सोमवार, २ जून, २०१४

निकाल शिक्षणाचा

आज बारावीचा निकाल लागेल आणि संध्याकाळी शेजार पाजारच्या यशस्वी मुलांकडून पेढे मिळतील. "किती टक्के मिळाले रे?"  अशी  विचारपूस होईल. ज्यांना  जास्त टक्के मिळाले असतील त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा ऊर अभिमानाने भरून येईल. जे जेमतेम पास झालेत त्यांना 'सुटलो बुवा एकदाचे" या फीलिंग बरोबर आणखी थोडे मार्क्स जास्त पडायला हवे होते असे वाटेल. ज्यांचा फर्स्ट क्लास थोडक्यात चुकला किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले त्यांचा चेहरा पडलेला असेल आणि जे नापास झाले असतील त्यांच्या घरी कुणीतरी गेल्यासारखं वातावरण असेल.

प्रसंग साधारणतः असा असेल :

मिलिंद कोपर्यात रडत बसलेला. किचन मधे आई भाजी चिरताना टिपं गाळत असेल, पदराने मधूनच डोळे पुसत असेल. धाकटा भाऊ आज TV बंद म्हणून पलंगावर एका बाजूला बसून काहीतरी वाचण्याच्या प्रयत्नात आणि बाबा शून्यात नजर लावून बसलेले.
घरात तीव्र स्मशानशांतता.  कुणीच कुणाशी बोलत नाही.
इतक्यात मिलिंदचा मित्र माधव पेढे घेऊन येतो. मिलिंदचे बाबा पेढा घेतात आणि मिलिंदकडे रागीट कटाक्ष टाकून माधवला म्हणतात "शिकव जरा आमच्या नालायकाला पण. नापास झालेत, आमच्या अख्ख्या खानदानात कुणीच नापास झालं नाही. अब्रू धुळीला मिळवली सगळी.  दिवे लावले ! आता बसा वार्या करीत बोर्डाच्या." माधवला काही बोलायचं सुचत नाही. तो दोन मिनिटे शांत ऐकून घेतो आणि "बराय येतो" म्हणून निघून जातो.

स्वगते:
बाबांना उद्या ऑफिसमधे सहकार्यांना काय सांगू असा प्रश्न पडलेला. जोश्याच्या मुलीला नेहमीप्रमाणे चांगले टक्के मिळाले असतील. उद्या तो सर्वांना पार्टी देईल. "तुमचाही मुलगा होता ना हो बारावीला? किती मिळाले?" असा प्रश्न विचारल्यावर काय सांगू? त्यापेक्षा उद्या ऑफिसला जातच नाही. मेडीकल बाकी आहेत, त्याच टाकूया. काय नाही केलं मुलासाठी? परवडत नसताना विलेपार्ल्याला भरभक्कम फी वाला क्लास लावला. परीक्षेच्या काळात त्याच्याबरोबर रात्र रात्र जागलो.  कॉफी करून दिली. ऑफिसमधे रजा टाकली.
आता काय होणार आहे पुढे देव जाणे! चांगला शिकून इंजीनिअर व्हावं इतकं साधं स्वप्न नाही पूर्ण करू शकत? काय कमी ठेवलं, जे मागेल ते दिलं. आमच्या वेळी नव्हत्या इतक्या सोयी, म्हणून आपल्या मुलांना काही कमी पडू द्यायचं नाही असं वाटतच ना आम्हाला.

मिलींदची आई शेजारी काय म्हणतील या विचारात.

आणि मिलिंद "नापास होणं हा इतका मोठा अपराध आहे का?" या विचारात. "आपल्याला या किचकट गणितात आणि सायन्समधे काडीचाही रस नाही, हे किती वेळा सांगितलं आपण यांना. अकरावीला प्रमोट झालो तेव्हाच सांगितलं, पण बाबांनी काही ऐकलं नाही. मोठा क्लास लावला. मला खरं तर इतिहासाची खूप आवड आहे, जुन्या काळाविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यातला सन - सनावळ्या पण अचूक लक्षात राहतात. दहावीला समाजशास्त्रातच जास्त मार्क्स होते. बाबांनी सायन्स घेऊन दिलं, खानदानात अजीतकाका सारखा आणखी एक इंजीनिअर व्हावा असंच त्यांना वाटतंय. आता CET चा निकाल पण असाच असेल, तेव्हा पण ओरडणार.  मला का जाऊ देत नाहीयेत माझ्या मार्गाने?"

वरील प्रसंगात बारावीचा निकाल होता, त्याजागी कुठलीही परीक्षा ठेवा. फरक पडत नाही. प्रत्येक निकाल हा घरच्यांसाठी निकालच असतो. गुणवत्ता यादी जाहीर करण्याची अमानुष पद्धत बंद झाली हे एक बरं झालं. नाहीतर त्यात स्थान मिळालं नाही म्हणून खट्टू होणार्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा  मोठा वर्ग समाजात होता. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनी पुढे काय केलं यावर संशोधन झालं पाहिजे.

नापास झालेल्या मुलांकडे एकंदरीत समाजाचा दृष्टीकोण बदलायला हवा. नापास होणं हा काही अपराध नाही. नापास होण्याच्या भीतीने किंवा नापास झाल्यामुळे आत्महत्या करणार्यांची संख्या कमी नाही.
नापास झालो म्हणून जीवनच संपवूया असं यांना का वाटतं? हे तर शिक्षणाच्या मुलभूत उद्देशाच्या विरुद्ध आहे. शिक्षणाने तुम्हाला जगायला सक्षम बनवलं पाहिजे. तुमच्या क्षमतांची ओळख करून दिली पाहिजे. भोवतालच्या घटनांची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून त्या परिस्थितीत कसं वागावं याचं आकलन होईल. असं घडतं का हो?

सध्याचं शिक्षण तुम्हाला फक्त डीग्री मिळवून देतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या डीग्रीने काय करता याची ना तुमच्या शिक्षकांना फिकर ना समाजाला. विद्यापीठे म्हणजे मागणी तसा पुरवठा देणारे कारखाने झालेत.
बाजारात व्यवस्थापक हवेत, मग MBA चा कारखाना काढा. तंत्रज्ञ हवेत, मग काढा Technical Institutes.
अशा कारखान्यातून हजारो तरुण बाहेर पडतात नोकरी शोधायला. बाजाराची जितकी गरज असेल तितक्यांना नोकर्या मिळतात आणि बाकीचे बेरोजगार. कारण मिळालेल्या शिक्षणाने जगायला सक्षमच बनवलं नाही.
पोटार्थी शिक्षणाने हजारो बेरोजगार  B. Ed. आणि D. Ed. पदवीधारकांची पिढी घडवली, आता त्यात बेरोजगार इंजीनिअरही येताहेत.  B. Ed. आणि B. E. करून कॉल सेंटरमध्ये काम करणारे मित्र पाहिले की वाईट वाटतं. "अमुक एक कर त्याला भविष्यात स्कोप आहे" असे  सांगणाऱ्या उपदेशक मंडळींचा मला भयंकर तिटकारा आहे.
सब घोडे बारा टक्के पद्धतीचे शिक्षण एकाच छापाचे गणपती तयार करतेय. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे याची जाणीवच नाही.
नापासांना आपण "नालायक" आहोत असे वाटतंय तर बेरोजगारांना आपल्या शिक्षणाच्या उपयोगाबाबत संभ्रम आहे.

खूप पैसा मिळवणं हे काही शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाही पण शिक्षणसम्राटांचे आहे. One time investment मुळे देशभर  विद्यापीठांचे पीक आलंय. कधी नव्हे ते लोकांना शिक्षणाचे महत्व पटलंय पण कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे हे माहित नाहीये. पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर ठेवताहेत. मुलाला कशात रस आहे हेच पाहत नाहीयेत. त्यात डॉक्टर, इंजीनिअर, MBA  वगैरे व्हावं अशी इच्छा. त्यांना सांगावं वाटतं की, खलिल जिब्रान वाचा. तो सांगून गेलाय -
"Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you."
… You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
मुलाला चित्रकार व्हायचंय… होऊ द्या. . रंग विकत घेऊन द्या, आणि  त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे रंग पहा.
मुलाला लेखक व्हायचंय. . होऊ द्या. . पुस्तके विकत घेऊन द्या, लेखक कसा घडतो ते जाणवून द्या.
करीअरच्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, फक्त क्षेत्र निवडताना मुलाची आवड, अभ्यासाची क्षमता लक्षात घ्या. या निर्णयप्रक्रियेत मुलाला प्रत्यक्ष सहभागी करा. नापास झालेल्या मुलाला खर तर तुमच्या प्रेमाची जास्त गरज असते. विझू जात असलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी घरचांच्या मदतीची खरी गरज असते. नापास होणं म्हणजे काही इभ्रतीला लागलेला बट्टा नव्हे. अपयश येतंच. त्यात अडकून न पडता त्यावर मात करायला जिगर लागतं. यशस्वी माणसाची ओळख तो किती अपयशातून यशस्वी झाला यावरच ठरत असते. 

1 टिप्पणी: