तारलई गावाच्या वेशीवर मंडपवाल्या केश्याचं घर आहे. गावापासून तसं घर दूरच. आजूबाजूला जेमतेम दोन तीन घरं. पण ती रिकामीच. त्या घरातली माणसे मुंबई पुण्याला राहायला. जत्रेला दहा पंधरा दिवसांसाठी कुठे ती घरे माणसांनी भरून जायची. बाकी वर्षभर निरव शांतता असायची आसपास. गावातल्या बायका केश्याच्या बायकोला रंजनाला विचारायचे कि कसे राहता इतक्या लांब? माणसाची चाहूल नाय आजूबाजूला. रात्री जरा खुट्ट झालं तरी आमचा जीव वरखाली होतो, तुम्ही राहता कसे बिनघोर? रंजी म्हणायची कि आत्याबाय हायता, गुरं हायती मग कशाला घाबरायचं. केश्याचे बरेच उद्योग असायचे. मंडपासोबत त्याने लाऊड स्पीकर भाड्याने द्यायला सुरुवात केली, मग लोकांना ने आणायला जीप घेतली. हे सारे उद्योग सण समारंभासाठी पूरक होते. पण यासर्वांमुळे त्याला घरी यायला नेहमी उशीर व्हायचा . कुठे सप्ताह, दिंडी वगैरे असली कि दोन तीन दिवस घरी फिरकणं नसायचं. केश्याची आई भीमाक्का वयाने थकलेली, पण अगदी काटक बाई. सकाळपासून कामात असायची. सकाळी न्याहारी झाली कि सून गुरांना घेऊन रानात जायची. म्हातारी भीमाक्का घर सांभाळायची. घराच्या आजूबाजूला फिरून हिरवाट आणायची. गुरांचा गोठा झाडलोट करायची. केश्याला आणि रंजनाला मुलबाळ नव्हतं. केश्या घरी नसला तरी सासू सून गुण्यागोविंदाने राहायची. घरात नवीन टीव्ही घेतल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत तो चालू असायचा.
पाली जत्रा जवळ आली होती. केश्या जीप घेऊन दोन दिवसांसाठी पाली गावाला सकाळीच निघाला. सोबत गावातील पाच सहा जण सोबत होते. म्हातारीला व बायकोला सांगून गेला कि नीट ऱ्हावा. घरात फक्त त्याच्याकडेच मोबाईल होता. जर गरज पडली तर कदमांच्या घरी राजुला फोन करायला सांगावं लागायचं. दुपारपासून म्हातारीचं अंग भरून आलं. संध्याकाळी म्हातारी सुनेला म्हणाली मला जेवाया नगं, भूक न्हाय. तरी बळेबळेच रंजीने तिला भाकरी भाजी खायला लावली. साडे नऊ वाजले असतील, म्हातारी आतल्या खोलीत झोपायला निघून गेली. रंजीने सगळं आवरलं. झाकपाक केलं. नेहमीच्या सिरीयल बघितल्या. झोपायच्या आधी म्हातारीला विचारू म्हणून आतल्या खोलीत गेली तर म्हातारीची काहीच हालचाल नाही. आत्याबाय, झोपलाव का? तर एक नाही दोन नाही. अंग गरम आहे का बघायला तिने तिच्या कपाळाला हात लावला तर अंग थंडच पडलेलं. हलवून बघितलं तर म्हातारी गारच. रंजी भेदरली. रात्रीचे साडे अकरा वाजलेले. गावात डॉक्टर नाही. शेजारी कुणी गडीमाणूस नाही. नवऱ्याला फोन करून सांगावा धाडावा तर फोन नाही. म्हातारीला बरेच प्रयत्न करून जाग आली नाही तेव्हा तिला कळलं कि म्हातारीने जीव सोडला. आता करावं काय? तिने तडक पायात चप्पल सरकवली, दरवाजाला कडी कुलूप लावलं आणि गावात गेली. चांदणं टिपूर पडलेलं होतं. कुणाला काय सांगायचं हेच तिला कळत नव्हतं. रडायला तर येत होतं पण भीती जास्त वाटत होती. पहिल्यांदाच इतक्या रात्रीची ती गावाकडे निघाली होती. जत्रेच्या वेळेला रात्रीचा तमाशा असायचा गावातल्या शाळेसमोरच्या मैदानात, पण तेव्हा रस्त्याने माणसे असायची सोबत. भीती वाटायची नाही.
गावातील कुत्री अचानक भुंकायला लागली . गावात कदमांच्या घरी रंजी गेली आणि दार ठोठावलं. त्यांच्याकडे मंडळी जागीच होती. शुक्रवारचा पिच्चर लागलेला दूरदर्शनवर. तिने गेल्यावर सांगितलं कि आत्याबाय काय उठंनात. राजू, शेजारचे मारुती आण्णा, शेखरआप्पा केश्याचा घरी निघाले. राजूने केश्याला फोन करून निघायला सांगितलं. मारुतीआण्णा जवळ चार्जिंगची बॅटरी होती. डुक्कराच्या शिकारीला जाताना वापरत. केश्याच्या घरी सगळे पोचले. अंगणात पिवळा बल्ब पेटत होता. घराच्या आत गोठ्यात गाय हंबरत होती. रंजीने कुलुप उघडलं आणि दार ढकललं तेव्हा सर्वांनी जे पाहिलं त्यांने त्यांना कापरं भरलं. म्हातारीचं प्रेत उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलं होतं. रंजीने जाताना आतल्या खोलीत म्हातारीला झोपलेलं बघितलं असताना ती आता वटी, गोठा पार करून उंबरठ्यापर्यंत कशी येईल? कुणी काहीच बोलेना. म्हातारीचा जीव गेलाय याची सगळ्यांनी पुन्हा एकदा खात्री केली. राजुने फोन करून गावात वर्दी दिली आणि तयारीला लागायला सांगितलं. केश्या येईपर्यंत मढं जागवायला पाहिजे. म्हातारीला भिंतीला टेकवून बसवलं. नाकात कापूस घातला. माणसं जमू लागली. अंगणात खुर्च्या टाकून माणसे बसली. बायका आतल्या खोलीत रडू लागल्या. पुरुष मंडळी बाहेर बसून पुढचं काय करायचं यावर बोलत होती.
म्हातारीचं प्रेत आतल्या खोलीतून बाहेर आलं कसं दबक्या आवाजात विचारू लागली. कुणी म्हटलं- असेल थोडी धुगधुगी जीवात. कुणी म्हटलं रंजीने नीट बघितलंच नसेल,म्हातारी जिवंत असेल तेव्हा. कुणी म्हटलं जर कुलूप लावलंच नसतं तर?
रात्री अडीच तीनला सगळीकडे सामसूम होती. अंगणात माणसे पेंगत दबक्या आवाजात रात्र जागवत होते. घरात आतल्या खोलीत रंजीचे डोळे आणि गाल रडून रडून दुखत होते. चुलीवर सगळ्यांसाठी चहा कढत होता. बाहेरच्या खोलीत म्हातारीचं मढं देवळीजवळ भिंतीला टेकवून बसवलं होत. बाजूला उदबत्त्या लावल्या होत्या. म्हातारीच्या चेहऱ्यावर एक हलकीच स्मितरेषा उमटली.
***