शुक्रवार, १७ जुलै, २०२०

आठवणींचा कोलाज - घर




"मुझे एक मकान चाहिए 
जिसकी छोटी-सी क्यारी में
एक नन्हा-सा बिरवा रोप सकूँ 
जो केवल अपना हो 
जिसकी छत के नीचे लेटूँ 
तो सदियों से जगी मेरी आँखों में भी 
एक निजी सपना हो 
मैं एक छोटा-सा मकान खोज रहा हूँ 
ऊँची इमारतों वाले इस शहर में। 

- रामदरश मिश्र 


TIFR ला इंटर्नशीप करत असताना रोज समुद्राची गाठभेट व्हायची. तिथल्या लायब्ररीतून समुद्र दिसायचा. तिथल्या लोकांना मात्र त्याचं काहीच कौतुक नाही.(त्यांच्यासाठी नेहमीचाच तो) लंचच्या वेळेत तिथल्या कट्ट्यावर जाऊन बसायचो. संध्याकाळी घरी जाताना कुलाबा, कफ परेड फिरत बस चर्चगेटला यायची. आजूबाजूच्या उंच इमारती , समुद्राची जवळीक याचे अप्रूप वाटे. असाच एकदा संध्याकाळी परतत होतो. बसमध्ये माझ्या पुढच्या सीटवर एक नवविवाहित जोडपं बसलं होतं. बहुतेक मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायकचे दर्शन करून आले होते.(लग्न झाल्यावर या ठिकाणी जोडीने जायलाच पाहिजे असा अलिखित नियम असावा , आता त्यात टिटवाळ्याच्या गणपतीची पण भर पडलीय) मुलीने साडी नेसली होती, हातातल्या प्लास्टिकचा पिशवीत प्रसादाच्या चुरमुर्याचे पाकीट, पेढ्याचा पुडा, कुंकवाची डबी होती. मुलगा थोडासा बावरलेला होता. खिडकीतून तिला बऱ्याच गोष्टी दाखवत होता.उदा. ही अमुक एक वास्तू, इथे अमुक एक होतं वगैरे. त्यात आपल्याला या शहराबद्दल खूप माहितेय हा अविर्भाव होता. इम्प्रेशन मारण्याची फेज.
एका उंच इमारतीकडे डोळे विस्फारून पाहत एकाएकी त्या मुलीने म्हटलं,
 'आपलं असेल का हो असं एखादं घर ?'
यावर त्या मुलाने थोडं हसत उत्तर दिले - "असेल की"
या महानगरात सोबतीने बघितलेल्या एका नवीन स्वप्नाची ती नांदी होती.

 मुळातच घर ही फार सुंदर गोष्ट आहे, नवीन घराचे किंवा स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणारी व त्यासाठी झगडणारी माणसे मला फार ग्रेट वाटतात. ग्रेट यासाठी कि त्यात एक दुर्दम्य आशावाद आहे. नोकरीच्या, पोटापाण्याच्या शोधात माणसं स्थलांतरित होतात. नवीन शहरात, गावात "आशियाना" शोधतात. ऍड्जस्ट करतात स्वतःला. आम्हाला मराठीच्या पुस्तकात उपमा अलंकाराचं उदाहरण म्हणून पुढील वाक्य होतं -"मुंबईतील घरे म्हणजे कोंबड्यांची खुराडीच ". अरुंद  गल्लीबोळातून जाणारी, अरुंद अशी एकावर एक इमले असलेली फार लहान लहान घरं मी पाहिली आहेत. एका मित्राच्या घरातून नारळाचे झाड उगवले होते ते थेट छपरातून बाहेर, किंवा असे म्हणूया या झाडाभोवतीच त्यांनी झोपडी बांधली होती. मग या झाडाच्या खोडाला पिशवी, दप्तर वगैरे वस्तू अडकवल्या जात. काही घरांच्या लादीतून पावसाळ्यात पाणी उफाळे. काहींच्या छपरातून पाणी गळे. पावसाळयाच्या सुरुवातीला मग पत्र्यांवर डांबराचा थर चढवला जाई.

घरांचा स्वभाव त्यांच्या घरमालकाप्रमाणे बदलतो. कुठे फक्त चहा मिळणार आहे आणि चहा पिल्यावर निवांत गप्पा मारता मारता जेवणाचा आग्रह कुठे होणार आहे हे घरमालकाच्या स्वभावावर ठरतं. काही घरांत आब राखून अवघडून बसावं लागतं, जीव गुदमरतो तर काही घरांत बिनदिक्कत जमिनीवर फतकल मारून बसता येतं. काही घरांत ओठातल्या ओठांत खोटं हसत समोरच्या श्रीमंतीकडे पाहावं लागतं तर कुठे गगनभेदी हसण्याने मन मोकळं होतं.

"No one realizes how beautiful it is to travel until he comes home and rests his head on his old, familiar pillow." हे जे लिन युतांगने म्हटलंय ते १००% खरंय.

माझ्या मते घर म्हणजे सोयी सुविधा नव्हेत. उंची फर्निचर नव्हे. स्केवर फूटचं गणित नव्हे. घर बनतं माणसांमुळे.
लहानपणी उन्हाळाच्या सुट्टीनंतर मुंबईला परतल्यावर आजी म्हणायची "तुम्ही होतात तेव्हा गजबजलेलं होतं, आता एकटं घर खायला उठतंय". अंगणात पायरीवर बसून रातकिड्यांचे आवाज ऐकत आम्ही आजीची गोष्ट ऐकत असू.  घर बांधताना माझे बाबा आणि काका किती लहान होते आणि तरीही खेळण्याच्या गाडीतून कसे वाळू आणायचे, कसे चिखलात खेळायचे, हा पायरीचा भला मोठा लाल दगड कसा आणला, कुठं उसाचं गुऱ्हाळ होतं वगैरे गोष्टी आम्ही तल्लीन होऊन ऐकत असू.
कुणास ठाऊक घरांना बोलता येत असतं तर त्यांनी सगळ्या पावसाळयांचा हिशोब मांडला असता. पणजोबांच्या वेळेची हकीकत पोक्त आजोबांप्रमाणे दाढी कुरवाळत सांगितली असती. लहान मूल दुडू दुडू धावताना पडल्यावर मायेची हाक घातली असती. माजघरातील नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा चोरटा प्रणय बघून गालातल्या गालात हसलं असतं.

विश्वास पाटलांच्या 'झाडाझडती' मध्ये एक प्रसंग आहे. धरणासाठी एक अख्ख गाव विस्थापित होणार असतं. गाव सोडून जाण्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री एक अधू म्हातारे आजोबा घराच्या भिंती चाचपडत असतात. घराला पारखं होण्याआधी त्यावर मायेचा हात फिरवत, त्याचा स्पर्श साठवत. आजी तिच्या शेवटच्या आजारपणात सतत गावच्या घराचा उल्लेख करी. मला मरण माझ्या घरात येऊ दे म्हणत राहिली. आता ती नसलेल्या घरात आम्हाला घर खायला उठतं.


***

शुक्रवार, १० जुलै, २०२०

स्माईल

मध्यंतरी एका रविवारी मी आणि बायको youtube वर पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' बघत होतो. आमच्या पिढीला प्रत्यक्षात काही त्यांना पाहता आलं नाही. त्यांच्या रेकॉर्डिंग्स, पुस्तके हाच काय तो ठेवा.  संध्याकाळ फार मस्त गेली.  त्यातल्या 'एका रविवारची गोष्ट' मधले काही प्रसंग असे होते कि ते आठवून आम्ही खूप दिवस हसत होतो. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय कि त्यांचा कुणी पुतळा वगैरे उभारला तर त्याखाली एवढंच लिहा "या माणसाने आम्हाला हसवले". रवींद्र नाट्यमंदिराच्या अंगणात जो पुलंचा पुतळा आहे त्याखाली हेच वाक्य लिहून ठेवलंय. 

हसणं ही मनुष्य प्राण्याला लाभलेली अद्भुत देणगी आहे. इतर कुठलेच प्राणी हसत नाहीत. आपणच 'हीही ते हाहा ते हाहाहा' हसत असतो. लहान बाळं किती गोड हसतात (अपवाद: मध्यरात्री सगळे झोपल्यावर  हसत असतील तर). माझ्या एका मैत्रिणीने तिच्या भाचीचा हसण्याचा आवाज रेकॉर्ड करून अलार्म टोन म्हणून ठेवला होता. एकदा ती निवासी कॅम्पला गेल्यावर भल्या पहाटे जेव्हा एका लहान मुलीचा हसण्याचा आवाज जंगलात घुमायला लागला तेव्हा त्या हसण्याच्या आवाजाने बाकी सगळ्यांना भीतीनं घाम फुटला होता. असो.

माझ्या पुस्तकसंग्रहात वुडहाऊस, पुलं, दमा मिरासदार यांची पुस्तके आहेतच, याशिवाय 'पंच' या कार्टूनविषयक मासिकाचा एक विशेष अंक आहे ज्यात 'पंच' मधील सर्वोत्तम कार्टून समाविष्ट आहेत. तो संग्रह न्याहाळत मी कितीही वेळ बसू शकतो. मध्यंतरी दूरदर्शनच्या भरभराटीच्या काळातील 'ये जो है जिंदगी', मालगुडी डेज, देख भाई देख, फ्लॉप शो हे कार्यक्रम पाहून बॅकलॉग भरून काढला.  किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात.

फ्रेंड्सचा एक एपिसोड बघत असताना Joey आणि Chandler च्या रूममध्ये दोन व्यक्तींचं  ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर दिसतं.  कोण ही दोघं? या प्रश्नाचा शोध घेत मी लॉरेल अँड हार्डी पर्यंत पोचलो आणि मी त्यांचा फॅन झालो.  लहानपणी कधीतरी जाड्या आणि रड्याची ही series सह्याद्रीवर मराठीत डब होऊन यायची ते आठवलं.
काही मालिका, चित्रपट यांनी खूप हसवलं. काहींनी हसता हसता अंतर्मुख करायला लावलं. श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेत वयस्क आबा (दिलीप प्रभावळकर) एकदा  लाफ्टर क्लब मध्ये जातात आणि तिकडच्या इन्स्ट्रक्टरच्या सांगण्यावर हसण्याचा सराव करायला लागतात. घरी जेव्हा ते चोरून हसण्याचा सराव करत असताना जी काही गम्मत होते ते पाहण्यासारखं आहे.

Humor कळणारा समाज (उदा : ब्रिटिश हुमर) फार प्रगतीशील असतो
माणूस जेव्हा स्वतः हसता हसता दुसऱ्यांना हसवायला लागतो तेव्हा त्याच्या पुण्याची बेरीज व्हायला सुरुवात होते.

.***

गुरुवार, २ जुलै, २०२०

विमानप्रवास

चांदण्या रात्री आकाशात एक प्रकाशाचा लुकलुकता ठिपका दिसला.. तो हळूहळू मोठा होत गेला.. मग कळलं विमान आहे ते. 
मी पाहिल्यांदा केव्हा विमानप्रवास केला हे मला आठवतंय. २०१६ सप्टेंबर मध्ये. जेव्हा मी नवीन ठिकाणी जॉबला लागलो आणि आठवडाभरात ट्रैनिंग साठी बंगळूरला पाठवायचं ठरलं. मी जरासा बुजलेला होतो. एअरपोर्टवर गेल्यावर काय करायचं, बोर्डिंग पास कसा मिळवायचा, सोबतच्या सामानात काय न्यायला परवानगी आहे, काय नाही  याबद्दल मी Quora वर बरंच वाचलं,मनात खूणगाठी केल्या आणि लढाईला निघाल्यासारखं 'हर हर महादेव' म्हणत घर सोडलं. काहीही झालं तरी बावळट दिसायचं नाही हा निश्चय ठाम होता. आपल्याला फर्राटेदार इंग्रजी बोलता येतं त्यामुळे कुठलाही शाब्दिक हल्ला आपण सहज परतवू शकू याचं मानसिक बळ गोळा करत मी एअरपोर्टवर पोचलो. माझ्या अपेक्षांना कात्री देत फार काही इंग्रजी न पाजळता मी  चेक-इन, security, बोर्डिंग पार करत विमानात जाऊन बसलो. विंडो सीटचा प्रेफरेन्स आधीच दिल्याने खिडकीतून बाहेरचं जग पहायला मिळणार याची उत्सुकता होती. आकाश पाळण्यात बसल्यावर जशी असते तशी. मग इतर सोपस्कार पार पडल्यावर सुरक्षेच्या सूचना झाल्या. रनवे वर विमान पोचलं. विमानाने टेक-ऑफ घेतल्यावर पोटात वर-खाली झालं. एकदाचं ते त्याच्या मनाजोगत्या उंचीवर पोचल्यावर कप्तान साहेबांनी 'खुर्ची की पेटी' बांधण्याचे 'संकेत' बंद केले. 
विमानातून खालच्या इमारती, रस्ते, डोंगर इवलुसे दिसत होते. हा पसारा केवढा भव्य आहे. आपण या सर्व पसाऱ्यात केवढेसे. माणसाने प्रयत्न करून आकाशात पण स्वतःच अस्तित्व तयार केलंय.  हे सर्व कुतुहूलमिश्रित डोळ्यांनी पाहत असताना अचानक ऐरहोस्टेस ने 'सर, Would you like to have something? विचारल्यावर भानावर आलो. मी त्या बयेच्या विनवण्या ऐकूनही काहीच घेतलं नाही. एक तर त्या सर्व वातावरणात आपण दबून गेलेलो असतो. आवाज आपसूक नरमाईचा होतो. दोन तासांनी जेव्हा बंगळूरला पोचलो आणि इतर सोपस्कार पार पडेपर्यंत पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. एअरपोर्टवर साधा चहाचा कप तुम्हाला शंभराला पडतो तेव्हा चहापत्ती दक्षिण ध्रुवावरून आणलेली असावी असं वाटतं. 
हॉटेलकडे जात असताना ड्राइवरला मधे एखादं बरं ठिकाण दिसलं तर सांग बाबा असं म्हटलं. त्याने एका ठिकाणी थांबल्यावर मस्तपैकी इडली खाऊन भूक शमवली. काही दिवसांनी जेव्हा ऑफिस मधील सहकाऱ्याने सांगितलं कि flight मधलं खाणं-पिणं ऑफिसने आधीच बुक केलेलं असतं तेव्हा मात्र त्या ऐरहोस्टेस बयेच्या विनवण्याचा अर्थ लागला. ऑफिसच्या induction प्रोग्रॅम मध्ये बऱ्याच फालतू गोष्टी नवीन एम्प्लॉयीला सांगता तेव्हा अशा  अत्यंत महत्वाच्या गोष्टी का बरे सांगत नाहीत?
गेल्या चार वर्षांत बरेच विमानप्रवास झाले. मी सराईतासारखा फिरायला लागलो. बरेचसे हॅक्स कळले. एकदा flight चुकल्यावर वेळेची गणिते कळली. हातात पुस्तक घेऊन बसल्याने विद्ववतेचा आव आणता येतो आणि कानात हेडफोन्स असले कि तुसड्यासारखं वागता येतं.  विमान लँड झाल्याझाल्या आपण पॅसेजमधे उभं राहून जणू जग जिंकायला निघालेल्या नेपोलियनचे वंशज आहोत आणि लढाईसाठी उशीर होतोय असं दाखवता येतं. 

मला जे हॅक्स कळलेत (एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये जी ज्ञानप्राप्ती झालीय) त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी फुकटात ज्ञान देत नसतो. सिद्धार्थाला देखील घर दार सोडून जावं लागलं होतं. तुमच्याही नशिबी खूप विमानप्रवास असावेत , त्यातून तुम्ही जग तुमच्या चष्मानं बघावं आणि या सर्व पसाऱ्याचा अर्थ लावावा ही सदिच्छा. 

***

शुक्रवार, २६ जून, २०२०

भाषा


मला शब्दांचं फार कुतुहूल आहे. एकच शब्द पण त्याचा दोन वेगळ्या भाषांत  वेगळा अर्थ. 'आवडे' या शब्दाचा मराठीत अर्थ आवडणे असा तर गुजरातीत 'येणे' किंवा 'समजणे' असा. तेलगू मध्ये 'वेडी' चा अर्थ 'गरम' असा होतो.
काही भाषा खास secretly गुफतगू करण्यासाठी. उदा. रफ ची भाषा किंवा 'च' ची भाषा. आपल्या दोघांना एक सीक्रेट भाषा येतेय आणि ती कुणालाही decode करता येत नाही हा केवढा आनंद. माणसांप्रमाणे कॉम्पुटरचीही वेगळी भाषा असते. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

भाषा माणसे जोडण्यासाठी असतात असा आपण मानून चालू. पण केव्हापासून भाषा आपल्या सामाजिक दर्जाच्या मापदंड ठरल्या? अमुक एक शुद्ध प्रमाण भाषा आणि अमुक एक अशुद्ध. कागदचं अनेकवचन कागदच (का पण?). एखादी भाषा श्रेष्ठ. एखादी हलकी. का पण?
सगळ्यांना कळण्यासाठी काही नियम हवेत हे मान्य. आपण व्याकरणाच्या चुकांत माणुसकी हरवत चाललो.
मेलेला हत्ती व्याकरणाने नाही चालवता येत किंवा जिवंतही. (त्याला माहूत लागतो)

जी भाषा आपली नाही तिला शिकून मातृभाषेचा तिटकारा करू लागलो.
लहान बाळाला 'गाय कशी करते?' च्या ऐवजी 'काऊ कशी करते?" 'ती बघ कॅट"
नंतरच्या टप्प्यात मग "होमवर्क फिनिश केला का?"
"आज आम्ही एग खाल्लं"

जगाच्या पाठीवर असेही काही पाडे असतील जिथे वैश्विक इंग्रजी भाषेचा गंधही नसेल. बदलत्या सामाजिक गणितांसोबत   स्थलांतर, जागतिकीकरण अशा अनेक कारणांमुळे भाषांचा मृत्यू ओढवतोय. एका अहवालानुसार तर दर दोन आठवड्यांनी एक भाषा मृत्यू पावते. भाषा मरते म्हणजे नेमकं काय होतं? तर त्या भाषेबद्दलची सामाजिक अवकाशातली माहितीच नष्ट होते. त्या भाषेतील शब्द, त्यांचे अन्वयार्थ, बोली साहित्य, लहजा सारंच गायब.  Wikitongues हा प्रकल्प जगातील हरेक भाषेचे  डॉक्युमेंटेशनच काम करतोय.  त्यांच्या संकेतस्थळावर विविध भाषांचे विडिओ पहायला मिळतात. ज्या भाषा आपण कधी ऐकल्याही नसत्या.


माझ्या एका मित्राने त्याच्या आईच्या आवाजातील जात्यावरच्या ओव्या संकलित केल्यात. हे खूप मोठं संचित आहे.
मातृभाषेला आईच्या पदराची उब असते.





शुक्रवार, १९ जून, २०२०

आठवणींचा पोत


कसुओ इशीगुरोच्या एका पुस्तकाचा review द्यायचा होता त्यावेळी त्याच्या लेखनप्रक्रियेविषयी खूप वाचलं होतं. एका लेखात त्याने असं सांगितलेलं कि त्याला 'texture of memory' सोबत खेळायला आवडतं . या शब्दाला आपण मराठीत 'आठवणींचा पोत' असं म्हणू. कथेतील पात्रांना कुठल्या गोष्टी बारकाईने आठवतील आणि कुठल्या आठवणार नाहीत, काहीक आठवणींना  भावनांचं असं आवरण असेल कि आठवतंय तसे कदाचित घडलेलं नसेलच (मनाचे खेळ वगैरे) किंवा अमुकच गोष्टी सिलेक्टिव्हली का आठवत असतील? अशा अनेक प्रश्नांनी आपण घेरले जातो. 

खऱ्या आयुष्यातही असे बऱ्याचदा घडते. अचानक एके दिवशी बालपणातील किंवा कॉलेजच्या दिवसांतील काही आठवतं आणि तेच का आठवलं याचा प्रश्न पडतो. बालपणी एखादी हरवलेली गोष्ट का प्रकर्षाने आठवावी ? हरवलेली छत्री, कंपासपेटी आणि माणसे! सणासुदीला लहानपणीच वारलेल्या मुलाची आठवण येऊन एखाद्या आजीचे डोळे या वयातही पाणावतात.
वर्षोनुवर्षं संपर्कात नसलेल्या किंवा आता कुठे असेल याची जराही कल्पना नसलेल्या मित्राचा / मैत्रीणीचा  चेहरा का डोळ्यासमोर यावा? बरं मग माणसांना मृत्युशय्येवर असताना नेमकं काय आठवत असेल? आयुष्याचा चित्रपट फास्ट फॉरवर्ड मध्ये डोळ्यांसमोरून जात असेल का? का काही वयस्कर माणसे लगेच हळवी होतात?  

आपल्या रोजच्या जगण्यातील सर्वच गोष्टी आठवणींचा भाग होतात असेही नाही. ज्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो त्याच गोष्टी हळूहळू अंतरी झिरपतात. Inattentional blindness म्हणून मानसशास्त्रात एक कन्सेप्ट आहे.  एखादी गोष्ट आपल्या नजरेच्या टप्प्यात असतानादेखील आपल्याला ती दिसत नाही कारण आपलं लक्षच नसतं किंवा लक्ष भलतीकडेच असतं. 
[उदा:
"आई, माझं घड्याळ कुठंय?"
"आहे तिथेच टेबलावर. "
"नाहीये इथे"
"नीट बघ. सापडेल" 
"नाहीये s"
"डोळ्यासमोर असलेली गोष्ट सापडत नाही तुला.. हे काय"]

हा एक छान विडिओ आहे Inattentional blindness समजावण्यासाठी. 

मन आपल्याला सांगत असतं खुश राहण्यासाठी अमुक अमुक गोष्टींची गरज आहे. घर, गाडी, चांगली नोकरी, खूप पैसा इत्यादी इत्यादी. पण या सर्वात आपण छोट्या छोट्या गोष्टी अनुभवत नाही ज्या चांगल्या आठवणी बनवू शकतात. आपल्याला खुश ठेऊ शकतात. 
मोकळं निरभ्र आभाळ, उडणारे पक्षी, फुललेलं एखादं टपोरं फुल, कॉफीचा वास या सर्व गोष्टी क्षुल्लक दिसतात वरवर.  शेवटचं केव्हा आपण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलंय? 
चांगल्या आठवणी बनवता येतात.  
प्रयत्न करावा लागतो. 

सोमवार, १९ मार्च, २०१८

आयुष्य वाया कसं घालवावं?


एका निवांतशा संध्याकाळी आयुष्याकडे वळून पाहताना आपण जगलो ते आयुष्य खरंच worth होतं का? काय कमावलं? काय गमावलं? याचा आलेख मांडताना जे काही मनात दाटून येत असेल ते म्हणजे 'The Remains of the Day'. कसुओ इशीगुरु या ब्रिटिश लेखकाची १९८९ प्रकाशित झालेली कादंबरी. तिला बुकर प्राईझ मिळालं, या पुस्तकावर आधारित फिल्मला ८ अकॅडेमी नॉमिनेशन्स मिळाले.

तर या पुस्तकाने मला अंतर्यामी फार हलवलं, इतकं की,वाचून झाल्यावर नैराश्याच्या भावनेने काही दिवस मी  रोजचं वर्तमानपत्रही ढुंकून पाहिलं नाही. अजून काही वाचावंसं वाटत नव्हतं.

या पुस्तकाचा सारांश एका वाक्यात करायचा झाला तर - आयुष्य वाया कसं घालवावं याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे या पुस्तकातील स्टीवनची आत्मकथा. एखादा माणूस आपल्या स्वप्नांविषयी, भावनांविषयी एकंदरीत स्वतःच्या आयुष्याविषयी किती क्रूर वागू शकतो?

स्टीवन एक बटलर आहे. Darlington Hall नावाच्या एका राजेशाही वाड्यात Lord Darlington यांची सेवा करण्यात त्याने आयुष्य वेचलय.  दुसऱ्या महायुद्धानंतर सगळं बदललं. वाड्याची मालकी आता अमेरिकन Mr Farraday यांच्याकडे आलीय. नवीन मालकाने सुचवल्यामुळे रोड ट्रीप साठी निघाल्यावर प्रवासात स्टीवन स्वतःच्या गतायुष्याकडे पुन्हा पाहतोय. त्याचे बाबाही बटलर. टिपिकल राजेशाही इंग्लिश वातावरणाचा बटलर हा अविभाज्य भाग होता. बटलर, हाऊसकिपर, फूटमॅन अशा पदांच्या उतरंडी. बटलर पदापर्यंत पोचण्यासाठी कित्येक वर्षांचा अनुभव लागे. बटलरने आपलं अस्तित्व जाणवू न देता घरातील सर्व कामे पार पाडायची.
या प्रवासात स्टीवन आपल्या कारकिर्दीत ( कसली कारकीर्द, डोंबलाची!) आपण काय जोखमीची कामे केली याची उदाहरणे देतो जिथे त्याच्यामते भावनांना आवर घालावा लागला.  उदाहणार्थ एका प्रसंगात त्याचे बाबा मृत्युशय्येवर आहेत आणि त्याला हॉलमध्ये पार्टीची व्यवस्था बघावी लागते. काही कालानंतर बाबा वारल्याचे कळल्यावर देखील त्याला पार्टीत पाहुण्यांना ड्रिंक्स सर्व करत हिंडावे लागते. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना देखील मागे सारावे लागते.

स्टीवनचे बाबा. वयाची ऐंशी वर्षे ओलांडली तरी चाकरी करताहेत. एकदा चहाचा ट्रे नेताना पाय घसरून पडतात. त्यांना मग अशी कामं दिली जात नाहीत, कुणा पाहुण्यांच्या अंगावर चहा सांडला तर?
याच म्हाताऱ्या बाबांना नंतर lawn मध्ये ट्रेसह पायऱ्या चढण्या उतरण्याची प्रॅक्टिस करताना स्टीवन बघतो.
दुष्यन्त कुमार यांची ओळ आठवते अशा वेळी : ये लोग कितने मुनासिब है इस सफर के लिए.

मिस केंटन घरातील हाऊसकिपर आहे. तिचं स्टीवन वर प्रेम आहे,  बऱ्याचदा ते जाणवू देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी दुसऱ्याशी लग्न केलं. आयुष्यात प्रेम नावाची गोष्टच नाही.
या रोड ट्रिप मध्ये हे सगळं तो आठवतोय. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असल्याने बरेच राजकीय संदर्भ येतात, या मोठ्या राजकीय पटलावर आपणही काही तरी योगदान दिलंय, आपल्या सेवेमुळे मोठे निर्णय घेता आले असं स्टीवनचं मत आहे. घरातील चांदीची भांडी लखलखीत असल्यामुळे पाहुण्यांना आत्मिक शांती मिळाली असं त्याचं मत.
Lord Darlington यांच्या ज्यू द्वेषामुळे ज्यू नोकरांना कामावरून काढून टाकलं जातं याचा त्याला विरोध करता येत नाही कारण साहेबांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असावा असं याचं मत. स्वतःची काहीच मते नाहीत.

आपल्या कामाच्या dignity बद्दल स्टीवन जे स्पष्टीकरण देतो ते मुळात वाचण्यासारखं आहे. आपण आयुष्यभर आपलं काम डिग्निटीसह करण्याचा प्रयत्न केला असं त्याचं म्हणणं.

एका बटलरच्या - एका नोकराच्या आत्मकथेतून नेमकं काय सुचवायचंय लेखकाला? असं आयुष्य जगू नये.
हा तर साधा निष्कर्ष झाला. मग कसं जगावं?

आपण आपल्या मनाप्रमाणे करीअरचं क्षेत्र निवडतो, काहीतरी भव्य करावं, या विशाल पटलावर काहीतरी योगदान द्यावं, राबराब राबतो, काही प्रसंगात कौतुक वाट्याला येतं आणि ते प्रसंग कोरले जातात मनावर. त्यांच्याच शिदोरीवर आणखी  राबराब राबतो. व्याकुळ संध्यासमयी मग आयुष्याची उजळणी करताना काय उरलं याचाच विचार येतो. मग कसे जगलो आपण? डिग्निटीसह जगलो का?

***

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

प्रवासातल्या गोष्टी - १

भाऊ काय आलं ? मीरा रोड ना ?
हो.
म्हणजे आज मी शुद्धीत आहे तर , काल अर्धा क्वार्टर घेतली तर कारशेडला पोचलो.  आज दोन  क्वार्टर मारल्या तरी शुद्धीत आहे.  चांगलंय म्हणजे ! परवा तर झोपलो ते सरळ विरारवरून रिटर्न. नशीब आज खिडकीजवळ नाही बसलो नाहीतर आता उठलोच नसतो.………… तंबाखू आहे ?
नाही हो.
मग चुना पण नसेल.
नाही
मस्करी केली.  रागवू नको भाऊ.
कळलं . नाही रागावलो.
भाऊ तू कधी माणसाला मरताना पाहिलंय ? म्हणजे मरण्याच्या काही क्षण आधी? कावर्याबावर्या अवस्थेत?
अजूनपर्यंत तसा योग काही जुळून आला नाही.
नको पाहूस. फार भयानक असतं ते बाबा. जगण्यावरचा आपला विश्वास उडून जातो.
मरण कुणाला टाळता आलंय? पहावं तर लागणारच. दुसर्याचं आणि स्वतःचही.
खरंय. ह्या ह्या डोळ्यांनी पाहिलं रे तिला मरताना. . पण नाही वाचवू शकलो रे ! मला म्हणत होती "मला मरायचं नाहीय. जगायचंय. वाचव मला." तिचे ते डोळे अजून माझा पिच्छा करतात. जगायचंय म्हणतात.
नेमकं काय झालं होतं ?
ब्रेन ट्यूमर .
...
चल भाईंदर आलं. निघतो.

***