शुक्रवार, १७ जुलै, २०२०

आठवणींचा कोलाज - घर
"मुझे एक मकान चाहिए 
जिसकी छोटी-सी क्यारी में
एक नन्हा-सा बिरवा रोप सकूँ 
जो केवल अपना हो 
जिसकी छत के नीचे लेटूँ 
तो सदियों से जगी मेरी आँखों में भी 
एक निजी सपना हो 
मैं एक छोटा-सा मकान खोज रहा हूँ 
ऊँची इमारतों वाले इस शहर में। 

- रामदरश मिश्र 


TIFR ला इंटर्नशीप करत असताना रोज समुद्राची गाठभेट व्हायची. तिथल्या लायब्ररीतून समुद्र दिसायचा. तिथल्या लोकांना मात्र त्याचं काहीच कौतुक नाही.(त्यांच्यासाठी नेहमीचाच तो) लंचच्या वेळेत तिथल्या कट्ट्यावर जाऊन बसायचो. संध्याकाळी घरी जाताना कुलाबा, कफ परेड फिरत बस चर्चगेटला यायची. आजूबाजूच्या उंच इमारती , समुद्राची जवळीक याचे अप्रूप वाटे. असाच एकदा संध्याकाळी परतत होतो. बसमध्ये माझ्या पुढच्या सीटवर एक नवविवाहित जोडपं बसलं होतं. बहुतेक मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायकचे दर्शन करून आले होते.(लग्न झाल्यावर या ठिकाणी जोडीने जायलाच पाहिजे असा अलिखित नियम असावा , आता त्यात टिटवाळ्याच्या गणपतीची पण भर पडलीय) मुलीने साडी नेसली होती, हातातल्या प्लास्टिकचा पिशवीत प्रसादाच्या चुरमुर्याचे पाकीट, पेढ्याचा पुडा, कुंकवाची डबी होती. मुलगा थोडासा बावरलेला होता. खिडकीतून तिला बऱ्याच गोष्टी दाखवत होता.उदा. ही अमुक एक वास्तू, इथे अमुक एक होतं वगैरे. त्यात आपल्याला या शहराबद्दल खूप माहितेय हा अविर्भाव होता. इम्प्रेशन मारण्याची फेज.
एका उंच इमारतीकडे डोळे विस्फारून पाहत एकाएकी त्या मुलीने म्हटलं,
 'आपलं असेल का हो असं एखादं घर ?'
यावर त्या मुलाने थोडं हसत उत्तर दिले - "असेल की"
या महानगरात सोबतीने बघितलेल्या एका नवीन स्वप्नाची ती नांदी होती.

 मुळातच घर ही फार सुंदर गोष्ट आहे, नवीन घराचे किंवा स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणारी व त्यासाठी झगडणारी माणसे मला फार ग्रेट वाटतात. ग्रेट यासाठी कि त्यात एक दुर्दम्य आशावाद आहे. नोकरीच्या, पोटापाण्याच्या शोधात माणसं स्थलांतरित होतात. नवीन शहरात, गावात "आशियाना" शोधतात. ऍड्जस्ट करतात स्वतःला. आम्हाला मराठीच्या पुस्तकात उपमा अलंकाराचं उदाहरण म्हणून पुढील वाक्य होतं -"मुंबईतील घरे म्हणजे कोंबड्यांची खुराडीच ". अरुंद  गल्लीबोळातून जाणारी, अरुंद अशी एकावर एक इमले असलेली फार लहान लहान घरं मी पाहिली आहेत. एका मित्राच्या घरातून नारळाचे झाड उगवले होते ते थेट छपरातून बाहेर, किंवा असे म्हणूया या झाडाभोवतीच त्यांनी झोपडी बांधली होती. मग या झाडाच्या खोडाला पिशवी, दप्तर वगैरे वस्तू अडकवल्या जात. काही घरांच्या लादीतून पावसाळ्यात पाणी उफाळे. काहींच्या छपरातून पाणी गळे. पावसाळयाच्या सुरुवातीला मग पत्र्यांवर डांबराचा थर चढवला जाई.

घरांचा स्वभाव त्यांच्या घरमालकाप्रमाणे बदलतो. कुठे फक्त चहा मिळणार आहे आणि चहा पिल्यावर निवांत गप्पा मारता मारता जेवणाचा आग्रह कुठे होणार आहे हे घरमालकाच्या स्वभावावर ठरतं. काही घरांत आब राखून अवघडून बसावं लागतं, जीव गुदमरतो तर काही घरांत बिनदिक्कत जमिनीवर फतकल मारून बसता येतं. काही घरांत ओठातल्या ओठांत खोटं हसत समोरच्या श्रीमंतीकडे पाहावं लागतं तर कुठे गगनभेदी हसण्याने मन मोकळं होतं.

"No one realizes how beautiful it is to travel until he comes home and rests his head on his old, familiar pillow." हे जे लिन युतांगने म्हटलंय ते १००% खरंय.

माझ्या मते घर म्हणजे सोयी सुविधा नव्हेत. उंची फर्निचर नव्हे. स्केवर फूटचं गणित नव्हे. घर बनतं माणसांमुळे.
लहानपणी उन्हाळाच्या सुट्टीनंतर मुंबईला परतल्यावर आजी म्हणायची "तुम्ही होतात तेव्हा गजबजलेलं होतं, आता एकटं घर खायला उठतंय". अंगणात पायरीवर बसून रातकिड्यांचे आवाज ऐकत आम्ही आजीची गोष्ट ऐकत असू.  घर बांधताना माझे बाबा आणि काका किती लहान होते आणि तरीही खेळण्याच्या गाडीतून कसे वाळू आणायचे, कसे चिखलात खेळायचे, हा पायरीचा भला मोठा लाल दगड कसा आणला, कुठं उसाचं गुऱ्हाळ होतं वगैरे गोष्टी आम्ही तल्लीन होऊन ऐकत असू.
कुणास ठाऊक घरांना बोलता येत असतं तर त्यांनी सगळ्या पावसाळयांचा हिशोब मांडला असता. पणजोबांच्या वेळेची हकीकत पोक्त आजोबांप्रमाणे दाढी कुरवाळत सांगितली असती. लहान मूल दुडू दुडू धावताना पडल्यावर मायेची हाक घातली असती. माजघरातील नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा चोरटा प्रणय बघून गालातल्या गालात हसलं असतं.

विश्वास पाटलांच्या 'झाडाझडती' मध्ये एक प्रसंग आहे. धरणासाठी एक अख्ख गाव विस्थापित होणार असतं. गाव सोडून जाण्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री एक अधू म्हातारे आजोबा घराच्या भिंती चाचपडत असतात. घराला पारखं होण्याआधी त्यावर मायेचा हात फिरवत, त्याचा स्पर्श साठवत. आजी तिच्या शेवटच्या आजारपणात सतत गावच्या घराचा उल्लेख करी. मला मरण माझ्या घरात येऊ दे म्हणत राहिली. आता ती नसलेल्या घरात आम्हाला घर खायला उठतं.


***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा