय, तिने तिच्या ज्यु. केजीतल्या बाईंना तिचं पूर्ण नाव चिऊ उत्तम पाटील असे सांगितल्यावर त्याही जरा संभ्रमात पडल्या होत्या) ती घरी येणार कळताच अक्षरक्ष: दंगलीची परिस्थिती असल्यासारखी आवराआवर सुरु होते. तिच्या हाताला लागेल अशी महत्वाची वस्तू जवळपास नाही ना याची खात्री केली जाते, तिची नवचित्रकला माझ्या संग्रहातील  पुस्तकांच्या पानांवर दिसेल. ज्याला सर्व जण रेघोट्या म्हणतो अशा abstract चित्रकलेचं प्रात्यक्षिक तिने माझ्याकडच्या  पुस्तकांवर केलंय. बर्याच वस्तूंनी शेवटचा श्वास सोडलाय. तर मुद्दा असा चिऊ घरातून जाईपर्यंत आम्ही घाबरेघोबरे असतो. त्या दिवशी आई तिला रागाने उद्देशून म्हणाली,"तिला आमानधमकी पाहिजे आता".
आईच्या तोंडून तो शब्द ऐकताच आत्याची आठवण झाली एकदम. खरं म्हणजे ती माझ्या वडिलांची आत्या, पण आम्ही नातवंडेपण तिला आत्याच म्हणायचो. "आमानधमकी हा तिचाच शब्द." ती फार गोष्टीवेल्हाळ होती. कमरेत पोक काढून चालायची. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर लहान मूल घाबरून रडलंच पाहिजे, पण नंतर त्याचे तिच्याशिवाय अजिबात चालायचे नाही.  लहान मुलाला तेल लावून अंघोळ घालण्यापासून रात्री झोपवेर्यंत त्या मुलांच्या आयांना आत्या हवीच असे. तिला स्वतःला मूल नव्हतं, पण त्याची कसूर तिने आम्हाला वाढवून पूर्ण केली.
रात्री सगळ्यांची जेवणे उरकली, अंथरुणं पडली कि सगळा लहान मुलांचा गोतावळा आत्याच्या अंथरुणाशेजारी जमायचा. घरात एकूण तीन म्हातार्या होत्या, पण आत्यासारखी popularity त्यांना नव्हती. वयोमानाने येणारी अस्वस्थता,बैचेनी तिच्यात दिसायची नाही. "आत्या गोष्ट सांग ना" चा गजर व्हायचा. घरातल्या इतर बायका मुलांना आत्याकडे पिटाळून झोपून जायच्या. कंदिलाच्या पिवळ्या उजेडात बालफौज आत्याजवळ जमायची.
त्या बालफौजेत दोन ते दहा वयोगटातले सगळे असायचे, त्यात रांगणारे, नुकतेच चालायला शिकलेले (ज्यांच्या पायात पैजण असायचे, व त्याच्या आवाजावरून त्यांच्या detective आया त्यांना शोधून काढायच्या.) असे श्रोते असायचे. आत्या कुठली गोष्ट सांगू असे विचारायची, मग आम्ही एकसुरात म्हणायचो, "आमानधमकीची". जसे तमाशाला सुरुवातीला नमन असतं, तसंच इथे सुरुवातीला "आमानधमकी"ची गोष्ट असलीच पाहिजे असा आमचा आग्रह असायचा.
मग गोष्ट सुरु व्हायची. "एक होता राजा, तो एकदा जंगलात शिकारीला गेला."
तिच्या प्रत्येक पूर्ण वाक्याला "हुं" करून साद दिलीच पाहिजे असा अलिखित नियम होता.
"दिवसभर भटकला तो, पण शिकार काही सापडेना. कंटाळला बिचारा, अशात रात्र झाली. करावं काय आता. राजवाडा कोसो दूर. जवळ प्रधानजी नाही. कुठे राहायचं, काय खायचं, कुठली झोपडी दिसेना आसपास?"
"रात्र अशी किर्र, प्राण्यांचे आवाज येताहेत"
अशा वेळी खिडकीतून दिसणारी बाहेरची झाडे विचित्र हालचाल तरी करत किंवा विचित्र आकार तरी निर्माण करत.आणि मग पुरते घाबरून  आम्ही तिकडे न पाहता आत्याच्या गोष्टीकडेच ध्यान केंद्रित करीत असू. पण आपण जे पाहिलंय ते दुसर्याला इशार्याने दाखवून त्यालापण घाबरवत असू.
"तेवढ्यात राजाला एका झाडाच्या टोकावर एक छानशी जागा दिसली कि तिथे तो लपून राहू शकेल, तो झाडावर चढून जाऊन बसला, चढताना त्याने एक भला मोठ्ठा दगड सोबत घेतला.  थोड्यावेळाने काय झालं, एक मोठं अस्वल आलं आणि नेमकं त्या झाडाखाली बसलं. आता काय करावं, झाडावरून उतरू तर शकत नाही, उतरलं तर अस्वल खाऊन टाकणार"
आमच्यापैकी कुणीही अस्वल पाहिलं नव्हतं तेव्हा. त्यामुळे त्याचं चित्र मनावर पक्कं नव्हतं, त्याला काळे घनदाट केस असतात आणि ते उंच असतं या वर्णनामुळे कुणीही अशा टाइपचा इसम दिसल्यास आम्ही घाबरून जात असू.
"राजाने मग नेम साधला आणि जवळचा मोठ्ठा दगड त्याच्या पाठीत घातला. आणि जोराने म्हणाला "कशी पडली आमानधमकी?" बिचारं अस्वल जीवाच्या आकांताने पळत सुटलं. राजा मग सकाळ होताच घरी परतला."
ही गोष्ट सांगून होईपर्यंत अर्धेअधिक श्रोते झोपेच्या अधीन झालेले असत. कुणी आत्याच्या मांडीवर, कुणी तिला बिलगून झोपी गेलेले असायचे. मग अशा बहाद्दरांना हलकेच उचलून बाजूला ठेवण्यात येई. आणि मग  आमच्यासारख्या चिवट श्रोत्यांसाठी दुसरी गोष्ट सुरु होई, त्यात कधी गरीब शेतकरी आणि त्याची शहाणी मुलगी असे. शेतकर्याला अचानक  मोठा धनलाभ होतो. राजाला हे कळतं, राजापासून वाचण्यासाठी मग ती सोन्याच्या मोहरा शेणाच्या गोवर्यात लपवून ठेवते. अशा अनेक गोष्टी.
तिच्या काही गोष्टी तर दोन तीन दिवस चालायच्या. कुठलातरी राजा परदेशभ्रमंतीसाठी निघायचा आणि रस्त्यांत त्याला अनेक संकटे यायची. तिने सांगितलेल्या गोष्टींपैकी फार थोड्या आता आठवताहेत, पण आमानधमकीची गोष्ट मनात पक्की आहे,  मूल जरा जास्त दंगा करत असेल तर कुणी वडीलधार्याने म्हटलं कि "आमानधमकी हवीय का ?" तर ते सुमडीत गप्प बसायचं. शाळेतून आल्यावर न बोलता कुणी अभ्यासाला बसलं कि "शाळेत आज आमानधमकी पडलेली दिसतेय!" असा टोला असायचा.
***
कॉम्पुटरवर गेम खेळणाऱ्या घरातील नव्या पिढीला भेटण्याचा योग आला.आता कुटुंब विखुरलेले. त्यामुळे सततचा संपर्क नाही.  ही नविन पिढी आमच्यापेक्षा फार सतर्क. रात्री जेवणानंतर मी सर्वांना गोष्ट सांगणार असे आधीच जाहीर केल्यामुळे बिछान्याजवळ गर्दी. मुलांना 'आमानधमकी'ची गोष्ट सांगूया म्हणून सुरुवात केली "एक असतो राजा. . . "
तर त्यावर "असा राजा बिजा नसतो काही" अशी प्रतिक्रिया.
मुलांचे हिरोही बदललेले.
"काका तुला गर्लफ्रेंड आहे का रे?" वय वर्ष साडेपाच असलेल्या माझ्या पुतण्याचा प्रश्न.
"तू Asphalt 8 खेळणार का?"
आता त्यांना आवडणार्या गोष्टींविषयी बोलत गेलो. हळू हळू गोष्टीतल्या राजाची जागा Hugh Jackman ने घेतली. त्याने एका alien ला कशी आमानधमकी दिली इथपर्यंत आल्यावर मी सुटकेचा श्वास घेतला.
त्यांना "आमानधमकी" शब्द व ती गोष्ट लक्षात राहील की नाही कुणास ठावूक? निघताना मात्र,आम्हाला कुणीच गोष्ट सांगत नाही तेव्हा तू थांब बरेच दिवस असा आग्रह झाला. मुलांना रात्री झोपताना गोष्ट सांगायला त्यांच्या आई वडिलांना वेळ नाही. त्यांचे आई वडीलही एका  जगावेगळ्या आनंदाला मुकताहेत हे नक्की.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

असंबद्ध

"तू कविता करतोस ?"
"लिहायचो पण खूप आधी, कॉलेजला होतो तेव्हा !"
"मला वाचायला आवडतील तुझ्या कविता, काही हरकत नसेल तर . . ."
". . . ती एक मोठी दर्दभरी कहाणी आहे.. माझ्या कवितांची वही २६ जुलैच्या पावसात वाहून गेली.  ( हुश्श !!)
"अरेरे !"
"त्यानंतर कविता लिहावीशी वाटली नाही, पण आता वाटतेय."

***

 "वुडहाउसला मानलं पाहिजे यार, काय लिहितो !"
 "छे काहीतरीच. त्याच्या आजूबाजूला काय चाललंय याची त्याने साधी दखल घेतली नाही कधी , फक्त जुनं लंडन शहर रंगवत गेला. "
"पण, लोकांना हसवणं सोपं काम नाही."
"मान्य. पण साहित्यात जीवनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे."
"कुठल्या मुर्खाने सांगितलं की साहित्यात जीवनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे? आणि ऐक. . वुडहाउस ग्रेट आहे. वाद संपला. आजूबाजूला काय चाललंय याची त्याने दखल घेतली नाही म्हणून तो ९३ वर्षं जगला."



***

"काय शोधतोयस त्या सुभाषितांच्या पुस्तकात?"
"एक छानसं वाक्य, One liner जे मी स्टेटस म्हणून टाकू शकेल. "
"कसं वाक्य पाहिजे तुला ?"
"एकदम catchy, भरपूर likes मिळतील असे, आवडलं पाहिजे सगळ्यांना."
"घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलायस असं लिही, तुझ्या सगळ्या पुरुषमित्रांना आवडेल ते, कुणी एक शूर वीर म्हणून. "

***
"एकदा का नातं स्वीकारलं कि, त्या माणसाचा पण पूर्णपणे स्वीकार केला पाहिजे. . त्याच्या गुणदोषांसकट.  आपल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे . नातं लोणच्यासारखं असतं, मुरायला वेळ द्यावा लागतो. "
"आणि नातं जपताना दमछाक, मनस्ताप  होत असेल तर?"
"तर. . . ते नातं जपण्याइतकं गरजेचं आहे का याचा पुन्हा विचार करावा. उगाच मनात कुढत राहू नये "
" छान सल्ले देतोस. वपुंच्या कथांतून ढापतोस वाटतं अशी वाक्ये.  काही म्हणा ते लोणच्याचं बोललास ते आवडलं बाकी आपल्याला !!"

***

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

रोजच्या जगण्यापल्याडचं जग

"ऐक ना नव, खूप मस्त अनुभव असतात रे या भटकंतीचे ! आम्ही सध्या खेड्यापाड्यातल्या शाळांत जातोहोत, जिथे पोचायला धड रस्ता नाहीये, तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी आतमधे असणार्या या शाळा. तिथल्या मुलांपर्यंत विचार पोचवतो आहोत. या भेटींत नवी जागा पाहायला मिळते, माणसे भेटतात. . मुलं तर मुलंच. कुठलीपण. आपलं बालपण आठवायला लावणारी. दंगामस्ती करणारी.
त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळाच दृष्टीकोन मिळतो. मी माझ्या सत्राची सुरुवात खेळीमेळीने करतो, त्यांना त्यांच्या भाषेतच बोलतं करतो. हळू हळू मुलं त्यात गुंतत जातात. तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचं समाधान पाहून मजा येते यार. आपण बोललेलं कुणीतरी लक्ष देऊन ऐकतंय हे कळलं, की आपल्याला पण बोलण्याचा हुरूप येतो. या गप्पांत मुलं जे प्रश्न विचारतात ते तू ऐकलेस ना तर तुला पण आश्चर्य वाटेल. एका सातवीतल्या मुलीने मला विचारलं "सर, हे मन नेमकं असतं कुठे?" मी तर क्लीन बोल्ड. आपण मारे मनाच्या स्वास्थाविषयी बोलायचं, मनाच्या श्लोकाचा दाखला द्यायचा भाषणात, पण मन कुठे असतं, शोधलं का कधी?
ती मुलं सात आठ किलोमीटर चालत येतात शाळेत आजूबाजूच्या गावांतून. संध्याकाळी साडे पाच वाजले कि यांचा घोळका काट्याकुट्यातून वाट काढत दिवेलागणीपर्यंत घरी पोचायला निघतो. पहिल्यांदा original सूर्यास्त आणि सूर्योदय  पाहिला या दौर्यात आणि कातरवेळ कशी असते तेही अनुभवलं रे मित्रा. मस्तच.
आपण फार मोठे वक्ते आहोत या माझा गर्व मोडला या भटकंतीत. आपण शब्दांच्या फुलोर्यांनी भले महाराष्ट्रातल्या अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या असतील पण नि:शब्द करायला लावणारे प्रेम आणि आपुलकी काय असते, इथे कळलं. रात्री निवांत घोंगडी पांघरून मोकळ्या आभाळात तारे पाहण्यात अजब मजा आहे.
शाळेत माझं व्याखान संपलं कि, मी मुलांकडे उगाच गुरुदक्षिणा मागतो, मस्करीत. त्यांनी मला काही द्यावं ही अपेक्षा नाही पण त्यांची reaction पाहण्यासारखी असते. सधन तालुक्याच्या शाळांतली मुले सहज तयार होतात, "देऊ की, काय हवंय सांगा सर?" म्हणतात. परवा एका शाळेतली मुलं मात्र वेगळी होती. आई-वडील मजुरीवर जाणारे. त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागताच त्यांचा चेहरा सपशेल पडला. अगदी शांतता. आता सरांना काय द्यायचं असा विचार त्यांच्या मनात आला असेल. मी पण हे समजून लगेच विषय बदलला.
शाळेच्या मुख्याध्यापकांच्या छोट्याशा खोलीत गुळाने गुळमाट ठाण केलेला चहा कसाबसा संपवायच्या बेतात असताना आणि सरकारी निधी कसा मिळत नाही यावर हो हो करत असताना एक शिक्षक आत आले आणि मला म्हणाले. "सर, एका मुलीला तुम्हाला भेटायचंय". मी म्हटलं, "पाठवा कि तिला आत". एक धीट मुलगी आत आली. शिक्षक म्हणाले,"सर ही नववी 'अ' मधे आहे, तिला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायचीय." तिने आपल्या मुठीत दुमडलेली दहाची नोट मला देऊ केली. मला काय बोलू कळेनाच. अरे या मुलांसाठी दहा रुपये म्हणजे फार मोठी रक्कम. सगळ्या हौसमौजा पैशापाशीच येउन थांबतात. लिनेनचा आठशेचा शर्ट सहज विकत घेतो आपण दर महिन्याला, येथे वर्षाला दोन युनिफोर्म वापरायचे शाळेसाठी. इस्त्री हा प्रकार नाही. basic गरजाच भागवायला इतके कष्ट घ्यावे लागतात.  अशा वेळी एक चिमुरडी मला गुरुदक्षिणा म्हणून दहा रुपये देतेय, जे की तिने किती दिवस जपले असतील काहीतरी घेण्यासाठी. मला तिला दुखवायचं नव्हतं पैसे नाकारून. मी ते घेतले आणि तिला एक पुस्तक भेट दिलं.
मी ती दहाची नोट जपून ठेवलीय. धाड्कन मी जमिनीवर येतो ती नोट पाहून. degree चा आणि शहाणपणाचा संबंध नाही हे कळलंय."
***


"ऐक ना नव Counselling करताना ज्याम धमाल येते यार."
 ही जी मुलं आहेत ना, कसली हलकट आहेत. पण तितकीच गोड. त्यांच्याशी बोलणं सुरुवातीला कठीण गेलं. पण नंतरच्या sessions ला जेव्हा काही games घेतले तेव्हा त्यांची कळी खुलली. तुला तर idea आलीच असेल त्यांना गेल्यावेळी भेटलास तेव्हा. एकदम व्यक्त होत नाहीत रे  कुणाशीही. आपलं माणूस कुणी नाही म्हणून किंवा आई वडील नसल्याचं दु:ख असेल. त्यांची पार्श्भूमी संस्थेच्या register मधे आहे. पण मला ती मुलं त्यांच्या भूतकाळाला कशी पाहतात हे पहायचं होतं, मनात काही शल्य आहे का?, न्यूनगंड आहे का?, तिरस्कार आहे का? हे जोखायचं होतं. मग मी आताच्या session ला प्रत्येकाला एक चित्र काढायला सांगितलं. रंग दिले, कागद दिला. चित्रात एक निळी नदी काढायचीय, आणि ही नदी म्हणजे तुमचं आयुष्य आहे असं सांगितलं.  आता या सरळ प्रवाही नदीला कुठे वळण लागलं, कुठे खूप मोठा  बदल घडवणारा प्रसंग घडला ते काढायचं.  आणि ते त्या वळणाच्या बाजूला थोडक्यात लिहायचं. साल आठवत असेल तर ते पण लिहा. काही चांगलं घडलं असेल, ते पण लिहा. वळणावळणाची नदी.निळीशार. खडूने काढलेली रखरखीत.
मुलं गुंतली चित्र काढण्यात. आता चित्र काढून झाल्यावर एकेकाला बोलावलं आणि चित्र explain करायला लावलं.

एकाने सुरुवातीलाच नदीच्या उगमाजवळच लिहिलेलं "आई जन्म देतानाच मेली"
पुढचं वळण दोन वर्षांनी "बाबा मेले".
पुढचं वळण आठ  वर्षांनी "काका काकूंच्या त्रासाला कंटाळलो आणि मुंबईला आलो"
मग आता संस्थेत.

एकाने काढलेलं पहिलं वळण - "आईला बाबांनी मारलं"
मला वाटलं domestic violence असेल, पण नाही रे.  इथे खून केला होता, तोही चिमुरड्या मुलासमोर. भयानक.
मग "बाबा तुरुंगात"
मग मोठं वळण "बाबांचा मृत्यू".  बाबांविषयी तिरस्कार नाही. त्यांनी दारूच्या नशेत आईला मारलं, तसे ते चांगले होते असा म्हणाला. वाढदिवसाला सायकल आणली होती ही चांगली गोष्ट.
आई जेवण चांगलं बनवायची. संस्थेतल्या जेवणाला तिच्या हातची चव नाही.
संस्थेत येउन चांगल्या विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळणं हे आताचं आयुष्याला मिळालेलं मोठं वळण.

एका दंगेखोर मुलाने नदीत मासे काढले होते, बोट काढली होती. आजूबाजूला निसर्ग म्हणता येईल अशा गोष्टी पण काढल्या होत्या. इथे नदी सरळ होती. एकही वळण नाही. कसं शक्य आहे. त्याला बोलावलं. तेव्हा त्याचा डायलॉग  "दीदी, अपुन कि जिंदगी एक खुली किताब है, ऐसे एक painting मे नही आयेगी" एक नंबर चाप्टर. बघतेच त्याला नंतरच्या session ला.
काही जण गुन्हेगारी background चे. अनाथ म्हणून गुंडांच्या तावडीत सहज सापडलेले.  आपण चोरी करायचो हे accept केलं काहींनी. बहुतेकांच्या नदीला संस्थेत मोठं वळण मिळालं होतं.

त्यांच्याशी बोलून कळलं की जगणं सोपं नाहीये. तू एक शेर सांगितलेलास सुरेश भटांचा "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते".

आपल्या सरळसोप्या आयुष्याला इतकी वळणं परवडणार नाहीत. साध्या साध्या गोष्टीनी खचणारे आपण.
या मुलांनी हे कसं पचवलं असेल? कल्पना नाही करवत.
एक मात्र नक्कीय, या मुलांनी जगण्याचा धीर दिलाय मला."
 ***

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

बसरातील ग्रंथपाल (The Librarian Of Basra)

२००३ सालापासून सुरु असलेल्या इराक युद्धाच्या कहाण्या वाचनात आल्या. त्यात 'The Librarian Of Basra' हे जेनीट विंटर यांनी लिहिलेलं छोटेखानी पुस्तक वाचनात आलं. लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक. इराक मधील बसरा या शहरात तेथील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल असलेल्या आलिया मुहम्मद बेकर यांनी युद्धकाळात तीस हजार पुस्तकांचं ग्रंथालय कसं वाचवलं याची ही कथा. युद्धकाळात ब्रिटिश आणि अमेरिकी फौजा जेव्हा इराक वर आक्रमण करणार अशी चर्चा सुरु झाली तेव्हा पुस्तकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या बेकर यांनी ग्रंथालय स्थलांतरित करण्याची मागणी तेथील गवर्नर यांना केली, अपेक्षेप्रमाणे त्यांनी ती धुडकावून लावली. सरकारचं सहकार्य नाही, सद्दाम हुसेनविषयी जनमनात प्रचंड असंतोष. सर्वत्र लुटीचं वातावरण. अशात पुस्तके वाचवण्याची पर्वा कुणाला? ग्रंथालयात काही प्राचीन हस्तलिखिते,इतिहास, तत्वज्ञान यावरची मोल्यवान पुस्तके, त्यातील एक तर मुहम्मद पैगंबरचं तेराव्या  शतकातील चरित्र. हवाई बॉम्बहल्ल्यात ग्रंथालय नष्ट होण्यापूर्वी बेकर यांनी रोज थोडी थोडी पुस्तके गाडीतून घरी न्यायला सुरुवात केली. शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजारी असलेल्या रेस्टारंटच्या मालकाला विनंती करून तिथे काही पुस्तके हलवली.
हळू हळू ग्रंथालयात फौजांनी बस्तान मांडलं. आकाशात अमेरिकी सैन्याची विमाने घिरट्या मारू लागले. अशा वेळी सर्व पुस्तके एका ट्रक मधे लादून त्यांनी स्वतच्या घरी हलवली. घरी सर्वत्र पुस्तकेच पुस्तके. युद्ध सुरु झालं आणि काही दिवसातच ग्रंथालयाची इमारत बेचिराख झाली. बेकर युद्ध संपेपर्यंत वाट पाहत राहिल्या.पुस्तकांची घरी काळजी घेत राहिल्या.
                                          

आता युद्ध संपल्यावर पुन्हा नव्याने ग्रंथालयाची इमारत बांधली गेलीय आणि पुन्हा बेकर ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्यात.
त्यांच्या ग्रंथालयात रोज शहरातील विद्वजन,कलाकारांची हजेरी असते. त्या म्हणतात पवित्र कुराणात अल्लाने मुहम्मदला पहिली आज्ञा जर कुठली केली असेल तर ती म्हणजे "वाच". ग्रंथालये लिखित, मौखिक स्वरूपातील ज्ञान, त्या त्या भूभागाचा इतिहास, पुढील अनेक पिढ्यांसाठी जतन करतानाच हे सर्व त्यांच्यापर्यंत कसे पोहचेल याचीही काळजी करतात. एखाद्या समाजाची बौद्धिक जडणघडण करण्यात ग्रंथालयाचा महत्वाचा वाटा असतो. चांगला ग्रंथपाल ग्रंथालयाला लाभणे हे ही तितकेच महत्वाचे असते. ९ ते ५ कार्यालयीन वेळेच्या पल्याड वाचकांपर्यंत पोचणारा, पुस्तकांची भेट घडवून देणारा ग्रंथपाल जरी कुबेराच्या संपत्तीचा रखवालदार असला तरी ही संपत्ती लुटण्यासाठीच आहे असं मानणारा पाहिजे.

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

वाचायची राहून गेलेली पुस्तके

घरात पाऊल टाकलं की टेबलावर असलेला पुस्तकांचा ढीग नजरेस येतो. कितीक दिवसांपासून ती अशीच पडली आहेत. त्यातील बरीचशी अर्धी वाचून ठेऊन दिलेली, काही संदर्भासाठी कपाटातून काढलेली, काहींचं पहिलं पानही न उघडलेलं. वीस - तीस असावीत. आईची सतत भुणभुण की पसारा आवर. पसारा आवरायला घेतला कि मी हटकून एखाद्या पुस्तकाच्या पुन्हा प्रेमात पडणार, एखादा paragraph वाचता वाचता एक तास त्यात जाणार. पुलंनी लिहिलेला 'निळाई' लेख, फक्त एकदा नजरेखालून घालतो म्हणून वाचायला लागलो तर थेट वेनिसला जाऊन पोहोचलो. आईने तासाभराने आठवण करून दिली तेव्हा कुठे भानावर आलो.
आम्हा पुस्तकवेड्यांना स्थळ, काळ याचं भान राहतच नाही. फोर्टच्या रस्त्यांवर पुस्तके विकणाऱ्या माणसांना आम्ही परग्रहावरचे वाटत असू. त्याने प्रदर्शनाला ठेवलेल्या पुस्तकांच्या एकदम तळाशी असलेलं एखादं पुस्तक आम्ही मागणार, त्याचा ब्लर्ब वाचणार, मुखपृष्ठ कौतुकाने पाहणार, किती जुनी आवृत्ती आहे हे बारकाईने पाहणार, मधली पाने व्यवस्थित आहेत ना, पानांचा वास घेऊन अंदाजपंचे किती जुनं आहे याचे मनोमन गणित करणार, कुणी बरं लिहिलं होतं / सुचवलं होतं या पुस्तकाबद्दल ? हे आठवत बसणार, तोपर्यंत उभ्याने दोन पायांच्या कवायती करून झालेल्या असतात, अर्धा एक तास पुस्तक आपण न्हाहाळत असतो. विक्रेता साड्यांच्या दुकानातील सेल्समनसारखा डोक्यावर बर्फ ठेवून विचारतो, 'लेने का है क्या?' मग आपण किंमत विचारणार, त्याने सांगितलेली किंमत अर्थातच आपल्याला पटलेली नसते. मग त्यावर घासाघीस. कुठल्याही परिस्थितीत पुस्तक हातून जाऊ द्यायचं नसतं आपल्याला. शेवटी तडजोड होते. चांगल्या पुस्तकाची किंमत नाही करता येत असा विचार करून आपण समाधान करून घेतो. नवीन पुस्तक प्रवासात वाचत घरी येतो, पुढचे दोन तीन दिवस अर्धं वाचून होतं मग कामाच्या व्यापात अर्धं तसंच राहून जातं. अशी अर्धी वाचून झालेली पुस्तके कपाटातून आपल्याकडे रागाने पाहत आहेत असे वाटते. 

एखादं पुस्तक इतकं खिळवून ठेवणारं असतं की एक - दोन दिवसातच वाचून पूर्ण होतं. फोरसिथ, ग्रिशमच्या कादंबऱ्या अशापैकीच. रात्र रात्र जागून कादंबऱ्या संपवण्याची नशा वेगळीच असते. गोनिदा, पेंडसे, यांच्या कादंबऱ्या रात्री जागून वाचलेल्या, 'पडघवली' वाचून संपवली तेव्हा पहाट होत होती आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि योगायोगाने कादंबरीच्या शेवटीही तशाच पावसाचे वर्णन आहे.
पुलंच 'अपूर्वाई' मला पूर्ण वाचायचंय, पण कधीचा मुहूर्त येईल ठाऊक नाही, गेल्या चार वर्षात मी ते चारदा विकत घेतलंय. कधी मित्रांनी ढापलं, कधी कुणाला वाचायला दिलं त्यांनी परतच केलं नाही.
काही पुस्तके गेल्या काही वर्षांपासून माझ्या रीडिंग लिस्ट वर आहेत. एका कुंद पावसाळी संध्याकाळी वाचण्यासाठी मी Eliot च्या कविता ठेवल्यात, गावी आमराईत बसून निवांत दुपारी वाचता येईल म्हणून फास्टर फेणे, फेलूदा घेऊन ठेवलेत. अधेमधे त्यातल्या काही साहसकथा वाचतो पण अथ पासून इति पर्यंत नाही.
बालकवींच्या कविता पूरवून वाचतोय. कधी एखादी कविता एक दिवस पुरते कधी महिनोंमहिने डोक्यात घुमत राहते. सुनीताबाईंच्या 'सोयरे सकळ' 'मण्यांची माळ' तसेच  माधव आचवल यांच्या 'किमया' मधील ललितलेख एका बैठकीत नाही वाचता येत. प्रत्येक लेख मनात हळू हळू झिरपावा लागतो.  जी. ए. कुलकर्णी ( Genius GA असं आम्ही मानतो ) यांची कथा परत परत वाचावी लागते तेव्हा कुठे त्यांनी योजलेल्या शब्दकळेचं सामर्थ्य आणि सौंदर्य ध्यानात येतं.
 एकदा तर असं ठरवलं कि एक पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचाच नाही. पण कितीही पक्का निर्णय केला तरी किमान तीन पुस्तके simultaneously (एकसमयावछ्चदेकरून) वाचायची सवयच लागली आहे. अशात बरीच पुस्तके अर्धी वाचायची राहूनच जातात. मित्र जेव्हा विचारतात कि इतकी पुस्तके वाचतोस केव्हा, त्यावेळेस वाटतं यांना सत्य परिस्थिती कुठे माहितेय?
 सध्या काय वाचतोयस? या प्रश्नाला मी अताशा खरं उत्तर देणे टाळतो, कारण हातातलं पुस्तक कधी संपवता येईल याची खात्री नाही. म्हणूनच ग्रंथालयातून ठराविक मुदतीसाठी पुस्तके आणणे मला जमत नाही.

पुस्तकांच्या बाबतीत मी आळशी आहे, पण काही झालं तरी पुस्तके  माझी कागाळी कुणाकडे करणार नाहीत, अबोला धरणार नाहीत किंवा रागावणार नाहीत, त्यांच्या पानांत दडवून ठेवलेली सुगंधी गुपिते सुरक्षित जपून ठेवतील.