शनिवार, २५ जुलै, २०१५

पावसाविषयी पुन्हा एकदा

पाऊस माझ्या आठवणींत फार खोलवर रुजला आहे. गावी पावसाळा सुरु व्हायच्या आधी बरीच तयारी करावी लागते. मातीच्या भिंतींना वशेरा करून लावावा लागतो. कौलांची डागडुजी करावी लागते. विहीर साफ केली जाते. लाकूडफाटा, वैरण, शेणकुट यांची चार महिन्यांसाठी तरतूद करून ठेवावी लागते. जेव्हा पाऊस धो धो पडायला लागतो तेव्हा गुरांना गोठ्यातच आसरा घ्यावा लागतो, त्यांच्यासाठी ही गवत - वैरणीची तरतूद. माणसांना घरातच कोंडून घ्यावे लागते . लाकडं आणि गवत घरात पोटमाळ्यावर भरली जातात. कधी कधी पावसात सापपण या गवतात लपून बसतात तेव्हा गुरांना चारा देणाऱ्यांना जपूनच हालचाल करावी लागते. 
कधी पावसाचा थांगपत्ता नसताना गुराखी गुरांना घेऊन माळावर जातो आणि बघता बघता आभाळ भरून येतं, थंड वाऱ्याची झुळूक येते, झाडं -झुडपं वथरु लागतात आणि पाऊस बेभान होऊन कोसळू लागतो. मातीचा सुगंध दरवळू लागतो. हा सौम्यसा वाटणारा पाऊस हळू हळू रौद्र रूप धारण करतो. गोठ्यात वासरू हंबरू लागते  या क्षणी ग्रेस यांची कविता आठवते -
"पाऊस आला पाऊस आला
गारांचा वर्षांव
गुरे अडकली रानामध्ये
दयाघना तू धाव"
पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहतात. अंगणात मातीचे छोटे प्रवाह तयार होतात, कुठेतरी मोठं झाड उन्मळून पडतं किंवा शेताला घातलेला बांध कोसळतो. गावातील आजूबाजूची घरे स्थितप्रज्ञ असल्यासारखी निश्चल राहतात. पावसाची अखंड रिपरिप मनात रुजत जाते. वळचणीला अनेक पक्षी येउन कुडकुडत बसतात. 
 पाऊस  दिवस - रात्र कोसळत राहतो, सर्व व्यवहार थिजतात. आणि अचानक तिसऱ्या दिवशी पहाटे उघडीप होते. निळ्याशा आभाळावर चुलीच्या काळसर धुराने रेघोट्या ओढाव्या तसे चित्र दिसते. झाडांच्या पानांवरून पाणी ओघळत असते. गुरांना पाय मोकळे करायला बाहेर काढले जाते.  एकूणच गावात पुन्हा हालचालींना वेग येतो. 

अशा कैदेत ठेवणाऱ्या पावसात चुलीशेजारी बसून हात पाय शेकत आजीच्या गप्पा ऐकण्यात मजा आहे. "आमच्या वखताला. ." पासून सुरु झालेल्या गावकीच्या गप्पा थांबायचं नाव घेत नाहीत.  अशा पावसाळ्या संध्याकाळी खालेल्ला तिखटजाळ वांग्याचं भरीत आणि आंबेमोहराचा भात अजून जिभेवर पाणी आणतो.   चुलीत भाजलेल्या त्या वांग्याची सर कशालाच नाही.  
पाऊस पडून गेला की, फक्त पावसाळ्यातच उगवणाऱ्या रानभाज्या ही खवय्यांसाठी मोठी पर्वणी असते. तांदळी, कुरडू, शेंडवल अशा अनेक भाज्या या काळात उगवतात. प्रत्येक भाजी बनवण्याची वेगळी पद्धत आहे. नुसत्या लसणाच्या फोडणीवर भागणाऱ्या काही भाज्या, तर काहींना खरपूस भाजलेला कांदा हवा जोडीला. 
आता गावात या भाज्यांची माहिती असणारी जुनी जाणती माणसे कमी आहेत, जी पिकली पानं आहेत ती केव्हा गळून पडतील याचा नेम नाही. 'आमच्या वखताला असं व्हतं' असं पालुपद लावणारी माणसे काळाच्या प्रवाहात गडप होताहेत. त्यांचा काळ, त्यांनी अनुभवलेले पावसाळे कुठेतरी नोंद करून ठेवावे असं नेहमी वाटतं. 

***

जूनमधे शाळा सुरु होते. नवीन दप्तर, नवीन बूट, नवीन रेनकोट आणि नवीन वह्या पुस्तके. या नवीन गोष्टींसोबत हवेहवेसे वाटणारे आणि दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर भेटणारे जुने दोस्त. शाळा सुटल्यावर भर पावसात शाळेशेजारच्या लोखंडवाला रोड वर क्रिकेट खेळणे आणि त्यानंतर आंटीच्या हॉटेलमधे डोशाची पार्टी हे ठरलेलेच होते. आमचा एक मित्र नेहमी आम्हाला टाळायचा. त्याला एकदा मी खोदून विचारलं तेव्हा ओशाळत तो म्हणाला, "बाबांनी या वर्षीची शाळेची फी भरण्यासाठी अंगठी गहाण ठेवली".  गरीबी म्हणजे काय तेव्हा कळलंच नव्हते. सुर्वे म्हणतात तसे लपवायचे वंचनेचे डाग वाट्याला कधी आलेच नव्हते. दरवर्षी तीच छत्री दुरुस्त करून वापरायची सवय नव्हती. आपल्याला पावसाळा सुंदर वाटतो म्हणून सगळ्यांना वाटेलच असं नाही. 

***

मुंबईत मिठी नदीच्या आसपास वाढलेली प्रचंड झोपडपट्टी आहे. मुळात ही नदी नसून  एक मोठा नाला आहे. काळ्या पाण्याचा कचऱ्याने भरलेला नाला. २६ जुलैच्या पावसानंतर इथे नदी आहे याची जाणीव आपल्याला झाली. 


पावसाने वेग घेतला कि या नाल्याच्या आसपास राहणाऱ्यांच्या छातीत धडकी भरते. त्यांना २६ जुलैचा दिवस आठवतो. पावसाच्या पूर्वी तयारी म्हणून उन्हाळात पत्र्यावर डांबराचा थर दिला जातो. नाल्याची पातळी  वाढली कि पावसाचे पाणी नाल्यातून घरात येऊ नये म्हणून मोरीला प्लास्टिकची पिशवी बांधली जाते. महत्वाचं सामान, कपडे पोटमाळ्यावर टाकलं जातं. पाऊस थांबण्याची हताश चेहऱ्याने वाट पाहत बसतात. अशांसाठी पाऊस कधीच सुखद नसतो, मग ते पावसाला शिव्या देतात. पावसाला पडायचं तर तिकडे लांब तलावातच पडायला काय व्हतं? असं एकाने म्हणताना मी ऐकलय. 

***

मुंबईत भुलेश्वरला जर तुम्ही रात्रीचे दोन वाजता जरी गेलात तरी  गजबजाट दिसेल. अख्खी मुंबई शांत झोपली असताना, लोकलचा खडखडाट थांबला असतानाही इथे चहल पहल असते. इथल्या खानावळींत गर्दी असते. माणसे ओरपून जेवत असतात. वाढपी रोट्यांवर तुपाची धार ओढत असतात. इथल्या दुकानांच्या फूटपाथवर कुटुंबे विसाव्याला येतात. दिवसभर भटकून कपडे भांडी विकणारी ही माणसे. त्यांचा एका मोठ्या पिशवीत मावेल असा संसार घेऊन फिरतात. स्टोव पेटवला जातो. त्यात कसलीतरी भाजी शिजत असते. चिमुरडं पिल्लू बापाच्या खांद्यावरून हा झगमगाट बघत असतं. तेही आपली भूक ताब्यात ठेवायला शिकतं आपोआप. भात शिजला कि ताटलीत कुटुंब जेवायला बसतात. पावसापासून बचावासाठी वरती प्लास्टिक अंथरल जातं. तेही कधी कधी म्युनिसिपाल्टीचे अधिकारी ब्लेडने फाडून टाकतात. तरी हे जागा सोडत नाहीत. काटकसर करून नवीन प्लास्टिक आणतात. पावसात झोपेचे वांदे होतात. जमीन ओली असते. पहाटे जराशी डुलकी लागावी तर दुकान उघडण्यापूर्वी बाडबिस्तरा आवरावा लागतो. आपल्यासारखी निवांत रविवार सकाळ ह्यांच्या नशिबात नाही. बाल्कनीत उभं राहून मसाला चायचा घोट घेत पावसाचा मजा घेणं  ह्यांना ठावूक नाही. 

***

मध्यंतरी पावसाने मुंबई बंद पाडली. आठवड्याच्या मधे आलेली ही सुट्टी कामाचा स्ट्रेस घालवणारी. घरात बसून जुने हॉलीवुड सिनेमे पाहूया असं ठरवलं. सकाळपासून तीनदा चहा झाला. डोरबेल वाजली. समोर कल्पेश. रडवेला चेहरा घेऊन उभा. "दादा ,पेपर भिजले सगळे, त्यामुळे आज पेपर नाही". त्याला म्हटलं " मग रडतोयस कशाला? नसला एक दिवस पेपर तर बिघडत नाही" त्यावर तो "आज सायकलवरून पडलो, पेपरच्या गठ्यात चिखल भरला. आता अण्णा ओरडणार. पैसे कापून घेणार." त्याला रडणं थांबवून आत घेतलं आणि म्हटलं कितीचं नुकसान झालं? "जवळजवळ ऐंशी रुपये".  त्याला म्हटलं अण्णाशी बोलतो मी. तरी ऐकेना. 
आजूबाजूच्या चाळीस घरांत पेपर टाकतो कल्पेश. प्रत्येक घरामागे दहा रुपये दरमहा मिळतात त्याला.  
अकरावीचं कॉलेज सांभाळून पार्ट टाईम काम करतो, माझ्याकडून नेलेलं अब्दुल कलामचं इग्नायटिंग माइंडस त्याचं फेवरेट आहे. अब्दुल कलामसारखं काहीतरी करून दाखवावं अशी इच्छा त्याच्या मनात आहे. 
अशा माणसांच्या स्वप्नांवर कधी कधी पाऊस चिखल उडवतो हे  मला आवडत नाही, आपल्याला पावसाळा सुंदर वाटतो म्हणून सगळ्यांना वाटेलच असं नाही. 
 
***

२ टिप्पण्या: