आपल्या आयुष्यातील सर्व संपत्ती 'बोन डेन्सिटी स्कॅनर' नामक एका मशीनच्या वितरणात खर्ची घातलेल्या ख्रिस गार्डनर (विल स्मिथ)ची ही गोष्ट. बोन डेन्सिटी स्कॅनर ही मशीन हाड़ांचे अधिक परिणामकारक चित्र देते, पण सध्याच्या एक्स रे मशीन पेक्षा दुप्पट महाग असते. त्यामुळे बहुसंख्य डॉक्टरांना हा खर्च विनाकारण आहे असं वाटतं. कुठल्याही परिस्थितीत महिन्याला किमान ३ मशीन विकणं हे त्याला चरिथार्थ चालवण्यासाठी आवश्यक आहे. त्याला सतत किटकिट करणारी बायको आहे, एक लहान मुलगा (ख्रिस्तोफर) आहे. एकंदरीत त्रिकोणी कुटुंब. आपण जबाबदार बाप बनण्याचे तो हरघडी प्रयत्न करतोय.
हल्ली नवरा बायकोच्या नातेसंबंधात तणाव आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे ख्रिसला सेल्स मधे सतत येणारं अपयश. त्याला पार्किंगचे टिकिट्स भरता न आल्याने वाहतुक विभागवाले त्याची गाडी उचलून घेऊन जातात. घरमालकाचे भाडे थकलेले असते. कर भरण्यासाठी सरकार दरबारातून बर्याच नोटिशी घरात पडलेल्या असतात. सकाळी दोन्ही हातात एक एक अशा मशीन घेऊन तो त्याच्या मुलाला पाळणा घरात सोडतो. त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधे मशीन विकण्यासाठी डॉक्टरांच्या मुलाखती सुरु. डॉक्टरांची अपेक्षाभंग करणारी उत्तरे. या सर्वांतून संध्याकाळी बायकोचं तिरसट बोलणं, असा त्याचा नेहमीचा दिनक्रम.
एकदा असंच वॉल स्ट्रीटवरून चालताना एका गगनचुंबी इमारतीकडे तो पाहत असतो. बाजूला एक श्रीमंत दिसणारा गृहस्थ लाल पोर्शे पार्क करतो. ख्रिस त्याला विचारतो की तू हे कसं केलस आणि आणि तू काय नेमकं करतोस? तो उत्तर देतो की तो स्टॉकब्रोकर आहे. ख्रिसला या हलाखीच्या आयुष्याचा कंटाळा आलेला असतो, तो ठरवतो की असं काही तरी करावं. जॉब बदलाच्या त्याच्या निर्णयाला त्याच्या बायकोकडून अपेक्षेप्रमाणे कडवट प्रतिसाद मिळतो.
त्याच दरम्यान एक स्टॉक ब्रोकिंग फर्म इंटर्नशिपसाठी उमेदवार घेत असते. सहा महिन्यांची इंटर्नशिप. शेकडो अर्जापैंकी वीस जणांनाच निवडणार आणि त्या वीस जणामधून एकाचीच नोकरी पक्की होणार. ख्रिस पण इंटर्नशिपचा अर्ज भरतो. एकदा इंटर्न रिक्रूट करणारा HR मॅनेजर -ट्विसल टॅक्सीची वाट पाहत असतो त्या वेळी ख्रिस "मला पण त्याच ठिकाणी जायचे आहे" असे सांगून त्याला घरापर्यंत टॅक्सीतून लिफ्ट देतो. काही करून त्याला ही संधी गमवायची नसते. या प्रवासात तो रूबीक क्यूब सोडवून दाखवतो आणि आपण बुद्धिमान आहोत हे सिद्ध करतो पण त्याच्याकडे टॅक्सीचे पैसे भरण्याइतपत पैसे नसतात. मग टॅक्सीवाल्याला बरेच फिरवून एका ठिकाणी तो टॅक्सीतून पळ काढतो. टॅक्सीवाला त्याच्या मागे ओरडत पळत असतो. शेवटी ख्रिस त्या टॅक्सीवाल्याकडून स्वताची सुटका करुन घेतो. या गडबडीत तो एक मशीन गमावतो. एक मशीन म्हणजे एका महिन्याचं राशन. तो घरी उशीरा येईल असे सांगण्यासाठी फोन करतो तेव्हा त्याची बायको आपण घर सोडून चाललो आहोत असे सांगून त्याला आणखी मानसिक संकटात टाकते. ख्रिस तरीही ठामपणे बायकोला बजावतो कि त्याचा मुलगा ख्रिस्तोफर त्याच्याचसोबत राहील. अशा वेळी त्याला थॉमस जेफेरसनने अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यात लिहिलेल्या "प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा शोध घेण्याचा अधिकार आहे" या वाक्याची आठवण होते त्याला राहून राहून प्रश्न पडतो की जेफेरसनने 'सुखाचा शोध' असं का म्हटलं असेल ? सुखाचा फ़क्त शोधच घेता येतो का ? खरोखर सुखासारखं काही असतं का? सुख म्हणजे नक्की काय असतं?
घरी आल्यावर बायको आणि मुलगा दोघेही घरी नसतात. बायको मुलाला घेऊन घर सोडून गेलेली असते. त्याचं मन नैराश्याने भरुन जातं. अशा वेळी ट्विसल (HR मॅनेजर) त्याला फोन करुन सांगतो की, त्याला उद्या ऑफिसमधे येऊन भेट- तो इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालाय. इथे एक लोच्या असतो की या इंटर्नशिप दरम्यान कुठलेही मानधन मिळणार नसते, आणि सहा महिन्यांनंतरही नोकरीची हमी नसते, काय करावं आता? ख्रिस ही संधी स्वीकारतो.
मग त्याचा अत्यंत खडतर असा प्रवास सुरु होतो. सकाळी उठून मुलाला पाळणा घरात सोडणं, त्यानंतर इंटर्नशिपवर, मग मशीन विकण्याचा प्रयत्न करणं संध्याकाळी परत येताना ख्रिस्तोफरला घरी आणणं. अशातच घरमालक भाड़े वेळेवर देता न आल्यामुळे त्यांना घराबाहेर काढतो, त्याचे बँक अकाउंट्स सरकारकडून गोठवले जातात. ख्रिस पुरता कफल्लक होतो ख्रिसला आपल्या मुलासोबत एक रात्र रेल्वे स्टेशनवरील बाथरूममधे काढावी लागते. आता राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्याला कळते की एका चर्च मधे राहण्याची व्यवस्था होऊ शकते पण फ़क्त मर्यादित लोकांसाठीच. मग वेळेशी लढाई सुरु होते. इंटर्नशिप संपल्या संपल्या ख्रिस्तोफरला घेऊन चर्चजवळ रांगेत उभे राहवे लागे. जरा उशीर झाला तर रात्र उघडयावर काढावी लागेल ही भीती सदोदित मनी असे. आपण कफल्लक झाले आहोत हे तो ऑफिस मधे कुणालाच कळू देत नाही. एकदा त्याच्या बॉसकडे टॅक्सीवाल्याला द्यायला सुट्टे पैसे नसतात, तेव्हा पाच डॉलर उसने देतो. पाच डॉलरही त्याच्यासाठी फार मोठी रक्कम असते त्यावेळी. ख्रिस त्याच्या इंटर्नशिप च्या काळात खूप शिकण्याचा प्रयत्न करतो. एकदा तर नियमांना डावलून एका बड्या कंपनीच्या CEO ला फोन करतो आणि गुंतवणुकीसाठी वेळ मागतो, त्या CEO सोबत एका रग्बी मॅचला जाऊन आपले कॉन्टेक्ट्स वाढवतो.
अशातच त्याला त्याची हरवलेली एक मशीन सापडते. त्या मशीनला एक वेडा 'टाइम मशीन' असे मानत असतो. त्याच्याकडून तो ती परत घेतो, तिचे काही भाग मोडलेले असतात. तिला दुरुस्त करण्यासाठी पैशांची गरज असते. ख्रिस रक्तदान करून पैसे कमावतो आणि ती दुरुस्त करतो. त्या मशीनला विकून अडीचशे डॉलर मिळतात. आणखी काही दिवसांचा प्रश्न मिटतो. असे करता करता सहा महिने होतात. अंतिम परीक्षा पार पडते.
इंटर्नशिपच्या शेवटच्या दिवशी त्याचा बॉस त्याला केबिन मधे बोलावतो. ख्रिसने नविन शर्ट घातलेला असतो. तो त्याला म्हणतो की त्याने हाच शर्ट उद्या पण घालावा. स्टॉक ब्रोकर म्हणून कामाच्या पहिल्या दिवशी. त्याची निवड झाल्याबद्दल तो त्याचे अभिनंदन करतो. ख्रिसला त्याचे अश्रु आवरत नाहीत. तो धावत पाळणाघरात जाऊन ख्रिस्तोफरला मिठी मारतो. आता त्याला कळतं सुख म्हणजे नेमकं काय!
चित्रपटाच्या नावातील हॅप्पीनेसची स्पेलिंग जाणीवपूर्वक चुकीची लिहिलीय ख्रिस्तोफरच्या पाळणाघराजवळील भिंतीवरील ग्राफिटीवरुन ती घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत स्वत: वर विश्वास ठेवायला हवा असा संदेश कुठल्याही उपदेशाचा बडेजाव न आणता हा चित्रपट देतो. चित्रपटात एके ठिकाणी ख्रिस आणि त्याच्या मुलाचा संवाद आहे तो खूप प्रेरणादायी आहे "Hey. Don't ever let somebody tell you... You can't do something. Not even me. All right?"
Christopher: All right.
Christopher Gardner: You got a dream... You gotta protect it. People can't do somethin' themselves, they wanna tell you you can't do it. If you want somethin', go get it. Period."
ख्रिस पुढे जाऊन एक यशस्वी स्टॉक ब्रोकर बनतो. या चित्रपटाची कथा ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यावरून घेतलीय. एकदा पहावाच असा हा चित्रपट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा