गुरुवार, १३ जून, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 14 June

 1. गामक घर आणि माधव ज्युलियन यांची कविता 


'गामक घर' हा मैथिली भाषेतला 2019 चा चित्रपट आहे. ही तीन पिढ्यांची 'घर' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन सांगितलेली कथा आहे. 1998, 2010 व  2019 या काळात कुटुंबातील नात्यांत, घरात काय बदल झालेत हे दिसतं. लग्न, बारश्यासारख्या समारंभात आधी एकत्र येणारं कुटुंब, माणसांच्या राबत्यामुळे गजबलेलं घर- हळूहळू कर्ती माणसे निवर्तली कि ओसाड -दुर्लक्षित  पडलेलं विदारक वाटतं. जागतिकीकरणामुळे शहरं माणसांनी ओसंडून वाहू लागली तर एकीकडे गावं ओसाड व भकास झालीयेत. नात्यांत देखील तो पूर्वीसारखा ओलावा राहिला नाही. 

माधव ज्युलियन यांच्या कवितेत बालपणीच्या घराबद्दलच्या आठवणी आहेत. जे हरवलंय त्याची नोंद आहे. 
आमुचे घर छान
शेजारी वाहे ओढा
कागदी होड्या सोडा
दूर जाती II १ II

चतुर नव्हे तर
अभ्रकी पंखांचे ते
 विमान उडे तिथे
उन्हामाजी II २ II

उथळ वाहे पाणी
नितळ थंडगार
नाचता त्यात फार 
मौज वाटे II ३ II 

पाहून अंग ओले 
भरते रागे आई
मागून देई काही 
खाऊ गोड II ४ II 

आमुचे घर छान 
परसू लांब रुंद
मोगरा जाई कुंद 
फुलतात II ५ II

खोबरे झेंडूतील 
मागतो सदा बाळ
झेंडूचा पहा काळ 
खोडकर II ६ II

अडूळशाची फुले 
देठात थेंब गोड
करितो गोड तोंड 
मुलांचे तो II ७ II

सोलून कोरफड 
पाण्यात धुता साफ
बर्फ हो अपोआप 
काचेवाणी II ८ II

आमुचे घर छान 
म्हणती आम्हा द्वाड
करितो परी लाड 
बाबा-आई II ९ II

अंगणी सरावल्या 
खडूने काढू शिडी
लंगडी चढोवढी 
खेळायचा II १० II

घरात जिन्याखाली 
ताईचे घरकुल
खड्यांची थंड चूल
पक्वान्न दे II ११ II

भांडून केव्हा केव्हा 
म्हणतो जा फू गडी!
लागेना परी घडी 
एक व्हाया II १२ II

आमुचे घर सान 
आता ते कुठे गेले
बाल्याचे हे भुकेले 
मन पुसे II १३ II

2. Absolute Khushwant

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. खुशवंत सिंगांबद्दल खूप ऐकलेलं. दर रविवारी HT मधे येणारे त्यांचे सदर (Between us) वाचत होतोच, पण मुद्दाम निवडून पुस्तक वाचावं असं वाटलं नव्हतं. मित्रांनी 'Train to Pakistan" वर तोंडभर स्तुती केली होती. लाइब्रेरीत 'Absolute Khushwant' वाचायला घेतलं आणि तासा दोन तासांत जे काही वाचलं त्यामुळे मी अक्षरश: भारावला गेलो. त्यानंतर ते माझ्या रीडिंग लिस्टचा भाग झाले. ताजं, खुसखुशीत आणि निर्भीड (बोल्ड) लिखाण ही त्यांची खासियत. त्याच पुस्तकात 'माझ्या आयुष्यात आलेल्या बायका', 'माझ्या लेखक असण्यावर' 'दिल्ली शहरावर' हे लेख आहेत. मुळापासून वाचावे असे हे लेख. "जर तुम्ही पत्रकार असाल तर दिल्ली शहरात तुमच्यावर उपाशी मरण्याची पाळी कधीच येणार नाही, इतक्या रोज परिषदा Conference होत असतात, त्यानंतर खाण्याची (आणि पिण्याची) सोय असते" हे त्यांचेच उद्गार. रोखठोकपणा हा जगण्याचा आणि पर्यायाने लेखनाचा स्थायीभाव. त्यांना एकाने त्यांच्या लेखक असण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मस्करीत म्हटलं होतं "क्या पूछते हो मेरे कारोबार का हाल, बेचता हूँ आइनें अंधो के शहर में".

3. What You Missed That Day You Were Absent from Fourth Grade

असं तुमच्यासोबत कधी झालंय का कि तुम्ही शाळेला दांडी मारलीत आणि त्याच दिवशी नेमकं काही महत्वाचं घडलंय  किंवा शिकवलंय? दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मग मित्रांनी ते तिखटमीठ लावून सांगितलंय? 

What You Missed That Day You Were Absent from Fourth Grade ही कविता पण त्याच कल्पनेतून कवीला सुचली असावी. संपूर्ण कविता वरील लिंक वर आहे. या कवितेत तो / तीने  चौथ्या इयत्तेतील एक दिवस शाळेला बुट्टी मारल्यामुळे काय हुकलंय याची यादी आहे. तुम्ही जर या गोष्टी नीट पाहिल्यात उदा. 

how to stand still and listen to the wind किंवा  how peeling potatoes can be a form of prayer तर असं लक्षात येईल कि या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत.  त्या अभ्यासक्रमाचा भाग नसतात. 

The English lesson was that I am

is a complete sentence.

मोठं झाल्यावर, संकटांना तोंड देताना असं वाटतं ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या असत्या तर बरं झालं असतं. 

तरी देखील कवितेतील Mrs. Nelson सारखे असे काही शिक्षक असतात जे अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला घडवत असतात. आपल्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असतो. 

ही कविता Poetry Unbound: 50 Poems to Open Your World' या कवितासंग्रहात आहे. 



4.कानगोष्टी: In the Wee Small Hours of the Morning

Song by Frank Sinatra


5. Watchlist: 

आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पु. ल. देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा