शुक्रवार, १७ जुलै, २०१५

फँड्री

मध्ये एकदा मित्राशी बोलता बोलता मुद्दा जातिभेदावर आला. त्याच्या मते आता असलं काही लोक मानत नाहीत. हॉटेलमध्ये सगळ्यांना प्रवेश मिळतो, वेगवेगळ्या जातीची माणसे एकत्र बसून जेवतात. लोकलच्या गर्दीत एकमेकांना पाठ - पोट चिटकून प्रवास करतात. बरेच आंतरजातीय विवाह होतात. सगळ्यांना नोकर्या मिळतात, जातीमुळे कुणाची अडवणूक केली जात नाही. 'एक गाव एक पाणवठा' आहे. इत्यादी प्राध्यापकी बोलणं ऐकल्यावर त्याला म्हटलं, "तुझ्या मनातून तरी तुझी जात गेलीय का? खरं सांग. इथे जन्माला येतानाच आपण आपली जात येउन येतो. आपल्या आडनावावरून आपण कुठल्या जातीचे आहोत, कळतंच न अजूनही.आडनाव सोडतात का माणसं? नाही. जात समाजातून तेव्हाच नाहीसी होईल जेव्हा ती आपल्या मनातून नाहीसी होईल. " त्याला हे सगळं भावनिक वगैरे वाटलं. सतत रडत राहणाऱ्या आणि आपल्यावर सतत अन्यायच कसा झालाय याचे उद्घोष करणाऱ्या दलित साहित्यामुळे तुझी मते अशी आहेत आणि राष्ट्र प्रगती करतंय तर तुम्ही अजून जुन्याच गोष्टी उगाळता आहात  अशी टिप्पणी करून तो गेला.

मध्यंतरी 'Untouchability in Rural India' हे पुस्तक वाचनात आलं आणि ग्रामीण भागातील या वास्तवाची प्रखरतेने जाणीव झाली. शहरी भागात  शाळेपासून आपल्याला जातीची ओळख पटायला लागते, शाळेच्या दाखल्यावर ती स्पष्ट लिहिलेली असते. कॉलेजप्रवेशापासून मग पुढे आयुष्यभर ती वेगवेगळ्या ठिकाणी मिरवावी लागते. माणसे स्वतःला काय समजतात ते पहायचं असेल तर लग्नविषयक जाहिराती पहाव्यात. स्वजातीय वधू / वर हवेत. इतर क्षमस्व. भारताच्या ग्रामीण भागात ही परिस्थिती किती बिकट आहे याचे हृदयद्रावक चित्रण या पुस्तकात आहे. माणसाचा जातीविषयक अहंकार अमानुषतेची कुठली पातळी गाठू शकतो याचे प्रत्यय यातील काही केस स्टडीज वाचल्यावर कळतं. आजही बर्याच गावात महारवाडा आहे. गावातील सफाईची घाणेरडी कामे त्यांनीच करावी अशी रीत आहे. कुणी आवाज उंचावला तर आवाजच बंद करण्याची सोय आहे. त्यांनी सतत मळकटच कपडे घालावेत, शानषौकित राहू नये, त्यांना पाणी द्यायला वेगळी भांडी, त्यांच्या स्पर्शाने विटाळ अशी जातीद्वेषी अनेक उदाहरणे. माणसाला माणूस म्हणून जगायला नाकारणारी.


पुलंनी शाहूमहाराजांवरच्या एका लेखात असे म्हटलंय-
"… दुर्देवाने हिंदुसमाजरचना ही एका गळक्या भांड्याच्या उतरंडीसारखी आहे. परंपरेच्या डबक्यातून भरलेले हे पाणी ब्राह्मणवर्गापासून थेट खालपर्यंत गळत असते. त्या दुर्गंधीचे बळी असणारे लोक खालच्या भांड्यावर त्याच विषारी पाण्याचा प्रयोग करीत असतात. ब्राह्मणांनी मराठ्यांना क्षुद्र लेखावे, मराठ्यांनी शहाण्णव कुळाबाहेरच्यांना कडू मानावे, त्यांनी महारांना, महारांनी मांगाना, धेडांनी ढोरांना अशी ही दुष्ट उतरंड आहे… जन्मजात श्रेष्ठत्वाच्या आधारावर विद्येची मक्तेदारी गेली असेल, परंतु जन्मजात  श्रेष्ठकनिष्ठत्वाची कल्पना आजही गेलेली नाही… "
या पुस्तक वाचनाच्या  पार्श्वभूमीवर नागराज मंजुळेचा 'फँड्री' पाहिला आणि कुणीतरी झोपलेल्या किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केलाय असं मनापासून वाटलं.  अनेक अर्थांनी हा चित्रपट वेगळा आहे.  रुपेरी पडद्यावर केवळ लव्ह स्टोरी पाहण्याची सवय असलेल्या प्रेक्षकाच्या इच्छेनुसार, त्याला आवडेल तेच दाखवणाऱ्या चित्रपटांच्या व्याख्येत हा चित्रपट बसत नाही.

कैकाडी समाजात जन्माला आलेल्या जांबुवंत कचरू माने याची ही कथा. त्याला सगळे 'जब्या' म्हणूनच हाक मारतात. त्याच्या मनात स्वतः विषयी, स्वतःच्या रूपाविषयी, परिस्थितीविषयी, जातीविषयी प्रचंड न्यूनगंड आहे. तो सातव्या इयत्तेत आहे. वर्गातल्या सवर्ण जातीतील शालू नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम आहे. घरी आईबाप ठार अडाणी. रोजंदारीवर घर चाललेलं. एक बहिण लग्नाच्या वयाची आणि एक माहेरी राहायला आलेली कायमची . एक म्हातारा आजा  सतत टोपल्या विणत असलेला. जब्याच्या भावना समजून घ्यायला  जिवलग  मित्र पिराजी आहे. दया पवार यांनी 'बलुतं' मध्ये आपल्या नावाची हकीकत सांगताना म्हटलंय - दगडू मारुतीचं डी एम पवार  केलं,  एका मित्राने आजीला विचारलं "डी एम घरात आहे का?" तर "डयाम घरात नाही" असं तिनं  उत्तर दिलं. दलित जातीतील पोरांची नावे कचरू, धोंड्या अशीच. नावाच्या बाबतीतही चांगला अर्थ असावा ही अपेक्षाही वाट्याला न आलेला जब्या  गृहपाठ विचारायला जेव्हा वर्गातल्या वेदांत कुलकर्ण्याच्या घरी जातो तेव्हा कुंपणावरूनच त्याची बोळवण केली जाते. "काकू, वेदांत आहे का घरी?' या प्रश्नावर "बघ ते कैकाड्याचं पोर आलंय" ही अवहेलना. हा चित्रपट बघताना जब्याच्या पौगंडावस्थेतील मनावर काय आघात होत असतील याची कल्पना केलेली बरी. वयाच्या ज्या टप्प्यात आपला आत्मविश्वास घडत असतो,  स्वतःला स्वतःचीच नव्याने ओळख होत असते त्या टप्प्यावर असे आघात मनाला खिळखिळे करतात.

काळ्या चिमणीला जाळून तिची राख ज्या व्यक्तीच्या डोक्यावर टाकू ती आपल्याला वश होते या 'चंक्या'च्या सल्ल्यापायी जब्या आणि पिराजी काळ्या चिमणीला शोधत रानोमाळ भटकतात. ती चिमणी त्यांना शेवटपर्यंत सापडत नाही. अप्राप्य वस्तू म्हणून काळ्या चिमणीचं रूपक वापरलंय. "चिमणी बामीन असते. . " या संवादातून स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना आपण कशा स्वीकारल्या आहेत याची टोकदार जाणीव होते.

शालूला डुकराबद्दल घृणा आहे हे कळल्यावर तो पाटलाच्या अंगणात अडकलेल्या डुकराच्या पिल्लाला काढायला साफ नकार देतो. आपण डुकराला शिवलो कळल्यावर शालू आपल्यावर प्रेम करणार नाही ही त्याची समजूत. पोटासाठी कसलीही कामे करणाऱ्या बापाबद्दल त्याच्या मनात राग आहे, शाळा बुडवून त्यालापण रोजंदारीवर जावं लागतं याबद्दल चीड आहे. इतरांच्या घरात वीज असताना ढणढण जळणाऱ्या रॉकेलच्या दिव्यात अभ्यास करावा लागतो याबद्दल खंत आहे. वर्गात गुरुजी शिकवत असताना त्याच्या आईने शाळेजवळ येणं त्याला कमीपणाचं वाटतं.

नवीन कपडे घेण्यासाठी जब्या शहरात पेप्सी विकायला जातो, शहरातील मोठमोठ्या दुकानांतील पोस्टर पाहून त्यालापण तसेच कपडे घालावे असं वाटतं, Van  Heusen च्या मॉडेलप्रमाणे आपलेही नाक असावं म्हणून तो नाकाला चिमटा लावतो. शहरात रस्त्याच्या कडेला लावलेली सायकल ट्रकखाली चेंगरली जाते तेव्हा त्याने फोडलेला हंबरडा आपल्या जीवावर येतो.

जत्रेत देवाच्या पालखीच्या वेळी  पिसाळलेले डुक्कर जमावात घुसते आणि पालखी पडते, लोकांच्या मते हा अपशकून झाला. लवकरात लवकर ते डुक्कर पकडायचे काम कचरूला दिले जाते. मुलीच्या हुंड्याची तयारी करणाऱ्या असहाय बापाला मनात नसताना हे काम घ्यावे लागते. भल्या पहाटे हागणदारीतून डुकराला पकडतानाचा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. शाळेजवळ वर्गातील कुणीही आपल्याला डुक्कर पकडताना पाहू नये विशेषतः शालुने, म्हणून जब्या लपून बसतो. गुडघ्याच्या दुखण्याने कावलेला बाप त्याला थपडा मारतो. एकदा डुक्कर हाताशी लागतं तेव्हा शाळेत 'जनगणमन' सुरु होतं. राष्ट्रगीताचा आदर ठेवण्यासाठी सावधान उभं राहिल्यावर हाताशी आलेलं डुक्कर पळून जातं. रामदास फुटाणे यांची 'भारत माझा देश आहे' या कवितेची इथे आठवण येते. लाजिरवाणे जिणे जगतो आहोत तरी भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.  लोकांच्या गुवाच्या पाट्या रिकाम्या करतो आहोत तरी भारतावर प्रेम आहे. हा सगळा पकडापकडीचा खेळ चालू असताना गावकऱ्यांनी तमाशा पाहिल्यासारखं गर्दी करणं आणि टिप्पणी करणं फार क्लेशदायक आहे. त्यात एकाने फेसबुकवर 'fandry race. . enjoy friends' असा स्टेटस टाकून फोटो शेअर करणं म्हणजे  सोशल नेटवर्किंगच्या दुरुपयोगाबद्दल केलेलं subtle भाष्य आहे. शेवटी डुक्कर पकडलं जातं आणि त्याच्या मुसक्या आवळून त्याचं मढं खांद्यावरून नेलं जातं तेव्हा पार्श्वभूमीवर आंबेडकर, फुले, शाहू महाराज आणि गाडगे बाबा यांची भित्तीचित्रे आहेत. एकूणच या महापुरुषांच्या विचारांचे मढे आम्ही खांद्यावर वाहून नेत आहोत असा विचार मनात येतो. 

डुक्कर वाहून नेताना  जब्याच्या बहिणीची छेड जेव्हा काही सवर्ण गावगुंड काढतात तेव्हा त्याचा राग अनावर होतो आणि त्यांच्यावर दगड मारतो आणि त्यातला शेवटचा दगड आपल्याकडे भिरकावतो.  इथे चित्रपट संपतो. जेव्हा एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांना विचारलं गेलं कि त्याच सीन पाशी चित्रपट का थांबवला? तर त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर परिस्थितीचे भीषणत्व मांडणारे आहे - "पुढे जब्याचं काय होईल सांगता येत नाही. सवर्णावर हल्ला केला म्हणून त्याच्या अख्ख्या कुटुंबाला जिवंत जाळलं जाऊ शकतं, त्याच्या बहिणीवर बलात्कार होऊ शकतो किंवा याहूनही भयानक, आणि ते पचवणं लोकांना शक्य नाही."

***

1 टिप्पणी: