चांदण्या रात्री आकाशात एक प्रकाशाचा लुकलुकता ठिपका दिसला.. तो हळूहळू मोठा होत गेला.. मग कळलं विमान आहे ते.
मी पाहिल्यांदा केव्हा विमानप्रवास केला हे मला आठवतंय. २०१६ सप्टेंबर मध्ये. जेव्हा मी नवीन ठिकाणी जॉबला लागलो आणि आठवडाभरात ट्रैनिंग साठी बंगळूरला पाठवायचं ठरलं. मी जरासा बुजलेला होतो. एअरपोर्टवर गेल्यावर काय करायचं, बोर्डिंग पास कसा मिळवायचा, सोबतच्या सामानात काय न्यायला परवानगी आहे, काय नाही याबद्दल मी Quora वर बरंच वाचलं,मनात खूणगाठी केल्या आणि लढाईला निघाल्यासारखं 'हर हर महादेव' म्हणत घर सोडलं. काहीही झालं तरी बावळट दिसायचं नाही हा निश्चय ठाम होता. आपल्याला फर्राटेदार इंग्रजी बोलता येतं त्यामुळे कुठलाही शाब्दिक हल्ला आपण सहज परतवू शकू याचं मानसिक बळ गोळा करत मी एअरपोर्टवर पोचलो. माझ्या अपेक्षांना कात्री देत फार काही इंग्रजी न पाजळता मी चेक-इन, security, बोर्डिंग पार करत विमानात जाऊन बसलो. विंडो सीटचा प्रेफरेन्स आधीच दिल्याने खिडकीतून बाहेरचं जग पहायला मिळणार याची उत्सुकता होती. आकाश पाळण्यात बसल्यावर जशी असते तशी. मग इतर सोपस्कार पार पडल्यावर सुरक्षेच्या सूचना झाल्या. रनवे वर विमान पोचलं. विमानाने टेक-ऑफ घेतल्यावर पोटात वर-खाली झालं. एकदाचं ते त्याच्या मनाजोगत्या उंचीवर पोचल्यावर कप्तान साहेबांनी 'खुर्ची की पेटी' बांधण्याचे 'संकेत' बंद केले.
विमानातून खालच्या इमारती, रस्ते, डोंगर इवलुसे दिसत होते. हा पसारा केवढा भव्य आहे. आपण या सर्व पसाऱ्यात केवढेसे. माणसाने प्रयत्न करून आकाशात पण स्वतःच अस्तित्व तयार केलंय. हे सर्व कुतुहूलमिश्रित डोळ्यांनी पाहत असताना अचानक ऐरहोस्टेस ने 'सर, Would you like to have something? विचारल्यावर भानावर आलो. मी त्या बयेच्या विनवण्या ऐकूनही काहीच घेतलं नाही. एक तर त्या सर्व वातावरणात आपण दबून गेलेलो असतो. आवाज आपसूक नरमाईचा होतो. दोन तासांनी जेव्हा बंगळूरला पोचलो आणि इतर सोपस्कार पार पडेपर्यंत पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. एअरपोर्टवर साधा चहाचा कप तुम्हाला शंभराला पडतो तेव्हा चहापत्ती दक्षिण ध्रुवावरून आणलेली असावी असं वाटतं.
हॉटेलकडे जात असताना ड्राइवरला मधे एखादं बरं ठिकाण दिसलं तर सांग बाबा असं म्हटलं. त्याने एका ठिकाणी थांबल्यावर मस्तपैकी इडली खाऊन भूक शमवली. काही दिवसांनी जेव्हा ऑफिस मधील सहकाऱ्याने सांगितलं कि flight मधलं खाणं-पिणं ऑफिसने आधीच बुक केलेलं असतं तेव्हा मात्र त्या ऐरहोस्टेस बयेच्या विनवण्याचा अर्थ लागला. ऑफिसच्या induction प्रोग्रॅम मध्ये बऱ्याच फालतू गोष्टी नवीन एम्प्लॉयीला सांगता तेव्हा अशा अत्यंत महत्वाच्या गोष्टी का बरे सांगत नाहीत?
गेल्या चार वर्षांत बरेच विमानप्रवास झाले. मी सराईतासारखा फिरायला लागलो. बरेचसे हॅक्स कळले. एकदा flight चुकल्यावर वेळेची गणिते कळली. हातात पुस्तक घेऊन बसल्याने विद्ववतेचा आव आणता येतो आणि कानात हेडफोन्स असले कि तुसड्यासारखं वागता येतं. विमान लँड झाल्याझाल्या आपण पॅसेजमधे उभं राहून जणू जग जिंकायला निघालेल्या नेपोलियनचे वंशज आहोत आणि लढाईसाठी उशीर होतोय असं दाखवता येतं.
मला जे हॅक्स कळलेत (एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये जी ज्ञानप्राप्ती झालीय) त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी फुकटात ज्ञान देत नसतो. सिद्धार्थाला देखील घर दार सोडून जावं लागलं होतं. तुमच्याही नशिबी खूप विमानप्रवास असावेत , त्यातून तुम्ही जग तुमच्या चष्मानं बघावं आणि या सर्व पसाऱ्याचा अर्थ लावावा ही सदिच्छा.
***
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा