शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

झेनकथा

"A Japanese warrior was captured by his enemies and thrown into prison.That night he was unable to sleep because he feared that the next day he would be interrogated, tortured, and executed. Then the words of his Zen master came to him, "Tomorrow is not real. It is an illusion. The only reality is now." Heeding these words, the warrior became peaceful and fell asleep."
झेनकथा या प्रकारात वरकरणी बोध असा नसतो. त्या कथेचा अर्थ शोधत राहायचं.  कथेत विसंगती असते. मनाला खूप विचार करायला लावायचा.शेवटी विचार करून करून मन थकून जातं. मग विचार येत नाहीत डोक्यात. तो क्षण झेनचा. स्तब्धतेचा. वरची झेनकथा त्यातलीच. उद्या हा भास आहे. खरं वास्तव म्हणजे आताचा क्षण. उद्याची चिंता कशाला? पण हा उद्या येणारच आहे, सैनिकाला त्रासाला तोंड हे द्यावंच लागेल कि हा होणारा त्रास, वेदना हापण केवळ भास आहे? कि सगळं अस्तित्वच एक भास आहे?
झेन शिकणारे शिष्य ध्यानधारणा करत असताना त्यांचे गुरु छोट्याशा दंडुक्याने त्यांच्या डोक्यात टपली मारावे तसे मारतात. लक्ष ध्यानावरून जरा भरकटलं, खा टपली. त्या गुरूंना बरोबर कळत असलं पाहिजे शिष्यांच्या मनात काय चाललंय ते.
या झेनकथांचं पुस्तक हाती लागलंय. पन्नास पानी पुस्तकांत या कथा आहेत. या कथांच्या सोबत त्या कथांवरून लोकांनी काय निष्कर्ष काढले ते पण दिलंय. पण ते फालतूय. लोकांनी काहीही निष्कर्ष काढलेत.
बहुधा जास्त विचार केलेल्या त्या माणसांना तो झेनचा क्षण लगेच अनुभवता आला असणार.
सध्या यातील एकेक कथा रोज मनात घोळवतोय. प्रवासात, लंच करताना इतरांना पण पकवतोय.
मजा येतेय आणि ज्या कुणी अज्ञात लेखकाने त्या लिहिल्या असतील त्या बद्दल कौतुक आहे. हे लोकसाहित्य प्रकारात मोडत असल्याने इतक्या वर्षांत कथांची versions बदलली आहेत. काही कथांचे शेवट वेगळे आहेत, काहीतील संवाद वेगळे आहेत. संपादक महाशयांनी त्या कथांची जितकी versions (प्रारूपे) आहेत तितकी दिलीयेत.
 मला आवडलेली आणखी एक कथा :
"A monk set off on a long pilgrimage to find the Buddha. He devoted many years to his search until he finally reached the land where the Buddha was said to live. While crossing the river to this country, the monk looked around as the boatman rowed. He noticed something floating towards them. As it got closer, he realized that it was the corpse of a person. When it drifted so close that he could almost touch it, he suddenly recognized the dead body - it was his own! He lost all control and wailed at the sight of himself, still and lifeless, drifting along the river's currents. That moment was the beginning of his liberation". 
एकदम आहट स्टाईलची ही कथा आहे. स्वताचे निश्चल प्रेत पाहिल्यावर किंवा त्याचा भास झाल्यावर त्या साधूला मुक्तीची अनुभूती येते. आपल्या इच्छा, वासना देहाशी बांधील असतात. भौतिकतेकडे आपला ओढा असतो. देहाच्या पलीकडे जाता आले पाहिजे. नचिकेत्याने यमराजांना तिसरा वर मागताना विचारलं होतं कि, देह नष्ट झाला कि आत्मा नष्ट होतो कि आत्मा चिरंतन आहे?
A renowned Zen master said that his greatest teaching was this: Buddha is your own mind. So impressed by how profound this idea was, one monk decided to leave the monastery and retreat to the wilderness to meditate on this insight. There he spent 20 years as a hermit probing the great teaching.
One day he met another monk who was travelling through the forest. Quickly the hermit monk learned that the traveller also had studied under the same Zen master. "Please, tell me what you know of the master's greatest teaching." The traveller's eyes lit up, "Ah, the master has been very clear about this. He says that his greatest teaching is this: Buddha is NOT your own mind."
या कथेत  काय सुचवायचय? ज्ञान कसं obsolete होतं ? कि जे मिळालंय ते अंतिम ज्ञान नव्हतं? कि गुरुने सांगितलेलं सुद्धा स्वतच्या कसोटीवर तपासलं पाहिजे अंधानुकरण न करता?
"Once there was a well known philosopher and scholar who devoted himself to the study of Zen for many years. On the day that he finally attained enlightenment, he took all of his books out into the yard, and burned them all."
ही मला न पटलेली कथा आहे. पुस्तके म्हणजे  ज्ञानाची साधने. जे साध्य करायचं आहे ते मिळवल्यावर पुस्तके जाळून टाकायची?  पुस्तकांच्या निर्जीव पानांत खरंच माणूस बदलवण्याची क्षमता असते? त्या संशोधकाला खरंच ज्ञानप्राप्ती झाली होती का?
डोक्याचं भजं होतं ते असं !
***

सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

एक अकेला ईस शहर में

त्याने दरवाजा उघडला. बूट काढून भिरकावले.  जरावेळ पलंगावर बसला. पंखा टॉप स्पीडला.  घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे  पावणे एक झाले होते म्हणजे साडे बारा वाजलेत. घड्याळ पंधरा मिनिटे पुढे ठेवलंय. बाकी घड्याळ कितीही मिनिटे पुढे ठेवा उशीर होणारच, खिशातला मोबाईल काढला आणि चार्जीगला लावला. उद्या शनिवार.  battery डेड झालेला फोन चालू झाल्यावर त्याने facebook आणि whatsapp uninstall केले. आता पुढचे दोन दिवस कुणाचेच updates नकोत.फुकटच्या गप्पा नकोत. पुढचे दोन दिवस  निवांत.
बेसिनचा नळ चालू करून त्याने चेहऱ्यावर सपासप पाणी मारले. ट्रेनमधे काय झोप लागली होती ! कशाला मरायला आपण इतक्या लांब राहायला आलोत. इतक्यात कुकरच्या शिट्टीचा आवाज आला. च्यायला !!यावेळेलापण माणसे जेवणाच्या तयारीत. बरंय. इतकं दमून घरी आल्यावर कुकर लावायचा stamina नक्की एका बाईतच असणार. अलार्म बंद करून त्याने पलंगावर स्वतःला फेकून दिले,
शनिवारचा दिनक्रम :
शनिवारची सकाळ अकरा वाजता उजाडली. आरामात ब्रश करत तो उघडाबंब घरभर फिरला. अंघोळीसाठी कडक पाणी तापवलं. विवस्त्र होऊन अर्धा तास अंघोळ केली. बादलीतलं पाणी संपलं तरी दिगंबर अवस्थेत तो बराच वेळ बसला. चहाचं आधण तापत ठेवलं. चहा कढस्तोवर पेपरातल्या बातम्या चाळल्या. संपादकीय पानावर कुठल्या विषयावर अकलेचे प्रदर्शन केलंय ते पाहिलं. कॉलेजला असताना डिबेटिंग सोसायटीच्या सभांत तो तावातावाने अमुक एका संपादकाने आजच्या संपादकीयात हे मांडलंय असं ठासून सांगायचा. लोकं काय आयतं ऐकायला मिळतंय म्हटल्यावर ऐकायची. जोरदार भाषण करायचा. आता अग्रलेख वाचायला घेतला कि झोप येते. चहा घेतला. दोन बिस्किटे चघळली.
बाल्कनीतल्या झाडांना पाणी घातलं. पिकलेली पाने खुडून टाकली. पेपराची जमलेली रद्दी नीट बांधून ठेवली.
कशाला हवेत घरात  दोन दोन पेपर. एक मराठी आणि त्याचा आंग्ल बंधू. रद्दीचा भाव चांगला येतो म्हणून ठीक आहे एकवेळ.
आठवडाभराचे कपडे मशीनला टाकले. पाच शर्ट, तीन पँट, तीन जोडी पायमोजे, तीन रुमाल. कपडे बाल्कनीत वाळत घातले. एका टोपात मुगाची खिचडी शिजायला टाकली.  फ्रीज आवरलं. खराब झालेल्या सॉसच्या बाटल्या कचऱ्यात टाकल्या. केव्हा आणल्या होत्या, देवास ठावूक. पुढच्या वेळेपासून त्यावर स्टीकर लावला पाहिजे. खिचडी झाल्यावर बकाबका जेवला. बटाटा साल न काढता खिचडीत टाकल्यावर वेगळीच चव येते. ओर्गनिक का काहीसी.
जेवल्यावर सुस्ती आली तेव्हा candy crush च्या दोन levels पार केल्या. मग लादीवर पहुडला. संध्याकाळी पाचला जाग आली. सकाळचाच उरलेला चहा गरम करून पिला. मग त्याने बाजारात जाऊन काही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली उदा. कांदे, बटाटे, लसूण, ब्रेड, दूध  इत्यादी.
संध्याकाळी सातला देवासमोर दिवा लावला. आठवडयातून याच दिवशी देवाची सेवा घडते. भात शिजायला टाकला. दूध गरम केलं. दूधभात खाल्ला. दूधाला त्याची स्वतंत्र चव आहे. भाताला आहे. लोक साखर टाकून चव बिघडवतात. सकाळची आणि आत्ता जेवलेली भांडी एकदम घासली. साडे आठ वाजलेत आतासे. या वेळेला आपण काय करत असलो असतो? chatting, टीम मीटिंगचे भयाण minutes लिहून सगळ्यांना मेल पाठवत, किंवा कुठल्यातरी न दिसणाऱ्या client साठी माथेफोड करत.  
त्याने मोबाईलच्या playlist मधे जाऊन बेगम अख्तरची गाणी लावली. शनिवारची संध्याकाळ व्याकूळ आणि उदास व्हायला एकदम चांगली. या बाईच्या आवाजात असा काय जादू आहे कि आपण एकदम हळवे होऊन जातो. ये मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया. . असं का वाटत राहावं कि आपले शंभर ब्रेकअप झालेत आणि आपण तनहाईत आहोत. इन्सान बगैर रोये तो नही उठना चाहिये ।
केव्हा झोप लागली कळलं नाही. मधे रात्री जाग आली तेव्हा Yanni ची गाणी चालू होती म्हणजे गाण्यांनी पण B to Y चा प्रवास केला होता. मोबाईल मध्ये पाचाचा अलार्म लावला.
रविवारचा दिनक्रम : 
रविवारी पहाटे पाचला Wake me up ने झोप उतरवली. त्याने भराभरा दात घासले आणि पँट चढवली. रविवारचा सूर्योदय पहायची त्याची जुनी सवय. ट्रेनही रिकाम्या असतात. मरीन लाईन्सच्या त्या कठड्यावर बसून हळू हळू उगवतीस येणारा सूर्य पाहणे त्याला खूप आवडतं. आठवड्याच्या इतर दिवशी कळतही नाही सुर्य केव्हा अगवतो ते. नुसतं निवांत बसून राहायचं. कशाचाच फार विचार करायचा नाही. या महानगरातलं आपलं वास्तव्य किती दिवस असेल कुणास ठावूक. आपण पहिल्यांदा इथे आलो तेव्हा या समुद्रानेच मन मोकळं करायला जागा दिली. शेंगदाणे खात उद्याची काळजी करत इथेच किती रात्री घालवल्या. एकदाचे आपण इथले चाकरमानी झालो. ट्रेनच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतलं. इथे सगळ्यांना जागा आहे. इथल्या ह्या उंच इमारती आणि त्यातले धनाढ्य लोक. प्रत्येकाच्या स्वप्नांना इथे वाव आहे.
नऊ वाजले तेव्हा त्याची तंद्री भंगली. स्टेशनवर पाणी कम चहा घेतला, घरी पेपर येणार आहे हे ठावूक असूनसुद्धा पेपरवाल्या समोर उभा राहून जमेल तितक्या हेडलाईन्स वाचल्या. इडलीवाल्या अण्णाकडे रस्त्यावर उभे राहून दोन प्लेट इडल्या खाल्ल्या. समाधानाची ढेकर दिली.
इडल्या खाल्ल्यावर आईची आठवण आली, तिला फोन करून इथे आपले कसे सुरळीत चालले आहे याची खात्री करून दिली.
घरी पोचल्यावर लादी पुसून घेतली. घरात बाईमाणूस नसताना केसांचे पुंजके कुठून येतात बरं. काही भुताटकी तर नसेल ना? गावी लोक सर्रास असे करायचे. कुणाची नखे चोरून ने तर कुणाची केसं. इथे सगळे सुसंस्कृत वाटतात. शेजारचा माणूस मेला तरी चौकशीस जाणार नाहीत. privacy महत्वाची.
भूक तर नाहीये इतकी. रेडीमेड सूप प्यावं. दोन मिनिटांत रेडी.
दुपारी घरातला पसारा आवरला. पुस्तकं नीट रचून ठेवली. कपड्यांच्या घड्या घातल्या. एका महान लेखकाची एपिक समजली जाणारी कादंबरी वाचायचा आटोकाट प्रयत्न केला. डोळ्यावर झोप आली तेव्हा झोपला.
संध्याकाळी मित्राने भेट दिलेली जास्मिन टी बनवली. त्याने चीनवरून आणली होती. चहाला मस्त वास येतो जास्मिनच्या फुलांचा. त्यानिमित्ताने सर्व मित्रांची आठवण काढून झाली. शिव्या देऊन झाल्या. काय करताहेत *** देव जाणे !!
 डिनरसाठी कर्ड राईस. साउथ इंडिअन बॉस कडून शिकलेली रेसिपी. खाणार तेवढा भात शिजवून घ्यायचा पहिल्यांदा. त्यात सढळ हाताने दही ओतायचं. जिरे,मोहरी, कढीपत्ता, मिरचीची कढत फोडणी द्यायची वरून. जमल्यास तुळशीची पाने टाकायची. झाला कर्ड राईस तयार.  दही गोड असेल तर भारीच.
जेवल्यावर भांडी घासताना U2 ची गाणी सोबतीला. त्याचं I still haven't found what I'm looking for फेवरेट.
आपल्याला तरी कुठे कळलंय काय शोधतो आहोत ते.
बिछाना टाकायचा. दोन दोन अलार्म लावायचे सोमवार साठी. झोपताना George Harrison चं All things must pass away ऐकायचं. येणाऱ्या आणखी एका दिवसासाठी  तयार व्हायचं.
All things must pass
None of life's strings can last
So, I must be on my way
And face another day.
All things must pass away

***

सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

गर्दी

गर्दी लोकल ट्रेनमधली, गर्दी सरकारी कचेऱ्यातली, गर्दी शाळा, महाविद्यालये, युनिवर्सिट्यातली,
गर्दी बाजारातली, गर्दी बगिच्यातली,
गर्दी थेटरांतली,  गर्दी माणसांची.
या गर्दीत एक तोच तो पणा आहे, ठोकळेबाजपणा.
नेत्यांची भाषणे ऐकून भारावून जाऊन टाळ्या पिटणारी  गर्दी !
हिरोने विलनला ठोकल्यावर 'हाण तिच्या s आयला' म्हणत खुश होणारी गर्दी !
संध्याकाळी घरी परतत असताना, रस्त्यांवरील दुकानांसमोर उभे राहून म्याच पाहणारी गर्दी !
ट्रेन, बसच्या विंडोसीट साठी धडपडनारी गर्दी !
राशनच्या लायनीत, सुलभच्या लायनीत नंबर येण्याची वाट बघत तिष्टत असलेली गर्दी !
परीक्षा सुरु असताना डोक्यात विचारांची गर्दी !
गर्दी हा हाडामासांच्या माणसांचा समुच्चय.
यातील प्रत्येक जीव वेगळा, वेगळ्या चिंतांनी ग्रासलेला.
कुणाला मुलीच्या लग्नाची चिंता
कुणाला संध्याकाळी काय रांधावं याची .
कुणी उद्याचे सूर आळवीत,
तर कुणी जुन्या जखमांची खपली काढीत
कुणाला सिरियलमधल्या नामिताचं पुढं काय होणार याविषयी उत्सुकता
तर "कांद्याचे भाव असेच वाढत राहिले तर. . काय?"
हा सामान्य व्यक्तीचा जागतिक महत्त्वाचा प्रश्न.
गर्दीचं सुंदर साजीरं रूप. 

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

निसर्ग आणि आम्ही

आपल्या चाकोरीबद्ध जगण्याने निसर्गाने देऊ केलेल्या छोट्या छोट्या आनंदाला आपण मुकत चाललो आहोत.
ऑफिसची वेळ गाठण्याच्या गडबडीत दारी फुललेला चाफा आपले मन वेधून घेत नाही, पावसाच्या सरींनी मन भरून येत नाही,  ऋतू येतात जातात त्याची आपल्याला खबर नसते.  पावसाचा पुन्हा एकदा वेध घेत असताना प्रा. म. ना. अदवंत यांच्या 'निसर्ग आणि आम्ही' लेखातील एक उतारा माझ्या वाचनात आला. चाकोरीबद्ध जगण्याचे निसर्गाला मान्य नसलेले तत्व त्यांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेले आहे. तो उतारा इथे देत आहे.

"कोटाची -पुस्तकांची -बुटांची आशा मी आता सोडूनच दिली होती. छत्री मिटवून टाकली व अपरिहार्यतेला तोंड देण्याच्या दृष्टीने मी पावले टाकायला सुरुवात केली. सप- सप- सप- माझ्या चेहऱ्यावर व अंगावर पावसाचा मारा होत होता. मी जात होतो ती पायवाट एका शेतातून जात होती. त्या ठिकाणचा चिवट चिखल इतका विलक्षण होता की, अनेक वेळी बूट चिखलातच रुतून राही आणि पाय फक्त बाहेर येई. पुन्हा पाय बुटात घालून बुटासह तो पाय बाहेर काढणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते. 
अर्धा फर्लांग गेल्यावर मी माझ्या चिडक्या मनोवृत्तीतून बाहेर आलो. या सर्व वादळी परिस्थितीतही मला अतिशय अननुभूत असा आनंद वाटायला लागला. आतापर्यंत मी जवळ जवळ चाळीस पावसाळे पाहिले होते. असे मुसळधार पावसाचे दृश्य तर शेकडो वेळा पाहिले असेल, पण अशा पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद मी पहिल्यानेच अनुभवीत होतो. पाऊस आला तर शक्य तो घरातून निघावयाचेच नाही आणि मध्येच पावसाने गाठले तर शक्य तितक्या तातडीने आश्रयस्थान जवळ करावयाचे हा माझा आतापर्यंतचा शिरस्ता. पावसातून जाताना कपडे भिजू नयेत - अंगावर चिखल उडू नये म्हणून जास्तीत जास्त दक्षता घेण्याची काळजी. त्यामुळे निसर्गाच्या या आनंदाचे मी आतापर्यंत त्रयस्थपणाने आणि तटस्थपणानेच कौतुक करीत होतो. पण त्या निसर्गाच्या भव्य व प्रचंड आंदोलनात समरस होण्याचा, त्याच्याशी एकरूप होण्याचा आनंद केवढा मोठा आहे याची मला त्या दिवशी कल्पना आली. 
पावसाचा माझ्या चेहऱ्यावर सपासप होणारा मारा मला अतिशय सुखावह वाटायला लागला. चिखलात होणार्या घसरगुंडीत आणि कसरतीत मोठी मौज वाटू लागली. माझ्या प्रतिष्ठेचे व हिशेबी वृत्तीचे ओझे दूर फेकून देऊन मी जणू निसर्गाच्या क्रीडेत सामील झालो. 
माणसाच्या मनावर असलेल्या  प्रतिष्ठेच्या व व्यावहारिक गोष्टींच्या दडपणामुळे अशा प्रकारे किती आनंदाला तो मुकत असेल याची मला या वेळी जाणीव झाली. आपण आपले जीवन अनेक वेळा रुपये आणि पै यांच्या हिशोबात बसविण्याचा प्रयत्न करतो. प्रतिष्ठेची आपणाभोवती खरी खोटी वलये निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चाकोरीला जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद मानण्याचा आपण प्रयत्न करतो. त्या चाकोरीबाहेर जाणारे, हिशोबी वृत्तीला धक्का देणारे, प्रतिष्ठेच्या वलयातून बाहेर पडणारे थोडे जरी काही घडले, तरी आपण अस्वस्थ होतो. आणि काहीतरी चुकल्याची, काहीतरी अनिष्ट घडत असल्याची जाणीव आपण करून घेतो."
***  
       ( पूर्ण लेख  'मनाची मुशाफिरी' या पुस्तकात वाचता येईल. )


मग काय करता येईल या  प्रतिष्ठेच्या खोट्या वलयांतून बाहेर पडण्यासाठी? निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयोग केलेल्या थोरोने फार पूर्वी म्हटलंय  -
"I went to the woods because I wished to live deliberately, to front only the essential facts of life, and see if I could not learn what it had to teach, and not, when I came to die, discover that I had not lived."
यातील 'live deliberately' मी  मुद्दाम ठळक केलंय, कारण हे दोन शब्द माझा पिच्छा सोडत नाहीयेत.  विचारपूर्वक किंवा निश्चयाने जगणं म्हणजे कसं ते शोधण्याची धडपड चाललीय सध्यातरी.
***

शनिवार, २५ जुलै, २०१५

पावसाविषयी पुन्हा एकदा

पाऊस माझ्या आठवणींत फार खोलवर रुजला आहे. गावी पावसाळा सुरु व्हायच्या आधी बरीच तयारी करावी लागते. मातीच्या भिंतींना वशेरा करून लावावा लागतो. कौलांची डागडुजी करावी लागते. विहीर साफ केली जाते. लाकूडफाटा, वैरण, शेणकुट यांची चार महिन्यांसाठी तरतूद करून ठेवावी लागते. जेव्हा पाऊस धो धो पडायला लागतो तेव्हा गुरांना गोठ्यातच आसरा घ्यावा लागतो, त्यांच्यासाठी ही गवत - वैरणीची तरतूद. माणसांना घरातच कोंडून घ्यावे लागते . लाकडं आणि गवत घरात पोटमाळ्यावर भरली जातात. कधी कधी पावसात सापपण या गवतात लपून बसतात तेव्हा गुरांना चारा देणाऱ्यांना जपूनच हालचाल करावी लागते. 
कधी पावसाचा थांगपत्ता नसताना गुराखी गुरांना घेऊन माळावर जातो आणि बघता बघता आभाळ भरून येतं, थंड वाऱ्याची झुळूक येते, झाडं -झुडपं वथरु लागतात आणि पाऊस बेभान होऊन कोसळू लागतो. मातीचा सुगंध दरवळू लागतो. हा सौम्यसा वाटणारा पाऊस हळू हळू रौद्र रूप धारण करतो. गोठ्यात वासरू हंबरू लागते  या क्षणी ग्रेस यांची कविता आठवते -
"पाऊस आला पाऊस आला
गारांचा वर्षांव
गुरे अडकली रानामध्ये
दयाघना तू धाव"
पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहतात. अंगणात मातीचे छोटे प्रवाह तयार होतात, कुठेतरी मोठं झाड उन्मळून पडतं किंवा शेताला घातलेला बांध कोसळतो. गावातील आजूबाजूची घरे स्थितप्रज्ञ असल्यासारखी निश्चल राहतात. पावसाची अखंड रिपरिप मनात रुजत जाते. वळचणीला अनेक पक्षी येउन कुडकुडत बसतात. 
 पाऊस  दिवस - रात्र कोसळत राहतो, सर्व व्यवहार थिजतात. आणि अचानक तिसऱ्या दिवशी पहाटे उघडीप होते. निळ्याशा आभाळावर चुलीच्या काळसर धुराने रेघोट्या ओढाव्या तसे चित्र दिसते. झाडांच्या पानांवरून पाणी ओघळत असते. गुरांना पाय मोकळे करायला बाहेर काढले जाते.  एकूणच गावात पुन्हा हालचालींना वेग येतो. 

अशा कैदेत ठेवणाऱ्या पावसात चुलीशेजारी बसून हात पाय शेकत आजीच्या गप्पा ऐकण्यात मजा आहे. "आमच्या वखताला. ." पासून सुरु झालेल्या गावकीच्या गप्पा थांबायचं नाव घेत नाहीत.  अशा पावसाळ्या संध्याकाळी खालेल्ला तिखटजाळ वांग्याचं भरीत आणि आंबेमोहराचा भात अजून जिभेवर पाणी आणतो.   चुलीत भाजलेल्या त्या वांग्याची सर कशालाच नाही.  
पाऊस पडून गेला की, फक्त पावसाळ्यातच उगवणाऱ्या रानभाज्या ही खवय्यांसाठी मोठी पर्वणी असते. तांदळी, कुरडू, शेंडवल अशा अनेक भाज्या या काळात उगवतात. प्रत्येक भाजी बनवण्याची वेगळी पद्धत आहे. नुसत्या लसणाच्या फोडणीवर भागणाऱ्या काही भाज्या, तर काहींना खरपूस भाजलेला कांदा हवा जोडीला. 
आता गावात या भाज्यांची माहिती असणारी जुनी जाणती माणसे कमी आहेत, जी पिकली पानं आहेत ती केव्हा गळून पडतील याचा नेम नाही. 'आमच्या वखताला असं व्हतं' असं पालुपद लावणारी माणसे काळाच्या प्रवाहात गडप होताहेत. त्यांचा काळ, त्यांनी अनुभवलेले पावसाळे कुठेतरी नोंद करून ठेवावे असं नेहमी वाटतं. 

***

जूनमधे शाळा सुरु होते. नवीन दप्तर, नवीन बूट, नवीन रेनकोट आणि नवीन वह्या पुस्तके. या नवीन गोष्टींसोबत हवेहवेसे वाटणारे आणि दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर भेटणारे जुने दोस्त. शाळा सुटल्यावर भर पावसात शाळेशेजारच्या लोखंडवाला रोड वर क्रिकेट खेळणे आणि त्यानंतर आंटीच्या हॉटेलमधे डोशाची पार्टी हे ठरलेलेच होते. आमचा एक मित्र नेहमी आम्हाला टाळायचा. त्याला एकदा मी खोदून विचारलं तेव्हा ओशाळत तो म्हणाला, "बाबांनी या वर्षीची शाळेची फी भरण्यासाठी अंगठी गहाण ठेवली".  गरीबी म्हणजे काय तेव्हा कळलंच नव्हते. सुर्वे म्हणतात तसे लपवायचे वंचनेचे डाग वाट्याला कधी आलेच नव्हते. दरवर्षी तीच छत्री दुरुस्त करून वापरायची सवय नव्हती. आपल्याला पावसाळा सुंदर वाटतो म्हणून सगळ्यांना वाटेलच असं नाही. 

***

मुंबईत मिठी नदीच्या आसपास वाढलेली प्रचंड झोपडपट्टी आहे. मुळात ही नदी नसून  एक मोठा नाला आहे. काळ्या पाण्याचा कचऱ्याने भरलेला नाला. २६ जुलैच्या पावसानंतर इथे नदी आहे याची जाणीव आपल्याला झाली. 


पावसाने वेग घेतला कि या नाल्याच्या आसपास राहणाऱ्यांच्या छातीत धडकी भरते. त्यांना २६ जुलैचा दिवस आठवतो. पावसाच्या पूर्वी तयारी म्हणून उन्हाळात पत्र्यावर डांबराचा थर दिला जातो. नाल्याची पातळी  वाढली कि पावसाचे पाणी नाल्यातून घरात येऊ नये म्हणून मोरीला प्लास्टिकची पिशवी बांधली जाते. महत्वाचं सामान, कपडे पोटमाळ्यावर टाकलं जातं. पाऊस थांबण्याची हताश चेहऱ्याने वाट पाहत बसतात. अशांसाठी पाऊस कधीच सुखद नसतो, मग ते पावसाला शिव्या देतात. पावसाला पडायचं तर तिकडे लांब तलावातच पडायला काय व्हतं? असं एकाने म्हणताना मी ऐकलय. 

***

मुंबईत भुलेश्वरला जर तुम्ही रात्रीचे दोन वाजता जरी गेलात तरी  गजबजाट दिसेल. अख्खी मुंबई शांत झोपली असताना, लोकलचा खडखडाट थांबला असतानाही इथे चहल पहल असते. इथल्या खानावळींत गर्दी असते. माणसे ओरपून जेवत असतात. वाढपी रोट्यांवर तुपाची धार ओढत असतात. इथल्या दुकानांच्या फूटपाथवर कुटुंबे विसाव्याला येतात. दिवसभर भटकून कपडे भांडी विकणारी ही माणसे. त्यांचा एका मोठ्या पिशवीत मावेल असा संसार घेऊन फिरतात. स्टोव पेटवला जातो. त्यात कसलीतरी भाजी शिजत असते. चिमुरडं पिल्लू बापाच्या खांद्यावरून हा झगमगाट बघत असतं. तेही आपली भूक ताब्यात ठेवायला शिकतं आपोआप. भात शिजला कि ताटलीत कुटुंब जेवायला बसतात. पावसापासून बचावासाठी वरती प्लास्टिक अंथरल जातं. तेही कधी कधी म्युनिसिपाल्टीचे अधिकारी ब्लेडने फाडून टाकतात. तरी हे जागा सोडत नाहीत. काटकसर करून नवीन प्लास्टिक आणतात. पावसात झोपेचे वांदे होतात. जमीन ओली असते. पहाटे जराशी डुलकी लागावी तर दुकान उघडण्यापूर्वी बाडबिस्तरा आवरावा लागतो. आपल्यासारखी निवांत रविवार सकाळ ह्यांच्या नशिबात नाही. बाल्कनीत उभं राहून मसाला चायचा घोट घेत पावसाचा मजा घेणं  ह्यांना ठावूक नाही. 

***

मध्यंतरी पावसाने मुंबई बंद पाडली. आठवड्याच्या मधे आलेली ही सुट्टी कामाचा स्ट्रेस घालवणारी. घरात बसून जुने हॉलीवुड सिनेमे पाहूया असं ठरवलं. सकाळपासून तीनदा चहा झाला. डोरबेल वाजली. समोर कल्पेश. रडवेला चेहरा घेऊन उभा. "दादा ,पेपर भिजले सगळे, त्यामुळे आज पेपर नाही". त्याला म्हटलं " मग रडतोयस कशाला? नसला एक दिवस पेपर तर बिघडत नाही" त्यावर तो "आज सायकलवरून पडलो, पेपरच्या गठ्यात चिखल भरला. आता अण्णा ओरडणार. पैसे कापून घेणार." त्याला रडणं थांबवून आत घेतलं आणि म्हटलं कितीचं नुकसान झालं? "जवळजवळ ऐंशी रुपये".  त्याला म्हटलं अण्णाशी बोलतो मी. तरी ऐकेना. 
आजूबाजूच्या चाळीस घरांत पेपर टाकतो कल्पेश. प्रत्येक घरामागे दहा रुपये दरमहा मिळतात त्याला.  
अकरावीचं कॉलेज सांभाळून पार्ट टाईम काम करतो, माझ्याकडून नेलेलं अब्दुल कलामचं इग्नायटिंग माइंडस त्याचं फेवरेट आहे. अब्दुल कलामसारखं काहीतरी करून दाखवावं अशी इच्छा त्याच्या मनात आहे. 
अशा माणसांच्या स्वप्नांवर कधी कधी पाऊस चिखल उडवतो हे  मला आवडत नाही, आपल्याला पावसाळा सुंदर वाटतो म्हणून सगळ्यांना वाटेलच असं नाही. 
 
***

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

फँड्री

मध्ये एकदा मित्राशी बोलता बोलता मुद्दा जातिभेदावर आला. त्याच्या मते आता असलं काही लोक मानत नाहीत. हॉटेलमध्ये सगळ्यांना प्रवेश मिळतो, वेगवेगळ्या जातीची माणसे एकत्र बसून जेवतात. लोकलच्या गर्दीत एकमेकांना पाठ - पोट चिटकून प्रवास करतात. बरेच आंतरजातीय विवाह होतात. सगळ्यांना नोकर्या मिळतात, जातीमुळे कुणाची अडवणूक केली जात नाही. 'एक गाव एक पाणवठा' आहे. इत्यादी प्राध्यापकी बोलणं ऐकल्यावर त्याला म्हटलं, "तुझ्या मनातून तरी तुझी जात गेलीय का? खरं सांग. इथे जन्माला येतानाच आपण आपली जात येउन येतो. आपल्या आडनावावरून आपण कुठल्या जातीचे आहोत, कळतंच न अजूनही.आडनाव सोडतात का माणसं? नाही. जात समाजातून तेव्हाच नाहीसी होईल जेव्हा ती आपल्या मनातून नाहीसी होईल. " त्याला हे सगळं भावनिक वगैरे वाटलं. सतत रडत राहणाऱ्या आणि आपल्यावर सतत अन्यायच कसा झालाय याचे उद्घोष करणाऱ्या दलित साहित्यामुळे तुझी मते अशी आहेत आणि राष्ट्र प्रगती करतंय तर तुम्ही अजून जुन्याच गोष्टी उगाळता आहात  अशी टिप्पणी करून तो गेला.

मध्यंतरी 'Untouchability in Rural India' हे पुस्तक वाचनात आलं आणि ग्रामीण भागातील या वास्तवाची प्रखरतेने जाणीव झाली. शहरी भागात  शाळेपासून आपल्याला जातीची ओळख पटायला लागते, शाळेच्या दाखल्यावर ती स्पष्ट लिहिलेली असते. कॉलेजप्रवेशापासून मग पुढे आयुष्यभर ती वेगवेगळ्या ठिकाणी मिरवावी लागते. माणसे स्वतःला काय समजतात ते पहायचं असेल तर लग्नविषयक जाहिराती पहाव्यात. स्वजातीय वधू / वर हवेत. इतर क्षमस्व. भारताच्या ग्रामीण भागात ही परिस्थिती किती बिकट आहे याचे हृदयद्रावक चित्रण या पुस्तकात आहे. माणसाचा जातीविषयक अहंकार अमानुषतेची कुठली पातळी गाठू शकतो याचे प्रत्यय यातील काही केस स्टडीज वाचल्यावर कळतं. आजही बर्याच गावात महारवाडा आहे. गावातील सफाईची घाणेरडी कामे त्यांनीच करावी अशी रीत आहे. कुणी आवाज उंचावला तर आवाजच बंद करण्याची सोय आहे. त्यांनी सतत मळकटच कपडे घालावेत, शानषौकित राहू नये, त्यांना पाणी द्यायला वेगळी भांडी, त्यांच्या स्पर्शाने विटाळ अशी जातीद्वेषी अनेक उदाहरणे. माणसाला माणूस म्हणून जगायला नाकारणारी.


पुलंनी शाहूमहाराजांवरच्या एका लेखात असे म्हटलंय-
"… दुर्देवाने हिंदुसमाजरचना ही एका गळक्या भांड्याच्या उतरंडीसारखी आहे. परंपरेच्या डबक्यातून भरलेले हे पाणी ब्राह्मणवर्गापासून थेट खालपर्यंत गळत असते. त्या दुर्गंधीचे बळी असणारे लोक खालच्या भांड्यावर त्याच विषारी पाण्याचा प्रयोग करीत असतात. ब्राह्मणांनी मराठ्यांना क्षुद्र लेखावे, मराठ्यांनी शहाण्णव कुळाबाहेरच्यांना कडू मानावे, त्यांनी महारांना, महारांनी मांगाना, धेडांनी ढोरांना अशी ही दुष्ट उतरंड आहे… जन्मजात श्रेष्ठत्वाच्या आधारावर विद्येची मक्तेदारी गेली असेल, परंतु जन्मजात  श्रेष्ठकनिष्ठत्वाची कल्पना आजही गेलेली नाही… "
या पुस्तक वाचनाच्या  पार्श्वभूमीवर नागराज मंजुळेचा 'फँड्री' पाहिला आणि कुणीतरी झोपलेल्या किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केलाय असं मनापासून वाटलं.  अनेक अर्थांनी हा चित्रपट वेगळा आहे.  रुपेरी पडद्यावर केवळ लव्ह स्टोरी पाहण्याची सवय असलेल्या प्रेक्षकाच्या इच्छेनुसार, त्याला आवडेल तेच दाखवणाऱ्या चित्रपटांच्या व्याख्येत हा चित्रपट बसत नाही.

कैकाडी समाजात जन्माला आलेल्या जांबुवंत कचरू माने याची ही कथा. त्याला सगळे 'जब्या' म्हणूनच हाक मारतात. त्याच्या मनात स्वतः विषयी, स्वतःच्या रूपाविषयी, परिस्थितीविषयी, जातीविषयी प्रचंड न्यूनगंड आहे. तो सातव्या इयत्तेत आहे. वर्गातल्या सवर्ण जातीतील शालू नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम आहे. घरी आईबाप ठार अडाणी. रोजंदारीवर घर चाललेलं. एक बहिण लग्नाच्या वयाची आणि एक माहेरी राहायला आलेली कायमची . एक म्हातारा आजा  सतत टोपल्या विणत असलेला. जब्याच्या भावना समजून घ्यायला  जिवलग  मित्र पिराजी आहे. दया पवार यांनी 'बलुतं' मध्ये आपल्या नावाची हकीकत सांगताना म्हटलंय - दगडू मारुतीचं डी एम पवार  केलं,  एका मित्राने आजीला विचारलं "डी एम घरात आहे का?" तर "डयाम घरात नाही" असं तिनं  उत्तर दिलं. दलित जातीतील पोरांची नावे कचरू, धोंड्या अशीच. नावाच्या बाबतीतही चांगला अर्थ असावा ही अपेक्षाही वाट्याला न आलेला जब्या  गृहपाठ विचारायला जेव्हा वर्गातल्या वेदांत कुलकर्ण्याच्या घरी जातो तेव्हा कुंपणावरूनच त्याची बोळवण केली जाते. "काकू, वेदांत आहे का घरी?' या प्रश्नावर "बघ ते कैकाड्याचं पोर आलंय" ही अवहेलना. हा चित्रपट बघताना जब्याच्या पौगंडावस्थेतील मनावर काय आघात होत असतील याची कल्पना केलेली बरी. वयाच्या ज्या टप्प्यात आपला आत्मविश्वास घडत असतो,  स्वतःला स्वतःचीच नव्याने ओळख होत असते त्या टप्प्यावर असे आघात मनाला खिळखिळे करतात.

काळ्या चिमणीला जाळून तिची राख ज्या व्यक्तीच्या डोक्यावर टाकू ती आपल्याला वश होते या 'चंक्या'च्या सल्ल्यापायी जब्या आणि पिराजी काळ्या चिमणीला शोधत रानोमाळ भटकतात. ती चिमणी त्यांना शेवटपर्यंत सापडत नाही. अप्राप्य वस्तू म्हणून काळ्या चिमणीचं रूपक वापरलंय. "चिमणी बामीन असते. . " या संवादातून स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना आपण कशा स्वीकारल्या आहेत याची टोकदार जाणीव होते.

शालूला डुकराबद्दल घृणा आहे हे कळल्यावर तो पाटलाच्या अंगणात अडकलेल्या डुकराच्या पिल्लाला काढायला साफ नकार देतो. आपण डुकराला शिवलो कळल्यावर शालू आपल्यावर प्रेम करणार नाही ही त्याची समजूत. पोटासाठी कसलीही कामे करणाऱ्या बापाबद्दल त्याच्या मनात राग आहे, शाळा बुडवून त्यालापण रोजंदारीवर जावं लागतं याबद्दल चीड आहे. इतरांच्या घरात वीज असताना ढणढण जळणाऱ्या रॉकेलच्या दिव्यात अभ्यास करावा लागतो याबद्दल खंत आहे. वर्गात गुरुजी शिकवत असताना त्याच्या आईने शाळेजवळ येणं त्याला कमीपणाचं वाटतं.

नवीन कपडे घेण्यासाठी जब्या शहरात पेप्सी विकायला जातो, शहरातील मोठमोठ्या दुकानांतील पोस्टर पाहून त्यालापण तसेच कपडे घालावे असं वाटतं, Van  Heusen च्या मॉडेलप्रमाणे आपलेही नाक असावं म्हणून तो नाकाला चिमटा लावतो. शहरात रस्त्याच्या कडेला लावलेली सायकल ट्रकखाली चेंगरली जाते तेव्हा त्याने फोडलेला हंबरडा आपल्या जीवावर येतो.

जत्रेत देवाच्या पालखीच्या वेळी  पिसाळलेले डुक्कर जमावात घुसते आणि पालखी पडते, लोकांच्या मते हा अपशकून झाला. लवकरात लवकर ते डुक्कर पकडायचे काम कचरूला दिले जाते. मुलीच्या हुंड्याची तयारी करणाऱ्या असहाय बापाला मनात नसताना हे काम घ्यावे लागते. भल्या पहाटे हागणदारीतून डुकराला पकडतानाचा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. शाळेजवळ वर्गातील कुणीही आपल्याला डुक्कर पकडताना पाहू नये विशेषतः शालुने, म्हणून जब्या लपून बसतो. गुडघ्याच्या दुखण्याने कावलेला बाप त्याला थपडा मारतो. एकदा डुक्कर हाताशी लागतं तेव्हा शाळेत 'जनगणमन' सुरु होतं. राष्ट्रगीताचा आदर ठेवण्यासाठी सावधान उभं राहिल्यावर हाताशी आलेलं डुक्कर पळून जातं. रामदास फुटाणे यांची 'भारत माझा देश आहे' या कवितेची इथे आठवण येते. लाजिरवाणे जिणे जगतो आहोत तरी भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.  लोकांच्या गुवाच्या पाट्या रिकाम्या करतो आहोत तरी भारतावर प्रेम आहे. हा सगळा पकडापकडीचा खेळ चालू असताना गावकऱ्यांनी तमाशा पाहिल्यासारखं गर्दी करणं आणि टिप्पणी करणं फार क्लेशदायक आहे. त्यात एकाने फेसबुकवर 'fandry race. . enjoy friends' असा स्टेटस टाकून फोटो शेअर करणं म्हणजे  सोशल नेटवर्किंगच्या दुरुपयोगाबद्दल केलेलं subtle भाष्य आहे. शेवटी डुक्कर पकडलं जातं आणि त्याच्या मुसक्या आवळून त्याचं मढं खांद्यावरून नेलं जातं तेव्हा पार्श्वभूमीवर आंबेडकर, फुले, शाहू महाराज आणि गाडगे बाबा यांची भित्तीचित्रे आहेत. एकूणच या महापुरुषांच्या विचारांचे मढे आम्ही खांद्यावर वाहून नेत आहोत असा विचार मनात येतो. 

डुक्कर वाहून नेताना  जब्याच्या बहिणीची छेड जेव्हा काही सवर्ण गावगुंड काढतात तेव्हा त्याचा राग अनावर होतो आणि त्यांच्यावर दगड मारतो आणि त्यातला शेवटचा दगड आपल्याकडे भिरकावतो.  इथे चित्रपट संपतो. जेव्हा एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांना विचारलं गेलं कि त्याच सीन पाशी चित्रपट का थांबवला? तर त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर परिस्थितीचे भीषणत्व मांडणारे आहे - "पुढे जब्याचं काय होईल सांगता येत नाही. सवर्णावर हल्ला केला म्हणून त्याच्या अख्ख्या कुटुंबाला जिवंत जाळलं जाऊ शकतं, त्याच्या बहिणीवर बलात्कार होऊ शकतो किंवा याहूनही भयानक, आणि ते पचवणं लोकांना शक्य नाही."

***

शुक्रवार, २९ मे, २०१५

गेले सांगायचे राहून

आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या व्यक्तीला सांगायच्या राहून जातात, आणि मग मनाला हुरहूर लागून जाते.  कुणालातरी 'चुकलो , sorry !' म्हणायचं असतं, तर कुणाला 'thanks.  तुझ्यामुळेच शक्य झालं सगळं !' म्हणायचं असतं. मोहब्बत जरी आँखों से बयां होणारी गोष्ट असली तरी शब्दांनी व्यक्त करावीच लागते, नाहीतर 'प्रेमाचा गुलकंद' मधील त्या प्रेमवीरासारखी अवस्था होते.
न सांगितलेल्या गोष्टींचं ओझं फार जड असतं. काही  माणसे आयुष्यभर हे ओझं सांभाळत दिवस काढतात. अमुक एखादी गोष्ट तेव्हा बोललो असतो तर किती बरं झालं  असतं असे वाटत राहते. त्यामुळे कॅम्पच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांना  अशा 'गेले सांगायचे राहून' ची यादी करायला लावली.

निखिल:
"मला माझ्या जुन्या वर्गमैत्रिणीला सांगायचे आहे कि, She was my first crush. आम्ही एकाच शाळेत होतो.
शाळेपासून ती मला आवडायची. तेव्हा त्या अडनिड्या वयात बोलायचे धारिष्ट्य झालं नाही. तिच्यासाठी मी माझा क्लास बदलला. चित्रकलेत कमालीचा 'ढ' असतानाही तिच्यासोबत एलिमेंटरीच्या परीक्षेला बसलो आणि नापास झालो. तिच्यासाठी कविता लिहिल्या पण वाचून दाखवल्या नाहीत. तिच्या घराभोवती घोटाळलो.
शाळा सोडल्यानंतर परत एकदाच भेटलो रस्त्यात. अनिलांच्या 'आज अचानक गाठ पडे, असता मन भलतीच कडे' सारखी situation झाली ना  मित्रांनो.  तिला एकदा मनातलं सांगून टाकायचं आहे कि तिच्या गालावरच्या खळीने जीव घेतलाय माझा. "

एकनाथ:
" मला हेतल मॅडम ला sorry बोलायचं आहे. some years back, जेव्हा मी शिक्षणासाठी छोटे मोठे जॉब करायचो तेव्हाची गोष्ट. उन्हाळ्याच्या  सुट्टीत जॉब करून पैसे साठवायचो. दोन महिन्यांचा पगार साठला कि कॉलेजची फी भरायचो आणि फटाकशी  resignation देऊन कामातून सुटका करून घ्यायचो. कोण notice period च्या भानगडीत पडणार? salary अडकवली तर ?  असा विचार करायचो.  हेतल मॅडम माझ्या mentor होत्या. दीड महिने त्यांच्या सोबत काम केलं, त्यांनी या वेळेत मला तरबेज केलं. कधीही senior -junior अशी वागणूक दिली नाही. त्या सगळ्या team सोबत डब्बा share करत. माझ्यावर त्या हळूहळू मोठी जबाबदारीची कामे सोपवू लागल्या होत्या. त्यांच्या mailbox ला मला access दिला होता. त्यांच्या वतीने मी मेल्स पाठवायचो. अशात  salary चा दिवस आला. बँकेत salary क्रेडीट झाल्यावर उद्यापासून कामावर यायचं नाही ठरवून टाकलं. salary withdraw केली सगळी आणि रात्रीच resignation धाडून दिलं. त्यांचे येणारे फोन उचलले नाहीत. आता त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली. आता माझ्या हाताखाली आठ दहा माणसे आहेत. माझ्याशी असं कुणी वागलं तर मला खूप राग येईल आता. मी त्यांना एकदा भेटलो पाहिजे होतो"

प्रियांका:
"मला माझ्या बाबांना sorry बोलायचं आहे. मी T. Y.  च्या परीक्षेला नापास झाले तेव्हा बाबा माझ्यावर रागावले नाहीत. मी तेव्हा एका छोट्या firm मध्ये CA च्या हाताखाली काम करायचे. माझे पेपर वाईट गेले होते. मला पक्कं माहित होतं कि मी नापास होणार. निकालाच्या गप्पांना मी उगाच टोला द्यायचे. युनिव्हर्सिटीने पण त्या वर्षी निकाल उशिरा लावला. ऑनलाईन निकाल लागणार होता त्या दिवशी मी सकाळपासून दु:खी होते. बाबांनी त्यांच्या ऑफिसमधे माझा रिझल्ट पाहिला आणि तडक मला भेटायला गोरेगावला माझ्या ऑफिसला आले. त्यांना वाटलं निकाल समजताच मी जीव बिव देते कि काय ? मला फार वाईट वाटलं त्या दिवशी. त्या दिवसासाठी मला  बाबांना sorry बोलायचं आहे."

अमित:
"मला माझ्या आईला sorry म्हणायचं आहे. मी रोज ऑफिस मधून उशिरा घरी येतो. आई बिचारी माझ्यासाठी जेवायची थांबलेली असते. तिला कितीदा सांगितलं जेवून घेत जा तरी ऐकत नाही."

अशोक:
"मला ज्याला sorry बोलायचं आहे त्याचं नाव गाव आपल्याला ठावूक नाही. दोन वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आपण कुरीअर कंपनीत होता. आपण ज्याम भडकू डोक्याचा. ट्रेनमधे गेटवर उभं राहून आपण shining मारायचा. ग्रूप होता आपला. बोरीवलीला कुणालाच चढू द्यायचा नाय. एकदा एकाने जबरदस्तीने चढायचा प्रयत्न केला त्याला आपण,"ती समोरची गाडी पकड, पूर्ण खाली आहे. जा" सांगितलं.  त्याने नाय ऐकलं. तसाच खांबाला लटकून राहिला. गाडीने स्टेशन सोडल्यावर आपण लटकलेल्यांना आत घ्यायचा. पण त्या दिवशी डोकं फिरल्यासारखं झालं. त्याला आमच्यापैकी कुणीच आत घेतला नाही. दहिसर गेल्यावर गाडीने वेग घेतला आणि त्याचा हात सटकला. धप सारखा मोठा आवाज आला. चेन खेचली तेव्हा गाडी मीरा रोडला थांबली. जगला वाचला का माहित नाही  तो. त्याला sorry भाई बोलायचे आहे. तेव्हापासून आपण गेटवर नाय उभा राहत. आत धक्के खातो.


***

निखिलने त्याच्या पहिल्या crushला WhatsApp वर सगळं सांगितलं. उलट टपाली एक स्माईली आल्यावर त्याला फार हलकं वाटलं. एकनाथ ने हेतल मॅडमचा इमेल आयडी मिळवून त्यांना माफीनामा पाठवला. हेतल मॅडमनी त्याची आस्थेने चौकशी करून त्याला All the best म्हणाल्या. प्रियांकाने बाबांसाठी नवीन iPod घेतला, त्यात त्यांच्या आवडीची दत्ताची गाणी भरली. स्वतःचा लहानपणाचा फोटो प्रिंट करून आणला आणि त्याच्या पाठीमागे "Sorry बाबा" लिहिलं.  अमितने CL टाकून आईला स्वयंपाकात मदत केली. संध्याकाळी जेवताना लहानपणीच्या दिवसांची आठवण काढली. अशोक ने "Sorry भावा" चिट्ठी लिहून साई बाबांच्या चरणाजवळ ठेवली.



सोमवार, ४ मे, २०१५

द डायरी ऑफ अॅन फ्रँक आणि हॅनाची सुटकेस

'द डायरी ऑफ  अॅन फ्रँक'


 (फोटो :'द गार्डियन' मधून )
'द डायरी ऑफ अॅन फ्रँक' हे जागतिक साहित्यविश्वातील एक अनमोल लेणे आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात मानवी जीवन कसे कवडीमोल झाले होते याचे भेदक चित्रण या पुस्तकात आहे.

हे पुस्तक म्हणजे तेरा वर्षाच्या अॅन फ्रँकची डायरी. नाझी पोलिसांपासून वाचण्यासाठी अॅन, तिचे आई वडील, बहिण व अन्य चार व्यक्ती एका कंपनीच्या पोटमाळ्यावर लपून-छपून जीवन जगू लागतात. या एकांतात  अॅनची एकमात्र सोबती म्हणजे तिची डायरी. तिला अॅनने 'किटी' नाव ठेवले होते. लपून -छपून हे भूमिगत जीवन जगत असताना आलेले अनुभव, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या समजुतीमुळे ज्यूंचा केला जाणारा अतोनात छ्ळ व संहार व तिच्याच वयाच्या पीटर व्हनडन यांत जुळलेले भावबंध या सर्वांचा पट या डायरीत दिसतो.

ज्या वयात हिंडायचं, बागडायचं, स्वप्नं पहायची त्या वयात केवळ खिडकीच्या कोपर्यातून आभाळ दिसतं याचे समाधान मानावे लागले. या दोन वर्षातील आपल्या भावभावनांना तिने कुठलाही आडपडदा न ठेवता वाट करून दिली आहे. "मला मृत्युनंतरही जगायचंय" असे ती लिहिते. सुरुवातीचा तिचा अल्लडपणा व नंतर युद्धामुळे आलेला प्रौढपणा, हरवलेलं बालपण तिच्या लेखनातून जाणवत राहते.
सुरुवातीला ती म्हणते,

"Writing in a diary is a really strange experience for someone like me. Not only because I've never written anything before, but also because it seems to me that later on neither I nor anyone else will be interested in the musings of a thirteen-year old school girl. Oh well, it doesn't matter. I feel like writing."
केवळ स्वान्त सुखाय म्हणून केलेलं हे लेखन मानवी इतिहासातील एका क्रूर कालखंडाचे साक्षीदार ठरेल असे तेव्हा अॅनलाही वाटले नसेल. या वयातील तिचे विचार स्पष्ट आहेत. भूमिगत जीवन जगत असताना केव्हा पकडले जाऊ आणि  छ्ळछावणीत केव्हा रवानगी होईल सांगता यायचे नाही. त्या भीतीची आयुष्यावर छटा असतानाही "As long as this exists, this sunshine and this cloudless sky, and as long as I can enjoy it, how can I be sad?” असे म्हणणारी  अॅन ग्रेट वाटते.
१ ऑगस्ट १९४४ ला अॅनची डायरी संपते. त्यांच्या अज्ञातवासाचा थांगपत्ता जर्मन पोलिसांना लागतो व त्या आठ जणांना छ्ळछावणीत नेले जाते. त्यातच त्या सर्वांचा मृत्यू होतो. एकटे अॅनचे वडील ऑटो फ्रँक कसेबसे वाचतात. अॅनच्या इच्छेप्रमाणे त्यांनी ही डायरी प्रकाशित केली.

ज्यू म्हणून जन्माला आल्यामुळे एका मानवजातीला ज्या अनन्वित अत्याचाराला सामोरे जावे लागले, महायुद्धाच्या काळात जगणे कसे मातीमोल होते याचे अंगावर काटा आणणारे वर्णन या पुस्तकात येते.
***

हॅनाची सुटकेस




(फोटो : हॅना'स सुटकेस संकेतस्थळावरून)


'हॅनाची सुटकेस' हे माधुरी पुरंदरेंनी अनुवादित केलेलं पुस्तक नुकतंच वाचून संपवलं.  अॅन फ्रँकच्या डायरीत आणि या पुस्तकात साम्याचा भाग म्हणजे दोन्ही चरित्रनायिका १३ वर्षाच्या आहेत. दोघांच्याही वाट्याला ज्यू म्हणून नशिबी आलेली छळवणूक आणि मृत्यू. अॅनने तिचे अनुभव डायरीतून लिहून तरी ठेवले, हॅनाच्या बाबतीत तसं नाही.
फुमिको इशिओका या जपानी संशोधिकेने २००० साली हॅनाच्या सुटकेसचा माग काढत या मुलीबरोबर काय घडलं ते जगासमोर आणलं. या प्रवासादरम्यान  इशिओका यांना  हॅनाचे दुर्मिळ फोटो सापडले. त्या काळातील अन्य उपलब्ध साधनांचा मागोवा घेत त्यांनी हॅनाची कहाणी रचली.

कुठल्याही संवेदनशील माणसाला हेलावून टाकेल अशा शब्दांत त्या दिवसांचे वर्णन या पुस्तकात येते.

इतिहासापासून काय शिकावं तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ न देणं.
***

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

विजू

बेळगावला मिळालेली मेडिकलची सीट सोडून मी प्लेन B.Sc करायचा निर्णय घेतला. घरात यावरून बरंच तांडव झालं. डॉक्टर असलेल्या काकांनी त्यांच्याकडे B.Sc झालेली मुलं औषधं विकायला येतात व आपण त्यांना कशी वागणूक देतो यावर भाष्य केलं. आईने तिचा मुलगा डॉक्टर असावा ही इच्छा व्यक्त केली. बाबांचा मात्र सपोर्ट होता. 'आवडेल ते कर, पण नंतर आम्हाला दोष देऊ नकोस' असा धोक्याचा इशाराही होता त्यात.
 पुढची तीन वर्षं  मनासारखी जगता यावी म्हणून घरापासून दूर उपनगरात असलेल्या मुंबईतल्या अस्सल मराठी कॉलेजमध्ये मग मी दाखल झालो.  आधीच मी मितभाषी त्यात नविन मित्र मिळवण्यासाठी जी सामाजिक कौशल्ये लागतात ती माझ्यात नाहीत. पण आपण 'माणूसघाणे' म्हणून राहू नये यासाठी कॉलेजच्या सगळ्या मंडळांत नाव नोदवलं. त्यांच्या meetings ला जात राहिलो. एके दिवशी फलकावर नाट्यमंडळाच्या नवीन एकांकिकेसाठी ऑडिशनची तारीख आली. शाळेत असताना शिवाजी आणि दादोजी कोंडदेव यांच्या संवादाचा एक प्रवेश आम्ही बसवला होता. त्यात मी शिवाजी झालो होतो. त्यानंतर रंगभूमीशी नाते नाही.  कुणास ठावूक आपण चांगले नट बनू पुढेमागे.  Try करने में क्या जाता है ? आम्ही मग ऑडिशनसाठी नाव नोंदवलं.
ऑडिशनच्या दिवशी सभागृहात नुसता कल्लोळ होता. हातात स्क्रिप्ट घेऊन अनेकजण वेगवेगळ्या कोपर्यात rehearsal करत होते. मी पक्का ठाम होतो. शिवाजी आणि दादोजी कोंडदेव दोन्ही साकारणार होतो. मग थोड्या वेळाने डिरेक्टरसाहेब आले. senior मंडळींनी त्यांच्या पाया  वगैरे पडून नवीन नियम घालून दिला. मग रीतसर ऑडिशन सुरु झाल्या. त्या दिवशी किमान पाच फुलराणी आणि किमान चार शिवराय आलेले. फुलराणींनी 'तुला शिकविल चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा' म्हणत त्या मास्तरासकट सगळ्यांना जेरीला आणलं. शिवरायांचा जन्म, शपथ आणि बाजीप्रभूंचा मृत्यू, गड आला सिंह गेला असे एकेक प्रसंग सादर होत होते. आता काय करायचं? दुसरं काय येतंच नाय ! क्या करे ? तेवढ्यात माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एकाने मला खुणावलं की जरा बाजूला ये.
"मी विजय, फर्स्ट यिअर, Physics - Chemistry - Botany"
"Chemistry - Botany - Zoology"  मी.
"काय करायचं ?"
"कशाचं?"
"स्क्रिप्टचं - मी पण शिवराय साकारतोय तुझ्यासारखाच."
"तुला कसं कळलं - मी शिवाजीची भूमिका करतोय ते?" मी गोंधळात.
"Simple. तुला स्वताशी बोलताना ऐकलं रे. कोण स्वतःला 'आम्ही' म्हणून संबोधणार?"
"जे आहे ते सादर करायचं, आणि काय ?"
"हे बघ अजून चार  performances   आहेत, तोपर्यंत आपण नवीन स्क्रिप्ट बनवू, एकत्र perform करू "
"नवीन स्क्रिप्ट, खाऊ आहे का ?"
"डिरेक्टर ज्याम भडकू आहे आणि आपला नंबर शेवटी आहे. आपण जे सादर करणार आहोत ते केलं तर selection तर होणार नाहीच, पण backstage पण मिळणार नाही. Believe me !"
ऑडीच्या पायर्यांवर बसून मग आम्ही स्क्रिप्ट पक्की केली. लिहायला वेळच नव्हता. इम्प्रोवाइज केलं.
बतावणी type स्कीट होतं. ते सादर केल्यावर जरा वेगळं काहीतरी पाहिल्याचा भाव डिरेक्टरच्या आणि senior मंडळींच्या चेहर्यावर उमटला आणि अशा प्रकारे आम्ही नाट्यमंडळाच्या नवीन एकांकिकेच्या ताफ्यात दाखल झालो.
विजयला त्यानंतर मी विजू, विज्या, विज्या *** अशीच हाक मारत आलोय. कॉलेजची तीन वर्ष आम्ही एकत्र ज्याम धमाल केली.  माझ्याहून थोडासा उंच, कुरळे दाट केस, गोरा रंग, सतत विचारमग्न तंद्रीत असलेले डोळे, शर्ट नेहमी ईन केलेला, हजरजबाबी.
शेवटच्या क्षणी महत्वाचा बदल करायची त्याची जुनी खोड मलापण लागली आणि पहिल्या वर्षीच मी zoology चा निरोप घेऊन त्याच्यासोबत Physics च्या वर्गांत बसू लागलो. एकदा आम्ही career मार्गदर्शन करणाऱ्या एका नामांकित व्यक्तीच्या भाषणाला गेलो. तिथे त्यांनी कुणाला काही प्रश्न आहेत का असे विचारल्यावर एकाने विचारलं - "मी B. E. केलंय Mechanical. आता पुढे काय करू?"
त्यावर त्या विद्वान व्यक्तीने "मला असं वाटतं आपण civil services कडे वळावं."असा सल्ला दिला.
त्या 'B.E. Mechanical' ने मान हलवत त्याचे आभार मानले.
च्यायला. या engineerला पुढे काय करू प्रश्न पडलाय?
मग एवढं शिकून फायदा काय? आपल्याला कशात आनंद मिळतो हेच कळत नसेल तर.
विजू आणि मी या तीन वर्षांत आपल्या जीवनाचं प्रयोजन काय याचा शोध लावण्याचा निश्चय केला.
नाट्यमंडळातून आमची हकालपट्टी तेवढी व्हायची बाकी होती. सगळ्यांना तिथे मुख्य भूमीका हव्या असायच्या. डिरेक्टर सतत कुणानाकुणाच्या नावाने शिव्या देत असायचा. एकदा आम्हा दोघांना मॉबमध्ये घेतलं, तिथेपण आम्ही माती केली. movements चुकवल्या. डिरेक्टरसाठी सिगारेट्स घेऊन ये, मुख्य नायिकेचे journal लिहिणे. property ची देखरेख करणे अशा कामांवर आमची नेमणूक झाल्यावर आम्हां दोघांचाही स्वाभिमान जागा झाला. आपला जन्म अभिनयासाठी झालेला नसून प्रयोगशाळेतील रसायनांसाठी झालेला आहे याची जाणीव होताच आम्ही रंगभूमीला रामराम ठोकला. इतिहास दोन नटसम्राटांना मुकला.
आता chemistryतलं नोबेल मिळवणं आमचं ध्येय झालं. तेही स्वप्न काही पूर्ण झालं नाही. पुस्तकाच्या बाहेरचं काही experiment करू नका असाच दम दिला होता. तरीही Lab मधून Sodium चोरून नेऊन आर्टस वाल्या मित्रांना जादू दाखवणे सारखे उद्योग केले. शंका विचारल्यावर "तुमचे फोटो त्या तिथे आईनस्टाईनच्या बाजूला लावले पाहिजेत. लक्ष असतं का वर्गात शिकवताना?" असं ऐकावं लागलं.
कॉलेज मध्ये व्याख्यानमाला चालवणे, NSS च्या रक्तदान शिबिराला इतरांना रक्तदान करायला लावून स्वतः कॉफी आणि पारले बिस्कीट हादडणे, कॅन्टीनच्या अण्णाचे बिल थकवणे असे उपक्रम आम्ही एकत्र केले.
विजूच्या घरी आई आणि मोठा भाऊ होता. बाबा दारूच्या व्यसनापायी वारले. घर एका दुमजली चाळीत शेवटचं. घराबाहेर डालडाच्या डब्यात लावलेली मूडदूस झालेली तुळस. एका बाटलीत लावलेलं मनी प्लांट. घरात भिंतीचे पोपडे निघालेले. आमच्याही घरी परिस्थिती ताज महाला सारखी नव्हती काही. उन्हाळात कमालीचं उकडायचं. त्याच्या घरातून लवकर सटकून आम्ही जवळच्या बुद्ध विहारात जाऊन बसत असू. तिथल्या थंडगार फरश्या आणि कमालीची शांतता अस्वस्थ करी. परिस्थिती बदलली पाहिजे असे वाटे.
यथावकाश शिक्षण पार पडलं. मी शहराच्या दूर टोकावर बस्तान बसवलं. विजूला नोकरी लागल्याचं कळलं. नवीन घर घेतलं त्याने.
 मध्ये एकदा त्याने फोन करून "सर मी B.Sc. झालो आहे, आता पुढे काय करू?" असा प्रश्न  विचारल्याचं आठवतं, ज्याम हसलो आम्ही. नंतर काही दिवसांपूर्वी लग्नाचं निमंत्रण देण्याचा फोन आला. "आईला आता काम जमत नाही, सारखी आजारी असते, आता तिला आराम" वगैरे. परवा लग्नाला गेलो. भेटताच "भले पठ्ठ्या !" म्हणून पाठीत गुद्दा हाणला. चेहऱ्यावरून वहिनी सोशिक असल्याचं जाणवलं. विजूसारख्या माणसाला सहन करायला ईश्वर तिला सहनशक्ती देवो. receptionच्या वेळी माझी ओळख आपल्या सहचारिणीला करून देताना म्हणाला, "My friend and philosopher. एकत्र होतो कॉलेजमध्ये."
आहेराचं पाकीट घेताना मला म्हणाला -
 "अरे आपण आपल्या जीवनाचं प्रयोजन काय याचा शोध घेणार होतो ना, काय सापडलं ?"
 "आनंदी राहणं हेच प्रयोजन. जे जगलो ते मजेत. स्वतःच्या मर्जीने. पुढे काय करायचं किंवा कसं जगायचं हा प्रश्न कुणाला विचारावा लागला नाही हेच विशेष." मी.
"सर मी B.Sc. झालो आहे, आता पुढे काय करू?" विजू.
 त्यावर आम्ही दोघेही मनापासून ज्याम हसलो. त्याच्या  बायकोला आम्ही का हसतोय हे कळलं नाही. 

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

क्रिकेटचं वेड आणि करप्शन वाली चाय

१. भारत अपेक्षेप्रमाणे सेमीफायनल मध्ये हरला आणि लाखो क्रिकेटप्रेमींचा मूड गेला. काहींनी तर प्रेमभंग झाल्यासारखा चेहरा केला. संध्याकाळी साडेचार नंतर सर्वत्र काहीतरी दु:खद  घडलंय असाच माहोल होता. गजबजलेला चर्चगेटचा परिसरही त्या दिवशी संध्याकाळी दु:खद वातावरणात असल्यासारखा वाटत होता. अनेकांनी विराट आणि त्याची प्रेयसी अनुष्काला शिव्या घातल्या. या दिवसभरात अनेक व्यक्ती भेटल्या ज्या क्रिकेटच्या अक्षरक्ष: वेड्या होत्या. सकाळी अंघोळ करून TV ची पूजा करून मगच  स्टार स्पोर्टस लावणारा किरण ट्रेनमध्ये भेटला. कामावर न येण्याचे असंख्य बहाणे त्याने बॉसला सांगितले होते, पण बॉसने "आज आला नाहीस, तर घरीच बस" असा प्रेमळ ओरडा दिल्यामुळे तो नाराजीतच कामाला चालला होता. कानात रेडिओवरची कमेंट्री. मिनिटागणिक ऑस्ट्रेलियाचा वाढत चाललेला स्कोर पाहून त्याचा चेहरा पडला होता.
आमच्या ऑफिसमधील लिफ्टमन असलेल्या काकांनी दिवसभर लिफ्टमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाला "स्कोर काय झाला?" विचारून भंडावून सोडले होते. संध्याकाळी सामना हरल्याचे दु:ख व्यक्त करताना मला म्हणाले, "सरांनु आज मी जेवलोच नाही"
"का ?"
"टेंशन"
"कशाचं ?"
"अहो म्याचचं टेंशन ! इंडिया हरली म्हणून आज जेवलोच नाही"
"अहो मामा, एवढं टेंशन त्या धोनीला पण आलं नसेल."
मग त्यांनी तरुणपणापासून आपण क्रिकेटपायी काय काय केलं ते सांगू लागले.
भारत - पाकिस्तानचा सामना पहायचाय म्हणून दहावीचा पेपर बुडवून घरी बसले. एकदा रस्त्यातून चालताना चपलेचा अंगठा तुटला म्हणून चप्पल हातात घेऊन अनवाणी चालू लागले. एका TVच्या शोरूम समोरील गर्दीत उभे राहून तासभर क्रिकेट बघितल्यावर निघताना लोकांना हे चप्पलचोर वाटले. तेव्हा लोकांना समजावताना ह्यांना नाकी नऊ आले.  क्रिकेटपायी आजूबाजूचे सगळे भान विसरणारी असली माणसे -आयुष्यात ह्यांनी कधी क्रिकेटची ब्याट हाती धरली नसेन पण क्रिकेटपटूंनी कसे खेळावे याचे धडे चारचौघात देणार.
माझ्या एका दूरच्या काकाने त्याच्या लहानपणी  कमेंट्री करणाऱ्या माणसांना पहायचय म्हणून  रेडिओ खोलला होता. त्यात  माणसे तर  सापडली नाहीतच मात्र ह्यांनाच मोठ्या माणसांनी आमानधमकी दिली.
यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार असे सुरवातीपासून सांगणाऱ्या माझ्या एका मित्राने भारत हरल्यावर "बरं झालं सेमी फायनल मध्ये हरलो ते. फायनलमध्ये जाऊन हरण्यापेक्षा हे बरं !" ही प्रतिक्रिया दिली.
त्या बिचार्या क्रिकेटपटूंच्या विरोधात निदर्शने केली गेली. माध्यमांत लोकांनी असंतोष व्यक्त केला. क्रिकेटपटूंच्या घराभोवतालची सुरक्षा वाढवावी लागली. हे दुर्देवाचे आहे. प्रेक्षक म्हणून आपण जसे नाट्य, सिनेमा याबाबत immature आहोत तसेच क्रिडारसिक म्हणूनसुद्धा.

२. 
ऑफिस मधील सगळ्यांचा उतरलेला चेहरा पाहून प्यूनला सगळ्यांसाठी  चहा आणायला सांगितला.
"इंडिया  की हार कि ख़ुशी में सर चाय मंगवा रहे है" शर्मा.
"हाहाहा" वातावरणात जरासे हास्य.
चहा नेहमीपेक्षा कडक होता.आमचे  कॅन्टीनवाले केव्हापासून असा चहा बनवायला लागले?
"ओ शर्माजी,आज चाय कहाँ से लाये?"
"सर, ये करप्शनवाली चाय हैं"
"तनिक मतलब बताय दो"
"सर इस चाय का पैसा कैंटीनवाले अन्ना के बजाय चाय बनानेवाले के पास गया है"
"मतबल ?"
"कैंटीनमें जो चाय बनाता है वो स्पेसल चाय बनाके देता हैं अदरक इलायची ज्यादा डालकर। अन्ना को पता नहीं रहता"
या चहाला "करप्शनवाली चाय" असे नामकरण करणाऱ्या प्यूनच्या कल्पकतेचे कौतुक वाटले.
भष्ट्राचार असा छोट्या छोट्या गोष्टींत सामावून आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालाय.

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

लक्ष्मणरेषा लोपली

आर. के. लक्ष्मण गेले. प्रत्येक मर्त्य देहाला कधीतरी जावेच लागते. आर. कें.च्या जाण्याने मात्र रुखरुख लागून राहिलीय. ज्यांच्या व्यंगचित्रांनी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवलं ते लक्ष्मण हयात नाहीत हे पचवणं थोडं कठीण जातंय. सहावीत असल्यापासून घरी म. टा. यायचा. त्यात "कसं बोललात !" ही चौकट असायची. पूर्ण पेपर वाचायच्या आधी ही चौकट डोळ्याखालून घालायची सवय. लक्ष्मण यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत कुणालातरी फटकारलेले  असायचे.  सुरु असलेला युनियनचा संप, विमान कंपन्यांचा नेहमीचा वक्तशीरपणा (?), वाढणारी महागाई, मंत्रिमहोदयांचे सुरु असलेले परदेशी दौरे, महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्यांची कार्यपद्धती असे विविध विषय असत. या चौकटीत रेषारेषांच्या चौकटीचा कुर्ता घातलेला, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा असलेला, कानशिलावरचे केस पांढरे झालेला 'कॉमन मॅन' असे. तोच नायक. कधी एक शब्द तोंडातून न  काढणारा. पुलं म्हणतात तसं संन्याशाच्या वस्त्रांचं रुपांतर राज वस्त्रांत  झाल्यावर जे स्थित्यंतर  घडलं ते  निमूट  पाहणारा.
या सामान्य माणसाला सोबत घेऊन त्यांनी आपल्याला  लोकशाही पाहायला शिकवली. राजकारणाचा अभ्यास करणार्यांनी रजनी कोठारी यांच्या पुस्तकाबरोबर लक्ष्मण यांची व्यंगचित्रेसुद्धा अभ्यासावीत. (दोघांचे निधन याच महिन्यात झाले हा फार मोठा ऱ्हास !)
मालगुडी डेज मधील त्यांच्या रेखाटनांनी दक्षिण भारतातील या काल्पनिक गावाला मूर्त स्वरूप दिलं. आर. के. नारायण यांच्या लेखणीतून उतरलेल्या व्यक्तींना लोभस रूप दिलं.
वृत्तपत्रीय लिखाणाचं आयुष्य फार लहान असतं असे म्हणतात.  पण फार वर्षांपूर्वी लक्ष्मण यांनी काढलेले एखादे व्यंगचित्र जेव्हा सद्य स्थितीवर भाष्य करते तेव्हा आपण त्याच वर्तुळात फिरत असल्याचा भास होतो.
 सामान्य माणसाला जेव्हा राजकारण्यांच्या आचार  आणि विचार  यांतील महदअंतर दिसून येते तेव्हा आपण फसवले गेलो आहोत याची जाणीव होते. लक्ष्मण यांनी सामान्य माणसाच्या मनातील विचार अत्यंत प्रभावीपणे आपल्या व्यंगचित्रांतून मांडले. आपले परखड मत व्यक्त करताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. जे चारशे शब्द खर्च करून संपादकाला सांगायचे असे ते त्यांच्या दोन ओळींच्या चित्रातून उमटे.
त्यांची असंख्य चित्रे आठवताहेत. .
हातात दंडुका घेतलेला, पोट वर्दीतून ओसंडून वाहणारा मग्रूर शिपाई जेव्हा रस्त्याशेजारच्या पिंपातील व्यक्तीला बाहेर काढतो तेव्हा काकुळतीला येऊन तो गरीब व्यक्ती उद्गारतो, "मी इथे लपलो नव्हतो, तर हेच माझे घर आहे."
जे स्वप्न 'नियतीशी करार' करताना दाखवलं गेलं ते कितपत सत्यात उतरलं ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरची त्यांची व्यंगचित्रे डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहेत. विकासाची आणि समानतेची स्वप्ने पाहणाऱ्यांना खाड्कन जमिनीवर आणणारे लक्ष्मण यांच्या जाण्याने आपण रोजच्या जीवनातील हास्याचा किरण गमावला आहे.
जॉर्ज ओर्वेलच्या 'Animal Farm' मधलं -
“All animals are equal, but some animals are more equal than others.” वाचताना लक्ष्मण यांच्या चित्रांची दर वेळेस आठवण येत राहील. 

शनिवार, ३ जानेवारी, २०१५

ज्याचे आम्ही मामा आहोत - शरद जोशी

एक सदगृहस्थ  बनारसला पोहचले. स्टेशनवर उतरल्यावर लगेच एक मुलगा पळत पळत आला.
'मामाजी ! मामाजी !' मुलाने पुढे वाकून नमस्कार केला.
त्यांनी काही त्याला ओळखलं नाही. "तू कोण रे?"
"मी मुन्ना ! ओळखलं नाहीत मला ?"

"मुन्ना ?" ते विचारात पडले.
"हो मुन्ना, विसरलात मला मामा. जाऊ द्या आता त्या गोष्टीला. इतकी वर्षं झाली आता."
"तू इथे कसा ?"

"मी आजकाल इथेच असतो."
"अच्छा."
"हो"
मामासाहेब आपल्या भाच्यासोबत बनारस फिरायला लागले. चला कुणाचीतरी सोबत मिळाली. कधी या मंदिरात चल तर कधी त्या मंदिरात. मग पोचले गंगातीरावर. विचार केला अंघोळ करावी.

"मुन्ना, अंघोळ करू?"
"जरूर मामाजी. बनारसला आलात आणि गंगास्नान नाही केलंत, कसं शक्य आहे?"
मामाजींनी गंगेत डुबकी मारली. हर हर गंगे.

बाहेर आल्यावर सामान गायब. कपडे गायब.
तो मुलगा - मुन्ना पण गायब.
"मुन्ना . . . ए … मुन्ना"
पण मुन्ना तिथे असेल तर मिळेल ना. ते टॉवेल लपेटून उभे होते.
"अहो भाऊ, तुम्ही मुन्नाला पाहिलंत का ?"

"कोण मुन्ना ?"
"ज्याचे आम्ही मामा आहोत"
"मी समजलो नाही"
"अहो, आम्ही ज्याचे मामा आहोत तो मुन्ना !"
ते टॉवेल लपेटून इकडून तिकडे पळत राहिले.
मुन्ना नाही सापडला.

मित्रांनो, भारतीय नागरिक आणि भारतीय मतदार म्हणून आपली अशीच परिस्थिती आहे. निवडणुकीच्या काळात कुणीतरी येतं आणि आपल्या चरणाशी पडतं. मला नाही ओळखलं ? मी निवडणुकीतील उमेदवार आहे, होणारा खासदार.
तुम्ही प्रजासत्तेच्या गंगेत डुबकी मारता. बाहेर पडल्यावर तुम्ही पाहता की जी व्यक्ती काल तुमच्या पाया पडत होती ती आज मत घेऊन गायब आहे. मतांची पूर्ण पेटी घेऊन फरार आहे.

समस्यांच्या तीरावर आपण टॉवेल लपेटून उभे आहोत.
सर्वांना विचारत आहोत - "साहेब, तुम्ही त्यांना पाहिलंत? तेच ज्याचे आम्ही मतदार आहोत, ज्याचे आम्ही मामा आहोत."
पाच वर्षे याच पद्धतीने टॉवेल लपेटून तीरावर उभे राहत निघून जातात.

लेखक - शरद जोशी 

***
(शरद जोशींचा हा छोटासा लेख हिंदीत वाचल्यावर असं वाटलं की याचा अनुवाद करावा. म्हणून हा प्रयत्न.)