शनिवार, २९ मार्च, २०१४

नोकरीनामा


परवा वाटेत एक मित्र भेटला. त्याने बोलता बोलता खिशातून त्याचे विजिटिंग कार्ड काढून दिले. मी म्हणालो  "अरे बाबा कार्ड कशाला ? आहे माझ्याकडे. काही महिन्यांपूर्वीच नाही का तू दिलस !" तर त्यावर त्याचे उत्तर -"जॉब बदलला मी,  हे नवीन कंपनीचं". मी चकित.  कारण या आमच्या मित्राला हेवा वाटावा अशा पगाराची नोकरी.  त्यावर आईटी क्षेत्रातला जॉब.  न राहवून कारण विचारलं, तेव्हा म्हणाला "पॅकेज जास्त आहे" . आईटी क्षेत्रातली मंडळी एका जागी फार टिकत नाहीत हे ऐकून होतो.  चांगली संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सर्वच असतो, पण या क्षेत्रातल्या मंडळींचा एका ठिकाणचा कार्यकाळ हा तीन महीने ते जास्तीत जास्त दोन वर्ष असा असतो.  त्यातही सतत स्वताला अपडेट ठेवायची धडपड.  ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या एका मित्राने सांगितलं, की हल्ली माणसं एका कंपनीत एखाद वर्ष काम करतात आणि तो अनुभव बांधून दुसर्या कंपनीत जातात. कंपनीशी त्यांना कुठलीही बांधीलकी असत नाही.  मग ही माणसे जाताना एका वर्षात या क्षेत्रात कमावलेले ज्ञान, बहुमोलाचे अंदाज सोबत घेऊन जातात.  जे कंपनीच्या दृष्टीने फार महत्वाचे असते.   नवीन नोकरदारांवर कामकाज शिकवण्यासाठी जो खर्च होतो तो वेगळाच.
माझ्या शेजारचे काका, इतकेच कशाला माझ्या बाबांनी देखील एकाच कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.  कंपनीच्या उत्कर्षाच्या सर्व घटनांचे साक्षी राहिले.  त्यांना विचारलं तर आपण सुरुवात किती रुपये पगारापासून केली आणि आता मेहनतीने कुठपर्यंत आलो आहोत याचा सविस्तर आलेख सांगतील. पण पैसा कमावणं  हाच नोकरी करण्याचा महत्वाचा हेतू आहे का?
स्वताच्या आवडीच्या क्षेत्रात किती जण काम करतात?
मुळात आपण नोकरी, उद्योग कशासाठी करतो ? पैसा कमावण्यासाठी. हे खरं प्राथमिक उत्तर.  कारण त्याशिवाय उपजीविका करणं कठीण आहे.  (पैश्य़ाशिवायही रानावनात  नीट जगता येतं हे थोरोचं  वाल्डेन वाचताना पटतं आणि त्याचा खूप हेवा वाटतो)  रोज सकाळी उठून कामावर जाण्याची लगबग. तो सकाळचा दीर्घ प्रवास, दिवसभर ऑफिसमधे काम, संध्याकाळी थकल्या जीवांची घराची ओढ.  रात्रीची जरा झोप लागतेय तोच पुन्हा घड्याळाचा गजर.  पुन्हा तेच तेच.  कधी एकदा रविवार येतोय याची आस.  आणि रविवारच्या रात्री सोमवारची भीती.  जगण्यात एकसुरीपणा येत जातो . कामाच्या डेड लाइन्स पाळता पाळता आपणच डेड होऊन जातो कळतच नाही.  एंजॉयमेंटच्या नावावर वीकेंडला नविन लागलेला पिक्चर पाहतो, बाहेर जेवतो आणि आपलं सगळं सुरळीत चाललं आहे याचं स्वतःलाच आश्वासन देत राहतो.
माझ्या आईटी क्षेत्रातल्या मित्रासारखे काही झटपट नोकर्या बदलतात,तर काही दुसरी चांगली नोकरी शोधूया का? मिळेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात आणि सुरक्षितता शोधत जगत असतात.  एका मित्राने सरकारी नोकरी मिळाल्यावर "Finally got a government job... आता आयुष्यभराची चिंता मिटली" असे म्हटल्यावर काय रिएक्शन द्यावी या विचारात  बराच वेळ होतो मी.  आवश्यकतेपेक्षा जास्त पगार, कामाचे कमी तास,दिवाळी बोनसची खात्री, केव्हाही संप करून व्यवस्थेला वेठीला धरण्याची मुजोरी आणि कामचुकारपणा ही व्यवछेदक लक्षणे असणार्या नोकर्यांसाठी जेव्हा लाखोंच्या संखेने अर्ज येतात,प्यून, क्लर्क सारख्या पोस्टसाठी जेव्हा मास्टर्स झालेली मुले मूली प्रयत्न करतात तेव्हा काळजी वाटते की  इतके शिकूनसुद्धा आपल्याला पुढे काय करायचे आहे हे न कळणं ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका नव्हे का?
निव्वळ स्कोप आहे असा विचार करून इंजीनियर झालेला माझा मित्र जेव्हा कॉल सेंटरमधे कमी पगाराचा जॉब करतो,तेव्हा खंत वाटते.  करिअरिस्टिक धोरणातून इतरांच्या सांगण्यावरून  क्षेत्र निवडलेलं.  त्यात मनातून आवड नाही म्हणून रेटत रेटत केट्या  पास करत एकदाची हाती मिळवलेली डिग्री.  आणि त्याच क्वालिफिकेशनचे हजारो लोग.  नोकरी नाही म्हणून घरच्यांनी दाखवलेला अविश्वास हेच हल्लीच्या पिढीचे क्रंदन आहे.  बरं, वाट चुकली हे ध्यानात आल्यावरही आपल्या मनासारख्या क्षेत्रात न जाणार्या रिस्क घ्यायला घाबरणार्या लोकांची दया येते. आला दिवस ढकलला जातो.  पगार केव्हा वाढेल याच विचारात आयुष्य गुंतून जाते.
वपु काळे यांनी त्यांच्या वडिलांबद्दल लिहिलय की,उतारवयात ते असंबध्द बोलत . आयुष्यभर बॉसला एक शब्द उलटा न बोलता इमाने एतबारे  नोकरी केल्यानंतर उतारवयात ते बॉसला शिव्या देत.  आयुष्यभर दाबून ठेवलेला राग, अपमान, संताप याचा म्हातारपणी उद्रेक होतो.
याउलट आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद वेगळाच असतो.  मॉनेटरी फायदे हे मग बायप्रोडक्ट असतं.  आवडीच्या क्षेत्रातली कंटाळवाणी कामे पण कल्पकतने कशी करता येतील हे कळू लागतं.  प्यून, क्लर्क यांना मी अजिबात कमी लेखत नाहीये.  शेवटी प्रत्येक काम महत्वाचच असतं,पण प्रत्येकाने स्वतःची वाट शोधायला हवी.   At the end of the day समाधान महत्वाच असतं.  "मी तेव्हा हे करू शकलो असतो"  किंवा "मी तेव्हा हे केलं असतं तर किती बरं झालं असतं" ही वाक्ये  नंतर  खूप त्रास देतात मनाला.
आपलं आवडीचं क्षेत्र कसं निवडावं? माझा मित्र दिपची  theory असे  सांगते की, जे करताना तुम्ही देहभान विसरता त्याचसाठीच तुमचा जन्म झालेला असतो.  बर्याचदा त्याची मस्करी केली आम्ही.  पण आता ते पटतंय.
 शाळेत असताना निबंधांचा शेवट जसा आपण typical पद्धतीने करायचो तसाच शेवट एका मोठ्या माणसाचे वचन उद्गारून करतोय -
"And in the end, it’s not the years in your life that count. It’s the life in your years."
- Abraham Lincoln 

सोमवार, २४ मार्च, २०१४

लोकलकथा

माझा एक सहकारी प्राध्यापक मित्र पीएचडी करतोय. त्याचा विषय आहे की मुंबईतील रेल्वे कशा प्रकारे एक लहान विश्व आहेत -  स्वताचे वेगळेपण असणारे. या मोठ्या विश्वात आणखी लहान लहान विश्वे.  रेल्वेमुळे कशा पद्धतीने समाज आणि त्यातील घटक बांधले जातात वगैरे. या तत्सम तांत्रिक गोष्टी तो माझ्याशी बराच वेळ बोलत होता. तर या विषयावर बोलत असताना रेल्वेतील भिकारी, भजनी मंडळे, ग्रुप्स, पाकिटमार, भेळवाले असे अनेकविध विषय माझ्या डोळ्यासमोर आले. पुढे मागे यातील एका विषयावर आपणही पीएचडी करण्यास हरकत नाही.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्या रेल्वेची ओळख फार लहानपणीच झाली.  त्यावेळी आणि आतापण हा प्रवास फारसा सुखकारक आहे असे कधी वाटले नाही.  दिवाळीला बाबांच्या ऑफिसमधे लक्ष्मीपूजेसाठी आम्ही जात असू, त्यावेळी कांदिवली ते चर्नी रोड हा तासभराचा प्रवास कधी संपेल असे वाटे. कंटाळा येई.  शाळेत असताना एकदा मी फर्स्ट क्लास ने प्रवास केला होता. टिकिट मात्र सेकंड क्लासचे होतं. त्यावेळी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास काही माहित नव्हतं.  स्टेशनला टीसीने पकडलं आणि विचारलं 'टिकिट' ,  मग मी सेकंड क्लासचं टिकिट दाखवताच त्याने विचारलं की 'फर्स्ट क्लासने कशाला आलास?' मग मी  विचारलं की "फर्स्ट क्लास म्हणजे काय?" त्या बिचार्याला माझ्या अज्ञानाची दया आली असावी. त्याने मला सोडून दिलं.

कॉलेजमधे असताना पहाटे ५. ३० ची लोकल पकडायला लागायची. सातच्या ठोक्याला एप्रन घालून लॅबमधे हजर असलच पाहिजे असा दंडक होता.  उशीरा येणार्याना  कुलकर्णी सर अशा नजरेने पाहत की, अख्या वर्गात आपण 'होपलेस' आहोत आणि आपण रसायनशास्त्रावर काळिमा आहोत असे वाटे. सोबतीला आणखी एक जण असल्यावर हा काळिमा आणि होपलेस'पणा वाटून घेतल्यासारखे वाटे.  सकाळची ही लोकल सुटली की दहा मिनिटे थांबावे लागे.  पुलं म्हणतात तसे मुंबईकराचे घड्याळ हे त्याच्या नशिबालाच बांधलेले असते. 
नेहमीची लोकल चुकल्यानंतरचे दुःख फ़क्त मुंबईकरालाच अनुभवता येईल.  भल्या पहाटे देखील बसायला थर्ड सीट किंवा किमान चौथी सीट मिळणे कठीण. अशा वेळी ज्यांना विंडो सीट मिळते त्यांच्या नशिबात चांगले ग्रह असावेत.   सकाळच्या गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेन मधे चढणार्याचे कसब पाहून कौतुक वाटे.

लोकलच्या या गर्दीतही ग्रुप असतात. रोज रोज एकाच ट्रेनने जाणारे अनोळखी चेहरे हळू हळू एकमेकांना नावाने ओळखू लागतात.  "आपला माणूस" म्हणून त्याच्यासाठी जागा धरली जाते.  त्याला  निदान नीट उभं राहायला मिळावं अशी अपेक्षा असते.  मग या जागा अडवून ठेवण्यावरून भांडणे होतात.  क्वचित प्रसंगी मारामारी होते.  इथे लोक ग्रुपने मार खातातही आणि मार देतातही ! इथे बहुतेक सर्व सण साजरे केले जातात.  एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले जाते.  वयानुसार प्रत्येकाची यथोचित थट्टा मस्करी पण होते.  गटारीचे प्लान बनवले जातात, कधी कधी वडे समोसे आणले जातात.

या तास दीडतासाच्या प्रवासात काही भजनी मंडळी कोकलून इतर प्रवाशांचा जीव खातात.  निवडक काही अप्रतिम गाणारे असतात.  बाकी नुसता टाहो.  काही दिवसांपूर्वी विरार लोकलच्या लेडीज़ डब्यात एका बाळाचा जन्म झाला, तेव्हा लोकांना कोण आनंद ! गाडी वीस मिनिटे स्टेशन वर थांबली तरी एरवी सेकंदासाठी कुरबुरी करणार्या कुणीही तक्रार केली नाही. 

माधवनचा 'रहना है तेरे दिल में' आठवतोय ? त्यात तो दिया मिर्ज़ाचा हात हातात घेऊन तिचे भविष्य सांगताना म्हणतो की, "तेरे हातों में लम्बी रेखाएं नहीं है, सब लोकल ट्रेन की पटरियां ही है" किंवा लोकलच्या दरवाज्यात उभा राहून राणी मुखर्जी वर लाइन मारणारा 'साथिया'तला विवेक ओबेरॉय, शेवटची लोकल चुकल्यामुळे अनपेक्षित प्रसंगाना सामोरे जावे लागणारा 'एक चालीस की लास्ट लोकल ' मधला अभय देओल असो.  बॉलीवुडने लोकल ट्रेनला कथावस्तूचा एक भाग म्हणून स्वीकारलय.  'ह्यूगो' नावाच्या हॉलीवुड चित्रपटात तर रेल्वे स्टेशन वरच सर्व महत्वाच्या घटना घडतात.

विजय तेंडुलकरांची 'झपूर्झा' नावाची श्रुतिका आहे.  त्यात त्यांनी बॅकग्राउंडला लोकल ट्रेनचा प्लॉट घेतलाय. संध्याकाळी घरी परतणारा म्हातारा त्याच्या मनातले विचार, त्याचे कुटुंब, ट्रेनमधले प्रवासी या सर्वांचा त्यांनी ज्या शैलीने मिलाफ केलाय.. मानना ही पडेगा !!  ती श्रुतिका उत्तरोत्तर मनावर असा ताबा मिळवते की त्या ट्रेनमधील त्या कम्पार्टमेंट मधे आपणच आहोत असे वाटते.  वपुंचे 'कर्मचारी' पुस्तक लोकलकथांनी भरलेले आहे.

मुंबईवर जेव्हा दहशती हल्ला झाला तेव्हा लोकल ट्रेन्समधली निरागस माणसे हकनाक मारली गेली.  ते भयाण दिवस विसरणे कधीही शक्य नाही. पण या सर्व संकटांतूनही माणसे पुन्हा उभी राहिली.  पुन्हा जीवावर उदार होऊन स्टीलचा रॉड पकडत ऑफिसला जाऊ लागली.  "स्पिरिट ऑफ़ मुंबई"चे गोडवे गायले गेले, पण या सर्व धैर्यामागे शूरपणा नव्हताच. होती ती फ़क्त अगतिकता. एक दिवस कामावर गेलो नाही तर पगार बुडेल किंवा काहींच्या बाबतीत घरी चूलच पेटणार नाही ही परिस्थिती.

कष्टकर्यांच्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणार्या अस्सल मुंबईकराला अजूनही 'विंडो सीट'चच स्वप्न पडतं.

मंगळवार, ११ मार्च, २०१४

कथालेखन वगैरे

मरीन ड्राइवला पोचलो तेव्हा सहा वाजले होते. आणखी अर्ध्या तासात काळोख पडेल. वर्दळ नेहमीसारखीच.  मस्तपैकी जागा पकडली पाहिजे. निदान जवळपास डिस्टर्ब करणारं - काय करतोय म्हणून डोकावून पाहणारं कुणी नको. आज कुठल्याही परिस्थितीत रणजीतला कथेचा फर्स्ट ड्राफ्ट दिला पाहिजे.  गेला आठवडाभर आज देतो, उद्या देतो, कंटेंट रेडी आहे फ़क्त कागदावर उतरवायचय, उद्या पक्का - असं करून त्याला टाळत आलो. आणि आज सकाळी पावणे पाचला  त्याचा SMS आला की, 'I knw..u hvnt wrttn anythin..i'll KILL u'. सकाळी नऊला उठलो तेव्हा कुठे तो पाहिला.  मग अर्धा तास दात घासत, एक तास बाथरूममधे अंघोळ करताना आणि त्यानंतर १२ पर्यंत डोरेमॉन बघत काय लिहावं याचाच विचार करत बसलो आपण.  तरी काहीच srtike होत नव्हतं. रणजीतला हवीय एक लव स्टोरी.  मग त्यात पाणी घालून तो एकांकिका बनवणार किंवा अगदीच नाही जमलं तर शॉर्ट फ़िल्म.  त्याच्या अपेक्षाही भन्नाट असतात.  'अजून कुणालाही सुचली नसेल अशी प्रेमकथा लिही... रोजरोजचं नको त्यात...बस स्टॉप, ट्रेनमधली ओळख... मग ओळखीचं रूपांतर प्रेमात अशी रटाळ स्टोरी नकोच... काहीतरी फ्रेश हवं आणि सगळ्यांना अपील होणारं....' . एवढ सगळं हवय आणि ते पण सामान्य माणसाच्या बाबतीत. अशक्य ! आता इतक्या वर्षांत लोकं त्याच त्याच पध्दतीने प्रेमात पडत असतील तर आपण काय करणार ? CCD ला जाऊन कॉफ़ी पीत पीत  लिहूया असं ठरवलं दुपारी. कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी दीपक घेईल.  पण किती वेळ टेबल अडवून बसणार? आणि कुणी ओळखीचं भेटलं तर औपचारिक बोलावं लागणार.  त्यात आणखी वेळ जाणार.  त्यापेक्षा 'समुद्रकिनारी' खारे दाणे खात बसू.
आणि असा प्लान ठरला.

कठडयावर मांडी घालून बसलो, चपला नीट काढून पायाखाली घेतल्या.  बॅगेतून डायरी काढली.  दहा वेळा रिफिल बदललेलं montex चं लकी पेन.… त्याला एकदा ओठाला लावलं.  समोरच्या समुद्राकडे लॉन्ग पॉज घेऊन पाहिलं.  एक खोल दीर्घ श्वास आणि कागदावर लिहिणार तोच खांद्याला कुणी तरी हात लावला - "भाईसाब कुछ पैसा देगा?" एक सत्तर वर्षांची म्हातारी माझ्या बाजूला बसलीय.  पोशाखावरुन कॅथलिक वाटतेय.  चेहर्यावर सुरकुत्या आहेत.  बोलताना गाल आत ओढले जाताहेत.  केस पांढरेफटक.  ती पुन्हा म्हणाली "मेरा कोई नहीं है।  सब मर गया।  कुछ पैसा देगा?".
मी भिकार्यांना पैसे कधीच देत नाही.  म्हणजे आधी द्यायचो.  पण काही महिन्यांपूर्वी मंडळाच्या व्याख्यानमालेत एका समाजसेविकेचे लेक्चर ऐकले.  तिच्या मते भिकार्यांना पैसे देण्यापेक्षा खायला काही तरी द्या. बिस्किटचा पुडा द्या.  तिने इतक्या पोटतिड़कीने सांगितलं की, मी माझ्या बॅगेत पारले ग्लुको बिस्किटचे छोटे पुडे ठेऊ लागलो.  आला भिकारी की दे बिस्कीट.  एकदा एका लहान मुलाला तो पुडा  देताना त्याने सांगितलं "हम ये नहीं खाताय, क्रीम का दो ना".  मुलं ती मुलंच. रणजीतला ही गोष्ट सांगताच त्याने याच थीमवर शॉर्ट फ़िल्म केली.  त्या लहान मुलांचे कुरतडलेलं बालपण हास्याचा विषय होऊ नये असचं मला वाटत होतं.
त्यानंतर मी भिकार्यांना काहीच देत नाही. आपोआप ते कंटाळून पुढे जातात.
तरी पण त्या म्हातारीला म्हटलं 'पैसा नहीं है, कुछ खाओगी?"  तिने नकारार्थी मान हलवली. मग मी नायक आणि नायिका कुठे भेटतील या विचारात गुंतलो.  शाळा- कॉलेज - हॉस्पिटल - लाइब्रेरी - नाट्यगृह - चौपाटी - कॉमन भेळवाला.  किंवा असं केलं तर.… नायक आणि नायिका एकमेकांना फेसबुकवर ओळखतात चेहर्याने.
माझ्या बाजूला बसलेली म्हातारी दर थोड्या वेळाने बाजूच्या कपल्सकडे, इवनिंग वॉकला आलेल्यांकडे पैसे मागत होती "भाईसाब कुछ पैसा देगा?" हे वाक्य सारखं कानावर पडत होतं.  एकाने म्हातारीला सांगितल "आप मुझे बताओ आपकी कहानी'. मग म्हातारीने तेच "मुझे कोई नहीं है, अकेली हुँ, कुछ पैसा दोगे? दस रूपया?" हे सांगायला सुरवात केली.  त्या गृहस्थाने सर्व शांतपणे ऐकलं आणि तसाच निघुन गेला.  मग म्हातारीने तोंडातल्या तोंडात त्याला काही शिव्या दिल्या.

नायक आणि नायिका एकमेकांना भेटायचं ठरवतात.  पहिल्यांदाच भेटणार असतात.  वातावरण निर्मिती  करता येईल. कॉफ़ी शॉप की क्रॉसवर्ड ? क्रॉसवर्ड डन्.
माझ्या बाजूला बराच वेळ पासून एक माणूस फोन वर बोलतोय. ऐकायला स्पष्ट येतेय.
"जी मै मुकुल बात कर रहा हुँ। कपूर जी कैसे हो आप? पहचाना? सर मैं ऑडिशन के लिए आया था।  आपने कहा था, कुछ काम होगा तो बतावोगे।…जी सर, कल ही आये हो बैंगकॉक से ? कैसे रही आपकी ट्रीप ? जी बिजी हो.....ok सर कुछ काम हो तो बता दीजिये। …जी यही नंबर है मेरा।  बाय सर have a good day. "
मग दूसरा फ़ोन कॉल.
"जी क्या मैं शर्माजी से बात कर सकता हुँ? सर, मैं मुकुल, सेट पे मुलाकात हुई थी।  आपने कहा था कुछ काम होगा तो बतावोगे? हा..सर कैसी है अभी आपकी तबियत, ठीक है सर बाद में बात करेंगे। "
या संवादावरुन आणि वाक्यावाक्यागणिक टपकणार्या नम्रतेतून हे स्पष्ट कळत होतं कि ही व्यक्ती स्ट्रगलर आहे.
 मग आणखी काही फोन कॉल्स. तीच नकारघंटा. तो उदास चेहर्याने निघुन गेला.
नायिका शाळेत शिकवत असते. आपल्या नायिकेसाठी नायक एक नाटुकले लिहून देतो.  नायिका लहान मुलांना घेऊन ते नाटक बसवते. मग या सर्व घडामोडीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पुढे?
पुढे?
लग्न?
की इथेच शेवट करावा?
चटपटित संवाद नंतर लिहिता येतील. ब्लू प्रिंट ओकेय. पण तितकिशी भिड़त नाहीय मनाला.
ती म्हातारी कुठे गेली? आता तर इथे होती. 

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

उगाच हळहळते आपली शाई

सहावीत असतानाची गोष्ट. मराठीचा तास चालू होता. बाई सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता शिकवत होत्या. सगळ्यांची डोकी बाकावरील पुस्तकांत होती. बाईंचा तसाच आदेश होता. या कवितेच्या पानावर निळ्या हिरव्या रंगातला समुद्र होता. वर्गात फ़क्त बाईंचाच आवाज घुमत होता. शेजारचा मित्र वर्गात असून नसल्यागत. त्याची छान समाधी लागलेली. मागे जरा वळून पाहिलं, मागच्या बाकावरचे पण समाधीत गुंतलेले.
बाई कविता शिकवताहेत. मुलं कठीण शब्दांचे अर्थ समासात लिहिताहेत. खिडकीतून येणार्या उन्हाची एक तिरिप कंपासपेटीवर पडलीय. अचानक खट  सारखा आवाज येतो अन धपदिशी काहीतरी माझ्या पुढ्यात पडतं.  त्या आवाजाने वर्गाची तंद्री भंगते. सगळे काय झालं म्हणून एकमेकांकडे पाहू  लागतात. माझ्या समोरील पुस्तकावर चिमणी मरून पडलेली असते. रक्ताचा एक मोठा ठिपका पानावर पडलेला असतो. रक्ताचे काही डाग कुणाच्या तरी यूनिफार्मवर उडालेले असतात.  एकंदरीत खिडकीतून आलेली एक चिमणी छताच्या पंख्याच्या तावडीत सापडून निष्प्राण झालेली असते.  एव्हाना माझ्या अवतीभोवती मुला-मुलींची गर्दी जमा होते.  शेजारी बसलेल्या मित्राची झोप खाडकन् उतरलेली असते. मग चारी बाजूंनी 'च्यक च्यक' सुरु होते. बाई गर्दीतून वाट काढत माझ्या बाकाजवळ येतात. मेलेल्या चिमणीला पाहतात अन् वर्गातील मागच्या बाकावरील धाडसी मुलाला तिला बाहेर फेकून यायला सांगतात. तो मुलगा मग ते पुस्तक सांभाळून उचलतो आणि वर्गाबाहेर पडतो मग वर्गाबाहेर जाता जाता मधल्या रांगांमधले आणि ज्यांना मेलेली चिमणी पाहता आली नाही ते तिला शेवटचं पाहण्याचा प्रयत्न करतात.
वर्ग परत सुरु होतो. माझं लक्ष आता उडालेलं. मी वरती पंख्याकडे पाहतो. तो गरगर फिरत असतो. माझं डोकं पण गरगरायला लागतं.  पुढचे दोन दिवस मी कुणाशीच फार बोलत नाही. इतक्या जवळून मृत्यू पाहण्याची ही पहिलीच वेळ.

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी होतो. आजीची दुभती म्हैस आजारी होती. चार दिवस तिने चारा पाणी काहीच शिवलं नाही. एखादं माणूस आजारी असावं असं शोकाकूल वातावरण घरी होतं.म्हैस काही वाचणार नाही हे ही सगळ्यांना कळून चुकलेलं. अन् ती रात्रीच केव्हातरी वारली. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो. अन् सकाळी जाग आली ती आजीच्या किंकाळीने. लहान होतो. आजी का रडतेय हे सुरुवातीला कळलं नाही. नंतर मेलेल्या म्हशीला पाहून कळलं. आजीच्या डोळ्याला पाण्याच्या नुसत्या धारा लागल्या होत्या. लहानशी चिमणी मरते तशी इतकी मोठी म्हैसपण मरते तर ! हालचाल थांबली, श्वास थांबले म्हणजे मृत्यू असंच असले पाहिजे. पण ही काहीतरी हरवल्याची जाणीव कसली? लोकं का रडतात?

शाळेच्या थोडं पुढे मुसलमानांच कब्रस्तान होतं. त्याला लागूनच खदान. त्यात आम्ही शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.  कब्रस्तानमधले हे उंचवटे कसले, ही उत्सुकता होती. मित्राने सांगितलं, माणूस मेला की त्याला इथे पुरतात. पण जोपर्यंत डोळ्याने पाहत नाही तोवर विश्वास कसा ठेवायचा? एकदा खेळताना  कब्रस्तानमधे गर्दी दिसली, काहीतरी खांद्यावरनं आणलेलं दिसलं. मग खेळ तसाच ठेवून आम्ही सगळे जमलो अन् चर्चेतून कळले की कुणीतरी मेलयं. खेळ संपल्यावर संध्याकाळी वाट चुकवून आम्ही तिथे पोचलो. त्या उंचावट्यावर फुलांची चादर होती. असाच प्रकार एकदा शाळेतून घरी जाताना दिसला पण यावेळी माणसाला पांढरया कपड्यात गुंडाळून खांद्यावरुन नेत होते. आई माझ्यासोबत होती. तिने बजावलं की असं काही दिसलं की लांब उभं राहायचं. आणि नमस्कार करायचा. आईला प्रश्न विचारण्याचं धाडस झालच नाही तेव्हा. मग हिन्दुंमधे मेलेल्या माणसाला जाळतात हे पुढे कळलं. शाहरुखचा 'कुछ कुछ होता है' मधे सुरुवातीस राणी मुख़र्जीच्या दहनाचा सीन आहे, तेव्हा तीही शंका फिटली पिक्चर पाहून.

काही जवळच्या, काही शेजारच्या व्यक्तींचं अकाली जाणं पाहिलं. त्यांच्या जाण्याने होणारं दुःख अनुभवलं आणि हे सर्व निसर्गनियमाचा भाग आहे, जाणारा जातोच त्याला परत नाही आणता येत इत्यादि सांत्वन करणारं तत्त्वज्ञान कधी पिंडाचा भाग होऊन गेलं कळलं देखील नाही.  मन कोरडं नाही झालं हे नशीब.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळची दादर फ़ास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मला उभा होतो. गाडीला यायला तीन मिनिटे अवकाश होता म्हणून थोडं चालत जाऊया पुढे म्हणून प्लेटफार्मवर चालत होतो. गर्दी होती थोडीशी. अचानक मधे कबूतराचं पिल्लू तडफडत पडलेलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या पत्र्यांमधल्या पोकळीत कबूतराचं घरटे होते. बॅगेतून टिश्यू पेपर काढला आणि त्याला अलगद उचलून कोपर्यात नेलं. बारिकशी चोच हालत होती. पाण्याच्या बॉटल मधलं थोडस पाणी करंगळीने त्याला पाजलं. एव्हाना लोकं कुतूहलाने पाहत होतीच माझ्याकडे. ट्रेन आली. थोड्या वेळाने ते मेलं. त्याला आणखी एका टिश्यू मधे गुंडाळून कोपर्यात कुणाचाही पाय लागणार नाही असं ठेवलं. एवढ्यात माझे हे सर्व उद्योग बघणार्या एकाने असही म्हटले कि "पंछी चुतिया होते है किधर भी घोंसला बनाते हैं".  माझी ट्रेन एव्हाना सुटली होती  दूसरी ट्रेन कुठली लागलीय हे पाहूया म्हटलं. हे इंडिकेटर पण जाम मिजासखोर. थोड्या वेळाने मागे वळून जिथे पिल्लू ठेवलय तिथे पाहिलं तर त्या पिल्लाजवळ एक कबूतर येऊन थांबलं होतं. त्याचच पिल्लू असावं बहुतेक.  आप्त स्वकीयाच्या  मरणाचं दुःख पशू पक्षांनापण होतं असावं.
संजय चौधरीची ओळ आठवली एकदम 'जाणारा जातोच, थांबवता येत नाही.. पण उगाच हळहळते आपली शाई'

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

द परसूट ऑफ़ हॅप्पीनेस

   
२००६ साली आलेला 'द परसूट ऑफ़ हॅप्पीनेस' हा सिनेमा नुकताच  पाहिला आणि  प्रचंड आवडला. साधी सोपी गोष्ट.  चित्तथरारक असे एक्शन आणि एडवेंचर नाही. पाहताक्षणी मनाला पटणारा आणि भिडणारा. विल स्मिथ हा ताकदीचा नट. याआधी मोहम्मद अलीच्या बायोपिक मधे त्याने भूमिका केली होती आणि MIB च्या मालिकांत तो असतोच.
     आपल्या आयुष्यातील सर्व संपत्ती  'बोन डेन्सिटी स्कॅनर' नामक एका मशीनच्या वितरणात खर्ची घातलेल्या ख्रिस गार्डनर (विल स्मिथ)ची ही गोष्ट.  बोन डेन्सिटी स्कॅनर ही मशीन हाड़ांचे अधिक परिणामकारक चित्र देते, पण सध्याच्या एक्स रे मशीन पेक्षा दुप्पट महाग असते. त्यामुळे बहुसंख्य डॉक्टरांना हा खर्च विनाकारण आहे असं  वाटतं. कुठल्याही परिस्थितीत महिन्याला किमान ३ मशीन विकणं हे त्याला चरिथार्थ चालवण्यासाठी आवश्यक आहे. त्याला सतत किटकिट करणारी बायको आहे, एक लहान मुलगा (ख्रिस्तोफर) आहे. एकंदरीत  त्रिकोणी कुटुंब.  आपण जबाबदार बाप बनण्याचे तो हरघडी प्रयत्न करतोय.
         हल्ली नवरा बायकोच्या नातेसंबंधात तणाव आहे.  त्याला मुख्य कारण म्हणजे ख्रिसला सेल्स मधे सतत येणारं अपयश. त्याला पार्किंगचे टिकिट्स भरता न आल्याने वाहतुक विभागवाले त्याची गाडी उचलून घेऊन जातात. घरमालकाचे भाडे थकलेले असते. कर भरण्यासाठी सरकार दरबारातून बर्याच नोटिशी घरात पडलेल्या असतात. सकाळी दोन्ही हातात एक एक अशा मशीन घेऊन तो त्याच्या मुलाला पाळणा घरात सोडतो.  त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधे मशीन विकण्यासाठी डॉक्टरांच्या मुलाखती सुरु.  डॉक्टरांची अपेक्षाभंग करणारी उत्तरे.  या सर्वांतून संध्याकाळी बायकोचं तिरसट बोलणं, असा त्याचा नेहमीचा दिनक्रम.
       एकदा असंच वॉल स्ट्रीटवरून चालताना एका गगनचुंबी इमारतीकडे तो पाहत असतो. बाजूला एक श्रीमंत दिसणारा  गृहस्थ लाल पोर्शे पार्क करतो. ख्रिस त्याला विचारतो की तू हे कसं केलस आणि आणि तू काय नेमकं  करतोस? तो उत्तर देतो की तो स्टॉकब्रोकर आहे.  ख्रिसला या हलाखीच्या आयुष्याचा कंटाळा आलेला असतो, तो ठरवतो की असं काही तरी करावं. जॉब बदलाच्या त्याच्या निर्णयाला त्याच्या बायकोकडून अपेक्षेप्रमाणे कडवट प्रतिसाद मिळतो.
   त्याच दरम्यान एक स्टॉक ब्रोकिंग फर्म इंटर्नशिपसाठी उमेदवार घेत असते. सहा महिन्यांची इंटर्नशिप. शेकडो अर्जापैंकी वीस जणांनाच निवडणार आणि त्या वीस जणामधून एकाचीच नोकरी पक्की होणार. ख्रिस पण इंटर्नशिपचा अर्ज भरतो.  एकदा इंटर्न रिक्रूट करणारा HR  मॅनेजर -ट्विसल टॅक्सीची वाट पाहत असतो त्या वेळी ख्रिस  "मला पण त्याच ठिकाणी जायचे आहे" असे सांगून त्याला घरापर्यंत टॅक्सीतून लिफ्ट देतो. काही करून त्याला ही संधी गमवायची नसते. या प्रवासात तो रूबीक क्यूब सोडवून  दाखवतो आणि आपण बुद्धिमान आहोत हे सिद्ध करतो पण त्याच्याकडे टॅक्सीचे पैसे भरण्याइतपत पैसे नसतात. मग टॅक्सीवाल्याला बरेच फिरवून एका ठिकाणी तो टॅक्सीतून पळ काढतो. टॅक्सीवाला त्याच्या मागे ओरडत पळत असतो. शेवटी ख्रिस त्या टॅक्सीवाल्याकडून स्वताची सुटका करुन घेतो. या गडबडीत तो एक मशीन गमावतो. एक मशीन म्हणजे एका महिन्याचं राशन.  तो घरी उशीरा येईल असे सांगण्यासाठी फोन करतो तेव्हा त्याची बायको आपण घर सोडून चाललो आहोत असे सांगून त्याला आणखी मानसिक संकटात टाकते. ख्रिस तरीही ठामपणे बायकोला बजावतो कि त्याचा मुलगा ख्रिस्तोफर त्याच्याचसोबत राहील. अशा वेळी त्याला थॉमस जेफेरसनने अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यात लिहिलेल्या "प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा शोध घेण्याचा अधिकार आहे" या वाक्याची आठवण होते त्याला राहून राहून  प्रश्न पडतो की जेफेरसनने 'सुखाचा शोध' असं का म्हटलं असेल ? सुखाचा फ़क्त शोधच घेता येतो का ? खरोखर सुखासारखं  काही असतं का? सुख म्हणजे नक्की काय असतं?
      घरी आल्यावर बायको आणि मुलगा दोघेही घरी नसतात. बायको मुलाला घेऊन घर सोडून गेलेली असते. त्याचं मन नैराश्याने भरुन जातं. अशा वेळी ट्विसल (HR  मॅनेजर) त्याला फोन करुन  सांगतो की, त्याला उद्या ऑफिसमधे येऊन भेट- तो इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालाय. इथे  एक लोच्या असतो की या इंटर्नशिप दरम्यान कुठलेही मानधन मिळणार नसते, आणि सहा महिन्यांनंतरही नोकरीची हमी नसते, काय करावं आता? ख्रिस ही संधी स्वीकारतो.
    मग त्याचा अत्यंत खडतर असा प्रवास सुरु होतो. सकाळी उठून मुलाला पाळणा घरात सोडणं, त्यानंतर इंटर्नशिपवर, मग मशीन विकण्याचा प्रयत्न करणं संध्याकाळी परत येताना ख्रिस्तोफरला घरी आणणं. अशातच घरमालक भाड़े वेळेवर देता न आल्यामुळे त्यांना घराबाहेर काढतो, त्याचे बँक अकाउंट्स सरकारकडून गोठवले जातात. ख्रिस पुरता कफल्लक होतो  ख्रिसला आपल्या मुलासोबत एक रात्र रेल्वे स्टेशनवरील बाथरूममधे काढावी लागते. आता राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्याला कळते की एका चर्च मधे राहण्याची व्यवस्था होऊ शकते पण फ़क्त मर्यादित लोकांसाठीच. मग वेळेशी लढाई सुरु होते. इंटर्नशिप संपल्या संपल्या ख्रिस्तोफरला घेऊन चर्चजवळ रांगेत उभे राहवे लागे. जरा उशीर झाला तर रात्र उघडयावर काढावी लागेल ही भीती सदोदित मनी असे. आपण कफल्लक झाले आहोत हे तो ऑफिस मधे कुणालाच कळू देत नाही. एकदा त्याच्या बॉसकडे टॅक्सीवाल्याला द्यायला सुट्टे पैसे नसतात, तेव्हा पाच डॉलर उसने देतो.  पाच डॉलरही त्याच्यासाठी फार मोठी रक्कम असते त्यावेळी. ख्रिस त्याच्या इंटर्नशिप च्या काळात खूप शिकण्याचा प्रयत्न करतो. एकदा तर नियमांना डावलून एका बड्या कंपनीच्या CEO ला फोन करतो आणि गुंतवणुकीसाठी वेळ मागतो, त्या CEO सोबत एका रग्बी मॅचला जाऊन आपले कॉन्टेक्ट्स वाढवतो.
     अशातच त्याला त्याची हरवलेली एक मशीन सापडते. त्या मशीनला एक वेडा 'टाइम मशीन' असे मानत असतो. त्याच्याकडून तो ती परत घेतो, तिचे काही भाग मोडलेले असतात. तिला दुरुस्त करण्यासाठी पैशांची गरज असते. ख्रिस रक्तदान करून पैसे कमावतो आणि ती दुरुस्त करतो. त्या मशीनला विकून अडीचशे डॉलर मिळतात. आणखी काही दिवसांचा प्रश्न मिटतो. असे करता करता सहा महिने होतात. अंतिम परीक्षा पार पडते.
इंटर्नशिपच्या शेवटच्या दिवशी त्याचा बॉस त्याला केबिन मधे बोलावतो. ख्रिसने नविन शर्ट घातलेला असतो. तो त्याला म्हणतो की त्याने हाच शर्ट उद्या पण  घालावा. स्टॉक ब्रोकर म्हणून कामाच्या पहिल्या दिवशी. त्याची निवड झाल्याबद्दल तो त्याचे अभिनंदन करतो. ख्रिसला त्याचे अश्रु आवरत नाहीत. तो धावत पाळणाघरात जाऊन ख्रिस्तोफरला मिठी मारतो. आता त्याला कळतं सुख म्हणजे नेमकं काय!
     चित्रपटाच्या नावातील हॅप्पीनेसची स्पेलिंग जाणीवपूर्वक चुकीची लिहिलीय ख्रिस्तोफरच्या पाळणाघराजवळील भिंतीवरील ग्राफिटीवरुन ती घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत स्वत: वर विश्वास ठेवायला हवा असा संदेश कुठल्याही उपदेशाचा बडेजाव न आणता हा चित्रपट देतो. चित्रपटात एके ठिकाणी ख्रिस आणि त्याच्या मुलाचा संवाद आहे तो  खूप प्रेरणादायी आहे "Hey. Don't ever let somebody tell you... You can't do something. Not even me. All right?"
Christopher: All right.
Christopher Gardner: You got a dream... You gotta protect it. People can't do somethin' themselves, they wanna tell you you can't do it. If you want somethin', go get it. Period."
    ख्रिस पुढे जाऊन एक यशस्वी स्टॉक ब्रोकर बनतो. या चित्रपटाची कथा ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यावरून घेतलीय. एकदा पहावाच असा हा चित्रपट आहे.

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

पिंक फलॉयड द वॉल


कथेचा नायक पिंक. तो पाळण्यात असतानाच त्याचे वडील वारले. दुसर्या महायुद्धात मरणार्या सैनिकांपैकी एक त्याचे वडील. आपलं मरण जवळ आलय हे कळताच ते बैचैन झालेले.  तार करता करताच बॉम्बच्या हल्ल्यात जीव गमावला. आजूबाजूला तसेच शेकडो सैनिक पडलेत. निर्जीव.

तो बागेत खेळतोय. त्याला गोल गोल फिरणार्या पाळण्यात बसायचय. झोपाळ्यावर बसायचय. पण इतर मुलांसारखे त्याच्यासोबत त्याचे वडील नाहीत. तो कुठल्यातरी माणसाचा हात पकडतो व त्याच्यासोबत चालतो, तो माणूस हयाला झिडकारतो. हा घरी येतो. वडिलांच्या आठवणी असलेल्या काही वस्तू कपाटातून काढतो. त्यात त्यांचा सैनिकी वेषातला एक फ़ोटो , मेल्याबद्दल मिळालेलं एक मेडल व प्रशस्तीपत्रक आहे. त्याच्या जरासं बाजूला एक पिस्तूल आहे. काही बंदुकीच्या गोळ्या आहेत. तो त्यातील एक गोळी उचलतो आणि मित्रांसोबत बोगद्याजवळच्या रेल्वे ट्रॅक वर येतो. ती गोळी रेल्वे ट्रॅक वर ठेवतो. गाडी जवळ येते. ड्राईवर भोंगा वाजवतो. मित्र त्याला 'बाजूला हो' म्हणून ओरडत असतात. हा मात्र तल्लीन होऊन ती गोळी नीट ट्रैक वर ठेवतो व लगेच बाजूला जातो.  गाडी गोळीवरुन जाते आणि फुटते. त्याला आगगाडीच्या डब्यांतून युद्धकैदी जात असल्याचा भास होतो.  ते युद्धकैदी खिडकीतून हात बाहेर काढून वाचवण्याची आर्जवे करताहेत असं त्याला दिसतं.  हे सारे त्याच्या मनाचे भास !!

शाळेत अभ्यास न करता कविता करतो म्हणून शिक्षक त्याचा वर्गासमोर अपमान करतात.  त्याला वाटतं ही शाळा नाहीये तर एक असेंबली लाइन आहे आणि ही मुले म्हणजे एकाच बनावटीचे पुतळे. ज्यांच्या चेहर्यावर कुठलेही भाव नाहीत. ज्यांना कुठलेही स्वतंत्र विचार नाहीत. असेंबली लाइनवर चालताहेत आणि अल्टीमेट प्रोडक्ट म्हणून हातात डिग्री घेऊन बाहेर पड़ताहेत.  हे सारे त्याच्या मनाचे भास!!
 हीच मुले पुढे एका मोठया मिक्सरमधे कुस्करली जाताहेत. त्यांच्या मांसापासून हैमबर्ग बनवले जाताहेत. आणि अचानक ही मुले या व्यवस्थेविरुद्ध उठाव करतात. मोडतोड. हे सारे त्याच्या मनाचे भास !!

वडील लवकर गेल्याने आई त्याच्या बाबतीत फार काळजी करते . तो तिच्या या काळजीने आणखी कोमेजलाय.  तो आता एक नावाजलेला गायक आहे. सतत दौरे चालू आहेत. पुढे त्यात भर पडते ती अयशस्वी लग्नाची.  बायकोच्या प्रेमप्रकरणामुळे त्याला तिचा प्रचंड राग येतो. त्याला शरीरसुखाची घृणा वाटते.  तो स्वतःला एका खोलीत बंद करतो. बाहेरच्या जगापासून अलिप्त. त्याला वाटतं, तो लहान बनलाय आणि आता युद्धभूमीवर आहे रक्त आणि चिखलाने माखलेली जमीन आहे, प्रेतांचे पाट भरलेत, एका सैनिकाची गोळ्यांनी छिन्न झालेली छाती... त्यातून रक्त वाहतेय.  तो त्यावर कापड टाकतो.  हे सारे त्याच्या मनाचे भास!

तो अंगावरचे सर्व केस भादरतो. भुवयापण. त्याला सतत असं वाटतं की तो एका भिंतीत बंदिस्त आहे. तो भिंतीवर हात आपटतो. "कोण आहे का पलीकडे?" असं जोरजोरात ओरडतो. तिकडून काही उत्तर येत नाही.
तो निपचित पड़ून राहतो. त्याच्या मैनेजरला कुठल्याही परिस्थितीत शो करायचाय, तो त्याला ड्रग्स देऊन स्टेज वर उभा करतो. अंगात किडे वळवळताहेत असं त्याला वाटतं. शो मधे हा स्वतःला हुकुमशाहा समजून लोकांना हिंसेची चिथावणी देतो. प्रेक्षक भारले जाऊन हिंसक आंदोलन करतात. हा पोलिसांपासून वाचण्यासाठी  बाथरूममधे लपतो. बाथरूममधे कविता वाचत बसतो. हे सारे त्याच्या मनाचे भास !!

आणि एकदाची ती भिंत जमीनदोस्त केली जाते. सगळीकडे ढिगारा आहे आणि लहान मुले काहीतरी शोधताहेत. एक लहान मुलगा खेळण्यातील ट्रक घेऊन उभा आहे.  ढिगारा उपसतोय. त्यातील शाबूत विटा खेळण्यातील ट्रकवर लादून चालतोय. भिंती बांधण्याचं कौशल्य मानवजातीच्या रक्तातच असावं बहुतेक.

गेले काही दिवस या चित्रपटाने झपाटलं आहे  अजून तरी शब्दात नीट पकडता  येत नाहीय त्याची भयाणता.

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

दृष्टी

विरार रेल्वे स्टेशन वर फलाट क्र. १ च्या पुढे फलाट क्र ६ व ७ सुरु होतात. डहाणूला जाणार्या मेमू  इथून सुटतात. तासाभराच्या अंतराने गाडी सुटत असल्याने लोकांना फलाटावर असलेली गाडी पकडणे गरजेचे  वाटते.  नाहीतर मग पुढल्या मेलची वाट पाहावी लागते . गाडी सुटायच्या वेळी  तर जी धांदल उडते ती पाहण्यासारखी असते. गावी चाललेली मंडळी बाजाराचे सामानाचे गाठोडे डब्यात कोंबत असतात.  कुणाचे हमालाशी वाद चाललेले असतात, गाडी सुटणार म्हणून भेळवाल्याकडून कुणाला पटकन भेळ हवी असते, कुणाला आपण पाण्याची बाटलीच विसरलो आहोत याची जाणीव होते. काही बायका घाईत लेडीज डबा कुठे आहे ते शोधत असतात. तरणी पोरं दरवाज्यात उभे राहून काय सिद्ध करीत असतात देव जाणे ! पण त्यांची मस्ती चालू असते.
गाडीचा सिग्नल पडला आणि भोंगा वाजला की कुणीतरी फलाटावरच राहिलेला भिडू धावत पळत गेट पकडतो. दुसरा त्याला हात देतो. ज्याची गाडी सुटली असेल तो आपला हताश चेहर्याने थोडा वेळ गाडीकडे बघतो आणि मग नेहमीचा नसल्यास कुणाला तरी "या नंतर कितीची गाडी?"  असे विचारतो आणि वाट पाहणे सुरु. आणि समजा, गाडी आपल्यासोबत असलेल्या अर्धांगिनीच्या कृपेमुळे सुटली असेल तर तिचा उद्धार होतो. नविन लग्न झालेल्या जोडप्यांना याचा काहीच फरक पडत नाही. त्यांची आजन्म सोबत फलाटावर वाट बघण्याची तयारी  दिसून येते आणि ही जोडपी गर्दीत उठून दिसतात. विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.
असचं काहीसं होते जेव्हा डहाणूवरुन सुटलेली मेमू  विरारला येते. अशा वेळी जर तुम्ही पूर्वेला जाताना  फलाट क्र ६ व ७ वर असाल तर शहाणपणाचा सल्ला म्हणजे पाच मिनिटं बाकावर बसा. गर्दीच्या विरुद्ध जाऊ नका. पूर्ण फलाट माणसांनी भरून जातो आणि जर तुम्ही या गर्दीतून जाण्याचे धैर्य दाखवत असाल तर  वाटेतील सामानाच्या ढिगाला पूर्ण वळसा घालून जावे लागणे, लोकांचे धक्के खाणे  इ  गोष्टी सहन कराव्याच लागतील.
मला तो मनस्ताप अजिबात नको असतो, म्हणून जर या फलाटावर गाडी येताना किंवा जाताना दिसली की मी लगोलग एक बाक पकडतो. कानात हेडफोन घालून एक पूर्ण गाणं ऐकतो. गर्दी गेली की आरामात जातो.
माणसं का अशी धावतात, कशाच्या पाठी  कळत नाही.  मोबाइलवर पण टेम्पल रन खेळतात.  जिवाच्या आकांताने आपणच पळत आहोत अशी समज करुन  घेतात. असो.
तर काही दिवसांपूर्वी असंच संध्याकाळी सहाच्या  सुमारास घरी परतत होतो. ६ नंबरच्या फलाटावर दूरुन मेमू  येताना दिसली आणि मनात म्हटलं 'चला आता पाच मिनिटं इथेच बसू.. धक्के खाण्यापेक्षा'.  गाडी फलाटाला लागली आणि माणसे नेहमीप्रमाणे धावू लागली.  इतक्यात माझं लक्ष दोन व्यक्तींकडे गेलं.  एक स्त्री आणि एक पुरुष. दोघांच्या हातातील लाल काठीमुळे आणि डोळ्यांवरील चष्म्यामुळे ते अंध आहेत हे लगेच कळलं. एकमेकांचा हात धरला होता आणि ते गर्दीच्या विरुद्ध जात होते. अचानक  दोघांचा हात सुटला आणि कुठे आणि कसं जावं ते त्यांना कळेना. मग मी माझा नियम मोडला. जागेवरून उठलो  आणि त्यांच्याकडे गेलो.  दोघांचाही एकेक हात माझ्या हातात घेतला आणि फलाटावर चालू लागलो.  बाजूने जाणार्या लोकांच्या धक्क्यांची त्यांना पर्वा नव्हती किंवा सवयीचं झाले असेल म्हणा.  आम्ही तिघे असे चाललो होतो.  तीन माणसांनी अशी वाट धरल्यामुळे समोरुन येणारे आधी गोंधळायचे मग लगेच मार्ग बदलायचे.  या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. त्या पुरुषांने त्या स्त्रीला विचारलं की  "आज बाईंनी शिकवलेलं कळलं का?" सौजन्याचे नियम दोघेही पाळत होते आणि म्हणूनच कि काय दोघेही नवरा बायको आहेत असं वाटत नव्हते.
 मी मनात म्हटलं की 'कुठल्या यांच्या बाई आणि कुठलं शिकवणं?" त्या स्त्रीने उत्तर दिलं "हो, कळलं की"
"काय शिकवलं आज?" तो.
"आज बाईंनी चपात्या भाजल्यात कि नाही ते ओळखायला शिकवलं, स्पर्श करून.  सकाळी  माझ्या  चपात्या नेहमी करपतात आणि मग मुलांना त्या तशाच डब्यात न्याव्या लागतात.  हे एक बरं झालं आता."
'चपात्या लाटायला केव्हा शिकवलं?" तो.
"डोळे जायच्या आधी मला यायच्या कि हो ! आता सहा महिन्यांपूर्वी नजर गेली.  चपात्या लाटता येतात अंदाजाने.  सुरुवातीला कळायचं नाही.  आता सवय झाली" ती.
एवढ्यात फलाट संपला त्यांना पूर्वेकडे आणलं. रिक्क्षास्टॅंड जवळ तो तिला "चला बाय" म्हणाला आणि गेला.ती पण रिक्क्षासाठीच्या रांगेत उभी राहिली.
आणि मी मात्र त्यांचे संभाषण मनात घोळवत चालू लागलो.
या बाईची दृष्टी आता सहा महिन्यांपूर्वी गेली होती तर.  कशामुळे गेली असेल? कुठला आजार?
म्हणजे सहा महिन्यांपूर्वी ही माझ्याच सारखं पाहू शकत होती.
अचानक दृष्टी  गेल्याने तिला त्रास नक्कीच झाला असणार.  डोळ्यापुढे एकदम अंधार आला असेल.
 घरी लाइट गेली तर क्षणभर बावरल्या सारखं करतो आपण, मेणबत्ती शोधेपर्यन्त.
इथे तर काळोख आता आयुष्याचा सोबती आहे ही जाणीव किती दुःख देणारी असेल?
तशाही परिस्थितीत ही बाई शिकतेय आणि यापुढे चपात्या करपणार नाहीत याचा तिला आनंद आहे.
अशी जगण्याची जिद्द असलेली माणसे कुठे आणि जराशा प्रतिकूल गोष्टीने हात पाय गाळून बसणारे आम्ही कुठे!   कुंतीने कृष्णाकडे असीम दुःख मागितलं होतं. तितकं दुःख मागायचं धैर्य नाहीय रे कुणात ! आमची दुःखे पण छोटीशीच. हसत हसत त्यांना भिडण्याची शक्ती दिलीस तरी पुरे!!