रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

भुकेविषयी संमिश्र

जिल्ह्याच्या गावी पोचलो तेव्हा माथ्यावर रणरणतं ऊन होतं. घामाच्या धारा लागल्या होत्या. सोबतच्या बाटलीतलं पाणीही संपलं होतं. जवळपास एखादं चांगलं हॉटेल पाहून जेवावं असं ठरवलं. कलेक्टर ऑफिस जवळ छोटंसं हॉटेल होतं. कुठल्यातरी ट्रस्टचं. सरकारी कामासाठी लांबलांबच्या गावांवरून आलेली लोकं आपापल्या पिशवीतून आणलेला भाकरतुकडा खात होती. खूप जण झुणका भाकर खात होते म्हणून पोऱ्याला सांगितलं, झुणका भाकर आण म्हणून. त्याने मला झुरळासारखं झिडकारत सांगितलं, "आधी तिथे कूपन घ्या आणि त्या काउंटरवर द्या". काउंटरवर गेलो. त्याला म्हटलं झुणका भाकर दे, तर तो  चेहरा जराही वरती न करता म्हणाला कितीची ? एक रुपयाला एक भाकरी होती, झुणका कॉम्प्लिमेंटरी होता बहुतेक. म्हटलं दे दहा रुपयाची. त्याने निर्विकारपणे कुपन दिलं.  दुसऱ्या काउंटरवर ते दिलं, त्याने एका मोठ्या थाळीत मोजून दहा भाकऱ्या टाकल्या. एक वाडगं घेतलं आणि दोन पळ्या भरून एक पातळसा द्रव त्यात ओतला. मीठ लागेल तर त्या ताटात आहे कोपऱ्यातल्या. भाकऱ्या आकाराने पुरीहून थोड्या मोठ्या होत्या .
अशी सेल्फ सर्विस केल्यावर बसायला जागा शोधू लागलो. मधल्या रांगेत एक खुर्ची रिकामी होती तिथे गेलो तर बाजूला बसलेल्या बाईने माझं म्हातारं येतंय, मुतायला गेलंय असं सांगून दुसरीकडं बस रे बाबा असं सांगितलं.
हातात  प्लेट,त्यात वरणासमान झुणका नावाचा पदार्थ घेऊन थोडा वेळ उभा राहिलो. माझी दया येऊन पोऱ्याने एका खेडूताला त्याच्या नातवाला मांडीवर बसवायला सांगून मला खुर्ची मोकळी करून दिली. ग्लासात पाणी आणून दिले.
झुणका म्हणजे बेसनाला पाण्यात कालवून लसणाची फोडणी दिली होती. नावाला जरा कांदा सापडत होता. भाकऱ्या अगदी खुरखुरीत होत्या. महिलांच्या  कुठल्यातरी बचत गटाला काँट्रॅक्ट दिलं होतं जेवणाचं.  तीन भाकऱ्या खाल्यावर मन विटलं. माझ्या समोर एक माणूस तोच झुणका भाकरीने ओरपत होता. दाढीची खुटं वाढलेली, केस विस्कळीत, मळकट रंगाचं शर्ट, चेहऱ्यावर बेफिकीरपणा. मी ताट उचलणार इतक्यात त्याचं लक्ष माझ्या ताटात गेलं आणि तो म्हणाला, "याचं काय करणार ?". मी म्हटलं, "जात नाहीयेत, टाकून देतोय" यावर त्याने विचारलं, "मी घेऊ का ?", मी हो म्हणायच्या आत त्याने त्या उरलेल्या भाकऱ्या घेतल्या, बखोटीच्या पिशवीतून एक कागद काढून त्यात गुंडाळल्या. माझ्याकडे पाहून म्हणाला, "चला संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली."

***

आयुष्यात बराच संघर्ष करावा लागलेल्या ऍक्टर मित्राने त्याच्या हलाखीच्या दिवसांबद्दल सांगितलं. अभिनय म्हणजे भिकेचे डोहाळे असा समज अजूनही बऱ्याच पालकांत आहे. मित्राला घरून कधीच पाठिंबा मिळाला नाही. रिहर्सल वरून उशिरा घरी आल्यावर कधी कधी उपाशी झोपावं लागे. हातात कामे असायची पण पैसे नसायचे. पैसे बुडवणारेही भेटले. पोटात भुकेचा कधी कधी आगडोंब उसळायचा.  एकदा तर वेगवेगळ्या मिठाईच्या दुकानात जाऊन "जरा ये टेस्ट के लिये दिखाना, और ये कैसे दिया किलो? इसका भी टेस्ट दिखाना, क्या केहते है इसे ?" करत त्याने पोट भरलंय.

***

कॉलेजच्या दिवसांत वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आम्ही तिघंजणं बाहेरगावी जायचो. कधी बक्षिसं मिळायची, कधी नाही. बक्षीस न मिळाल्यावर वाटभर जगात partiality कशी चालते यावर एकमताने चर्चा होई.
असंच एकदा पुण्याहून मुंबईला परत आल्यावर कडकडून भूक लागलेली.  तेली गल्लीतल्या नाक्यावर पाणीपुरी खाऊया असं ठरलं. तीन प्लेट पाणीपुरी रिचवल्यावर पैसे देण्यासाठी आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. प्रत्येकाला वाटलं दुसऱ्याकडे पैसे असतील म्हणून. बॅगेचे कोपरे पालथे केल्यावर हातात वीस रुपये लागले. त्या पाणीपुरीवाल्याच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच विसरणार नाही.

***

तेच आम्ही तिघे. आयुष्यात जरा स्थिरावल्यावर एकदा एका  हॉटेलात जेवायला गेलो, एक मित्र मांसाहारी आणि आम्ही दोघे खासफुस खाणारे. आम्ही थाळी मागवली अन त्याने त्या हॉटेल ची signature डीश म्हणून prawns करी मागवली. एक दोन घास खाल्यावर त्याने नाक मुरडत ती बाजूला ठेवली. जेव्हा बिल आलं तेव्हा आम्हां दोघांच्या थाळीच्या एकत्रित बिलापेक्षा त्याची Prawns Curry महागात पडली.

***
सकाळी ऑफिसला पोचल्यावर लगेच टेबलावरचा फोन खणखणला. "आज आपका लंच विथ VP है, एक बजे तैयार रहना" VP (आमच्या कंपनीचा नवीन vice प्रेसिडेंट)ची सेक्रेटरी जया. आमचे नवीन VP रोज एका एम्प्लॉयी सोबत लंच करायचे . त्याच्याबद्दल जाणून घायचे. काही प्रॉब्लेम आहे का कामात वगैरे विचारपूस करायचे. HBR मधले लेख वाचून उगाच मॅनॅजमेन्ट प्रयोग करणारे जे असतात त्यापैकी ते एक.
दुपारी कॅफेटेरियात त्यांच्या समोर बसलो. त्यांचे जेवण वेटरने आणून दिले. एक रोटी, थोडी डाळ आणि दोन काकडीच्या चकती. बस्स एवढंच.
माझा तीन टियरचा डब्बा. त्यांचं जेवण उरकलं दोन मिनिटांत. माझं आपलं चालूय सावकाश. प्रश्न विचारून प्रश्न संपले. कंपनीने लंच साठी दिलेला अर्धा तास पुरेपूर वसूल करणारा मी.
मी त्यांना म्हटलं, "सर, इतनाहि लंच क्यू?". त्यावर ते म्हणाले, "जीने के लिये खाओ, खाने के लिये मत जियो".
लंच संपल्यावर श्रीरामपंडी नाडर, माझा सहकारी म्हणाला. "अरे आज इसको बहुत पकाया तुमने, हम लोग सिर्फ एक ज्यूस लेके इसके साथ बैठता. पांच मिनिट में लंच खतम. उसके जाने के बाद अराम से खाता. "
मी त्याला VP चा डायलॉग सांगितला, त्यावर त्याचं कहर उत्तर. "अरे इन्का खानेका खयाल रखना आदमीलोग है,  हर घंटे कुछनाकुछ खाता, और हमको बोलता - जीने के लिये खाओ, खाने के लिये मत जियो"

***

संध्याकाळी चालत घरी जाताना कानात हेडफोन्स घालून माझ्याच तंद्रीत होतो. अचानक एका बाईने  थांबवलं. गावी दुष्काळ पडलाय तेव्हा मुंबईत आलो, काहीतरी खायला द्या अशी हात जोडून विनंती केली, सोबत दहा पंधरा वर्षाचा मुलगा होता बाई विधवा होती. पोराच्या पाठीला बॅग, शर्ट मळकट, डोळ्यात आर्जव. रस्त्यावरच्या पिवळ्या उजेडात त्यांची अगतिकता अजून भयानक वाटत होती. पैसे मागत नव्हते, खायला द्या म्हणत होते. बाजूला सँडविचवाला होता त्याला पन्नास रुपये दिले आणि म्हटलं, दोन सँडविच दे यांना. पैसे दिले म्हणून ग्रेट झालो अशातला भाग नाही. त्या मुलाच्या मनावर भुकेमुळे जे ओरखडे उमटले असतील त्या दिवसांत त्यांच्या विचाराने अजूनही वाईट वाटतं.
***

बुफे पद्धत. आपली पचनशक्ती किती चांगली आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी अशावेळी प्रत्येकजण कटिबद्ध असतो. रांगेने मांडून ठेवलेला एखादा पदार्थ आपण चाखला नाहीतर अन्नपूर्णा देवी आपल्यावर रुष्ट होईल अशी बहुतेकांची समजूत असते.लोकांना किती खावं याचा अंदाजच येत नाही. मग अन्नाने भरलेली ताटे टाकून दिली जातात. अशावेळी प्रेमचंदांच्या "बूढी काकी"कथेची आठवण येते अन मन विषण्ण होते.

***

चार्लीच्या मॉडर्न टाइम्स मध्ये नायिका ब्रेड चोरी करताना पकडली जाते तेव्हा चार्ली तो आरोप स्वतःवर घेतो.
नायिकेच्या नजरेत तो हिरो ठरतो, पण तुरुंगात जाण्याची चार्लीची हौस दांडगी, कारण तुरुंगात जेवण मिळण्याची असलेली  खात्री. बाहेरच्या बेभरवशाच्या बेकारीच्या वातावरणात उपाशी मरण्यापेक्षा तुरुंगवास पत्करलेला बरा. पुढे त्याचे जे स्वप्नरंजन दाखवलंय त्याला तोड नाही. दोघांचा संसार, मोठं घर, दारात असलेली दुभती गाय, अन्नाचा नसलेला तोटा आणि हाती असलेलं काम. बायको दारापर्यंत सोडायला येते वगैरे.
गोल्ड रश मधल्या बूट खाण्याच्या प्रसंगाबद्दल तर किती लिहावं !

***

भूक माणसाला अगतिक करते. कधी कधी आपला स्वाभिमान विसरायला भाग पाडते. भूक आहे म्हणून जगाचा गाडा चाललाय. माणसं मेहनत करताहेत. आयुष्यातून पोटाच्या भुकेची काळजी एकदा गेली तर अन्य महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देता येते.

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा