मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

प्रेमचंदांची "ईदगाह"

मी आठवीत असताना, त्यावेळी दूरदर्शनवर मेट्रो नावाचं एक चॅनेल असायचं. त्यावर दर सोमवारी, संध्याकाळी सहा वाजता एक मालिका लागायची - "सुनो कहानी". त्या मालिकेचं शीर्षकगीत मला अजूनही आठवतेय "ना कोई राजा ना कोई राणी दिल कहता है दिल की जुबानी… सुनो कहानी".
या मालिकेत दर आठवड्याला एक कथा  दाखवायचे, या कथा बहुधा भारतातील वेगवेगळ्या भाषांतील अभिजात साहित्यातून घेतलेल्या असायच्या.  या मालिकेचे भाग यूट्यूब वर मिळतात का ते पाहिलं पण मिळाले नाहीत. असो.  या मालिकेतील असंख्य आठवणीत राहिलेल्या भागांपैकी एक भाग म्हणजे "ईदगाह". मुंशी प्रेमचंद यांच्या याच नावाच्या गाजलेल्या कथेचं हे सादरीकरण. नंतर वयपरत्वे चांगलं वाचायला लागल्यावर लगोलग प्रेमचंदांच्या अनेक कथा मिळवून वाचल्या. नॅशनल बुक ट्रस्टने त्यांच्या कथांचा एक संपादित कथासंग्रह काढलाय ( नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके स्वस्त आणि मस्त असतात, दर्जाबद्दल प्रश्नच नाही )  या कथासंग्रहात ही कथा पुन्हा एकदा वाचताना भरून आलं.

या कथेची सुरुवात होते ती ईदच्या सकाळी. रमजान महिन्याच्या अत्यंत कडक उपवासाच्या तीस दिवसांनंतर ईदची सकाळ उगवलेली. सगळीकडे अतिशय आनंदाचे वातावरण आहे.  लवकर तयार होऊन नमाज़साठी "ईदगाह"ला (नमाज़ची जागा )जायला सर्व तयार होताहेत. घरातील बायका शेवयांची गोड खीर बनवण्यात मश्गूल आहेत.  लहान मुलांना वडील मंडळींकडून "ईदी" मिळाल्यामुळे ते  सारखे सारखे आपला खिसा चाचपत आहेत, आपल्या या खजिन्यातून काय काय घेता येईल याचे स्वप्नरंजन चालले आहे.
एकीकडे हे सुखद चित्र असतानाच दुसरीकडे काळोखात बुड़ालेलं अमीनाचं घर आहे. अमीनाचा कर्तासवरता मुलगा गेल्या वर्षीच्या प्लेगात अकाली मृत्यू पावलाय. सूनही नवरयाच्या मागोमाग "अल्लाघरी" गेलीय, पदरी पाच वर्षाचा एक निरागस नातू आहे - हामिद.  त्याला तिने सांगितलय की अब्बाजान कामासाठी बाहेरगावी गेलेत आणि अम्मीजान अल्लाच्या घरी त्याच्यासाठी छान छान  वस्तू आणायला गेलीय.  मृत्यूच्या कटु वास्तवाची ओळख या निष्पाप जीवाला नकोच.  घरोघरी गोडधोड असताना हामिदही हट्ट करेलच अन घरात पुरेसं सामानही नाही म्हणून ती  विवंचनेत.  शिवणकामाच्या छोट्या मोठ्या कामातून जमलेल्या काही  पैशांपैकी ती हामिदला तीन पैसे खर्चाला देते. हामिद आपल्याहुन दोन - तीन वर्षांनी मोठ्या असलेल्या सोबत्यांसोबत ईदगाहकडे निघालाय.  गावाहुन ईदगाह दोन - तीन मैल दूर आहे. वाटेत शहराकडील बड्या मंडळींची घरे लागतात त्यांची श्रीमंती, घरापुढील फुललेले बगीचे, कोर्टकचेरी, कॉलेज यांच यथार्थ वर्णन येतं.
नमाज़ झाल्यावर विविधरंगी जत्रेत मुलं बागडताहेत. मुलांच्या मनाला रिझवेल असं बरंच काही जत्रेत आहे.
उंचच उंच जाणारा झोपाळा, गोल गोल फिरणारे हत्ती घोडे आहेत त्यावर बसण्यासाठी कुणाही मुलाचं मन करेल. हामिदकडे फ़क्त तीन पैसे आहेत तो एवढ़या पैशात या झोपाळयावर नक्कीच बसू शकतो, पण त्याने तसं केलं नाही.
आता सोबत्यांची फ़ौज मातीच्या खेळण्यांकडे वळलीय, कुणी मातीचा शिपाई घेतलाय तर कुणी हातात कायद्याचं पुस्तक असलेला वकील साहेब.  हामिदला कुठली ही खेळणी परवडणार? तो त्यांची उगाच निंदा करतो की पडल्यावर फळकन फुटतील बिचारे! काय फायदा मग विकत घेऊन ? मनातून त्याला प्रत्येक खेळण्याला स्पर्श करून पहायचाय, त्याला हातात मिरवायचय, पण त्याचे ते सोबती त्याला करू देत नाहीत. मनातून अगदी हिरमुसुन गेलाय बिचारा !
पुढे मिठायांची दुकाने आहेत. जिलेबी, गुलाबजामुन , रबड़ी.  नुसतं नाव घेताक्षणी तोंडाला पाणी सुटेल.  अहाहा! काय घमघमाट सुटलाय ! हामिदचे  सोबती काहीबाही विकत घेऊन खाताहेत. हामिद का नाही काही विकत घेत? हामिदचे  मित्र त्याला कंजूस म्हणून चिडवतात, तर कोण म्हणतोय की आपले सर्व पैसे संपले की तो खायला विकत घेईन व आपल्याला दाखवून दाखवून खाईल. हामिद हिरमुसतो.
 मिठायांच्या  दुकानापुढे लोखंडाच्या घरगुती उपयोगाच्या वस्तू विकणारे, नकली दागिने विकणारे यांची दुकाने आहेत. लहान मुलांचे इथे काय काम? त्या दुकानात हामिदला एक चिमटा दिसतो. मग आपले हे छोटे साहेब विचार करतात की  रोज भाकरया भाजताना आजीचे हात पोळतात. कुणा शेजारणीने विस्तव मागितला तरी ती हाताने उचलून देते, मग पोळलेल्या हातावर सतत फुंकर मारत बसते.  घरात चिमटा असेल तर असं होणार नाही. मी तिच्यासाठी चिमटा घेतला तर ती खुश होईल या खेळण्यांवर कोण खुष होईल? कधीतरी अब्बाजान व अम्मीजान येतीलच. ते पण खुश होतील माझ्यावर. असा विचार करून हामिद तीन पैशाचा चिमटा विकत घेतो.
हामिदने चिमटा विकत घेतल्यावर त्याचे सोबती त्याला वेड्यात काढतात. मुर्ख लेकाचा !! अख्खे तीन पैसे खर्च करुन घेतलं ते काय? तर हा लोखंडाचा विद्रूप चिमटा. काय उपयोग त्याचा ? पण असं म्हणतात, दारिद्र्य जगण्याचं धैर्य शिकवतं. हामिद मग त्यांच्या मतांचं खंडन करू लागतो. "हा चिमटा पहा , हातात घेतला आणि दुसर्या हातावर आपटला कि झाली फकीराची चिपळी , खांद्यावर घेतला कि झाली बंदूक आणि मातीच्या खेळण्यांचा काय निभाव लागणार या चिमटया पुढे" इ. इ. सर्वजण शेवटी बोलण्यात हामिदला शरण जातात आणि सर्वांना मान्य करावचं लागतं की चिमटा हीच योग्य वस्तू आहे.  मग प्रत्येकाला तो चिमटा हातात घ्यावासा वाटतो व हामिदचा हेवा वाटतो. गावात परतायला  दुपार होते.
अमीना हामिदची वाट पहात असते. घरी पोचल्यावर हामिद लगेच आजीच्या कुशीत शिरतो. अमीनाला जाणून घ्यायचं असतं की लेकराने काय काय पाहिलं?  काय मजा केली ? ती त्याच्या हातातील चिमटा पाहून आश्चर्यचकित होते व विचारते "कुठुन आणलास ?" . तिला जेव्हा हामिद सांगतो कि त्याने तीन पैशाला विकत घेतलाय तेव्हा संतापाच्या सुरात ती म्हणते कि पैशाचं काही खाता न पिता कशाला घेतलास हा दळभद्री चिमटा ? तेव्हा हामिद म्हणतो की आता तुझे हात गरम तव्याने पोळणार नाहीत, म्हणून तर मी विकत घेतला अमीनाचा राग क्षणात प्रेमात बदलतो. तिच्या डोळ्यात अश्रु  दाटतात.  लहानग्या हामिदला कळतही नाही कि आजी का रडतेय ?
कथेच्या शेवटची तीन वाकये अतिशय सुंदर आहेत...
"और अब एक बड़ी विचित्र बात हुई। हामिद कें इस चिमटे से भी विचित्र। बच्चे हामिद ने बूढ़े हामिद का पार्ट खेला था। बुढ़िया अमीना बालिका अमीना बन गई। वह रोने लगी। दामन फैलाकर हामिद को दुआऍं देती जाती थी और आँसूं की बड़ी-बड़ी बूंदे गिराती जाती थी। हामिद इसका रहस्य क्या समझता!"
कथा इथे संपते पण माझ्या  मनातील कथा मात्र इथे संपत नाही. ही कथा एका नातवाने आपल्या आजी वरच्या प्रेमापोटी विकत घेतलेल्या चिमटयावर थांबत नाही तर मानवाच्या चिरंतन अशा जिजुविषु वृत्तीच दर्शन घडवते. तुम्ही भले पैशाने श्रीमंत असाल , काहीही विकत घेऊ शकत असाल पण जोपर्यंत तुम्ही दुसर्याचा विचार करत नाही, त्या पैशाने दसर्याच्या चेहर्यावर जरासं का होईना, हसू आणत नाही आनंद आणत नाही तोपर्यंत त्या पैशाचा काही उपयोग नाही.
   पैसा आहे म्हणून मस्त जगता येईलच असं नाही.  तुम्ही कुठल्या गोष्टींवर तो खर्च करता त्यावर ते अवलंबून आहे.  पैशाने वस्तू विकत घेता येतीलही पण आनंद नाही विकत घेता येत.  ज्यांना दुसर्यांवर प्रेम करता येतं त्यांना धातूचे तुकडे फ़क्त साधन वाटतात साध्य नाही.



(प्रेमचंद यांच्या "ईदगाह"या कथेवर मुक्तचिंतन.  समीक्षेचे कुठलेच नियम न वापरता एका वाचकाने कथा का आवडली आणि कथेत काय आहे याचं वर्णन इथे केलयं. जर काही चांगलं असेल या लेखात तर त्याचे श्रेय प्रेमचंद यांच्या सशक्त लेखनाला आहे   )

ही कथा आणि प्रेमचंद यांच्या इतर कथा इथे वाचता येतील.






    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा