शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

प्रवासातल्या गोष्टी - १

भाऊ काय आलं ? मीरा रोड ना ?
हो.
म्हणजे आज मी शुद्धीत आहे तर , काल अर्धा क्वार्टर घेतली तर कारशेडला पोचलो.  आज दोन  क्वार्टर मारल्या तरी शुद्धीत आहे.  चांगलंय म्हणजे ! परवा तर झोपलो ते सरळ विरारवरून रिटर्न. नशीब आज खिडकीजवळ नाही बसलो नाहीतर आता उठलोच नसतो.………… तंबाखू आहे ?
नाही हो.
मग चुना पण नसेल.
नाही
मस्करी केली.  रागवू नको भाऊ.
कळलं . नाही रागावलो.
भाऊ तू कधी माणसाला मरताना पाहिलंय ? म्हणजे मरण्याच्या काही क्षण आधी? कावर्याबावर्या अवस्थेत?
अजूनपर्यंत तसा योग काही जुळून आला नाही.
नको पाहूस. फार भयानक असतं ते बाबा. जगण्यावरचा आपला विश्वास उडून जातो.
मरण कुणाला टाळता आलंय? पहावं तर लागणारच. दुसर्याचं आणि स्वतःचही.
खरंय. ह्या ह्या डोळ्यांनी पाहिलं रे तिला मरताना. . पण नाही वाचवू शकलो रे ! मला म्हणत होती "मला मरायचं नाहीय. जगायचंय. वाचव मला." तिचे ते डोळे अजून माझा पिच्छा करतात. जगायचंय म्हणतात.
नेमकं काय झालं होतं ?
ब्रेन ट्यूमर .
...
चल भाईंदर आलं. निघतो.

***

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

भुकेविषयी संमिश्र

जिल्ह्याच्या गावी पोचलो तेव्हा माथ्यावर रणरणतं ऊन होतं. घामाच्या धारा लागल्या होत्या. सोबतच्या बाटलीतलं पाणीही संपलं होतं. जवळपास एखादं चांगलं हॉटेल पाहून जेवावं असं ठरवलं. कलेक्टर ऑफिस जवळ छोटंसं हॉटेल होतं. कुठल्यातरी ट्रस्टचं. सरकारी कामासाठी लांबलांबच्या गावांवरून आलेली लोकं आपापल्या पिशवीतून आणलेला भाकरतुकडा खात होती. खूप जण झुणका भाकर खात होते म्हणून पोऱ्याला सांगितलं, झुणका भाकर आण म्हणून. त्याने मला झुरळासारखं झिडकारत सांगितलं, "आधी तिथे कूपन घ्या आणि त्या काउंटरवर द्या". काउंटरवर गेलो. त्याला म्हटलं झुणका भाकर दे, तर तो  चेहरा जराही वरती न करता म्हणाला कितीची ? एक रुपयाला एक भाकरी होती, झुणका कॉम्प्लिमेंटरी होता बहुतेक. म्हटलं दे दहा रुपयाची. त्याने निर्विकारपणे कुपन दिलं.  दुसऱ्या काउंटरवर ते दिलं, त्याने एका मोठ्या थाळीत मोजून दहा भाकऱ्या टाकल्या. एक वाडगं घेतलं आणि दोन पळ्या भरून एक पातळसा द्रव त्यात ओतला. मीठ लागेल तर त्या ताटात आहे कोपऱ्यातल्या. भाकऱ्या आकाराने पुरीहून थोड्या मोठ्या होत्या .
अशी सेल्फ सर्विस केल्यावर बसायला जागा शोधू लागलो. मधल्या रांगेत एक खुर्ची रिकामी होती तिथे गेलो तर बाजूला बसलेल्या बाईने माझं म्हातारं येतंय, मुतायला गेलंय असं सांगून दुसरीकडं बस रे बाबा असं सांगितलं.
हातात  प्लेट,त्यात वरणासमान झुणका नावाचा पदार्थ घेऊन थोडा वेळ उभा राहिलो. माझी दया येऊन पोऱ्याने एका खेडूताला त्याच्या नातवाला मांडीवर बसवायला सांगून मला खुर्ची मोकळी करून दिली. ग्लासात पाणी आणून दिले.
झुणका म्हणजे बेसनाला पाण्यात कालवून लसणाची फोडणी दिली होती. नावाला जरा कांदा सापडत होता. भाकऱ्या अगदी खुरखुरीत होत्या. महिलांच्या  कुठल्यातरी बचत गटाला काँट्रॅक्ट दिलं होतं जेवणाचं.  तीन भाकऱ्या खाल्यावर मन विटलं. माझ्या समोर एक माणूस तोच झुणका भाकरीने ओरपत होता. दाढीची खुटं वाढलेली, केस विस्कळीत, मळकट रंगाचं शर्ट, चेहऱ्यावर बेफिकीरपणा. मी ताट उचलणार इतक्यात त्याचं लक्ष माझ्या ताटात गेलं आणि तो म्हणाला, "याचं काय करणार ?". मी म्हटलं, "जात नाहीयेत, टाकून देतोय" यावर त्याने विचारलं, "मी घेऊ का ?", मी हो म्हणायच्या आत त्याने त्या उरलेल्या भाकऱ्या घेतल्या, बखोटीच्या पिशवीतून एक कागद काढून त्यात गुंडाळल्या. माझ्याकडे पाहून म्हणाला, "चला संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली."

***

आयुष्यात बराच संघर्ष करावा लागलेल्या ऍक्टर मित्राने त्याच्या हलाखीच्या दिवसांबद्दल सांगितलं. अभिनय म्हणजे भिकेचे डोहाळे असा समज अजूनही बऱ्याच पालकांत आहे. मित्राला घरून कधीच पाठिंबा मिळाला नाही. रिहर्सल वरून उशिरा घरी आल्यावर कधी कधी उपाशी झोपावं लागे. हातात कामे असायची पण पैसे नसायचे. पैसे बुडवणारेही भेटले. पोटात भुकेचा कधी कधी आगडोंब उसळायचा.  एकदा तर वेगवेगळ्या मिठाईच्या दुकानात जाऊन "जरा ये टेस्ट के लिये दिखाना, और ये कैसे दिया किलो? इसका भी टेस्ट दिखाना, क्या केहते है इसे ?" करत त्याने पोट भरलंय.

***

कॉलेजच्या दिवसांत वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आम्ही तिघंजणं बाहेरगावी जायचो. कधी बक्षिसं मिळायची, कधी नाही. बक्षीस न मिळाल्यावर वाटभर जगात partiality कशी चालते यावर एकमताने चर्चा होई.
असंच एकदा पुण्याहून मुंबईला परत आल्यावर कडकडून भूक लागलेली.  तेली गल्लीतल्या नाक्यावर पाणीपुरी खाऊया असं ठरलं. तीन प्लेट पाणीपुरी रिचवल्यावर पैसे देण्यासाठी आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. प्रत्येकाला वाटलं दुसऱ्याकडे पैसे असतील म्हणून. बॅगेचे कोपरे पालथे केल्यावर हातात वीस रुपये लागले. त्या पाणीपुरीवाल्याच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच विसरणार नाही.

***

तेच आम्ही तिघे. आयुष्यात जरा स्थिरावल्यावर एकदा एका  हॉटेलात जेवायला गेलो, एक मित्र मांसाहारी आणि आम्ही दोघे खासफुस खाणारे. आम्ही थाळी मागवली अन त्याने त्या हॉटेल ची signature डीश म्हणून prawns करी मागवली. एक दोन घास खाल्यावर त्याने नाक मुरडत ती बाजूला ठेवली. जेव्हा बिल आलं तेव्हा आम्हां दोघांच्या थाळीच्या एकत्रित बिलापेक्षा त्याची Prawns Curry महागात पडली.

***
सकाळी ऑफिसला पोचल्यावर लगेच टेबलावरचा फोन खणखणला. "आज आपका लंच विथ VP है, एक बजे तैयार रहना" VP (आमच्या कंपनीचा नवीन vice प्रेसिडेंट)ची सेक्रेटरी जया. आमचे नवीन VP रोज एका एम्प्लॉयी सोबत लंच करायचे . त्याच्याबद्दल जाणून घायचे. काही प्रॉब्लेम आहे का कामात वगैरे विचारपूस करायचे. HBR मधले लेख वाचून उगाच मॅनॅजमेन्ट प्रयोग करणारे जे असतात त्यापैकी ते एक.
दुपारी कॅफेटेरियात त्यांच्या समोर बसलो. त्यांचे जेवण वेटरने आणून दिले. एक रोटी, थोडी डाळ आणि दोन काकडीच्या चकती. बस्स एवढंच.
माझा तीन टियरचा डब्बा. त्यांचं जेवण उरकलं दोन मिनिटांत. माझं आपलं चालूय सावकाश. प्रश्न विचारून प्रश्न संपले. कंपनीने लंच साठी दिलेला अर्धा तास पुरेपूर वसूल करणारा मी.
मी त्यांना म्हटलं, "सर, इतनाहि लंच क्यू?". त्यावर ते म्हणाले, "जीने के लिये खाओ, खाने के लिये मत जियो".
लंच संपल्यावर श्रीरामपंडी नाडर, माझा सहकारी म्हणाला. "अरे आज इसको बहुत पकाया तुमने, हम लोग सिर्फ एक ज्यूस लेके इसके साथ बैठता. पांच मिनिट में लंच खतम. उसके जाने के बाद अराम से खाता. "
मी त्याला VP चा डायलॉग सांगितला, त्यावर त्याचं कहर उत्तर. "अरे इन्का खानेका खयाल रखना आदमीलोग है,  हर घंटे कुछनाकुछ खाता, और हमको बोलता - जीने के लिये खाओ, खाने के लिये मत जियो"

***

संध्याकाळी चालत घरी जाताना कानात हेडफोन्स घालून माझ्याच तंद्रीत होतो. अचानक एका बाईने  थांबवलं. गावी दुष्काळ पडलाय तेव्हा मुंबईत आलो, काहीतरी खायला द्या अशी हात जोडून विनंती केली, सोबत दहा पंधरा वर्षाचा मुलगा होता बाई विधवा होती. पोराच्या पाठीला बॅग, शर्ट मळकट, डोळ्यात आर्जव. रस्त्यावरच्या पिवळ्या उजेडात त्यांची अगतिकता अजून भयानक वाटत होती. पैसे मागत नव्हते, खायला द्या म्हणत होते. बाजूला सँडविचवाला होता त्याला पन्नास रुपये दिले आणि म्हटलं, दोन सँडविच दे यांना. पैसे दिले म्हणून ग्रेट झालो अशातला भाग नाही. त्या मुलाच्या मनावर भुकेमुळे जे ओरखडे उमटले असतील त्या दिवसांत त्यांच्या विचाराने अजूनही वाईट वाटतं.
***

बुफे पद्धत. आपली पचनशक्ती किती चांगली आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी अशावेळी प्रत्येकजण कटिबद्ध असतो. रांगेने मांडून ठेवलेला एखादा पदार्थ आपण चाखला नाहीतर अन्नपूर्णा देवी आपल्यावर रुष्ट होईल अशी बहुतेकांची समजूत असते.लोकांना किती खावं याचा अंदाजच येत नाही. मग अन्नाने भरलेली ताटे टाकून दिली जातात. अशावेळी प्रेमचंदांच्या "बूढी काकी"कथेची आठवण येते अन मन विषण्ण होते.

***

चार्लीच्या मॉडर्न टाइम्स मध्ये नायिका ब्रेड चोरी करताना पकडली जाते तेव्हा चार्ली तो आरोप स्वतःवर घेतो.
नायिकेच्या नजरेत तो हिरो ठरतो, पण तुरुंगात जाण्याची चार्लीची हौस दांडगी, कारण तुरुंगात जेवण मिळण्याची असलेली  खात्री. बाहेरच्या बेभरवशाच्या बेकारीच्या वातावरणात उपाशी मरण्यापेक्षा तुरुंगवास पत्करलेला बरा. पुढे त्याचे जे स्वप्नरंजन दाखवलंय त्याला तोड नाही. दोघांचा संसार, मोठं घर, दारात असलेली दुभती गाय, अन्नाचा नसलेला तोटा आणि हाती असलेलं काम. बायको दारापर्यंत सोडायला येते वगैरे.
गोल्ड रश मधल्या बूट खाण्याच्या प्रसंगाबद्दल तर किती लिहावं !

***

भूक माणसाला अगतिक करते. कधी कधी आपला स्वाभिमान विसरायला भाग पाडते. भूक आहे म्हणून जगाचा गाडा चाललाय. माणसं मेहनत करताहेत. आयुष्यातून पोटाच्या भुकेची काळजी एकदा गेली तर अन्य महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देता येते.

***

मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

दि हार्ट अँड दि बॉटल

मराठीत बालसाहित्यात हल्ली कुठे नवीन प्रयोग होऊ लागलेत. आपल्याकडे लहान मुलांसाठी असलेली दर्जेदार पुस्तके कमीच आहेत. त्यामानाने इंग्रजी भाषेत  बालसाहित्यात नवनवीन प्रयोग होताहेत. मुलांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात यासाठी तिथे प्रयत्न केले जातात. पुस्तकांच्या विषयापासून ते पुस्तक छपाईपर्यंत खोलवर विचार केला जातो. मुलांच्या वयोगटानुसार त्यांनी काय वाचावं, त्यांची शब्दसंपत्ती कशी वाढेल, आजूबाजूच्या जगाची त्यांना ओळख कशी होईल, उत्कृष्ट साहित्याचे लहान मुलांसाठी संक्षिप्तिकरण (Abridged Edition ) जेणेकरून त्यांना साहित्यात रुची वाटेल या सर्व गोष्टींचा  विचार केला जातो.  अक्षरांना सुंदर चित्रांची साथ लाभते आणि वाचन हा एक आनंदानुभव बनतो.

ऑलिवर जेफर्स (Oliver Jeffers) या लेखकाचं " दि हार्ट अँड दि बॉटल " हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचनात आलं.

लहान मुलांना 'मृत्यू' या संकल्पनेपासून आपण दूरच ठेवतो. त्यांच्या कोवळ्या मनावर आघात होईल असे आपल्याला वाटते. रोज आपल्याशी खेळणारे आजोबा आज शांत का झोपलेत या प्रश्नावर 'आजोबा देवाघरी गेले' असे सांगून आपण वेळ मारून नेतो. आपली जवळची व्यक्ती गमावण्याची भावना त्यांना कळू नये असं आपल्याला वाटतं. वाढत्या वयाबरोबर आपोआप त्यांना हे कळत जाईल असा विचार  त्यामागे असतो (काही वर्षांपूर्वी आणि आजही लैंगिक शिक्षणाबाबतही असाच दृष्टीकोन समाजात आहे.)
ज्यांना लहान वयातच आपल्या जवळच्या व्यक्ती गमवाव्या लागतात ते हे दु:ख कसे पचवतात? या दु:खाच्या आघातातून सावरतात का स्वतःला? या विषयावर हे पुस्तक आहे.



प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासू असलेल्या एका लहान मुलीची ही गोष्ट.Once there was a girl, much like any other.  बाबांची लाडकी लेक असलेल्या या मुलीचं भावविश्व फार अनोखं आहे.बाबा आपल्या खुर्चीवर बसून तिला पुस्तकांतल्या गोष्टी सांगायचे.  तिला आकाशातल्या चांदण्यांत रस आहे, समुद्राच्या तळाशी काय आहे हे तिला जाणून घ्यायचय. तिला नवीन गोष्टी शोधायला आवडतात.

आणि एके दिवशी बाबांची खुर्ची रिकामी होते. बाबांच्या मृत्यूचा आघात पचवताना ती अंतर्यामी कठोर होत जाते आणि ठरवते कि यापुढे असले कुठलेच दु:ख नको. ती आपले हृदय एका बाटलीत काढून ठेवते (या रूपकाचा अर्थ असा कि ती संवेदनशून्य बनत जाते.) आता तिला कुठल्याच गोष्टीची उत्सुकता वाटेनाशी होते.


रोजच्या जगण्यात सुरवातीला काहीच फरक पडत नाही, पण मनाच्या तळाशी दडवलेलं दु:ख बाहेर यायला धडपडत असते. व्यक्त होणंच विसरलेल्या मुलीला आपले बाटलीबंद हृदय कसे काढावे कळत नाही. ती हरतऱ्हेचे प्रयत्न करते पण बाटलीतून हृदय निघेच ना.
आणि एकेदिवशी तिला तिच्याच सारखी जिज्ञासू छोटी मुलगी भेटते आणि तिचे हृदय बाटलीतून बाहेर काढून देते. आता हृदय परत मिळाल्यावर तिला परत जगाविषयी प्रेम वाटू लागते. बाबांची खुर्ची मग कधीच रिकामी राहत नाही.

जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने आयुष्याबाबत आपण उदासीन होतो, प्रसंगी काहीजणांच्या मनात आत्महत्येचे विचारही येतात. चलती का नाम जिंदगी म्हणत, मृत्यू ह्या सार्वकालिक सत्याला स्वीकारून पुढे चालत राहणं एवढंच आपल्या हातात आहे.
लहान वयातच मुलांना 'मृत्यू' या विषयाची ओळख करून देणं काहींना पटणार नाही. पण निसर्गाचा उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा नियम त्यांना जितक्या लवकर समजवाल तितक्या लवकर त्यांची भावनिक तयारी होईल.
***

रविवार, २७ मार्च, २०१६

जादुई कुंचला

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी चीनमधे लियांग नावाचा होतकरू मुलगा राहत होता. त्याला घरदार- कुटुंब नव्हतं. लोकांची गुरे सांभाळणे, लाकूडफाटा आणणे अशी कामे करून तो दिवस काढी. त्याचं आयुष्य खडतर असले तरी त्याचा स्वभाव लोकांना मदत करण्याचा होता. त्याचं एक स्वप्न होतं. त्याला फार मोठा चित्रकार व्हायचं होतं. तो चित्रकलेच्या सरावात कधीही खंड पडू द्यायचा नाही. रानात लाकडे तोडताना, गुरे चरायला नेताना तो माळरानात पक्षी आणि प्राण्यांची चित्रे  काढी. तो जे काही पहायचा त्याचं चित्र काढायचा - झाडे -पक्षी-माणसे. त्याला चित्रांशिवाय काही सुचायचंच नाही. लवकरच तो चित्रकलेत तरबेज झाला.

एके रात्री लियांगला स्वप्न पडलं. त्यात एका म्हाताऱ्याने त्याला एक कुंचला दिला. त्या म्हाताऱ्याने म्हटलं कि हा जादुई कुंचला आहे आणि  लियांगने त्याचा लोकांना मदत करण्यासाठी  उपयोग करावा. लियांगला दुसऱ्या दिवशी पहाटे जाग आली तेव्हा आपल्या हातात तो सुंदर कुंचला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. लियांगला प्रचंड भूक लागली होती म्हणून त्याने ताटभर भाताचे चित्र काढले. अहो आश्चर्यम ! अचानक चित्र जिवंत झाले आणि भाताने भरलेले ताट समोर आले. तो खूप आनंदी झाला. त्याने पक्ष्याचे चित्र काढले. त्या चित्रातून पक्षी बाहेर आला आणि त्याने आकाशात भरारी घेतलीसुद्धा.


लियांग जेव्हा गावात गेला, तेव्हा त्याने पाहिलं कि एक म्हातारा शेतकरी कावड भरून पाणी नेत होता आपल्या शेतात शेंदण्यासाठी. त्या वृद्ध शेतकऱ्यासाठी हे फार कष्टाचे काम होते. लियांगने त्याच्या शेताशेजारी नदीचे चित्र काढले आणि नदी जिवंत झाली. आता तो शेतकरी कितीही पाणी पिकांना देऊ शकत होता. 
थोडं पुढे गेल्यावर लियांगला आणखी एक गावकरी भेटला. तो बिचारा रडत होता. त्याची गाय रात्री वारली होती आता त्याच्या लहान मुलांसाठी दूध कुठून मिळणार? लियांगने गायीचे चित्र काढले आणि क्षणार्धात चित्रातून गाय जिवंत झाली. गावकऱ्याने लियांगचे आभार मानले आणि तो गायीचे दूध काढू लागला. 

त्या दिवसापासून लियांग आपल्या जादुई कुंचल्याचा उपयोग गावातील लोकांच्या मदतीसाठी करी. जेव्हा गावकऱ्यांना कशाची नड भासे, तेव्हा लियांग मदतीला येई. लवकरच गावात भरभराट आली आणि लियांगच्या जादुई कुंचल्याची कीर्ती सर्वदूर पोचली.

लोकं त्याला विचारीत, "तू या जादुई कुंचल्याचा उपयोग करून श्रीमंत का नाही होत?"
"मला कशाची गरज आहे ?"  लियांग उत्तरे,"मला लोकांची मदत करून श्रीमंत असल्यासारखं वाटतं."

थोड्याच दिवसांत लियांगच्या जादुई कुंचल्याची वार्ता शेजारील गावच्या सावकाराच्या कानी पोचली. त्याने विचार केला, या कुंचल्याचा उपयोग करून तो सम्राटापेक्षाही श्रीमंत बनेन. त्याने  लियांगचा कुंचला चोरण्याचा डाव रचला. त्याने त्याच्या गुंडांना लियांगच्या घरी पाठवलं. गुंडांनी लियांगला जेरबंद केलं आणि कुंचला आणून सावकाराला दिला.

सावकाराला आपल्या शक्तीसामर्थ्याचे प्रदर्शन करायचे होते म्हणून त्याने आपल्या काही मित्रांना घरी दावतला बोलावले. त्याने त्या कुंचल्याने खूप चित्रे काढली पण एक चित्र जिवंत होत असेल तर शपथ.
त्याला कळून चुकलं कि यात काहीतरी रहस्य आहे. त्याने गुंडांना फर्मावलं कि लियांगला त्याच्यासमोर हजर करा. लियांग समोर येताच सावकार म्हणाला, " जर तू माझ्यासाठी काही चित्रे काढशील तरच इथून जिवंत घरी जाऊ शकशील !"

लियांगला सावकाराचा इरादा कळला. तो म्हणाला,"मी नक्की तुमची मदत करेन, पण मला मुक्त करा."

"माझ्यासाठी सोन्याचा पर्वत काढ" सावकार म्हणाला. "मी तिथे जाऊन खूप सोने गोळा करेन." त्याला म्हणायचं होतं,"मी या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल. सम्राटापेक्षाही"

लियांगने समुद्राचं चित्र काढलं.

"तू समुद्र कशाला काढलास" सावकार म्हणाला. "मी म्हणालो ना कि पर्वताचं चित्र काढ. मला सोनं हवंय, मासे नकोयत."

"पर्वत समुद्राच्या पल्याड आहे. हा पहा." आणि लियांगने समुद्राच्या पल्याड पर्वत काढला.

जेव्हा सावकाराने सोन्याने चमकणाऱ्या पर्वताला पाहिलं, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आसुरी चमक आली. "पण हा पर्वत तर फार दूर आहे, मी तिथे कसा जाऊ?"

"मी तुमच्यासाठी जहाजाचं चित्र काढतो, जे तुम्हाला तिथवर घेऊन जाईल. " लियांग म्हणाला. आणि त्याने सम्राटाच्याही आरमाराला लाजवेल  असे सुंदर रत्नजडीत जहाज जिवंत केले. सावकार जहाजात चढला आणि म्हणाला, "आता त्या पर्वतापर्यंत नेणाऱ्या वाऱ्याची निर्मिती कर." लियांगने वाऱ्याचे चित्र काढले. जहाज पर्वताच्या दिशेने चालू लागले. त्या सोनेरी पर्वताला आपल्या कवेत घेण्यास सावकार उतावीळ झाला होता. त्याने लियांगला फर्मावले, "जरा जोराचा वारा येऊ दे म्हणजे मी त्या पर्वतावर लवकर पोचेन."

लियांग वाऱ्याचे चित्र काढत राहिला. मंद वाऱ्याचे रुपांतर सोसाट्याच्या वाऱ्यात झाले आणि मोठे वादळ आले. त्या वादळात रत्नजडीत जहाज आणि लोभी सावकार बुडून समुद्रतळाशी गेले.

असं म्हणतात कि लियांगने त्याच्या गावातील  एका सुंदर मुलीशी लग्न केलं आणि त्याच्या कुटुंबासह त्याने उर्वरीत आयुष्य छान घालवलं.
***


( इथे  उपलब्ध असलेल्या या चिनी लोककथेचा हा अनुवाद आहे. माझ्या भाचरांना हि गोष्ट सांगताना मजा आली आणि  वाटलं कि ब्लॉगवर ही गोष्ट पोस्ट करावी म्हणून.)

बुधवार, २३ मार्च, २०१६

मिक्सरेडिओचा अंत


काल संध्याकाळी ई-मेल आला- 'MixRadio is Closing Today'.


मिक्सरेडिओ ही on-line music streaming service. नोकिया कंपनीने आधी ovi music म्हणून ही सेवा सुरु केली. त्यानंतर तिचे नामांतर 'Nokia Music' असे झाले. नोकिया नंतर या सेवेची मालकी 'Line' ने घेतली आणि तिचे rebranding 'MixRadio' असे केले. गेली १७ वर्षे ही सेवा सुरु होती.
  Windows OS च्या आधीच्या सर्व मोबाईल्स मधे pre -installed असणारे हे app. तुमचे इंटरनेट चालू असेल तर मनमुराद गाणी ऐकण्याची हौस पूर्ण करता येई. दोन वर्षांपूर्वी मी माझा पहिला स्मार्टफोन घेतला. त्यानंतर गेली दोन वर्षे मी हे app वापरत होतो. 
टिकाऊ आणि स्वस्त मोबाईल म्हणजे नोकिया हे समीकरण असताना घेतलेला फोन आताही व्यवस्थित चालतोय.अनेक वेळा त्याने आपली टिकाऊपणाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
मिक्सरेडिओ ची खासियत म्हणजे त्यांचा संग्रह. लाखो गाणी तुमच्या दिमतीला. गजलचा संग्रह तर अप्रतिम होता. फरिदा खानुम आणि इक़्बाल बानोची गझल मी पहिल्यांदा ऐकली ती इथे. बेगम अख्तर ने वेड लावले ते इथे.
सकाळी ऑफिसला निघताना कानात हेडफोन लावून घराबाहेर पडायचे. Favourites मधून एक गायक निवडायचा. मग त्या Genre मधील गाणी ऐकत प्रवास करायचा. ऑफिसमधे आवाज कमी करून classical ऐकायचं. संध्याकाळी home theatre ला मोबाईल जोडून कुठलातरी राग ऐकत बसायचं. कितीही गाणी ऐका. महिन्याची फी नाममात्र.
App चा Interface अत्यंत सहज सुंदर. गायकाची माहिती, त्याचे recent twitter updates, फोटो उपलब्ध असे. मी अनेक कोंकणी, बंगाली, गुजराती गाणी blindly download केली होती. आता जेव्हा बंगाली शिकतोय तेव्हा फार मजा येतेय.
इंटरनेटच्या महाजालात कुठली site, माहिती केव्हा गडप होईल सांगता येत नाही. हे सारं माहितीचं आभासी विश्व. आता या app ची जागा घेण्यासाठी नवीन apps सरसावले आहेत. जुन्या users न आकर्षक योजना देताहेत. On-line music industry  फार मोठी आहे. इथे टिकायचं असेल तर नवीन business models विचारात घेतले पाहिजेत.



मिक्सरेडिओचा अंत मनाला चटका लावून गेला. ज्यांनी हे app वापरलंय त्यांना कळेल कि मला नेमकं काय म्हणायचं आहे. 

शनिवार, १९ मार्च, २०१६

एका चित्राच्या निमित्ताने

एका लहान मुलगा कसलंतरी चित्र काढत बसला होता. त्याला घरातील एका मोठया माणसाने जरा जरबेतच विचारलं, "काय काढतोयस रे ?". मुलगा म्हणाला, "देवबाप्पाचं चित्र काढतोय". त्यावर त्या मोठ्या माणसाने जरा मिश्किल अंदाजात म्हटलं, "अरे पण देव दिसतो कसा हे कुणालाच माहित नाही, मग कसं काढणार तू चित्र ?". मुलगा फार गोड होता. त्याने मग उलटटपाली फार छान उत्तर दिलं. "माझं चित्र पाहून लोकांना कळेल - देवबाप्पा दिसतो कसा ते."

लहान मुलांमध्ये सर्जनशीलता अशी ठासून भरलेली असते. प्रश्नांना वेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याची, वेगवेगळी उत्तरं शोधण्याची, नवनिर्मितीची आस त्यांना असते. कधी ती एकटेच स्वताशी बडबडत बसतील. स्वतःच्या मनोराज्यात हुंदडत बसतील. हल्लीच वय वर्ष नऊच्या अद्वैत या मित्राला भेटलो. त्याच्याशी गप्पा झाल्या, त्याने काढलेल्या या चित्राविषयी.  अद्वैत चौथ्या इयत्तेत आहे.


या चित्रात त्याने काय काढलंय ते पूर्णपणे abstract असल्याने व चित्रकलेतले  मला काहीच कळत नसल्यामुळे खुद्द  चित्रकारांना याबद्दल विचारण्यात आले. पहिलं चित्र हे Gun Tank (रणगाडा) आहे. पण त्यात फार वैशिष्ट्ये आहेत. एक तर हा रणगाडा detachable पार्टसचा आहे. याचे सगळे भाग केव्हाही सुटे होऊ शकतात. रणगाड्याला खाली चाके आहेत तेव्हा जमिनीवरील युद्ध त्याने लढता येते. हवाई हमल्यासाठी वरचा भाग आपोआप विलग होऊन जेट बनू शकतो. आणखी मजेशीर बाब म्हणजे  आपत्कालीन परिस्थितीत जेटचा भाग सुटा होऊन आतील व्यक्ती 'धूम' स्टाईल बाईकवरून सुसाट पळूही शकते.

या रणगाड्याच्या खाली दोन Weapon Tanks आहेत. पहिला Tank अल्त्रोन नामक रोबोचा आहे. त्याचं नाव त्याने Tank वर कोरलंय. तो आपल्यासारखे आणखी रोबो बनवू शकतो. तो बॉस आहे. दुसऱ्या Tank मध्ये शस्त्रे आहेत खूप सारी. आणि त्यात एक रखवालदार पण आहे. ही चित्रे पाहून मी ज्याम इम्प्रेस झालो आहे.
मुळात मला चित्रांमध्ये निसर्गचित्र तेवढं काढता येतं. त्यातही दोन डोंगर, त्यातून उगवणारा किंवा मावळतीचा सूर्य,  चार आकडा दर्शवणारी आकाशातील पक्षी, घर, नदी , नदीतील त्रिकोणी मासे आणि घरापुढील सरळ रेषेतील गवत एवढं काढता येतं.  अद्वैतची चित्रकला तुम्ही म्हणाल realistic नसेल. रणगाडा, रोबो जसेच्या तसे वाटत नसतीलही. पण त्याच्याशी बोलताना एक जिवंत चित्र त्याच्या डोक्यातून कागदावर उतरतं आहे हे जाणवत होतं. तो कल्पना जगत होता. डोक्यात चाललेल्या हजारो गोष्टींपैकी एक गोष्ट अल्त्रोनची असेल. त्या अल्त्रोनचं पुढे युद्धही झालं असेल कुणाबरोबर. त्याच्या मनोविश्वात त्याने रोबोंना जगावर ताबा मिळवताना पाहिलंही असेल. एक दिवस हे सर्व तो कागदावर उतरवेल हे नक्की.

मुलांच्या कल्पनांना फुलू दिलं, "आता हा अल्त्रोन कुठे चालला आहे, पुढे काय होईल तेही काढ चित्रात." असं प्रोत्साहन दिलं तर पुढे मागे तो चांगला कलाकार होईल, त्याला आपल्या कल्पना तुमच्याशी शेअर कराव्या वाटतील किंवा "असले नसते धंदे करण्यापेक्षा अभ्यास करा गणिताचा" म्हणत दटावलं तर हा रोबो, त्याबरोबरचं काल्पनिक जग आपोआप गुडूप होऊन जाईल हळूहळू.

जगाला हुशार व्यक्तींबरोबरच वेगळा विचार करणाऱ्यांची, सृजनशील लोकांची  फार गरज असते. स्टीव जॉब्स ने आयफोन आणला बाजारात तेव्हा इतरही कंपन्या होत्याच ना स्पर्धेत. आज Apple आपलं स्थान टिकवून आहे ते सततच्या सृजनामुळे. मानवी प्रगती नवनिर्मितीचा आणि सृजनाचा ध्यास या दोन गोष्टींवर अवलंबून आहे.