रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

वाचायची राहून गेलेली पुस्तके

घरात पाऊल टाकलं की टेबलावर असलेला पुस्तकांचा ढीग नजरेस येतो. कितीक दिवसांपासून ती अशीच पडली आहेत. त्यातील बरीचशी अर्धी वाचून ठेऊन दिलेली, काही संदर्भासाठी कपाटातून काढलेली, काहींचं पहिलं पानही न उघडलेलं. वीस - तीस असावीत. आईची सतत भुणभुण की पसारा आवर. पसारा आवरायला घेतला कि मी हटकून एखाद्या पुस्तकाच्या पुन्हा प्रेमात पडणार, एखादा paragraph वाचता वाचता एक तास त्यात जाणार. पुलंनी लिहिलेला 'निळाई' लेख, फक्त एकदा नजरेखालून घालतो म्हणून वाचायला लागलो तर थेट वेनिसला जाऊन पोहोचलो. आईने तासाभराने आठवण करून दिली तेव्हा कुठे भानावर आलो.
आम्हा पुस्तकवेड्यांना स्थळ, काळ याचं भान राहतच नाही. फोर्टच्या रस्त्यांवर पुस्तके विकणाऱ्या माणसांना आम्ही परग्रहावरचे वाटत असू. त्याने प्रदर्शनाला ठेवलेल्या पुस्तकांच्या एकदम तळाशी असलेलं एखादं पुस्तक आम्ही मागणार, त्याचा ब्लर्ब वाचणार, मुखपृष्ठ कौतुकाने पाहणार, किती जुनी आवृत्ती आहे हे बारकाईने पाहणार, मधली पाने व्यवस्थित आहेत ना, पानांचा वास घेऊन अंदाजपंचे किती जुनं आहे याचे मनोमन गणित करणार, कुणी बरं लिहिलं होतं / सुचवलं होतं या पुस्तकाबद्दल ? हे आठवत बसणार, तोपर्यंत उभ्याने दोन पायांच्या कवायती करून झालेल्या असतात, अर्धा एक तास पुस्तक आपण न्हाहाळत असतो. विक्रेता साड्यांच्या दुकानातील सेल्समनसारखा डोक्यावर बर्फ ठेवून विचारतो, 'लेने का है क्या?' मग आपण किंमत विचारणार, त्याने सांगितलेली किंमत अर्थातच आपल्याला पटलेली नसते. मग त्यावर घासाघीस. कुठल्याही परिस्थितीत पुस्तक हातून जाऊ द्यायचं नसतं आपल्याला. शेवटी तडजोड होते. चांगल्या पुस्तकाची किंमत नाही करता येत असा विचार करून आपण समाधान करून घेतो. नवीन पुस्तक प्रवासात वाचत घरी येतो, पुढचे दोन तीन दिवस अर्धं वाचून होतं मग कामाच्या व्यापात अर्धं तसंच राहून जातं. अशी अर्धी वाचून झालेली पुस्तके कपाटातून आपल्याकडे रागाने पाहत आहेत असे वाटते. 

एखादं पुस्तक इतकं खिळवून ठेवणारं असतं की एक - दोन दिवसातच वाचून पूर्ण होतं. फोरसिथ, ग्रिशमच्या कादंबऱ्या अशापैकीच. रात्र रात्र जागून कादंबऱ्या संपवण्याची नशा वेगळीच असते. गोनिदा, पेंडसे, यांच्या कादंबऱ्या रात्री जागून वाचलेल्या, 'पडघवली' वाचून संपवली तेव्हा पहाट होत होती आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि योगायोगाने कादंबरीच्या शेवटीही तशाच पावसाचे वर्णन आहे.
पुलंच 'अपूर्वाई' मला पूर्ण वाचायचंय, पण कधीचा मुहूर्त येईल ठाऊक नाही, गेल्या चार वर्षात मी ते चारदा विकत घेतलंय. कधी मित्रांनी ढापलं, कधी कुणाला वाचायला दिलं त्यांनी परतच केलं नाही.
काही पुस्तके गेल्या काही वर्षांपासून माझ्या रीडिंग लिस्ट वर आहेत. एका कुंद पावसाळी संध्याकाळी वाचण्यासाठी मी Eliot च्या कविता ठेवल्यात, गावी आमराईत बसून निवांत दुपारी वाचता येईल म्हणून फास्टर फेणे, फेलूदा घेऊन ठेवलेत. अधेमधे त्यातल्या काही साहसकथा वाचतो पण अथ पासून इति पर्यंत नाही.
बालकवींच्या कविता पूरवून वाचतोय. कधी एखादी कविता एक दिवस पुरते कधी महिनोंमहिने डोक्यात घुमत राहते. सुनीताबाईंच्या 'सोयरे सकळ' 'मण्यांची माळ' तसेच  माधव आचवल यांच्या 'किमया' मधील ललितलेख एका बैठकीत नाही वाचता येत. प्रत्येक लेख मनात हळू हळू झिरपावा लागतो.  जी. ए. कुलकर्णी ( Genius GA असं आम्ही मानतो ) यांची कथा परत परत वाचावी लागते तेव्हा कुठे त्यांनी योजलेल्या शब्दकळेचं सामर्थ्य आणि सौंदर्य ध्यानात येतं.
 एकदा तर असं ठरवलं कि एक पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचाच नाही. पण कितीही पक्का निर्णय केला तरी किमान तीन पुस्तके simultaneously (एकसमयावछ्चदेकरून) वाचायची सवयच लागली आहे. अशात बरीच पुस्तके अर्धी वाचायची राहूनच जातात. मित्र जेव्हा विचारतात कि इतकी पुस्तके वाचतोस केव्हा, त्यावेळेस वाटतं यांना सत्य परिस्थिती कुठे माहितेय?
 सध्या काय वाचतोयस? या प्रश्नाला मी अताशा खरं उत्तर देणे टाळतो, कारण हातातलं पुस्तक कधी संपवता येईल याची खात्री नाही. म्हणूनच ग्रंथालयातून ठराविक मुदतीसाठी पुस्तके आणणे मला जमत नाही.

पुस्तकांच्या बाबतीत मी आळशी आहे, पण काही झालं तरी पुस्तके  माझी कागाळी कुणाकडे करणार नाहीत, अबोला धरणार नाहीत किंवा रागावणार नाहीत, त्यांच्या पानांत दडवून ठेवलेली सुगंधी गुपिते सुरक्षित जपून ठेवतील. 




1 टिप्पणी: