रविवार, १० जानेवारी, २०२१

मुग्धा स्वप्न बघते

 काल बाबांचा मला खूप खूप राग आलेला. माझं आवडतं चॉकलेट त्यांनी ऑफिसवरून येताना आणलं नाही. मोठ्यांना कसं कळत नाही छोट्या मुलांचे कसे लाड करावेत. त्यात त्यांनी आल्या आल्या टीव्हीपण बंद केला. मला खूप खूप राग आला. मग मी बाहेर फिरायला गेले. मला कुठे जायचंय माहित नव्हतं. वाटेत मला खूप मोठी नदी दिसली. बघते तर काय नदीचं पाणी अगदी सफेद दुधासारखं. पण मला दूध प्यायला आवडत नाही. मी दूध नाही पिलं तर आई डोळे मोठे करते. मग मी माऊसारखं गुपचूप दूध पिते. 

तर त्या नदीच्या आजूबाजूला मोठे पर्वत होते. पर्वत माहितेय का कशाचे ? आईसक्रीमचे. किती थंडगार वाटत होतं. फ्रीजचा दरवाजा उघडल्यावर वाटतं तसं. मी थोडं आईसक्रीम खाल्लं आणि थोडं आईसाठी घेतलं. आई रागावते पण ती खाऊ पण देते. 

पुढे मला छोटा भीम दिसला. त्याने मला विचारलं, " मुग्धा, कुठे चाललीस ?". मी म्हटलं. मी चाललीय भुर्रर्र. चॉकलेटच्या देशात. जिथे खूप चॉकलेट आणि कॅडबरी आणि कुरकुरे असतील. तो म्हणाला "मी पण येतो मग". मी म्हटलं "बघ बाबा तू. माझ्याकडे तुझ्या तिकिटाचे पैसे नाहीत" तो म्हणाला "तिकीट नाही लागत इथे. बघ माझ्याकडे किती लाडू आहेत मोतीचूरचे खूप दिवस पुरतील आपल्याला. हे घे एक" मग मी त्याला थोडं आईसक्रीम दिलं आणि लाडू खायला लागले. खाताना बोलू नये असं आजी म्हणते म्हणून आम्ही थोडा वेळ न बोलता खाऊन घेतलं. 

आम्ही पुढे चालू लागलो. मग जंगल लागलं. मला थोडी भीती वाटली पण छोटा भीम म्हणाला, "घाबरू नको मी आहे. वाघ सिंह आला तर एकच फाईट मारेन!" तेवढ्यात सिंहाची डरकाळी ऐकू आली. मी घाबरून मागे बघितलं तर छोटा भीम गायब. मग मी खूप घाबरले. मला रडू आलं. आईची आठवण आली. तेवढ्यात कुणीतरी मला हलवून जागं केलं बाबांनी माझा पापा घेतला आणि म्हणाले, "रागावली का माझी सोनू बाळ ! हे घे चॉकलेट आणि अभ्यास करा जरा. सहामाही परिक्षा आहे ना. छोटा भीम कमी बघा परीक्षा होईपर्यंत. 

मी आईकडे बघितलं.  ती हसली फक्त. जेवल्यावर तिने फ्रीजमधून आईसक्रीम काढलं. स्वप्नातील आईसक्रीमपेक्षा तिच्या हातचं  आईसक्रीम खूप टेस्टी होतं. 

शनिवार, २ जानेवारी, २०२१

किडलेली माणसे

गंगाधर गाडगीळांची 'किडलेली माणसे ' नावाची कथा आहे. समाज म्हणून आपण किती mediocre आहोत हे अधोरेखित करणारी कथा. काही गुंड एक दुकान फोडून त्यातील सामान लंपास करीत असताना बघ्यांची गर्दी जमते. त्या गुंडांना थांबवण्याऐवजी शेजारच्या चाळीतील लोक निष्क्रियपणे पाहत राहतात. त्यातील काही त्या लुटीत सामील होतात. 

अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी प्रत्यक्षात घटली. मध्य प्रदेशात कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाला. त्या अपघातातील चालकाला मदत करण्याऐवजी शेजारच्या गावकऱ्यांनी कोंबड्या पळवून न्यायला सुरवात केली. एका वेळी चार पाच कोंबड्या काखोटीला मारून गावकऱ्यांनी पोबारा केला. या सर्व घटनेचा विडिओ या लिंक वर  आहे .  

काही देशांत वर्तनमानपत्र विक्रीच्या स्टॉलवर देखरेख करायला कुणी नसतं. आपल्याला हवं ते वर्तमानपत्र किंवा मासिक घ्यायचं आणि अचूक पैसे तिथे ठेवायचे किंवा सुट्टे पैसे परत घायचे हा शिरस्ता असतो. समाज म्हणून तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास असतो. लहानाचं मोठं होत असताना काय चूक काय बरोबर (ethics) शिकवलं जातं. 

पालिकेने बस स्टॉपवर लावलेल्या स्टीलच्या प्लेटस, दिवे लगोलग गायब करणारी माणसे, रोज कचऱ्याची गाडी येत असताना रस्त्यावर कचरा टाकणारी माणसे, पचापचा थुंकून सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी करणारी माणसे,  फुले तोडू नयेत असा बोर्ड लावलेला असला तरी बागेतील फुले तोडून पूजेसाठी नेणारी माणसे अशी यादी पुढे extrapolate करत भ्रष्ट अधिकारी व नेत्यांपर्यंत नेता येऊ शकते. 

काय करता येईल आपल्याला प्रामाणिकपणाचं बीज रोवण्यासाठी? 

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

गोष्ट

तारलई गावाच्या वेशीवर मंडपवाल्या केश्याचं घर आहे. गावापासून तसं घर दूरच. आजूबाजूला जेमतेम दोन तीन घरं. पण ती रिकामीच.  त्या घरातली माणसे मुंबई पुण्याला राहायला. जत्रेला दहा पंधरा दिवसांसाठी कुठे ती घरे माणसांनी भरून जायची. बाकी वर्षभर निरव शांतता असायची आसपास.  गावातल्या बायका केश्याच्या बायकोला रंजनाला विचारायचे कि कसे राहता इतक्या लांब? माणसाची चाहूल नाय आजूबाजूला. रात्री जरा खुट्ट झालं तरी आमचा जीव वरखाली होतो, तुम्ही राहता कसे बिनघोर? रंजी म्हणायची कि आत्याबाय हायता, गुरं हायती मग कशाला घाबरायचं. केश्याचे बरेच उद्योग असायचे. मंडपासोबत त्याने लाऊड स्पीकर भाड्याने द्यायला सुरुवात केली, मग लोकांना ने आणायला जीप घेतली. हे सारे उद्योग सण समारंभासाठी पूरक होते. पण यासर्वांमुळे त्याला घरी यायला नेहमी उशीर व्हायचा . कुठे सप्ताह, दिंडी वगैरे असली कि दोन तीन दिवस घरी फिरकणं नसायचं. केश्याची आई भीमाक्का वयाने थकलेली, पण अगदी काटक बाई. सकाळपासून कामात असायची. सकाळी न्याहारी झाली कि सून गुरांना घेऊन रानात जायची. म्हातारी भीमाक्का घर सांभाळायची. घराच्या आजूबाजूला फिरून हिरवाट आणायची. गुरांचा गोठा झाडलोट करायची. केश्याला आणि रंजनाला मुलबाळ नव्हतं.  केश्या घरी नसला तरी सासू सून गुण्यागोविंदाने राहायची. घरात नवीन टीव्ही घेतल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत तो चालू असायचा.

पाली जत्रा जवळ आली होती. केश्या जीप घेऊन दोन दिवसांसाठी पाली गावाला सकाळीच निघाला. सोबत गावातील पाच सहा जण सोबत होते. म्हातारीला व बायकोला सांगून गेला कि नीट ऱ्हावा. घरात फक्त त्याच्याकडेच मोबाईल होता. जर गरज पडली तर कदमांच्या घरी राजुला फोन करायला सांगावं लागायचं. दुपारपासून म्हातारीचं अंग भरून आलं. संध्याकाळी म्हातारी सुनेला म्हणाली मला जेवाया नगं, भूक न्हाय. तरी बळेबळेच रंजीने तिला भाकरी भाजी खायला लावली. साडे नऊ वाजले असतील, म्हातारी आतल्या खोलीत झोपायला निघून गेली.  रंजीने सगळं आवरलं. झाकपाक केलं. नेहमीच्या सिरीयल बघितल्या. झोपायच्या आधी म्हातारीला विचारू म्हणून आतल्या खोलीत गेली तर म्हातारीची काहीच हालचाल नाही. आत्याबाय, झोपलाव का? तर एक नाही दोन नाही. अंग गरम आहे का बघायला तिने तिच्या कपाळाला हात लावला तर अंग थंडच पडलेलं. हलवून बघितलं तर म्हातारी गारच. रंजी भेदरली. रात्रीचे साडे अकरा वाजलेले. गावात डॉक्टर नाही. शेजारी कुणी गडीमाणूस नाही. नवऱ्याला फोन करून सांगावा धाडावा तर फोन नाही. म्हातारीला बरेच प्रयत्न करून जाग आली नाही तेव्हा तिला कळलं कि म्हातारीने जीव सोडला. आता करावं काय? तिने तडक पायात चप्पल सरकवली, दरवाजाला कडी कुलूप लावलं आणि गावात गेली. चांदणं टिपूर पडलेलं होतं. कुणाला काय सांगायचं हेच तिला कळत नव्हतं. रडायला तर येत होतं पण भीती जास्त वाटत होती. पहिल्यांदाच इतक्या रात्रीची ती गावाकडे निघाली होती. जत्रेच्या वेळेला रात्रीचा तमाशा असायचा गावातल्या शाळेसमोरच्या मैदानात, पण तेव्हा रस्त्याने माणसे असायची सोबत. भीती वाटायची नाही.

गावातील कुत्री अचानक भुंकायला लागली . गावात कदमांच्या घरी रंजी गेली आणि दार ठोठावलं. त्यांच्याकडे मंडळी जागीच होती. शुक्रवारचा पिच्चर लागलेला दूरदर्शनवर. तिने गेल्यावर सांगितलं कि आत्याबाय काय उठंनात. राजू, शेजारचे मारुती आण्णा, शेखरआप्पा केश्याचा घरी निघाले. राजूने केश्याला फोन करून निघायला सांगितलं. मारुतीआण्णा  जवळ चार्जिंगची बॅटरी होती. डुक्कराच्या शिकारीला जाताना वापरत. केश्याच्या घरी सगळे पोचले. अंगणात पिवळा बल्ब पेटत होता. घराच्या आत गोठ्यात गाय हंबरत होती. रंजीने कुलुप उघडलं आणि दार ढकललं तेव्हा सर्वांनी जे पाहिलं त्यांने त्यांना कापरं भरलं. म्हातारीचं प्रेत उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलं होतं. रंजीने जाताना आतल्या खोलीत म्हातारीला झोपलेलं बघितलं असताना ती आता वटी, गोठा पार करून उंबरठ्यापर्यंत कशी येईल? कुणी काहीच बोलेना. म्हातारीचा जीव गेलाय याची सगळ्यांनी पुन्हा एकदा खात्री केली.  राजुने फोन करून गावात वर्दी दिली आणि तयारीला लागायला सांगितलं. केश्या येईपर्यंत मढं जागवायला पाहिजे. म्हातारीला भिंतीला टेकवून बसवलं. नाकात कापूस घातला. माणसं जमू लागली. अंगणात खुर्च्या टाकून माणसे बसली.  बायका आतल्या खोलीत रडू लागल्या. पुरुष मंडळी  बाहेर बसून पुढचं काय करायचं यावर बोलत होती.
म्हातारीचं प्रेत आतल्या खोलीतून बाहेर आलं कसं दबक्या आवाजात विचारू लागली. कुणी म्हटलं- असेल थोडी धुगधुगी जीवात. कुणी म्हटलं रंजीने नीट बघितलंच नसेल,म्हातारी जिवंत असेल तेव्हा. कुणी म्हटलं जर कुलूप लावलंच नसतं तर?

रात्री अडीच तीनला सगळीकडे सामसूम होती. अंगणात माणसे पेंगत दबक्या आवाजात रात्र जागवत होते. घरात आतल्या खोलीत रंजीचे डोळे आणि गाल रडून रडून दुखत होते. चुलीवर सगळ्यांसाठी चहा कढत होता. बाहेरच्या खोलीत म्हातारीचं मढं देवळीजवळ भिंतीला टेकवून बसवलं होत. बाजूला उदबत्त्या लावल्या होत्या. म्हातारीच्या चेहऱ्यावर एक हलकीच स्मितरेषा उमटली.

***

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

टाईम ट्रॅव्हल

मन स्वैर संचार करणारं आहे. एका क्षणात इथे तर एका क्षणात सात समुद्रापार- सात पर्वतांपलीकडच्या कुठल्यातरी गावी.
मनासारखंच शरीरालाही क्षणार्धात कुठेही जाता आलं तर? जसं टीव्हीवरच्या जुन्या पौराणिक मालिकांत दाखवायचे तसे.
टाईम ट्रॅव्हल करता आलं तर काय धम्माल येईल! बालपणात जाता येईल किंवा भविष्यातही. आपल्या जन्माच्या अगोदर कुठल्याही सालात जाऊन अनुभवता येईल तेव्हाचं समाजजीवन.

इतिहासातल्या भयानक घटना बदलता येतील.  लाखो ज्यूंचे शिरकाण थांबवता येईल. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांना वाचवता येईल. काही महापुरुषांच्या हत्या थांबवता येतील.  (स्टीफन किंगची ११/२२/६३ कादंबरी याच विषयावर आहे. एक टाईम ट्रॅव्हलर जॉन एफ केनेडीची हत्या थांबवण्यासाठी टाईम ट्रॅव्हल करतो)

आयुष्यातले काही महत्वाचे प्रसंग पुन्हा जगता येतील.  पुन्हा शाळेच्या बाकांवर बसून धडे गिरवता येतील. गमावलेल्या जिवलग माणसाच्या मिठीत पुन्हा काही क्षण विसावता येईल.

माहितेय हे सर्व अवास्तव व काल्पनिक आहे.
आपण लिहितो म्हणजे नक्की काय करतो? आपल्या काळाचा एक दस्ताऐवज पुढच्या पिढ्यांसाठी तयार करून ठेवतो.
त्यातून त्यांना भूतकाळ अनुभवता येतो.  आणि चांगलं भविष्य घडवणं हे तर आपल्या आताच्या वर्तमानातील  वागण्यावर अवलंबून आहे.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

ब्रँड

ब्रँड ही फार जूनी कल्पना आहे. काही शतकांपूर्वी मध्यपूर्वेत शाह अब्बास नावाचा आर्किटेक्ट होता. त्याची सर्वदूर ख्याती होती. त्याची वास्तुकला पाहून लोक म्हणायचे 'नक्कीच शाह अब्बास चं काम आहे हे. इतकी त्याच्या कंपनीची ब्रँड value होती.
मग लोक फिरता फिरता जिथे जातील तिथे काही सुंदर बघितलं कि  शाह अब्बास ! शाह अब्बास ! असे बोलू लागले.  (हा कदाचित प्रमोशनचा भाग असावा) मग दुसऱ्यांना वाटलं कि भाई शाब्बास म्हणताहेत म्हणजे प्रोत्साहन देताहेत, कौतुक करताहेत. तर असं शाह अब्बासचा ब्रँड एक नवीन शब्द भाषांना बहाल करून गेला.

महान नाटककार शेक्सपिअरने देखील स्वतःचा ब्रँड बनवला होता.  असं साहित्य लिहीन कि ते MA च्या अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे, गाईड लिहून प्राध्यापकांची घरे व्यवस्थित चालली पाहिजेत अशी त्याची विस्तृत ब्रँड स्ट्रॅटेजी होती.

हल्ली सगळीकडे आपल्याला ब्रँड्स दिसतात. वापरात असलेल्या वस्तूंचे, सेवांचे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या गोष्टी त्यांचा ब्रँड मिरवत असतात. फार पूर्वी रेडिओवर बिनाका गीतमाला यायची त्याचे किस्से ऐकून होतो. पण बिनाका हा टूथपेस्टचा ब्रँड आहे हे माहित नव्हतं (मला वाटलं, असेल काही अर्थ त्या शब्दाचा).  लाईफबॉय है जहाँ, तंदुरुस्ती है वहा म्हणत साबण, ऍक्शन का स्कूलटाइम म्हणत चपला, स्वाद भरे शक्ती भरे म्हणत बिस्किट ध्यानीमनी नसताना आपल्या रोजच्या व्यवहाराचा भाग होतात. काही माणसं ब्रँडेड वस्तू वापरण्यावर आग्रही (ब्रँड लॉयल ) असतात. त्या वस्तू आपल्या जवळ असल्याने आपण गर्दीत इतरांपेक्षा वेगळे उठून दिसू असं त्यांना उगाच वाटत असतं.

दोन रुपयांच्या पेनने जे लिहिलं जाऊ शकतं तेच महागड्या पार्करपेनने पण. काय लिहिलंय पेक्षा कशाने लिहिलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व येण्याचा हा काळ आहे. तुही यत्ता कंची? च्या ऐवजी 'तुझा ब्रँड कोणता?' हा हल्ली जिव्हाळयाचा प्रश्न आहे.

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

कविता

तुम जब खाना पकाती हो
तब उसकी महक से
भर जाता है सारा घर
क्या पक रहा है आज स्पेशल?
पूछते है पडोसी आते जाते वक्त
मैं थका हुआ आ जाता हूँ आफिस से
खाने के समय सुन लेती हो मेरी
दिन भर की बोरिंग पॉलिटिक्स की बातें
अंत में पूछती हो
आज का खाना कैसा था ?
तब कही याद आता है
आज ख़ीर बनाई थी
मैं ख़ीर की प्रशंसा करने लगता हूँ
तब तुम कुछ समझकर हंस देती हो
खीर की मिठास धीरे धीरे घर में
घुलने लगती है 

शनिवार, २५ जुलै, २०२०

दूरदर्शन

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा केबल नेटवर्क ने आपली पाळेमुळे फार खोलवर रुजवली नव्हती. बहुतेकांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा(ओनिडा, BPL, सोनी, क्राऊन या कंपनीचे बहुतांशी). दूरदर्शनचं एकच चॅनेल दिसायचं.  नंतर त्यात डीडी मेट्रोची भर पडली. जेव्हा काही कार्यक्रम नसेल तेव्हा स्क्रीनवर सफेद मुंग्या दिसायच्या.जरा हवेने अँटेना हलला तर चित्र गायब. मग कोणतरी छपरावर चढून तो ऍडजस्ट करणार आणि त्याला घरातून 'दिसतंय' किंवा 'अजून थोडं सरकव' असा फीडबॅक देणार. कार्यक्रमही आतासारखे पाल्हाळ नसायचे. आठवड्यातून एकदा प्रसारीत होणारे. त्यांची खूप आतुरता असायची.  शक्तिमान, डक टेल्स, टेल्सपिन, सुराग, राजा अँड रँचो, कॅप्टन व्योम, सी हौक्स ही काही मोजकी नावे आता आठवतायेत. आतासारखी OTT सुविधा नसल्यामुळे एक जरी एपिसोड चुकला तरी फार वाईट वाटायचं. शाळेत मित्रांना विचारायचं काय दाखवलं काल? . मग ते हळहळ व्यक्त करत मिर्च मसाला लावून सांगत.  रविवारी संध्याकाळी चार वाजता मराठी चित्रपट लागायचा.  प्रेक्षकांचं आयुष्य सॉर्टेड होतं कारण पर्याय कमी होते.

मग केबल नेटवर्क आणि कलर टीव्हीचा जमाना आला. भरमसाठ न्यूज, सिने चॅनेल सुरु झाले.  २४ तास प्रक्षेपणाची सोय झाल्याने कंटेन्टचा दर्जा खालावला. सिरिअल्स वर्षानुवर्षे चालू लागल्या. 'चार दिवस सासूचे' मालिका चार हजार दिवस झाले तरी चालूच राहिली. मालिकांतली पात्रे मेल्यावर पब्लिक डिमांड वर परत जिवंत होऊ लागली. मधे एकदा प्लास्टिक सर्जरीची लाट येऊन गेली. लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयी बदलल्या. रात्री उशिरा पर्यंत जेवणं उरकू लागली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चॅनेल्स वर आवडती मालिका असेल तर एक दुपारी रिपीट टेलिकास्ट वर बघितली जाऊ लागली. या मालिकांतली मोठी मोठी घरं, उंची पेहराव मध्यम व नव-उच्चभ्रूवर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत गेला. मध्यमवर्गाचं जगणं टीव्ही सिनेमाच्या जगात म्हणावं तसं रेखाटलं गेलं नाही.

हाय स्पीड इंटरनेट आणि OTT च्या काळात पुन्हा एकदा टीव्हीचा कायापालट झाला. नविन पिढीला (आणि जुन्यांनाही) कन्टेन्ट महत्वाचा वाटू लागला भले त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले तरी. नेटफ्लिक्स, Prime, हॉटस्टार यासारखी अनेक प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांसाठी उबलब्ध झालीयेत. Netflix and Chill तरुणाईत पॉप्युलर झालंय. मल्टिमिडीया कन्टेन्टचा ओघ न संपणारा झालाय. तुम्ही युट्युबवर एक विडिओ बघता बघता असे काही वाहवत जाता कि आपण नेमकं काय पाहण्यासाठी युट्युब उघडलंय याचा विसर पडतो. नेटफ्लिक्सवर आता काय पाहावं हे शोधण्यातच बराच वेळ जातो. न्यूज चॅनेल्स ओपिनियन मेकर्स झालीयेत. एक ठराविक अजेन्डा राबवताना दिसतायेत.

अखंड वाहणाऱ्या माहितीच्या या स्रोतांनी आयुष्य कॉम्प्लिकेटेड केलीयेत.