Dear J,
आजच्या पोस्टाने तुझे पार्सल मिळाले. शेजारच्या पोस्ट ऑफिसला दोन तीनदा चौकशी केलेली न राहवून. गहाळ होण्याच्या भीतीनेच अंगावर काटा आलेला. 'मिळेल हो, कुठं जातंय, आलं नाही अजून इथं' अशी सारखी आश्वासक उत्तरं तामिळमधून मिळत होती . शेवटी एकदाचे सुखरूप मिळाले. ते मी आज नीट ड्रॉवरमधे ठेवले. लंचब्रेकला डिपार्टमेंटचे सगळे कॅन्टीनला गेल्यावर हळूच ते उघडले. पुस्तकावर तू प्लास्टीकचं कव्हर लावून पाठवलंस ते बरं केलंस, इथे गेले आठवडाभर पावसाची रीप रीप चालूच आहे.
संध्याकाळी घरी आल्यावर हार्डबॉउंड कव्हरवर हात फिरवत मी खूप वेळ बसलो. पुस्तकाच्या मूळ मालकाने त्यात काही ठिकाणी समासांत पेंसिलने नोंदी केल्यात. title page च्या बाजूच्या पानावर 'Lt Col Atul Sinha' लिहिलंय वळणदार अक्षरात. आणि तारीख ३ ऑगस्ट १९७७. म्हणजे ३० वर्षांनी हे पुस्तक माझ्या हाती लागलंय. त्याआधी पाच वर्षांपूर्वी ते पब्लीश झालंय. ३५ वर्षांचं वयोमान. बांधणी अजून घट्ट आहे. नीट काळजी घेतलीय पुस्तकाची.
कोण असतील हे कर्नल अतुल सिन्हा? का त्यांनी हे पुस्तक रद्दीत दिलं असेल? त्यांच्या समासातल्या नोंदी खूप विस्तृत आहेत. फिलॉसॉफीचे जबरदस्त रेफरन्स आहेत. त्यांचं पर्सनल कलेक्शन तर ग्रेटच असेल. लिन युतांगचा हवाला देऊन त्यांनी एके ठिकाणी अमेरिकन आणि चिनी माणसे वेळ कसा मोजतात ते लिहिलंय. अमेरिकन माणसे तीन महिने पुढचा विचार करून आयुष्य आखतात, उदा. अमुक एके दिवशी मी अमुक एका ठिकाणी अमुक एक करेन. टायपोग्राफिकल चुका अमेरिकन संपादक फार गंभीरपणे घेतात तर या उलट चिनी संपादक त्या चुका शोधल्यावर वाचकांना मिळणाऱ्या आनंदावर विरजण पडू देऊ इच्छित नाहीत. कधी कधी तर आपण एक कादंबरी क्रमशः छापतोय हेही ते विसरतात. यापैकी आताच्या धकाधकीच्या आयुष्यात किती टिकलं असेल माहित नाही.
पुस्तकासोबत बिल पाठवलं नाहीस. कळव.
Yours,
S.
२५/७/२००७
चेन्नई
PS: या कर्नल अतुल सिन्हांबद्दल काही कळालं तर सांग. त्यांच्या कलेक्शनमधली काही पुस्तके असतील तर मला यादी पाठव.
***
Dear J,
सोबत चेक पाठवत आहे. कर्नल अतुल सिन्हांच्या संग्रहातील मला हवी असेलेली पुस्तके तू पाठवलेल्या यादीत हायलाईट करून पाठवतोय. त्यांच्या मुलीशी तुझी भेट झाली हे मस्तंय. तुझ्यासारखा शेरलॉक तूच. युनिव्हर्सिटीच्या कामासाठी पुढचे दोन आठवडे तुतिकोरिनला असेन. आल्यावर तुला कळवीन. तोपर्यंत ही पुस्तके शोध.
Yours,
S.
Dear J,
इथला मुक्काम अजून लांबला. महिनाभर इथेच आहे. अजून काही आठवडे इथेच असेन. इथल्या गेस्ट हाऊसचा पत्ता पाठवतोय. वाचायला आणलेली पुस्तके संपली. शहर छोटंसं आहे आणि पुस्तकांचं मार्केट जवळपास नाहीय. काही घबाड सापडलं तर कळव. दुर्गा भागवतांचे 'वॉल्डेनकाठी विचार विहार' मिळेल का? सरूला हवंय. मी मुंबई मराठीला वाचलं त्याला काळ लोटला. त्याची झेरॉक्स करणार होतो संग्रहासाठी, पण मन धजेना. बघ मिळतंय का?
Yours,
S.
कर्नल अतुल सिन्हांच्या संग्रहातील पुस्तकांचे काय झाले? पाठवणार असशील तर चेन्नईच्या पत्त्यावर पाठव. उद्या इथला मुक्काम हलवतोय.
Yours,
S.
***
Dear J,
तीन किलोचं रजिस्टर पार्सल मिळालं आज. कृष्णमूर्ती म्हणून माझा कलीग आहे त्याला ह्या माझ्या पुस्तक संग्रहाचं फार नवल वाटतं. कर्नल साहेबांनी पुस्तके फार मेहनतीने जमवलेली दिसतात. देशोदेशीच्या भ्रमंतीचे ठसे आहेत. एक पुस्तक तर ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या लाइब्ररीने वीड आऊट केलेलं. एकावर व्हिएन्ना मध्ये विकत घेतलेला दुकानाचा शिक्का. पुढचे काही दिवस मस्त जातील. नवीन मोबाईल फोन घेण्याचा विचार आहे CDMA. तुला नंबर कळवीन.
तू बिल पाठवायला हयगय का करतोस? पैसे नकोयत का?
Yours,
S.
१२/११/२००७
PS: कर्नल साहेबांविषयी उत्सुकता आहे. येत्या पात्रात बिलासोबत त्यांच्याविषयी लिही.
चेन्नई
***
Dear J,
महिनाभराने तुझं पत्र आलं. कर्नल साहेबांनी कसं भरभरून आयुष्य जगलं आणि त्यांच्या पराक्रमाचे किस्से तू लिहिलेल्या पत्रातून वाचले. गेल्यावर्षी ते वारले हे वाचून खूप वाईट वाटलं. तू पाठवलेल्या एका पुस्तकात त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सापडला मला. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या संग्रहातील पुस्तकांचे सोयरसुतक नसल्याचे वाचून तर अजून वाईट वाटले. मी इथल्या युनिव्हर्सिटीत काहीतरी खटपट करतो. त्यांचा पूर्ण संग्रह कितीला मिळेल याची चौकशी कर.
बापरे एक भयानक विचार माझ्या डोक्यात वळवळू लागलाय. माझ्याही पश्चात माझ्या पुस्तकांना कसे दिवस येतील?
Yours,
S.
१२/१२/२००७
चेन्नई