गुरुवार, १७ जुलै, २०१४

आठवणींचा कोलाज - पाऊस

धो-धो पाऊस कोसळतोय. पाठीवर दप्तर आणि रेनकोट घालून मी आणि माझा भाऊ आम्ही शाळेत जातोहोत. थोडीशी थंडी वाजतेय पण आईने आताच भरून दिलेल्या डब्यातील खाऊ मधल्या सुट्टीत खाणार आहोत या कल्पनेने ऊब वाटतेय. छोटा भाऊ पाण्याने भरलेल्या डबक्यात उड्या मारतोय, पाणी उडवतोय  आणि मी मोठेपणाचा समंजस आव आणून त्याला दटावतोय. मला पण त्या पाण्यात उड्या मारायच्या आहेत पण काल बाईंनी सांगितलेलं अजून डोक्यातून गेलेलं नाही की या पाण्यात किती प्रकारचे जीव जंतू असतात आणि त्यांच्यामुळे पायाला infection होऊ शकतं वगैरे. बाईंनी आमच्या डोक्यात ते जीव जंतूंच खूळ घातल्यामुळे लहानपणी पाऊस नीट एन्जोयचं करू शकलो नाही.
                                                                              ***

मुसळधार पावसामुळे शाळा लवकर सोडली की मग धमाल.  मुद्दाम भिजत घरी यायचं. आईसमोर मुद्दाम शिंका काढायच्या मग आपली सरबराई कशी होते ते पहायचं. आई पावसाला दूषणं देत राहणार. मग गरम गरम मुगाची खिचडी किंवा कुळथाच्या पिठाची पिठी आणि भात खाताना background ला बाहेर कोसळणारा पाऊस असायचा. चार गरम घास पोटात गेल्यावर 'याच साठी केला होता अट्टाहास' असे वाटे.
                                                                               ***

नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेचा दुसरा दिवस.  उत्स्फूर्त फेरी. मला  चिट्ठीत  मिळालेला विषय होता 'ये रे ये रे पावसा'.
compulsorily ललित बोलायचं होतं, डोळ्यासमोर मेघ दाटले. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. इतक्या लोकांसमोर बोलताना वाटलेली भिती आठवली कि जाम हसायला येतं.  कशीतरी वेळ मारून नेली - राधेच्या वत्सल डोळ्यांतला पाऊस, ग्रेस ची 'पाऊस कधीचा पडतो' ते 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' वगैरे बोललेलो आठवतेय. पावसाने जाम गोची केली होती तेव्हा.बक्षीस मिळालं नाही पण याच भीतीमुळे आणखी चांगली भाषणे करण्याची उर्जा दिली.

                                                                                ***
२६ जुलै, २००५. अकरावीचं कॉलेज नुकतच सुरु झालेलं. आणि त्या दिवशी पावसाचा नूर काही वेगळाच. रात्री पडला तो पडलाच पण सकाळी पण उसंत नाही. छत्रीवर  बंदुकीच्या गोळ्या येताहेत  असा आवेग.  दुपारपर्यंत सर्व मुंबई जलमग्न झाली. कॉलेज लवकर सोडलं. घरी कळवावं तर कसं. फोन करावा तर मोबाईल नाही. वाटेत गुडघाभर पाणी. हायवे वर पिवळ्या रंगाचा  एकच PCO आणि त्यापुढे किमान २० लोक रांगेत. रांगेत उभा राहून अर्ध्या तासाने नंबर आला. घरी आईला कळवलं की सुरक्षित आहे, काळजी नसावी. त्या दिवशी  पावसाने भयंकर रूप दाखवलं. माणसांनी एकमेकांना या परिस्थितीत खूप मदत केली, कुणी बिस्कीटचे पुडे वाटले, कुणी राहायला जागा दिली. संध्याकाळी थंडीने कुडकुडत घरी पोहोचलो.  आज त्याच कॉलेजमध्ये मी ग्रंथपाल आहे. हायवेवरचा तो PCO आता नाही, त्या दिवसाच्या आठवणी अजून अंगावर काटा आणतात.
                                                                              ***
एका टप्प्यावर कॉलेज हेच दुसरं घर झालं होतं. फेस्टिवल्स, स्पर्धा, NSS, मराठी वाड्ग्मय मंडळ, स्वतः jointly स्थापन केलेला 'कॉलेज कट्टा' यामुळे घरी फक्त पहाटेची अंघोळ आणि रात्रीची झोप याचसाठी जावं लागे. आपण हे सर्व व्यक्तिमत्व विकासासाठी करतो आहोत अशी तद्दन फालतू समजूत नव्हती. त्या दिवसांनी चिरकाल टिकणाऱ्या आठवणी दिल्या. त्या दिवसांत शिकलेल्या गोष्टी आणि मूल्ये अजूनही जगताना कामी येतात. पावसात कॉलेज कॅन्टीन गप्पांचा अड्डा बने.  कॉलेजच्या गेटबाहेर प्रभाची टपरी आहे त्याला लागून अण्णाची चायची गाडी आहे. पावसात चायची तल्लफ झाली तर तिथे कटींग मारायची आणि आल्याच्या तिखटजाळ चायने तोंड पोळून घ्यायचं. आयुष्यात पुढे काहीच नाही झालं तर अण्णा सारखी चायची टपरी टाकता येईल अन जगता येईल असा आत्मविश्वास दिला. त्याच्याकडे काचेच्या बरण्या भरून खारी, बिस्किटे असायची. एक खारीचा तुकडा आणि आणि एक कटिंग असा नाश्ता केल्यावर किमान दोन लेक्चर्स काळजी नसायची. कधी जिवलग मित्र चायचा वाटा उचलायचे कधी 'खारीचा'.

                                                                               ***
पाऊस खूप पडला तर बाल्कनीत कुडकुडनाऱ्या चिमण्या येउन बसायच्या. त्यांना लांबूनच पहावे लागे, जवळ गेल्यास  पुन्हा पावसात जायच्या घाबरून. काही धीट तशाच थांबायच्या. आईने आणि मी विचारांती निर्णय घेतला-
बाल्कनीत चिमण्यांसाठी लाकडी खोका ठेवला उंचावर.  घरटं बांधायला.  पावसाची सर त्यांच्या घरट्यावर पडू नये म्हणून काळजी घेतली.  त्यात चिमणं जोडपं राहायला आलंय. हे आमचे नवीन शेजारी पहाटे चिवचिवाट करून उठवतात. मग त्यांना तांदळाच्या कण्या घालायच्या. त्या निमित्ताने बऱ्याच चिमण्या खिडकीत जमा होतात.


                                                                               ***
मध्यंतरी इंद्रायणीने पुण्याला जाऊन आलो. मुंबईपासून पावसाने जी सोबत केली ती शिवाजीनगर येईपर्यंत.  साडेपाचचा अंधार आणि तो हळू हळू वितळत चाललेला. पावसामुळे खिडकीच्या काचांवर थेंब थेंब जमा व्हायचे आणि त्यांची सलग धार बनून खाली पडायची. माझ्या शेजारी बसलेल्या बाईंसोबत लहान मुलगी होती. तिची आणि माझी छान ओळख झाली. ती माझ्यासमोर उभी राहून त्या दंवाने भिजलेल्या काचेवर नक्षी काढत होती.  त्या नक्षीत ती काय काढतेय हे मी निरखून पाहू लागलो. पहिल्यांदा तिने स्वतःच नाव काढलं. पुन्हा दंव जमा झाल्यावर तिने होडी काढली. आणि थोड्या वेळाने घर. मी तिला विचारलं- 'होडी चालवणार कोण?' त्यावर तिचं उत्तर 'त्यात काय अवघड आहे.  ती आपोआप चालते' आपण फक्त पाणी द्यायचं'. 'मग तू होडीनेच का नाही जात पुण्याला?' तर तिने आईकडे बोट दाखवत म्हटलं 'हिच्यामुळे. ही खूप घाबरट आहे म्हणून'.

                                                                             ***
मित्रांचा अड्डा जमलेला. जुने दोस्त बऱ्याच वर्षांनी भेटलेले. रात्री जेवणं झाली तरी गप्पा थांबेनात. पाऊस खूप पडतोय म्हणून सर्वांनी थांबायचं ठरवलं . ज्याच्या घरी थांबलो होतो त्याने घरी कुणी नाही म्हणून आमंत्रण दिलेलं. त्याला बहुतेक याचा पश्चाताप होत असावा. रात्रभर फालतुगिरी चाललेली. अडीच वाजता कॉफी पिता पिता एकमेकांच्या जमलेल्या, फसलेल्या प्रेमकहाण्या चर्चेला आल्या आणि ज्यांच्या डोळ्यावर झोप आली होती ते पण जागे झाले.  घरभर कॅप्स्टनचा धूर दाटलेला. एक छोटा ढगच जणू.
'तुला बाहेर पडणाऱ्या पावसाची शपथ, खरं सांग. . कोणय ती?'
'अरे पावसाची शपथ घालू नको. . आपल्याला दुष्काळात राहावं लागेल.'
पावसाची गाणी रात्रभर चाललेली.  सातारी भाषेत 'नुसता राडाच'. 

सोमवार, २ जून, २०१४

निकाल शिक्षणाचा

आज बारावीचा निकाल लागेल आणि संध्याकाळी शेजार पाजारच्या यशस्वी मुलांकडून पेढे मिळतील. "किती टक्के मिळाले रे?"  अशी  विचारपूस होईल. ज्यांना  जास्त टक्के मिळाले असतील त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा ऊर अभिमानाने भरून येईल. जे जेमतेम पास झालेत त्यांना 'सुटलो बुवा एकदाचे" या फीलिंग बरोबर आणखी थोडे मार्क्स जास्त पडायला हवे होते असे वाटेल. ज्यांचा फर्स्ट क्लास थोडक्यात चुकला किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले त्यांचा चेहरा पडलेला असेल आणि जे नापास झाले असतील त्यांच्या घरी कुणीतरी गेल्यासारखं वातावरण असेल.

प्रसंग साधारणतः असा असेल :

मिलिंद कोपर्यात रडत बसलेला. किचन मधे आई भाजी चिरताना टिपं गाळत असेल, पदराने मधूनच डोळे पुसत असेल. धाकटा भाऊ आज TV बंद म्हणून पलंगावर एका बाजूला बसून काहीतरी वाचण्याच्या प्रयत्नात आणि बाबा शून्यात नजर लावून बसलेले.
घरात तीव्र स्मशानशांतता.  कुणीच कुणाशी बोलत नाही.
इतक्यात मिलिंदचा मित्र माधव पेढे घेऊन येतो. मिलिंदचे बाबा पेढा घेतात आणि मिलिंदकडे रागीट कटाक्ष टाकून माधवला म्हणतात "शिकव जरा आमच्या नालायकाला पण. नापास झालेत, आमच्या अख्ख्या खानदानात कुणीच नापास झालं नाही. अब्रू धुळीला मिळवली सगळी.  दिवे लावले ! आता बसा वार्या करीत बोर्डाच्या." माधवला काही बोलायचं सुचत नाही. तो दोन मिनिटे शांत ऐकून घेतो आणि "बराय येतो" म्हणून निघून जातो.

स्वगते:
बाबांना उद्या ऑफिसमधे सहकार्यांना काय सांगू असा प्रश्न पडलेला. जोश्याच्या मुलीला नेहमीप्रमाणे चांगले टक्के मिळाले असतील. उद्या तो सर्वांना पार्टी देईल. "तुमचाही मुलगा होता ना हो बारावीला? किती मिळाले?" असा प्रश्न विचारल्यावर काय सांगू? त्यापेक्षा उद्या ऑफिसला जातच नाही. मेडीकल बाकी आहेत, त्याच टाकूया. काय नाही केलं मुलासाठी? परवडत नसताना विलेपार्ल्याला भरभक्कम फी वाला क्लास लावला. परीक्षेच्या काळात त्याच्याबरोबर रात्र रात्र जागलो.  कॉफी करून दिली. ऑफिसमधे रजा टाकली.
आता काय होणार आहे पुढे देव जाणे! चांगला शिकून इंजीनिअर व्हावं इतकं साधं स्वप्न नाही पूर्ण करू शकत? काय कमी ठेवलं, जे मागेल ते दिलं. आमच्या वेळी नव्हत्या इतक्या सोयी, म्हणून आपल्या मुलांना काही कमी पडू द्यायचं नाही असं वाटतच ना आम्हाला.

मिलींदची आई शेजारी काय म्हणतील या विचारात.

आणि मिलिंद "नापास होणं हा इतका मोठा अपराध आहे का?" या विचारात. "आपल्याला या किचकट गणितात आणि सायन्समधे काडीचाही रस नाही, हे किती वेळा सांगितलं आपण यांना. अकरावीला प्रमोट झालो तेव्हाच सांगितलं, पण बाबांनी काही ऐकलं नाही. मोठा क्लास लावला. मला खरं तर इतिहासाची खूप आवड आहे, जुन्या काळाविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यातला सन - सनावळ्या पण अचूक लक्षात राहतात. दहावीला समाजशास्त्रातच जास्त मार्क्स होते. बाबांनी सायन्स घेऊन दिलं, खानदानात अजीतकाका सारखा आणखी एक इंजीनिअर व्हावा असंच त्यांना वाटतंय. आता CET चा निकाल पण असाच असेल, तेव्हा पण ओरडणार.  मला का जाऊ देत नाहीयेत माझ्या मार्गाने?"

वरील प्रसंगात बारावीचा निकाल होता, त्याजागी कुठलीही परीक्षा ठेवा. फरक पडत नाही. प्रत्येक निकाल हा घरच्यांसाठी निकालच असतो. गुणवत्ता यादी जाहीर करण्याची अमानुष पद्धत बंद झाली हे एक बरं झालं. नाहीतर त्यात स्थान मिळालं नाही म्हणून खट्टू होणार्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा  मोठा वर्ग समाजात होता. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनी पुढे काय केलं यावर संशोधन झालं पाहिजे.

नापास झालेल्या मुलांकडे एकंदरीत समाजाचा दृष्टीकोण बदलायला हवा. नापास होणं हा काही अपराध नाही. नापास होण्याच्या भीतीने किंवा नापास झाल्यामुळे आत्महत्या करणार्यांची संख्या कमी नाही.
नापास झालो म्हणून जीवनच संपवूया असं यांना का वाटतं? हे तर शिक्षणाच्या मुलभूत उद्देशाच्या विरुद्ध आहे. शिक्षणाने तुम्हाला जगायला सक्षम बनवलं पाहिजे. तुमच्या क्षमतांची ओळख करून दिली पाहिजे. भोवतालच्या घटनांची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून त्या परिस्थितीत कसं वागावं याचं आकलन होईल. असं घडतं का हो?

सध्याचं शिक्षण तुम्हाला फक्त डीग्री मिळवून देतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या डीग्रीने काय करता याची ना तुमच्या शिक्षकांना फिकर ना समाजाला. विद्यापीठे म्हणजे मागणी तसा पुरवठा देणारे कारखाने झालेत.
बाजारात व्यवस्थापक हवेत, मग MBA चा कारखाना काढा. तंत्रज्ञ हवेत, मग काढा Technical Institutes.
अशा कारखान्यातून हजारो तरुण बाहेर पडतात नोकरी शोधायला. बाजाराची जितकी गरज असेल तितक्यांना नोकर्या मिळतात आणि बाकीचे बेरोजगार. कारण मिळालेल्या शिक्षणाने जगायला सक्षमच बनवलं नाही.
पोटार्थी शिक्षणाने हजारो बेरोजगार  B. Ed. आणि D. Ed. पदवीधारकांची पिढी घडवली, आता त्यात बेरोजगार इंजीनिअरही येताहेत.  B. Ed. आणि B. E. करून कॉल सेंटरमध्ये काम करणारे मित्र पाहिले की वाईट वाटतं. "अमुक एक कर त्याला भविष्यात स्कोप आहे" असे  सांगणाऱ्या उपदेशक मंडळींचा मला भयंकर तिटकारा आहे.
सब घोडे बारा टक्के पद्धतीचे शिक्षण एकाच छापाचे गणपती तयार करतेय. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे याची जाणीवच नाही.
नापासांना आपण "नालायक" आहोत असे वाटतंय तर बेरोजगारांना आपल्या शिक्षणाच्या उपयोगाबाबत संभ्रम आहे.

खूप पैसा मिळवणं हे काही शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाही पण शिक्षणसम्राटांचे आहे. One time investment मुळे देशभर  विद्यापीठांचे पीक आलंय. कधी नव्हे ते लोकांना शिक्षणाचे महत्व पटलंय पण कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे हे माहित नाहीये. पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर ठेवताहेत. मुलाला कशात रस आहे हेच पाहत नाहीयेत. त्यात डॉक्टर, इंजीनिअर, MBA  वगैरे व्हावं अशी इच्छा. त्यांना सांगावं वाटतं की, खलिल जिब्रान वाचा. तो सांगून गेलाय -
"Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you."
… You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
मुलाला चित्रकार व्हायचंय… होऊ द्या. . रंग विकत घेऊन द्या, आणि  त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे रंग पहा.
मुलाला लेखक व्हायचंय. . होऊ द्या. . पुस्तके विकत घेऊन द्या, लेखक कसा घडतो ते जाणवून द्या.
करीअरच्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, फक्त क्षेत्र निवडताना मुलाची आवड, अभ्यासाची क्षमता लक्षात घ्या. या निर्णयप्रक्रियेत मुलाला प्रत्यक्ष सहभागी करा. नापास झालेल्या मुलाला खर तर तुमच्या प्रेमाची जास्त गरज असते. विझू जात असलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी घरचांच्या मदतीची खरी गरज असते. नापास होणं म्हणजे काही इभ्रतीला लागलेला बट्टा नव्हे. अपयश येतंच. त्यात अडकून न पडता त्यावर मात करायला जिगर लागतं. यशस्वी माणसाची ओळख तो किती अपयशातून यशस्वी झाला यावरच ठरत असते. 

शनिवार, १० मे, २०१४

लोकलकथा - २

गाडीने भाईंदर सोडलं आणि डब्यात एक परिचयाचा आवाज ऐकू आला.  "मेरी आवाज की तरफ़ ध्यान दिजिये श्रीमान, सुनने का कुछ पैसा नहीं, देख़ने का कुछ पैसा नहीं" . पन्नाशीतला एक गृहस्थ आपल्या खर्जातल्या आवाजात हातातल्या प्रोडक्टच मार्केटिंग करत होता.  रोज तीच लोकल गाडी पकडत असल्यामुळे मी त्याला चांगलाच ओळखतो.  त्याच्याकडच्या वस्तू १० रुपये ते ३० रुपये या परवडेबल रेंज मधल्या असतात हे आपलं माझं निरीक्षण.  सूया, मुंबई दर्शन गाइड, रेल्वेचं टाइमटेबल, दंतमंजन, वह्या,  घरचा वैद्य नामक पुस्तिका, टॉर्च यातलं तो काहीही विकतो.   लोकांच लक्ष कसं वेधून घ्यावं, हे त्याला बरोबर जमतं.
"घर, दुकान सब जगह काम आनेवाली चीज. (आता या ठिकाणी वस्तूच नाव) अगर बाजार मे इसकी  किमत  पुछने जाओ तो करीबन ६० से ७० रुपया होगी, लेकिन कंपनी के प्रचार के हेतू वही चीज आपको कम से कम दाम मे केवल १० रुपये मे दी जा रही है, मात्र १० रुपये, फक्त १० रुपये, ओन्ली टेन रुपीज"
"जो भाईसाब देखना चाहते है, देख सकते है, जो पाना चाहते है प्राप्त कर सकते है" मग तो एकेक सीट वर लोकांना बघण्यासाठी ती वस्तू देणार. काही जण उत्सुकतेपोटी पाहतात, काहींच्या मनात घेऊ का नको अशी चलबिचल होते. "आजकल १० रुपये में क्या आता है भाईसाब, वडापाव भी १५ रुपये का आता हैं" या त्याच्या वाक्याने "बरोबर आहे, घेऊया तर खरं. नाही चांगलं लागलं तर गेले १० रुपये म्हणायचं" असा विचार करून बरेच जण विकत घेतात.  "पिछले दस साल से इसी लाईन पे सफर कर रहा हुं, कभी शिकायत नही आयी" हे वाक्य ज्यांनी वस्तू विकत घेऊनही ज्यांच्या मनात अजूनही शंका आहे त्यांना विश्वास देण्यासाठी.

गेली ४ - ५ वर्षे वेगवेगळ्या डब्यांत मला तो भेटलाय. बहुधा गर्दीच्या वेळा टाळून तो प्रवास करतो, पण गर्दी त्याला वस्तू विकण्याची चांगली संधी देते .  मराठी, हिंदी वर त्याची चांगलीच कमांड आहे. इंग्रजीतली एखाद दुसरी कामचलाऊ वाक्ये त्याला येतात.  तीच तो अधून मधून वापरतो. केसं पांढरी झालीयेत. दंतमंजन विकताना तंबाकू खाऊन लाल पिवळ्या झालेल्या दातांकडे तो सोयीस्कर दुर्लक्ष करतो. दाढीची खुटं थोडीफार वाढलेली आहेत. खांद्याला झोळी सारखी जड ब्याग आहे.
डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर. जिथे साध्या मुंगीलाही हलता येणार नाही अशा  गर्दीच्या वेळी "भाईसाब जरा अंदर जाने दिजीये" म्हणत अभिमन्युसारखा तो आत शिरतो. वयाने शरीर थकले आहे याच्या खुणा दिसताहेत पण मिश्कीलपणा जात नाही. एकदा 'मुंबई दर्शन गाइडबुक' विकत होता, डब्यात कॉलेजला जाणारी बरीच तरुण मुलं-मुली होती. अशा वेळी त्याने आपले निरुपण सुरु केले.
"मित्रांनो, घर दुकान सगळीकडे उपयोगी येणारी गोष्ट. मुंबई दर्शन गाईडबुक ! मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, बाजार, सिनेमागृहे सगळ्यांची माहिती कुठे मिळेल? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक. समजा तुम्ही गर्लफ्रेंड बरोबर पिक्चर पाहायला जाताय. जवळच थिएटर कुठेय? कोण सांगेल?? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड  म्हणाली, चौपाटीला जाऊ, तर तिथे कुठली बस जाईल ? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड  म्हणाली, बाहेर जेवूया, तर कुठले हॉटेल्स? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक."
इतक्या विश्लेषणानंतर मुंबई दर्शन गाईडबुक खपलं नसतं तर नवल.
मी पण त्याच्याकडून बर्याच वस्तू विकत घेतल्या. त्याच्याकडच्या दंतमंजनाने दात शुभ्र होतात असे मला आढळले नाही, घरचा वैद्य कधीही मदतीला धावला नाही . पाठदुखी वरचा उपाय करताना जी घरगुती साधने म्हणून लिहिली होती ती सापडली नाहीत. पाठदुखी डॉक्टरच्या औषधानेच बरी झाली. मुंबईतच लहानाचा मोठा झाल्यामुळे मुंबई दर्शन गाईडबुक कधीही वापरले नाही. घरी पुस्तकांच्या कपाटात ते कोपर्यात पडलेले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाचा फारसा उपयोग झाला नाही कारण माझी एक मैत्रीण रेल्वेचं चालतं बोलतं वेळापत्रक आहे. कधी अडल्यास सरळ तिलाच कन्सल्ट करतो.(आणि खरं बोलायचं तर ट्रेन कुठे वेळेवर धावतात)  तरीपण या माणसाला जेव्हा भेटतो तेव्हा काही न काही विकत घेतोच. उपकार म्हणून नव्हे तर त्याच्या कौशल्याला दाद द्यावी म्हणून.
एकदा रात्री दहाच्या दरम्यान भेटला. शेवटची खेप असावी दिवसभराची. ओळखीचा चेहरा दिसल्यावर त्याने हात उंचावून ओळखल्याच दाखवलं. ट्रेन सोपार्याला रिकामी झाली तेव्हा त्याला विचारलं "कैसे हो?"
नेहमीचं उत्तर "बढीया". त्याची मुलं कॉलेजला जातात. मुलगा शेवटच्या वर्षाला आहे. त्याला बाबांनी आता आराम करावा असं मनात आहे. पण त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं यावर हा ठाम.
"बच्चे अपने पैरो पे खडे हो जायेंगे तो फिर करेंगे आराम ! अब ट्रेन की भीड भी रोज बढती ही जा रही है, कभी सास फुल जाती है, देखते है कब तक चलती है सांसे. उपर वाले पे विश्वास है. ये भी दिन जायेंगे"

"हे ही दिवस जातील" हा सुखात संयम ठेवण्यास सांगणारं  आणि दुखा:त धीर देणारं वाक्य आज त्याच्या तोंडून ऐकत होतो. स्टेशन आल्यावर त्याचा निरोप घेतला. आता जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा त्याच्या धडपडीमागील कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. माझ्याकडे पाहिल्यावर ओळखीचं स्मित करतो.


बुधवार, ७ मे, २०१४

जिप्सी

फॉक्स ट्रैवलर वर एक मस्त शो आहे - "One Man and His campervan". मार्टिन डोरे हा खादाड, भटक्या, मनमौज्या प्राणी (ही विशेषणे माझ्या खास आवडीची) स्वत:च्या  १९७० च्या क्लासिक campervan मधून राणीच्या साम्राज्यात भटकत असतो.मनात येईल तिथे मुक्काम, स्वत: एक्सपेरिमेंट करणारा कुक म्हणून एखाद्या तलावाच्या काठी किंवा मोकळ्या रानात निळ्या आभाळाखालीं जी साधने उपलब्ध होतील त्यातून जिभेला पाणी सुटेल असे पदार्थ बनवतो.कधी त्यात गळाला लागलेला लॉबस्टर असतो तर कधी लोकल चीज़ फैक्टरीतलं ताजं चीज़  असतं.मोजक्या साधनांतून जे बनवतो ते मस्तच असतं.पण सर्वांत भावणारी गोष्ट म्हणजे निवांतपणा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी निद्राधीन होईपर्यंत फक्त धावपळ करणार्या प्रत्येकाच्या मनात निवांतपणे, उनाडपणे जगावं असं वाटत असतं-ते स्वप्न मार्टिन स्वतः जगतोय याची थोडी असूया वाटतेच.त्याउपर तिथली छोटी  छोटी गावे, डोंगर दर्या, नजर जाईल तिथ पर्यंतचे हिरवेपण, वाटेत मधेच भेटायला येणारे छोटेसे ओढ़े, दूध देणार्या महाकाय गायी सगळं मनाचा ठाव घेणारं हे आपल्या शहरी निबिड जीवनात नाहीये याची खंत वाटते.

पाडगावकर म्हणतात ते अगदी खरंय-"एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून". प्रत्येकाच्या मनात एक जिप्सी दडलेला असतो,पण जसजसं मोठे होत जातो तसे टाईची गाठ मारता मारता त्यालापण मारून टाकतो.
लहानपणी मी आणि माझा भाऊ एक वेगळाच खेळ खेळायचो.  एक लहान वीट घ्यायची.  तिला रोज पाण्याने ओलं करायचं.  जास्त ऊन नसेल अशा कोंदट ठिकाणी ठेवायचं.  काही दिवसांनी मग त्यावर हिरवशार बारीक स्पंज सारखं गवत उगवायचं (ज्याला बॉटनीत मॉस म्हणतात)हे झालं आमचं अमेजॉनच जंगल.   मुद्दाम कर्कटकाने त्यावर चिरा काढायच्या-ह्या नद्या.   थोड्या दिवसांनी त्यावर लहान सहान सुश्मजीव फिरायचे.  मुंग्या असायच्या.  इथपर्यंत आल्यावर खरा प्लॉट सुरु व्ह्यायचा आमच्याकडे एक छानसं भिंग होतं.  त्यातून ह्या सर्व गोष्टी तासंतास पहायच्या.  स्वताला आपण हेलीकॉप्टरमधे बसलो आहोत आणि उंच आभाळातून हे जंगल दिसतय अशी कल्पना करायची.  लाल मुंग्या दुष्ट असतात (कारण त्या चावतात!) आणि काळ्या मुंग्या गरीब बिचार्या म्हणून त्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे असे वाटायचे.

एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत गावी जात असू.  त्यावेळी काय पाहू अन काय नको असे होई.  सकाळी एकदा पोटात भर पडली क़ी दुपारी घरात हजर आणि मग परत संध्याकाळी मोर्चा.  दिवसभर भटक भटक भटकायचं, पाय दुखेपर्यंत.   पाबळाच  गार पाणी चेहर्यावर मारल्यावर  सगळा क्षीण जायचा.  झाडाच्या सावलीत वरच्या आभाळातील ढगांचे बदलते आकार बघत पहुडायचं.  पाटाच्या कडेकडेने जाताना अवचित एखादी धामण सरकन डोळ्यासमोरून जायची.  पडलो, खरचटलं क़ी पांगळयाचा पाला चोपडायचा.  (ह्या गोष्टी घरी कधीच कळल्या नाहीत ) रात्री चांदण्या पहायच्या.  आजोबांच्या शिकारीच्या गप्पा ऐकायच्या.  आपले आजोबा आता इथे वाघ आला तऱी त्याला पळवून लावतील या निर्धास्तपणावर छान झोप लागे.
 सुट्टी संपल्यावर परत येताना पुढच्या वर्षासाठी सगळं नजरेत भरावे लागे.  नुकत्याच लावलेल्या चाफ्याच्या रोपट्याचे काय होणार याची चिंता असे.  गाडीत बसल्यावर भरलेल्या अंधारासोबत हे सगळं  गायब होई.  उजाडताच मुंबईत पोचलेले असू.  शाळा सुरु होताच वर्गपाठ आणि गृहपाठ करताना मनातला जिप्सी घाबरून जाई.  त्याला वर्ष संपायची ओढ लागे.


शनिवार, २९ मार्च, २०१४

नोकरीनामा


परवा वाटेत एक मित्र भेटला. त्याने बोलता बोलता खिशातून त्याचे विजिटिंग कार्ड काढून दिले. मी म्हणालो  "अरे बाबा कार्ड कशाला ? आहे माझ्याकडे. काही महिन्यांपूर्वीच नाही का तू दिलस !" तर त्यावर त्याचे उत्तर -"जॉब बदलला मी,  हे नवीन कंपनीचं". मी चकित.  कारण या आमच्या मित्राला हेवा वाटावा अशा पगाराची नोकरी.  त्यावर आईटी क्षेत्रातला जॉब.  न राहवून कारण विचारलं, तेव्हा म्हणाला "पॅकेज जास्त आहे" . आईटी क्षेत्रातली मंडळी एका जागी फार टिकत नाहीत हे ऐकून होतो.  चांगली संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सर्वच असतो, पण या क्षेत्रातल्या मंडळींचा एका ठिकाणचा कार्यकाळ हा तीन महीने ते जास्तीत जास्त दोन वर्ष असा असतो.  त्यातही सतत स्वताला अपडेट ठेवायची धडपड.  ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या एका मित्राने सांगितलं, की हल्ली माणसं एका कंपनीत एखाद वर्ष काम करतात आणि तो अनुभव बांधून दुसर्या कंपनीत जातात. कंपनीशी त्यांना कुठलीही बांधीलकी असत नाही.  मग ही माणसे जाताना एका वर्षात या क्षेत्रात कमावलेले ज्ञान, बहुमोलाचे अंदाज सोबत घेऊन जातात.  जे कंपनीच्या दृष्टीने फार महत्वाचे असते.   नवीन नोकरदारांवर कामकाज शिकवण्यासाठी जो खर्च होतो तो वेगळाच.
माझ्या शेजारचे काका, इतकेच कशाला माझ्या बाबांनी देखील एकाच कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.  कंपनीच्या उत्कर्षाच्या सर्व घटनांचे साक्षी राहिले.  त्यांना विचारलं तर आपण सुरुवात किती रुपये पगारापासून केली आणि आता मेहनतीने कुठपर्यंत आलो आहोत याचा सविस्तर आलेख सांगतील. पण पैसा कमावणं  हाच नोकरी करण्याचा महत्वाचा हेतू आहे का?
स्वताच्या आवडीच्या क्षेत्रात किती जण काम करतात?
मुळात आपण नोकरी, उद्योग कशासाठी करतो ? पैसा कमावण्यासाठी. हे खरं प्राथमिक उत्तर.  कारण त्याशिवाय उपजीविका करणं कठीण आहे.  (पैश्य़ाशिवायही रानावनात  नीट जगता येतं हे थोरोचं  वाल्डेन वाचताना पटतं आणि त्याचा खूप हेवा वाटतो)  रोज सकाळी उठून कामावर जाण्याची लगबग. तो सकाळचा दीर्घ प्रवास, दिवसभर ऑफिसमधे काम, संध्याकाळी थकल्या जीवांची घराची ओढ.  रात्रीची जरा झोप लागतेय तोच पुन्हा घड्याळाचा गजर.  पुन्हा तेच तेच.  कधी एकदा रविवार येतोय याची आस.  आणि रविवारच्या रात्री सोमवारची भीती.  जगण्यात एकसुरीपणा येत जातो . कामाच्या डेड लाइन्स पाळता पाळता आपणच डेड होऊन जातो कळतच नाही.  एंजॉयमेंटच्या नावावर वीकेंडला नविन लागलेला पिक्चर पाहतो, बाहेर जेवतो आणि आपलं सगळं सुरळीत चाललं आहे याचं स्वतःलाच आश्वासन देत राहतो.
माझ्या आईटी क्षेत्रातल्या मित्रासारखे काही झटपट नोकर्या बदलतात,तर काही दुसरी चांगली नोकरी शोधूया का? मिळेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात आणि सुरक्षितता शोधत जगत असतात.  एका मित्राने सरकारी नोकरी मिळाल्यावर "Finally got a government job... आता आयुष्यभराची चिंता मिटली" असे म्हटल्यावर काय रिएक्शन द्यावी या विचारात  बराच वेळ होतो मी.  आवश्यकतेपेक्षा जास्त पगार, कामाचे कमी तास,दिवाळी बोनसची खात्री, केव्हाही संप करून व्यवस्थेला वेठीला धरण्याची मुजोरी आणि कामचुकारपणा ही व्यवछेदक लक्षणे असणार्या नोकर्यांसाठी जेव्हा लाखोंच्या संखेने अर्ज येतात,प्यून, क्लर्क सारख्या पोस्टसाठी जेव्हा मास्टर्स झालेली मुले मूली प्रयत्न करतात तेव्हा काळजी वाटते की  इतके शिकूनसुद्धा आपल्याला पुढे काय करायचे आहे हे न कळणं ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका नव्हे का?
निव्वळ स्कोप आहे असा विचार करून इंजीनियर झालेला माझा मित्र जेव्हा कॉल सेंटरमधे कमी पगाराचा जॉब करतो,तेव्हा खंत वाटते.  करिअरिस्टिक धोरणातून इतरांच्या सांगण्यावरून  क्षेत्र निवडलेलं.  त्यात मनातून आवड नाही म्हणून रेटत रेटत केट्या  पास करत एकदाची हाती मिळवलेली डिग्री.  आणि त्याच क्वालिफिकेशनचे हजारो लोग.  नोकरी नाही म्हणून घरच्यांनी दाखवलेला अविश्वास हेच हल्लीच्या पिढीचे क्रंदन आहे.  बरं, वाट चुकली हे ध्यानात आल्यावरही आपल्या मनासारख्या क्षेत्रात न जाणार्या रिस्क घ्यायला घाबरणार्या लोकांची दया येते. आला दिवस ढकलला जातो.  पगार केव्हा वाढेल याच विचारात आयुष्य गुंतून जाते.
वपु काळे यांनी त्यांच्या वडिलांबद्दल लिहिलय की,उतारवयात ते असंबध्द बोलत . आयुष्यभर बॉसला एक शब्द उलटा न बोलता इमाने एतबारे  नोकरी केल्यानंतर उतारवयात ते बॉसला शिव्या देत.  आयुष्यभर दाबून ठेवलेला राग, अपमान, संताप याचा म्हातारपणी उद्रेक होतो.
याउलट आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद वेगळाच असतो.  मॉनेटरी फायदे हे मग बायप्रोडक्ट असतं.  आवडीच्या क्षेत्रातली कंटाळवाणी कामे पण कल्पकतने कशी करता येतील हे कळू लागतं.  प्यून, क्लर्क यांना मी अजिबात कमी लेखत नाहीये.  शेवटी प्रत्येक काम महत्वाचच असतं,पण प्रत्येकाने स्वतःची वाट शोधायला हवी.   At the end of the day समाधान महत्वाच असतं.  "मी तेव्हा हे करू शकलो असतो"  किंवा "मी तेव्हा हे केलं असतं तर किती बरं झालं असतं" ही वाक्ये  नंतर  खूप त्रास देतात मनाला.
आपलं आवडीचं क्षेत्र कसं निवडावं? माझा मित्र दिपची  theory असे  सांगते की, जे करताना तुम्ही देहभान विसरता त्याचसाठीच तुमचा जन्म झालेला असतो.  बर्याचदा त्याची मस्करी केली आम्ही.  पण आता ते पटतंय.
 शाळेत असताना निबंधांचा शेवट जसा आपण typical पद्धतीने करायचो तसाच शेवट एका मोठ्या माणसाचे वचन उद्गारून करतोय -
"And in the end, it’s not the years in your life that count. It’s the life in your years."
- Abraham Lincoln 

सोमवार, २४ मार्च, २०१४

लोकलकथा

माझा एक सहकारी प्राध्यापक मित्र पीएचडी करतोय. त्याचा विषय आहे की मुंबईतील रेल्वे कशा प्रकारे एक लहान विश्व आहेत -  स्वताचे वेगळेपण असणारे. या मोठ्या विश्वात आणखी लहान लहान विश्वे.  रेल्वेमुळे कशा पद्धतीने समाज आणि त्यातील घटक बांधले जातात वगैरे. या तत्सम तांत्रिक गोष्टी तो माझ्याशी बराच वेळ बोलत होता. तर या विषयावर बोलत असताना रेल्वेतील भिकारी, भजनी मंडळे, ग्रुप्स, पाकिटमार, भेळवाले असे अनेकविध विषय माझ्या डोळ्यासमोर आले. पुढे मागे यातील एका विषयावर आपणही पीएचडी करण्यास हरकत नाही.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्या रेल्वेची ओळख फार लहानपणीच झाली.  त्यावेळी आणि आतापण हा प्रवास फारसा सुखकारक आहे असे कधी वाटले नाही.  दिवाळीला बाबांच्या ऑफिसमधे लक्ष्मीपूजेसाठी आम्ही जात असू, त्यावेळी कांदिवली ते चर्नी रोड हा तासभराचा प्रवास कधी संपेल असे वाटे. कंटाळा येई.  शाळेत असताना एकदा मी फर्स्ट क्लास ने प्रवास केला होता. टिकिट मात्र सेकंड क्लासचे होतं. त्यावेळी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास काही माहित नव्हतं.  स्टेशनला टीसीने पकडलं आणि विचारलं 'टिकिट' ,  मग मी सेकंड क्लासचं टिकिट दाखवताच त्याने विचारलं की 'फर्स्ट क्लासने कशाला आलास?' मग मी  विचारलं की "फर्स्ट क्लास म्हणजे काय?" त्या बिचार्याला माझ्या अज्ञानाची दया आली असावी. त्याने मला सोडून दिलं.

कॉलेजमधे असताना पहाटे ५. ३० ची लोकल पकडायला लागायची. सातच्या ठोक्याला एप्रन घालून लॅबमधे हजर असलच पाहिजे असा दंडक होता.  उशीरा येणार्याना  कुलकर्णी सर अशा नजरेने पाहत की, अख्या वर्गात आपण 'होपलेस' आहोत आणि आपण रसायनशास्त्रावर काळिमा आहोत असे वाटे. सोबतीला आणखी एक जण असल्यावर हा काळिमा आणि होपलेस'पणा वाटून घेतल्यासारखे वाटे.  सकाळची ही लोकल सुटली की दहा मिनिटे थांबावे लागे.  पुलं म्हणतात तसे मुंबईकराचे घड्याळ हे त्याच्या नशिबालाच बांधलेले असते. 
नेहमीची लोकल चुकल्यानंतरचे दुःख फ़क्त मुंबईकरालाच अनुभवता येईल.  भल्या पहाटे देखील बसायला थर्ड सीट किंवा किमान चौथी सीट मिळणे कठीण. अशा वेळी ज्यांना विंडो सीट मिळते त्यांच्या नशिबात चांगले ग्रह असावेत.   सकाळच्या गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेन मधे चढणार्याचे कसब पाहून कौतुक वाटे.

लोकलच्या या गर्दीतही ग्रुप असतात. रोज रोज एकाच ट्रेनने जाणारे अनोळखी चेहरे हळू हळू एकमेकांना नावाने ओळखू लागतात.  "आपला माणूस" म्हणून त्याच्यासाठी जागा धरली जाते.  त्याला  निदान नीट उभं राहायला मिळावं अशी अपेक्षा असते.  मग या जागा अडवून ठेवण्यावरून भांडणे होतात.  क्वचित प्रसंगी मारामारी होते.  इथे लोक ग्रुपने मार खातातही आणि मार देतातही ! इथे बहुतेक सर्व सण साजरे केले जातात.  एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले जाते.  वयानुसार प्रत्येकाची यथोचित थट्टा मस्करी पण होते.  गटारीचे प्लान बनवले जातात, कधी कधी वडे समोसे आणले जातात.

या तास दीडतासाच्या प्रवासात काही भजनी मंडळी कोकलून इतर प्रवाशांचा जीव खातात.  निवडक काही अप्रतिम गाणारे असतात.  बाकी नुसता टाहो.  काही दिवसांपूर्वी विरार लोकलच्या लेडीज़ डब्यात एका बाळाचा जन्म झाला, तेव्हा लोकांना कोण आनंद ! गाडी वीस मिनिटे स्टेशन वर थांबली तरी एरवी सेकंदासाठी कुरबुरी करणार्या कुणीही तक्रार केली नाही. 

माधवनचा 'रहना है तेरे दिल में' आठवतोय ? त्यात तो दिया मिर्ज़ाचा हात हातात घेऊन तिचे भविष्य सांगताना म्हणतो की, "तेरे हातों में लम्बी रेखाएं नहीं है, सब लोकल ट्रेन की पटरियां ही है" किंवा लोकलच्या दरवाज्यात उभा राहून राणी मुखर्जी वर लाइन मारणारा 'साथिया'तला विवेक ओबेरॉय, शेवटची लोकल चुकल्यामुळे अनपेक्षित प्रसंगाना सामोरे जावे लागणारा 'एक चालीस की लास्ट लोकल ' मधला अभय देओल असो.  बॉलीवुडने लोकल ट्रेनला कथावस्तूचा एक भाग म्हणून स्वीकारलय.  'ह्यूगो' नावाच्या हॉलीवुड चित्रपटात तर रेल्वे स्टेशन वरच सर्व महत्वाच्या घटना घडतात.

विजय तेंडुलकरांची 'झपूर्झा' नावाची श्रुतिका आहे.  त्यात त्यांनी बॅकग्राउंडला लोकल ट्रेनचा प्लॉट घेतलाय. संध्याकाळी घरी परतणारा म्हातारा त्याच्या मनातले विचार, त्याचे कुटुंब, ट्रेनमधले प्रवासी या सर्वांचा त्यांनी ज्या शैलीने मिलाफ केलाय.. मानना ही पडेगा !!  ती श्रुतिका उत्तरोत्तर मनावर असा ताबा मिळवते की त्या ट्रेनमधील त्या कम्पार्टमेंट मधे आपणच आहोत असे वाटते.  वपुंचे 'कर्मचारी' पुस्तक लोकलकथांनी भरलेले आहे.

मुंबईवर जेव्हा दहशती हल्ला झाला तेव्हा लोकल ट्रेन्समधली निरागस माणसे हकनाक मारली गेली.  ते भयाण दिवस विसरणे कधीही शक्य नाही. पण या सर्व संकटांतूनही माणसे पुन्हा उभी राहिली.  पुन्हा जीवावर उदार होऊन स्टीलचा रॉड पकडत ऑफिसला जाऊ लागली.  "स्पिरिट ऑफ़ मुंबई"चे गोडवे गायले गेले, पण या सर्व धैर्यामागे शूरपणा नव्हताच. होती ती फ़क्त अगतिकता. एक दिवस कामावर गेलो नाही तर पगार बुडेल किंवा काहींच्या बाबतीत घरी चूलच पेटणार नाही ही परिस्थिती.

कष्टकर्यांच्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणार्या अस्सल मुंबईकराला अजूनही 'विंडो सीट'चच स्वप्न पडतं.

मंगळवार, ११ मार्च, २०१४

कथालेखन वगैरे

मरीन ड्राइवला पोचलो तेव्हा सहा वाजले होते. आणखी अर्ध्या तासात काळोख पडेल. वर्दळ नेहमीसारखीच.  मस्तपैकी जागा पकडली पाहिजे. निदान जवळपास डिस्टर्ब करणारं - काय करतोय म्हणून डोकावून पाहणारं कुणी नको. आज कुठल्याही परिस्थितीत रणजीतला कथेचा फर्स्ट ड्राफ्ट दिला पाहिजे.  गेला आठवडाभर आज देतो, उद्या देतो, कंटेंट रेडी आहे फ़क्त कागदावर उतरवायचय, उद्या पक्का - असं करून त्याला टाळत आलो. आणि आज सकाळी पावणे पाचला  त्याचा SMS आला की, 'I knw..u hvnt wrttn anythin..i'll KILL u'. सकाळी नऊला उठलो तेव्हा कुठे तो पाहिला.  मग अर्धा तास दात घासत, एक तास बाथरूममधे अंघोळ करताना आणि त्यानंतर १२ पर्यंत डोरेमॉन बघत काय लिहावं याचाच विचार करत बसलो आपण.  तरी काहीच srtike होत नव्हतं. रणजीतला हवीय एक लव स्टोरी.  मग त्यात पाणी घालून तो एकांकिका बनवणार किंवा अगदीच नाही जमलं तर शॉर्ट फ़िल्म.  त्याच्या अपेक्षाही भन्नाट असतात.  'अजून कुणालाही सुचली नसेल अशी प्रेमकथा लिही... रोजरोजचं नको त्यात...बस स्टॉप, ट्रेनमधली ओळख... मग ओळखीचं रूपांतर प्रेमात अशी रटाळ स्टोरी नकोच... काहीतरी फ्रेश हवं आणि सगळ्यांना अपील होणारं....' . एवढ सगळं हवय आणि ते पण सामान्य माणसाच्या बाबतीत. अशक्य ! आता इतक्या वर्षांत लोकं त्याच त्याच पध्दतीने प्रेमात पडत असतील तर आपण काय करणार ? CCD ला जाऊन कॉफ़ी पीत पीत  लिहूया असं ठरवलं दुपारी. कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी दीपक घेईल.  पण किती वेळ टेबल अडवून बसणार? आणि कुणी ओळखीचं भेटलं तर औपचारिक बोलावं लागणार.  त्यात आणखी वेळ जाणार.  त्यापेक्षा 'समुद्रकिनारी' खारे दाणे खात बसू.
आणि असा प्लान ठरला.

कठडयावर मांडी घालून बसलो, चपला नीट काढून पायाखाली घेतल्या.  बॅगेतून डायरी काढली.  दहा वेळा रिफिल बदललेलं montex चं लकी पेन.… त्याला एकदा ओठाला लावलं.  समोरच्या समुद्राकडे लॉन्ग पॉज घेऊन पाहिलं.  एक खोल दीर्घ श्वास आणि कागदावर लिहिणार तोच खांद्याला कुणी तरी हात लावला - "भाईसाब कुछ पैसा देगा?" एक सत्तर वर्षांची म्हातारी माझ्या बाजूला बसलीय.  पोशाखावरुन कॅथलिक वाटतेय.  चेहर्यावर सुरकुत्या आहेत.  बोलताना गाल आत ओढले जाताहेत.  केस पांढरेफटक.  ती पुन्हा म्हणाली "मेरा कोई नहीं है।  सब मर गया।  कुछ पैसा देगा?".
मी भिकार्यांना पैसे कधीच देत नाही.  म्हणजे आधी द्यायचो.  पण काही महिन्यांपूर्वी मंडळाच्या व्याख्यानमालेत एका समाजसेविकेचे लेक्चर ऐकले.  तिच्या मते भिकार्यांना पैसे देण्यापेक्षा खायला काही तरी द्या. बिस्किटचा पुडा द्या.  तिने इतक्या पोटतिड़कीने सांगितलं की, मी माझ्या बॅगेत पारले ग्लुको बिस्किटचे छोटे पुडे ठेऊ लागलो.  आला भिकारी की दे बिस्कीट.  एकदा एका लहान मुलाला तो पुडा  देताना त्याने सांगितलं "हम ये नहीं खाताय, क्रीम का दो ना".  मुलं ती मुलंच. रणजीतला ही गोष्ट सांगताच त्याने याच थीमवर शॉर्ट फ़िल्म केली.  त्या लहान मुलांचे कुरतडलेलं बालपण हास्याचा विषय होऊ नये असचं मला वाटत होतं.
त्यानंतर मी भिकार्यांना काहीच देत नाही. आपोआप ते कंटाळून पुढे जातात.
तरी पण त्या म्हातारीला म्हटलं 'पैसा नहीं है, कुछ खाओगी?"  तिने नकारार्थी मान हलवली. मग मी नायक आणि नायिका कुठे भेटतील या विचारात गुंतलो.  शाळा- कॉलेज - हॉस्पिटल - लाइब्रेरी - नाट्यगृह - चौपाटी - कॉमन भेळवाला.  किंवा असं केलं तर.… नायक आणि नायिका एकमेकांना फेसबुकवर ओळखतात चेहर्याने.
माझ्या बाजूला बसलेली म्हातारी दर थोड्या वेळाने बाजूच्या कपल्सकडे, इवनिंग वॉकला आलेल्यांकडे पैसे मागत होती "भाईसाब कुछ पैसा देगा?" हे वाक्य सारखं कानावर पडत होतं.  एकाने म्हातारीला सांगितल "आप मुझे बताओ आपकी कहानी'. मग म्हातारीने तेच "मुझे कोई नहीं है, अकेली हुँ, कुछ पैसा दोगे? दस रूपया?" हे सांगायला सुरवात केली.  त्या गृहस्थाने सर्व शांतपणे ऐकलं आणि तसाच निघुन गेला.  मग म्हातारीने तोंडातल्या तोंडात त्याला काही शिव्या दिल्या.

नायक आणि नायिका एकमेकांना भेटायचं ठरवतात.  पहिल्यांदाच भेटणार असतात.  वातावरण निर्मिती  करता येईल. कॉफ़ी शॉप की क्रॉसवर्ड ? क्रॉसवर्ड डन्.
माझ्या बाजूला बराच वेळ पासून एक माणूस फोन वर बोलतोय. ऐकायला स्पष्ट येतेय.
"जी मै मुकुल बात कर रहा हुँ। कपूर जी कैसे हो आप? पहचाना? सर मैं ऑडिशन के लिए आया था।  आपने कहा था, कुछ काम होगा तो बतावोगे।…जी सर, कल ही आये हो बैंगकॉक से ? कैसे रही आपकी ट्रीप ? जी बिजी हो.....ok सर कुछ काम हो तो बता दीजिये। …जी यही नंबर है मेरा।  बाय सर have a good day. "
मग दूसरा फ़ोन कॉल.
"जी क्या मैं शर्माजी से बात कर सकता हुँ? सर, मैं मुकुल, सेट पे मुलाकात हुई थी।  आपने कहा था कुछ काम होगा तो बतावोगे? हा..सर कैसी है अभी आपकी तबियत, ठीक है सर बाद में बात करेंगे। "
या संवादावरुन आणि वाक्यावाक्यागणिक टपकणार्या नम्रतेतून हे स्पष्ट कळत होतं कि ही व्यक्ती स्ट्रगलर आहे.
 मग आणखी काही फोन कॉल्स. तीच नकारघंटा. तो उदास चेहर्याने निघुन गेला.
नायिका शाळेत शिकवत असते. आपल्या नायिकेसाठी नायक एक नाटुकले लिहून देतो.  नायिका लहान मुलांना घेऊन ते नाटक बसवते. मग या सर्व घडामोडीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पुढे?
पुढे?
लग्न?
की इथेच शेवट करावा?
चटपटित संवाद नंतर लिहिता येतील. ब्लू प्रिंट ओकेय. पण तितकिशी भिड़त नाहीय मनाला.
ती म्हातारी कुठे गेली? आता तर इथे होती.