सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

बालपणातल्या हिरोंसोबत


             दिवाळीच्या निमित्ताने घरात साफ़सफाई सुरु होती. आईने अचानक फर्मान सोडलं की, माळ्यावर पेटीत जी काही रद्दी साठवून ठेवली आहेस, ती एकदाची बाहेर काढ ! या घरात राहायला आलो त्याला आता पाच -एक वर्षे झाली. सामान आवरण्याच्या गडबडीत जुन्या घरातील माझी सर्व जुनी वह्या पुस्तके त्या पेटीत भरली होती. रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा मुहूर्त साधून ती पेटी उघडली. वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या फायली, निबंध व चित्रकलेच्या वह्या आणि गोष्टींची खूप सारी पुस्तके.  एक एक वस्तू मला  भूतकाळात नेणारी.  ताम्हणकरांच्या "गोट्या"चा अख्खा संच, चंपक, चांदोबा, ठकठकचे काही अंक, चित्रकलेच्या वहीतील "याला चित्रकला म्हणतात का" असं वाटायला लावणारी चित्रे आणि रोजच्या सुविचारापासून मोटार गाडीच्या चित्रापर्यंत कशाचही कात्रण असलेल्या फायली, रंगपेट्या.   मी प्रत्येक गोष्ट अगदी निरखून पाहतोय म्हणून आईचा पारा चढला पण मी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं.  यातल्या प्रत्येक गोष्टीसोबत एक एक आठवण जोडली गेली होती
             चित्रकलेच्या वहीत "डक टेल्स" मधील संपूर्ण "स्क्रूज" फॅमिलीचं रेखाचित्र सापडलं. माझा अत्यंत आवडता कार्टून शो. दर गुरुवारी संध्याकाळी बरोबर पाचच्या ठोकयाला "ज़िन्दगी तूफानी है" असा कोरस आमच्या घरातून ऐकू यायचा. अत्यंत कवडीचुंबक पण श्रीमंत असलेला म्हातारा अंकल स्क्रूज मैकडक, अंकल डोनाल्ड डक नौदलात गेल्याने स्क्रूजकड़े राहायला आलेले त्याचे तीन अतिमस्तीखोर पुतणे लुई - ड्युई  - ह्युई, विमान चालवणारा बेभरवशाचा पाइलट लॉन्चपैड मैकक्वेक आणि  अंकल स्क्रूजला रस्त्यावर आणायला टपलेले त्याचे शत्रू ; असा सगळा प्लॉट असल्यावर धमाल ठरलेलीच. स्क्रूजला आपला पैसा सतत वाढतच कसा जाईल याची काळजी. स्वतः च्या पैशाने भरलेल्या गोदामात तो स्विमिंग पूल सारखा पोहे व क्षणात किती  पैसे आहेत हेही त्याला कळे. मला  सर्वात जास्त आकर्षण वाटायचं त्याच्या लकी कॉइनचं, त्याची आयुष्यातली पहिली कमाई.  हा कॉइन त्याच्याकडून हिसकावून घेतल्यास तो दरिद्री बनेल म्हणून त्याचे शत्रू अनेक मार्ग वापरतात पण हार मानेल तो अंकल स्क्रूज कसला ! त्याची पूर्ण फॅमिली त्याच्या सोबत असते, मग ती संकटे अत्यंत दुर्गम अशा वाळवंटातील असो वा नव्यानेच शोधलेल्या कुठलेश्या समुद्रप्रदेशातील असोत. मी पण एक कॉइन सतत सोबत ठेवायचो जेणेकरुन लवकर श्रीमंत होईल.
              उन्हाळ्यात शाळेला सुट्टी पडली की शेजारच्या ताईकडे असलेल्या चांदोबाच्या पुस्तकांत आम्ही डोके खुपसून तासनतास बसत असू. ताईच्या बाबांनी चांदोबाचे खूप जुने अंक बाइंड करुन  ठेवले होते.  तिचा आम्हाला अजूनही हेवा वाटतो . चांदोबा मधील पात्रांची नावे अगदी कठीण असायची.  संस्कृतप्रचूर वगैरे. जगाच्या पाठीवर कुठले आई -बाप आपल्या मुलांची नावे अशी कठीण ठेवत असतील असं आम्हाला वाटायचं. त्यातील विक्रम वेताळच्या गोष्टी वाचून विक्रम राजाला दुसरा कामधंदा नाही का ? किंवा एका रात्रीत वेताळ  इतक्या गोष्टी सांगतोय, तर त्याने त्या कुणाकडून ऐकल्या, असे प्रश्न मला पडायचे. गोष्टीच्या सुरुवातीला  विक्रम राजाच्या हातात तलवार आहे, भोवताली काळशार जंगल व त्यात हिरवी झाडे आहेत, जमिनीवर ठिकठिकाणी कवटींचा खच पडलाय असं चित्र असायचे. चांदोबातील चित्रेही बोलकी असायची.  मध्यंतरी एकदा रेलवे स्टॉलवरून चांदोबाचा अंक विकत घेतला. चांदोबातील चित्रे आज ही सुरेख असतात पण बदलत्या वाचकवर्गाचा विचार करताना गोष्टींचा दर्जा मात्र खालावलाय. "चंपक" आणि "ठकठक" नंतर आवडेनासे झाले.
         "गोटया"चा संच मीच विकत घेतलेला. त्यातील गोटयाच्या करामती अजूनही फ्रेश वाटणार्या. आगगाडीतून प्रवास करताना इतकी मोठी आगगाडी एवढ़याश्या साखळीने कशी थांबू शकते ? म्हणून साखळी ओढणारा भाबडा गोटया, व्याख्यात्यांनी यायला नकार दिला म्हणून रद्द होत असलेली शाळेतली व्याख्यानमाला चालू रहावी म्हणून कुंभार, सुतार, मदारी यांना व्याख्याते म्हणून बोलवणारा चतुर व प्रसंगवधानी गोटया मला हिरो वाटायचा.
         त्यावेळी आवडणारे हिरो वेगळे होते.  आता आवड बदलली असेल वय वाढल्यामुळे. रविवारी दुपारी दूरदर्शन वर येणारा "शक्तिमान" त्यातील पत्रकार पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री मुळे आवडायचा. त्याचं ते बावळट ध्यान,  गीता विश्वासला "देवीजी" म्हणून पुकारण, त्याचा तो चक्रमपणा खूप हसवायचा. संकटात असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शक्तिमान यायचा.  एक हात वर करून दूसरा हात कमरेवर ठेऊन गोल गोल फिरताना तो हवेत उड़त उड़त इच्छित स्थळी पोहचायचा. अशा वेळी सरकारी कचेरीतील टेबल फैन सारखा आम्ही तोंडाने झू s s झू झू आवाज करायचो. शक्तिमान योगासन करताना पाठीच्या कण्यावर सात चक्र दिसायची व ती फिरत असायची. आमच्या सामान्य  विज्ञान भाग २ च्या पुस्तकात याचा कुठेच उल्लेख नव्हता. शक्तिमानच्या लोकप्रियतेमुळे त्याच्यासारखी कपडे, त्याचे चित्र असलेली स्टीकर्स बाजारात आलेली होती.मी निबन्धाच्या वहीला शक्तिमानचा स्टीकर लावला होता तेव्हा भर वर्गात बाईंनी या "शक्तिमान"ने नंतर स्टाफरूम मधे येऊन वही घेऊन जावी असं म्हणून माझा चांगलाच पानउतारा केला होता.
          "मालगुडी डेज" मधील स्वामी आणि त्याचे दोस्त मला खूप जवळचे वाटायचे. पुस्तकाच्या शेवटी राजनच्या वडिलांची बदली होऊन तो गाव सोडून जातो आणि त्याची आणि स्वामीची भेटही होत नाही हे वाचल्यावर मला अतिशय वाईट वाटल होतं. राजन आपल्याला लक्षात ठेवेल का असा प्रश्न स्वामीला पडतो जर आर. के. नारायण मला भेटले असते तर मी त्यांना नक्कीच विचारलं असतं की मोठेपणी तरी ते एकमेकांना भेटलेत का ?
             "श्यामची आई" पुस्तक मला बक्षिस मिळालेलं, त्यातील श्याम सारखा समंजस मी त्या वयातही नव्हतो. पुस्तक वाचून रडल्याचं तेवढं आठवतं. खाऊच्या पैशातून स्वतः च्या भावासाठी कोट शिवणारा श्याम त्या वयात जितका समंजस, धाडसी होता तितका मी किंवा  माझ्या वयाची मंडळी होतो का असाही प्रश्न मला पडतो.
            खूप वर्षांनंतर उघडलेली पेटी मला परत बालपणात घेऊन गेली. माणसाने असचं वेळात वेळ काढून स्वताच्या बालपणात परत एकदा जावं, त्यात फार काळ रमू नये पण ती निरागसता सतत जोपासावी. पीटर पैनच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाने या जादुई दुनियेतील आपल्या मनातील परींच राज्य जपावं.


           






२ टिप्पण्या: