शनिवार, १० मे, २०१४

लोकलकथा - २

गाडीने भाईंदर सोडलं आणि डब्यात एक परिचयाचा आवाज ऐकू आला.  "मेरी आवाज की तरफ़ ध्यान दिजिये श्रीमान, सुनने का कुछ पैसा नहीं, देख़ने का कुछ पैसा नहीं" . पन्नाशीतला एक गृहस्थ आपल्या खर्जातल्या आवाजात हातातल्या प्रोडक्टच मार्केटिंग करत होता.  रोज तीच लोकल गाडी पकडत असल्यामुळे मी त्याला चांगलाच ओळखतो.  त्याच्याकडच्या वस्तू १० रुपये ते ३० रुपये या परवडेबल रेंज मधल्या असतात हे आपलं माझं निरीक्षण.  सूया, मुंबई दर्शन गाइड, रेल्वेचं टाइमटेबल, दंतमंजन, वह्या,  घरचा वैद्य नामक पुस्तिका, टॉर्च यातलं तो काहीही विकतो.   लोकांच लक्ष कसं वेधून घ्यावं, हे त्याला बरोबर जमतं.
"घर, दुकान सब जगह काम आनेवाली चीज. (आता या ठिकाणी वस्तूच नाव) अगर बाजार मे इसकी  किमत  पुछने जाओ तो करीबन ६० से ७० रुपया होगी, लेकिन कंपनी के प्रचार के हेतू वही चीज आपको कम से कम दाम मे केवल १० रुपये मे दी जा रही है, मात्र १० रुपये, फक्त १० रुपये, ओन्ली टेन रुपीज"
"जो भाईसाब देखना चाहते है, देख सकते है, जो पाना चाहते है प्राप्त कर सकते है" मग तो एकेक सीट वर लोकांना बघण्यासाठी ती वस्तू देणार. काही जण उत्सुकतेपोटी पाहतात, काहींच्या मनात घेऊ का नको अशी चलबिचल होते. "आजकल १० रुपये में क्या आता है भाईसाब, वडापाव भी १५ रुपये का आता हैं" या त्याच्या वाक्याने "बरोबर आहे, घेऊया तर खरं. नाही चांगलं लागलं तर गेले १० रुपये म्हणायचं" असा विचार करून बरेच जण विकत घेतात.  "पिछले दस साल से इसी लाईन पे सफर कर रहा हुं, कभी शिकायत नही आयी" हे वाक्य ज्यांनी वस्तू विकत घेऊनही ज्यांच्या मनात अजूनही शंका आहे त्यांना विश्वास देण्यासाठी.

गेली ४ - ५ वर्षे वेगवेगळ्या डब्यांत मला तो भेटलाय. बहुधा गर्दीच्या वेळा टाळून तो प्रवास करतो, पण गर्दी त्याला वस्तू विकण्याची चांगली संधी देते .  मराठी, हिंदी वर त्याची चांगलीच कमांड आहे. इंग्रजीतली एखाद दुसरी कामचलाऊ वाक्ये त्याला येतात.  तीच तो अधून मधून वापरतो. केसं पांढरी झालीयेत. दंतमंजन विकताना तंबाकू खाऊन लाल पिवळ्या झालेल्या दातांकडे तो सोयीस्कर दुर्लक्ष करतो. दाढीची खुटं थोडीफार वाढलेली आहेत. खांद्याला झोळी सारखी जड ब्याग आहे.
डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर. जिथे साध्या मुंगीलाही हलता येणार नाही अशा  गर्दीच्या वेळी "भाईसाब जरा अंदर जाने दिजीये" म्हणत अभिमन्युसारखा तो आत शिरतो. वयाने शरीर थकले आहे याच्या खुणा दिसताहेत पण मिश्कीलपणा जात नाही. एकदा 'मुंबई दर्शन गाइडबुक' विकत होता, डब्यात कॉलेजला जाणारी बरीच तरुण मुलं-मुली होती. अशा वेळी त्याने आपले निरुपण सुरु केले.
"मित्रांनो, घर दुकान सगळीकडे उपयोगी येणारी गोष्ट. मुंबई दर्शन गाईडबुक ! मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, बाजार, सिनेमागृहे सगळ्यांची माहिती कुठे मिळेल? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक. समजा तुम्ही गर्लफ्रेंड बरोबर पिक्चर पाहायला जाताय. जवळच थिएटर कुठेय? कोण सांगेल?? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड  म्हणाली, चौपाटीला जाऊ, तर तिथे कुठली बस जाईल ? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड  म्हणाली, बाहेर जेवूया, तर कुठले हॉटेल्स? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक."
इतक्या विश्लेषणानंतर मुंबई दर्शन गाईडबुक खपलं नसतं तर नवल.
मी पण त्याच्याकडून बर्याच वस्तू विकत घेतल्या. त्याच्याकडच्या दंतमंजनाने दात शुभ्र होतात असे मला आढळले नाही, घरचा वैद्य कधीही मदतीला धावला नाही . पाठदुखी वरचा उपाय करताना जी घरगुती साधने म्हणून लिहिली होती ती सापडली नाहीत. पाठदुखी डॉक्टरच्या औषधानेच बरी झाली. मुंबईतच लहानाचा मोठा झाल्यामुळे मुंबई दर्शन गाईडबुक कधीही वापरले नाही. घरी पुस्तकांच्या कपाटात ते कोपर्यात पडलेले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाचा फारसा उपयोग झाला नाही कारण माझी एक मैत्रीण रेल्वेचं चालतं बोलतं वेळापत्रक आहे. कधी अडल्यास सरळ तिलाच कन्सल्ट करतो.(आणि खरं बोलायचं तर ट्रेन कुठे वेळेवर धावतात)  तरीपण या माणसाला जेव्हा भेटतो तेव्हा काही न काही विकत घेतोच. उपकार म्हणून नव्हे तर त्याच्या कौशल्याला दाद द्यावी म्हणून.
एकदा रात्री दहाच्या दरम्यान भेटला. शेवटची खेप असावी दिवसभराची. ओळखीचा चेहरा दिसल्यावर त्याने हात उंचावून ओळखल्याच दाखवलं. ट्रेन सोपार्याला रिकामी झाली तेव्हा त्याला विचारलं "कैसे हो?"
नेहमीचं उत्तर "बढीया". त्याची मुलं कॉलेजला जातात. मुलगा शेवटच्या वर्षाला आहे. त्याला बाबांनी आता आराम करावा असं मनात आहे. पण त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं यावर हा ठाम.
"बच्चे अपने पैरो पे खडे हो जायेंगे तो फिर करेंगे आराम ! अब ट्रेन की भीड भी रोज बढती ही जा रही है, कभी सास फुल जाती है, देखते है कब तक चलती है सांसे. उपर वाले पे विश्वास है. ये भी दिन जायेंगे"

"हे ही दिवस जातील" हा सुखात संयम ठेवण्यास सांगणारं  आणि दुखा:त धीर देणारं वाक्य आज त्याच्या तोंडून ऐकत होतो. स्टेशन आल्यावर त्याचा निरोप घेतला. आता जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा त्याच्या धडपडीमागील कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. माझ्याकडे पाहिल्यावर ओळखीचं स्मित करतो.


बुधवार, ७ मे, २०१४

जिप्सी

फॉक्स ट्रैवलर वर एक मस्त शो आहे - "One Man and His campervan". मार्टिन डोरे हा खादाड, भटक्या, मनमौज्या प्राणी (ही विशेषणे माझ्या खास आवडीची) स्वत:च्या  १९७० च्या क्लासिक campervan मधून राणीच्या साम्राज्यात भटकत असतो.मनात येईल तिथे मुक्काम, स्वत: एक्सपेरिमेंट करणारा कुक म्हणून एखाद्या तलावाच्या काठी किंवा मोकळ्या रानात निळ्या आभाळाखालीं जी साधने उपलब्ध होतील त्यातून जिभेला पाणी सुटेल असे पदार्थ बनवतो.कधी त्यात गळाला लागलेला लॉबस्टर असतो तर कधी लोकल चीज़ फैक्टरीतलं ताजं चीज़  असतं.मोजक्या साधनांतून जे बनवतो ते मस्तच असतं.पण सर्वांत भावणारी गोष्ट म्हणजे निवांतपणा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी निद्राधीन होईपर्यंत फक्त धावपळ करणार्या प्रत्येकाच्या मनात निवांतपणे, उनाडपणे जगावं असं वाटत असतं-ते स्वप्न मार्टिन स्वतः जगतोय याची थोडी असूया वाटतेच.त्याउपर तिथली छोटी  छोटी गावे, डोंगर दर्या, नजर जाईल तिथ पर्यंतचे हिरवेपण, वाटेत मधेच भेटायला येणारे छोटेसे ओढ़े, दूध देणार्या महाकाय गायी सगळं मनाचा ठाव घेणारं हे आपल्या शहरी निबिड जीवनात नाहीये याची खंत वाटते.

पाडगावकर म्हणतात ते अगदी खरंय-"एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून". प्रत्येकाच्या मनात एक जिप्सी दडलेला असतो,पण जसजसं मोठे होत जातो तसे टाईची गाठ मारता मारता त्यालापण मारून टाकतो.
लहानपणी मी आणि माझा भाऊ एक वेगळाच खेळ खेळायचो.  एक लहान वीट घ्यायची.  तिला रोज पाण्याने ओलं करायचं.  जास्त ऊन नसेल अशा कोंदट ठिकाणी ठेवायचं.  काही दिवसांनी मग त्यावर हिरवशार बारीक स्पंज सारखं गवत उगवायचं (ज्याला बॉटनीत मॉस म्हणतात)हे झालं आमचं अमेजॉनच जंगल.   मुद्दाम कर्कटकाने त्यावर चिरा काढायच्या-ह्या नद्या.   थोड्या दिवसांनी त्यावर लहान सहान सुश्मजीव फिरायचे.  मुंग्या असायच्या.  इथपर्यंत आल्यावर खरा प्लॉट सुरु व्ह्यायचा आमच्याकडे एक छानसं भिंग होतं.  त्यातून ह्या सर्व गोष्टी तासंतास पहायच्या.  स्वताला आपण हेलीकॉप्टरमधे बसलो आहोत आणि उंच आभाळातून हे जंगल दिसतय अशी कल्पना करायची.  लाल मुंग्या दुष्ट असतात (कारण त्या चावतात!) आणि काळ्या मुंग्या गरीब बिचार्या म्हणून त्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे असे वाटायचे.

एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत गावी जात असू.  त्यावेळी काय पाहू अन काय नको असे होई.  सकाळी एकदा पोटात भर पडली क़ी दुपारी घरात हजर आणि मग परत संध्याकाळी मोर्चा.  दिवसभर भटक भटक भटकायचं, पाय दुखेपर्यंत.   पाबळाच  गार पाणी चेहर्यावर मारल्यावर  सगळा क्षीण जायचा.  झाडाच्या सावलीत वरच्या आभाळातील ढगांचे बदलते आकार बघत पहुडायचं.  पाटाच्या कडेकडेने जाताना अवचित एखादी धामण सरकन डोळ्यासमोरून जायची.  पडलो, खरचटलं क़ी पांगळयाचा पाला चोपडायचा.  (ह्या गोष्टी घरी कधीच कळल्या नाहीत ) रात्री चांदण्या पहायच्या.  आजोबांच्या शिकारीच्या गप्पा ऐकायच्या.  आपले आजोबा आता इथे वाघ आला तऱी त्याला पळवून लावतील या निर्धास्तपणावर छान झोप लागे.
 सुट्टी संपल्यावर परत येताना पुढच्या वर्षासाठी सगळं नजरेत भरावे लागे.  नुकत्याच लावलेल्या चाफ्याच्या रोपट्याचे काय होणार याची चिंता असे.  गाडीत बसल्यावर भरलेल्या अंधारासोबत हे सगळं  गायब होई.  उजाडताच मुंबईत पोचलेले असू.  शाळा सुरु होताच वर्गपाठ आणि गृहपाठ करताना मनातला जिप्सी घाबरून जाई.  त्याला वर्ष संपायची ओढ लागे.