सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

उगाच हळहळते आपली शाई

सहावीत असतानाची गोष्ट. मराठीचा तास चालू होता. बाई सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता शिकवत होत्या. सगळ्यांची डोकी बाकावरील पुस्तकांत होती. बाईंचा तसाच आदेश होता. या कवितेच्या पानावर निळ्या हिरव्या रंगातला समुद्र होता. वर्गात फ़क्त बाईंचाच आवाज घुमत होता. शेजारचा मित्र वर्गात असून नसल्यागत. त्याची छान समाधी लागलेली. मागे जरा वळून पाहिलं, मागच्या बाकावरचे पण समाधीत गुंतलेले.
बाई कविता शिकवताहेत. मुलं कठीण शब्दांचे अर्थ समासात लिहिताहेत. खिडकीतून येणार्या उन्हाची एक तिरिप कंपासपेटीवर पडलीय. अचानक खट  सारखा आवाज येतो अन धपदिशी काहीतरी माझ्या पुढ्यात पडतं.  त्या आवाजाने वर्गाची तंद्री भंगते. सगळे काय झालं म्हणून एकमेकांकडे पाहू  लागतात. माझ्या समोरील पुस्तकावर चिमणी मरून पडलेली असते. रक्ताचा एक मोठा ठिपका पानावर पडलेला असतो. रक्ताचे काही डाग कुणाच्या तरी यूनिफार्मवर उडालेले असतात.  एकंदरीत खिडकीतून आलेली एक चिमणी छताच्या पंख्याच्या तावडीत सापडून निष्प्राण झालेली असते.  एव्हाना माझ्या अवतीभोवती मुला-मुलींची गर्दी जमा होते.  शेजारी बसलेल्या मित्राची झोप खाडकन् उतरलेली असते. मग चारी बाजूंनी 'च्यक च्यक' सुरु होते. बाई गर्दीतून वाट काढत माझ्या बाकाजवळ येतात. मेलेल्या चिमणीला पाहतात अन् वर्गातील मागच्या बाकावरील धाडसी मुलाला तिला बाहेर फेकून यायला सांगतात. तो मुलगा मग ते पुस्तक सांभाळून उचलतो आणि वर्गाबाहेर पडतो मग वर्गाबाहेर जाता जाता मधल्या रांगांमधले आणि ज्यांना मेलेली चिमणी पाहता आली नाही ते तिला शेवटचं पाहण्याचा प्रयत्न करतात.
वर्ग परत सुरु होतो. माझं लक्ष आता उडालेलं. मी वरती पंख्याकडे पाहतो. तो गरगर फिरत असतो. माझं डोकं पण गरगरायला लागतं.  पुढचे दोन दिवस मी कुणाशीच फार बोलत नाही. इतक्या जवळून मृत्यू पाहण्याची ही पहिलीच वेळ.

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी होतो. आजीची दुभती म्हैस आजारी होती. चार दिवस तिने चारा पाणी काहीच शिवलं नाही. एखादं माणूस आजारी असावं असं शोकाकूल वातावरण घरी होतं.म्हैस काही वाचणार नाही हे ही सगळ्यांना कळून चुकलेलं. अन् ती रात्रीच केव्हातरी वारली. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो. अन् सकाळी जाग आली ती आजीच्या किंकाळीने. लहान होतो. आजी का रडतेय हे सुरुवातीला कळलं नाही. नंतर मेलेल्या म्हशीला पाहून कळलं. आजीच्या डोळ्याला पाण्याच्या नुसत्या धारा लागल्या होत्या. लहानशी चिमणी मरते तशी इतकी मोठी म्हैसपण मरते तर ! हालचाल थांबली, श्वास थांबले म्हणजे मृत्यू असंच असले पाहिजे. पण ही काहीतरी हरवल्याची जाणीव कसली? लोकं का रडतात?

शाळेच्या थोडं पुढे मुसलमानांच कब्रस्तान होतं. त्याला लागूनच खदान. त्यात आम्ही शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.  कब्रस्तानमधले हे उंचवटे कसले, ही उत्सुकता होती. मित्राने सांगितलं, माणूस मेला की त्याला इथे पुरतात. पण जोपर्यंत डोळ्याने पाहत नाही तोवर विश्वास कसा ठेवायचा? एकदा खेळताना  कब्रस्तानमधे गर्दी दिसली, काहीतरी खांद्यावरनं आणलेलं दिसलं. मग खेळ तसाच ठेवून आम्ही सगळे जमलो अन् चर्चेतून कळले की कुणीतरी मेलयं. खेळ संपल्यावर संध्याकाळी वाट चुकवून आम्ही तिथे पोचलो. त्या उंचावट्यावर फुलांची चादर होती. असाच प्रकार एकदा शाळेतून घरी जाताना दिसला पण यावेळी माणसाला पांढरया कपड्यात गुंडाळून खांद्यावरुन नेत होते. आई माझ्यासोबत होती. तिने बजावलं की असं काही दिसलं की लांब उभं राहायचं. आणि नमस्कार करायचा. आईला प्रश्न विचारण्याचं धाडस झालच नाही तेव्हा. मग हिन्दुंमधे मेलेल्या माणसाला जाळतात हे पुढे कळलं. शाहरुखचा 'कुछ कुछ होता है' मधे सुरुवातीस राणी मुख़र्जीच्या दहनाचा सीन आहे, तेव्हा तीही शंका फिटली पिक्चर पाहून.

काही जवळच्या, काही शेजारच्या व्यक्तींचं अकाली जाणं पाहिलं. त्यांच्या जाण्याने होणारं दुःख अनुभवलं आणि हे सर्व निसर्गनियमाचा भाग आहे, जाणारा जातोच त्याला परत नाही आणता येत इत्यादि सांत्वन करणारं तत्त्वज्ञान कधी पिंडाचा भाग होऊन गेलं कळलं देखील नाही.  मन कोरडं नाही झालं हे नशीब.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळची दादर फ़ास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मला उभा होतो. गाडीला यायला तीन मिनिटे अवकाश होता म्हणून थोडं चालत जाऊया पुढे म्हणून प्लेटफार्मवर चालत होतो. गर्दी होती थोडीशी. अचानक मधे कबूतराचं पिल्लू तडफडत पडलेलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या पत्र्यांमधल्या पोकळीत कबूतराचं घरटे होते. बॅगेतून टिश्यू पेपर काढला आणि त्याला अलगद उचलून कोपर्यात नेलं. बारिकशी चोच हालत होती. पाण्याच्या बॉटल मधलं थोडस पाणी करंगळीने त्याला पाजलं. एव्हाना लोकं कुतूहलाने पाहत होतीच माझ्याकडे. ट्रेन आली. थोड्या वेळाने ते मेलं. त्याला आणखी एका टिश्यू मधे गुंडाळून कोपर्यात कुणाचाही पाय लागणार नाही असं ठेवलं. एवढ्यात माझे हे सर्व उद्योग बघणार्या एकाने असही म्हटले कि "पंछी चुतिया होते है किधर भी घोंसला बनाते हैं".  माझी ट्रेन एव्हाना सुटली होती  दूसरी ट्रेन कुठली लागलीय हे पाहूया म्हटलं. हे इंडिकेटर पण जाम मिजासखोर. थोड्या वेळाने मागे वळून जिथे पिल्लू ठेवलय तिथे पाहिलं तर त्या पिल्लाजवळ एक कबूतर येऊन थांबलं होतं. त्याचच पिल्लू असावं बहुतेक.  आप्त स्वकीयाच्या  मरणाचं दुःख पशू पक्षांनापण होतं असावं.
संजय चौधरीची ओळ आठवली एकदम 'जाणारा जातोच, थांबवता येत नाही.. पण उगाच हळहळते आपली शाई'

४ टिप्पण्या: